96 तामिळी भाषेतील चित्रपट - व्हेलेनटाइन डे स्पेशल लेख ( सकाळ पेपर्स स्मार्ट सोबती )

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 13 February, 2021 - 23:39

96

न सांगताच तू मला उमगते सारे, तुलाही कळतात मौनातले इशारे ....... सुधीर मोघे

96 तामिळी भाषेतील चित्रपट. या चित्रपटास २०१८ साली “फिल्म फेअर अवार्ड साउथ” मध्ये सर्वोत्तम अभिनेता आणि अभिनेत्री या परितोषकासह एकूण पाच बक्षिसे मिळाली होती. त्याचप्रमाणे , या चित्रपटाचे यश बघून कन्नड भाषेत” ९९” आणि तेलगु भाषेत जानू या नावाने दोन स्वतंत्र चित्रपटाची निर्मिती झाली होती. खर तर चित्रपटाच्या नावावरूनच रहस्यमय वाटणारा हा चित्रपट प्रत्यक्षात मात्र आगळी वेगळी प्रेमकथा आहे.
राम कृष्णमूर्ती ( विजय सेतुपती) मुलांना फोटोग्राफी शिकवणारा शिक्षक. एक दिवस आपल्या एका विद्यार्थिनी बरोबर गाडीतून प्रवास करत असताना, त्याची गाडी, तो ज्या गावात..तंजावर मध्ये वाढला, शिकला त्या गावातून जाते. आपल्या बरोबर असणाऱ्या विद्यार्थिनीला, तो त्याच्या स्मृतीतील त्या गावच्या खुणा सांगू लागतो. गावातील आठवणीना उजाळा देत चाललेल्या रामला त्याची लहानपणाची शाळा अचानक दिसते. शाळा बघितल्यावर त्याच्या भावना अधिकच उचंबळून येतात .. राम त्या शाळेशी एकेकाळी इतका एकरूप झालेला होता कि शाळा सोडून गेल्यावर वीस वर्षांनीही शाळेच्या पुढे बसलेला वृद्ध वाचमन सुद्धा त्याला ओळखतो. रामला आता राहवत नाही आणि तो त्या दिवशी शाळेला सुट्टी असूनही इमारतीत प्रवेश करतो.

माणसाच्या आयुष्यात गतस्मृतीची अनेक सुगंधी फुले असतात. त्यातीलच एक फुल म्हणजे शाळा. केव्हाही हातात घ्याव आणि त्याचा मनसोक्त सुवास घेत राहावा. शाळा बघितल्यावर रामच्या मनात हाच सुवास दरवळत आहे. शाळेची ती इमारत.... ते वर्ग .... परीक्षा झाल्यावर एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जावेसे वाटणारे कुतूहल...... ती घंटा.... जेव्हा लहनपणी वाजायची तेव्हा कधी हवीशी तर कधी नकोशी वाटायची ... पण आता त्याच घंटेभोवती रामच्या आठवणी रुंजी घालत आहेत. वर्गातील ते बाक ....जिथे अभ्यास केला आणि तितक्याच खोड्या करून शिक्षकांचा मार खाल्ला आणि ते विस्तीर्ण पटांगण जिथे मित्रांच्याबरोबर खेळलो, बागडलो... शाळेच्या वातावरणात त्याला मित्रांच्या आठवणी येऊ लागतात. तिथूनच तो संपर्कात असणाऱ्या एखाद्या मित्राला फोन करतो. “तू कुठे, मी कुठे” या गोष्टी होतात. एका मित्राकडून दुसऱ्या मित्राला फोन .. शेवटी त्याला कळते शाळेतल्या मित्रांचा एक व्हाटस ग्रुप आहे. राम त्या ग्रुप मध्ये add होतो. त्या ग्रुपचे नाव असते ९६

दोन महीन्यानंतरचा काळ लोटला आहे आणि सर्व मित्र गेट टू गेदर साठी एकत्र जमले आहेत. सर्व मित्रांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक वर्षांनी एकत्र भेटल्याने शाळेतल्या आठवणी, फेसबुक वर टाकलेल्या पोस्ट्स या साऱ्या गोष्टी आठवून सर्वजण धमाल करत आहेत. रामही या वातावरणाची मजा घेत आहे. पण अचानक कुणी जानकी या विद्यार्थिनीची आठवण काढत. जानुचे नाव निघाल्यावर राम काहीसा अस्वस्थ होतो. आणि पुढील चित्रपट आपल्याला flashback ने दिसू लागतो.

बालपणाची मर्यादा ओलांडून जेव्हा तारुण्याची चाहूल लागते त्यावेळी नव्या संवेदनाची जाणीव होते. जानकी ( त्रिशा ) हि रामची अशीच संवेदना आहे. त्याची शाळेमधली जवळची मैत्रीण. तिचे अस्तिव त्याला हवेहवेसे वाटत असते. जानकीच्या मनातही अशाच हळुवार भावना आहेत. जानकी स्वभावाने धीट आहे. आणि राम स्वभावाने बुजरा. जानकी वर त्याचे प्रेम असूनही तो तिच्याशी बोलत असताना लाजत असतो. तिच्या सुंदर आवाजातील “ यमुना के तट.. “गाणे जेव्हा त्याला ऐकावेसे वाटते त्यावेळी तो स्वत: तिला सांगत नाही. उलट मित्रांच्याकडून इच्छा व्यक्त करतो. पण रामच्या मनातील भावना जानकीला माहित आहे. ती नजरेनेच त्याच्याशी संवाद साधते. एका दृष्टीने प्रेमात पडल्याने हा “कळण्याचाच चाले कळण्याशी संवाद”अशी त्या दोघांची अवस्था आहे. पण इतक्या उत्कठ भावना असताना गेट टू गेदरच्या या प्रसंगी जानुचे नाव अचानक आल्यावर राम अस्वस्थ का होतो हे मात्र कोडे आहे.

काहीच वेळात जानकी गेट टू गेदरच्या ठिकाणी पोचते. ती येणार म्हल्यावर राम दूरवर एका कोपऱ्यात अस्वस्थपणे उभा आहे. जानकीला जेव्हा मैत्रिणींच्या कडून कळते रामही आला आहे त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. तिला रामचे येणे अपेक्षित नसावे. अनेक वर्षानंतर रामचा उल्लेख ती प्रत्यक्ष ऐकते आहे. शाळेतले ते दिवस काही वेळातच तिच्या डोळ्यासमोरून जातात.

....शाळेची सुट्टी संपल्यावर शाळेतला तो पहिला दिवस होता. वर्गात बाई हजेरी घेत होत्या. रामचे नाव बाई हजेरीच्या वेळी घेत नाहीत. जेव्हा एक विद्यार्थी विचारतो तेव्हा बाई सांगतात त्याचे नाव या रजिस्टरला नाही. जानकी अस्वस्थ होते. आणि चौकशी अंती कळते रामच्या वडिलांना बरेच कर्ज झाले होते म्हणून ते घर विकून तंजावर सोडून चेन्नईला गेले..

संध्याकाळचची वेळ. शाळा सुटली आहे. विद्यार्थी घरी गेले आहेत. वर्गात कसाबसा अंधुक प्रकाश. जानकी भाउक होऊन वर्गात येते आणि ज्या बाकावर राम नेहमी बसायचा तिथे जाऊन एकटीच बसते. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तिच्यासोबत “तो” वर्गातला बाक आणि अंधार या दोनच गोष्टी असतात.

आणि आता रामला ती आज भेटत आहे. राम खर तर व्यवसायिक फोटोग्राफर पण जानकीचे नाव काढल्यावर तो बुजरा झाला आहे. जानकीला बघितल्यावर शाळेत जशी धडधड त्याच्या छातीत होत होती तशीच आजही होत आहे. जानकीच्या मनातही अनेक गोष्टींचे काहूर आहे. बावीस वर्षानंतर ते दोघे पहिल्यांदाच भेटत आहेत. पण दोघांच्या मनात भावना त्याच आहेत. थोडावेळ गेल्यावर राम जानकीला जेवण आणून देतो. जानकी जेवतेहि पण त्यातले थोडे रामसाठी ठेवते. त्याच ताटातील जेवण राम हळुवारपणे संपवतो . “तू आणि मी अजुनी एकच आहोत” हे व्यक्त करणारा प्रसंग.

थोड्याच वेळात निरोप घेण्याची वेळ येते.सगळेजण भाऊक झाले आहेत. शाळेतले दिवस सगळ्यांना आठवतात. आणि मघाशी ज्या जागेत जल्लोष होता ती जागा अचानक रिती वाटू लागते. जागा सुशोभित केलेली रोषणाई बंद होते आणि तिथे अंधार पसरतो.

पण जानकी आणि राम यांच्या मनात मात्र प्रेमाचा प्रकाश तसाच तेवत आहे. जानकीला पहाटेच्या विमानाने सिंगापूरला जायचे आहे. तिला सोडण्याच्या निमित्ताने राम तिच्याबरोबर जातो. दोघेही एकत्र वेळ काढायचे ठरवतात.

रामने लग्न केले नाही.रामला कॉलेज मध्ये असताना एक मुलगी आवडली होती. पण जेव्हा त्या मुलीने लग्नाबाद्ल विचारले तेव्हा त्याने जानकीशी असणाऱ्या नात्याबाबत सांगून दिले. जानकीच्या स्मृती मनात ठेऊन राम तसाच एकटा राहिला.

जानकीचे लग्न झाले आहे. घरी लग्नाचा विषय चालू असताना ती आपल्या वडिलांना शाळेतल्या प्रेमाबद्दल काहीच सांगू शकली नाही. इतक्या वर्षात रामचा पत्ता तिला माहित नव्हता. लग्नाच्या मांडवात असतानाही तिला वाटायचं राम कुठून तरी येईल आणि तिला घेऊन जाईल. लग्न झाल्यावरहि जानकीला जेव्हा दु:खाचा प्रसंग येई तेव्हा ती तिच्यासमोर शाळेतल्या रामचा चेहरा समोर आणत जाई. राम तिचे सर्वस्व होते आणि आहे.

पण जानकीचे ऐकून झाल्यवर रामला आश्चर्य वाटते. शाळा सोडल्यावर तो जानकीला भेटायला चेन्नईवरून तंजावरला तिच्या कॉलेज मध्ये भेटायला गेलेला असतो. पण लेडीज कॉलेज असल्याने तो इमारतीत प्रवेश करू शकत नाही. जानकीला तो एका मुलीकडून निरोप देतो. पण मुलगी रामचे नाव विसरून जाते. आणि कुणी मवाली मुलगा असेल म्हणून जानकी तिकडे लक्ष देत नाही उलट चिडते. राम जानकीला हा प्रसंग सांगतो. जानकी जेव्हा हे सर्व ऐकते तेव्हा तुटून जाते. हॉटेल मधील आपल्या खोलीत ती पश्चातापाने रडते. केवळ एका चुकीने तिला आपल्या प्रेमाला मुकाव लागले आहे.

पण जानकीला कुतूहल या गोष्टीचे आहे रामला ती कोणत्या कॉलेज मध्ये आहे हे कसे कळले? राम तिच्या प्रेमात इतका होता कि तो सातत्याने तिच्या बद्दल सर्व माहिती ठेवायचा. दहावी बारावीत किती मार्क्स पडले येथपासून ते तिने पहिल्यांदा साडी केव्हा नेसली होती हि सर्व माहिती रामला आहे. दोघे हसत खेळत बोलत आहेत इतक्यात राम तिला तिने लग्नात कोणती साडी नेसली होती ते सुद्धा सांगतो. जानकीला वाटत असते राम मांडवात कुठेतरी असायला पाहिजे होता. होय ! राम जानकीच्या लग्नाला होता पण आपल्या प्रेयसीच्या लग्नाचे वातावरण बघून तो निघून गेला होता. दोघेही भाऊक होतात आणि वातावरण बदलण्यासाठी राम कॉफीचा विषय काढतो.

कॉफी शॉप मध्ये दोघे बसले आहेत. पण रामच्या विद्यार्थिनी कुणाचा तरी वाढदिवस आहे म्हणून त्याच हॉटेल मध्ये येतात आणि जानकीला रामची बायको समजतात. जानकी त्या गोष्टीला हरकत घेत नाही. तिच्या दृष्टीने प्रेम महत्वाचे आहे. लग्न नाही. विद्यार्थिनी जानकीला त्यांच्या प्रेमकहाणी बद्दल विचारतात. राम कॉलेज मध्ये जेव्हा आला होता तेव्हा जी मुलगी रामचे नाव सांगायला विसरली होती तीने जर बरोबर सांगितले असते तर प्रेम कसे जुळले असते हे जानकीच्या मनात शल्य आहेच. जानकी काही क्षण रम्य विचारात गढून जाते आणि आपली स्वप्नातली प्रेमकहाणी विद्यार्थिनीना सांगते. जो प्रसंग प्रेमभंगाचे कारण ठरला होता, ज्या प्रसंगाची जखम तिच्या मनावर होती तोच प्रसंग ती आपले प्रेम कसे जमले या दृष्टीने सांगते. काही वेळापूर्वी जी खंत तिच्या मानत होती त्यावर घातलेली हि स्वप्नाळू फुंकर

रात्रीची वेळ. पावसाची संतत धार. जानकी आणि राम आता रामच्या घरी आलेले आहेत. ती रात्र आठवणीची रात्र आहे. ती रात्र जानकीला राम बाबत वाटणाऱ्या काळजीची आहे. त्याच्या विषयीच्या भावनांची आहे. रामचे लग्न व्हावे, त्याला सुंदर बायको मिळावी असे तिला वाटत असते आणि रामच्या मनातच फक्त शाळेतल्या आठवणी नाहीत त्याने त्या प्रत्यक्षही जपून ठेवलेल्या आहेत. शाळेतला ड्रेस .. त्याने केलेली कविता ... खूण म्हणून ठेवलेले पुस्तक .. जानकी रामसाठी गाणे म्हणते जे तिने रामने आग्रह करूनही शाळेत म्हटले नसते. “ यमुना के तट पर मिले कान्हा” लाईट गेलेली असते पण बटरीच्या उजेडात राम तिचा चेहरा पाहतो. जो त्याला नेहमी स्मरणात ठेवायचा आहे.

निरोपाचा तो क्षण येतो. विमान तळावर जानकी आणि राम गाडीतून येत आहेत. जानकी एक हात गिअर वर ठेवते. राम आणि जानकी दोघे मिळून गिअर बदलतात. आयुष्याचा प्रवास दोघे साथीने करू शकले नाही पण मनातली हि सुप्त इच्छा ते दोघे पूर्ण करतात.

जानकीला निरोप दिल्यावर राम आता एकटाच आहे. दूरवर पाहत असताना त्याची नजर सहज मघाशी जानकीचा ड्रेस त्याने वाळत ठेवला होता तिकडे जाते. राम तिचा ड्रेस त्याने इतके दिवस शाळेतल्या ज्या आठवणी जतन करून ठेवल्या आहेत त्या बगेमध्ये ठेवून देतो. रामच्या आयुष्यात जानकीच्या असणाऱ्या आठवणीत अजुनी एका आठवणीची भर पडते आणि चित्रपट संपतो.

विजय सेतुपतीचा आणि त्रीशाचा उत्तम अभिनय आणि सी. प्रेमकुमार यांचे दिग्दर्शन. प्रेम या भावनेचे अनेक गहिरे रंग संभम, तळमळ, सांत्वन या चित्रपटात बघायला मिळतात. जानकीला बघितल्यावर रामच्या मनातील अधीर धडधड किंवा जानकीची शाळेत असतानाची रामला संभ्रमात टाकणारी धिटाई, किंवा लग्न महत्वाचे नाही प्रेम महत्वाचे आहे हे व्यक्त करणारी भाऊक जानकी या सर्वच गोष्टी दोन्ही अभिनेत्यांनी उत्तम साकारलेले आहे.

हि कथा वेगळी का वाटते? प्रेम अपूर्ण कधीच नसते पण त्याची पुर्ती जगराहटीच्या दृष्टीने विवाहात झाली नाही म्हणून राम आणि जानकीच्या भावना अर्थहीन होत्या असे दिग्दर्शक ठरवत नाही. आपल्या दिशेने निघून गेलेली जानू आणि एकटा राहिलेला राम आपल्याला अस्वस्थ करतात आणि सुधीर मोघेंची एक कविता सहज आठवते “ तुझी दिशा पूर्वीच निश्चित ती बदलण आता हिताच नाही. माझ्या पुरत बोलायचं तर मला माझी दिशाच नाही”

सतीश गजानन कुलकर्णी
९९६०७९६०१९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख!
फार सुंदर आणि आवडता सिनेमा...96 आणि जानू दोन्ही पाहिले ..
दोन्ही ही तितकेच आवडले...जितक्यांदा पाहते तितक्यांंदा आवडतो सिनेमा....गाणी अप्रतिम दोन्ही भाषेतली...

मी पहिला आहे हा चित्रपट, इतका सुंदर विषय, तितकेच सुंदर अक्टर्स, स्क्रीनप्लेय, आपल्या बॉलीवूड मध्ये असे picture बनणं अशक्य वाटतं मला