जावयाचा मान, जावयाचे लाड, जावयाची मज्जा ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2021 - 16:54

आमच्याकडे हुंडा वगैरे घेतला जात नाही, लग्नाचा खर्च वर वधू दोघे अर्धे अर्धे उचलतात, मानपान वगैरे फारसे नसते.. असे म्हणतात, प्रत्यक्ष अनुभवले नाही. कारण माझे लग्न आमच्यात झाले नाही.

माझ्या बायकोकडे मानपान, हुंडा, जावयाचे लग्नाआधीच भरभरून लाड पुरवणे वगैरे भरपूर चालते.. असे ती म्हणते, प्रत्यक्ष अनुभव नाही. कारण मी तिच्याशी पळून लग्न केले. त्यामुळे स्वाक्षरी करायला आलेल्या तिच्या बहिणींनी जी ईवलीशी क्याटबरी दिली तीच गोड मानून घेतली.

पुढे मात्र रीतसर लग्न झाले. तिच्याशीच. तेव्हा त्या आंतरजातीय विवाहात मानपानाचे राडे होऊ नयेत म्हणून दोन्ही बाजूंकडून कुठलाच घाट घातला गेला नाही. थोडक्यात जावयाचा मान काय असतो, त्याचे काय लाड होतात हे लग्नापुरते तरी मी मुकलोच.

लग्नानंतरही काही मला चांदीच्या ताटात जेवू घातले अश्यातला भाग नाही, पण चांगली माणसे होती. म्हणजे आहेत. तर कपडालत्ता वगैरे सणासुदीला देताहेत, हसून माझ्याशी बोलताहेत हेच तेव्हा माझ्यासाठी खूप होते.

अश्यात लग्नानंतर त्यांच्या गावाला जायचे ठरले. त्यांच्या कुलदैवताच्या दर्शनाला. त्याशिवाय लग्न कबूल होत नाही म्हणतात. हे त्यांच्यात आमच्यात नाही तर तुमच्या आमच्या सर्वांच्यातच असावे. म्हटलं, चला जाऊया.

ऑफिसला सेकंड हनीमूनला जातोय सांगत आठवड्याभराची सुट्टी टाकली. कारण देवदर्शनाला जातोय हे सांगणे माझ्या नास्तिक इमेजच्या विरुद्ध असल्याने लाजायला होत होते.
ईथे आमचा पहिलाच अजून झाला नाही वगैरे डायलॉग मारत आमच्या देवदर्शनाच्या वयात पोहोचलेल्या बॉसने उपकार करतोय असे भासवत रजा मंजूर केली. येताना मला पाव किलो स्ट्रॉबेरी आणायला विसरू नकोस हे सांगायला तो विसरला नाही. रजेच्या अर्जावर मी महाबळेश्वर लिहिले होते. आणि चाललो होतो बल्लाळेश्वरला. किंवा जे काही त्यांचे दैवत होते, आता नेमके नाव आठवत नाही. पण दोन्ही नावात ईश्वर असल्याने नरो वा कुंजरो वा सारखे पाप अर्धेच लागणार होते. आणि त्या पापातही बायको अर्धी वाटेकरी व्हायला राजीखुशी तयार होती. कारण ते तिथे जाऊन देवाकडून धुवून घेऊ असा तिला विश्वास होता.

असो, तर पॉईंटावर येऊया. त्यांची घरची गाडी होती. जावयाचा मान देत मला मागे सासूबाईंसोबत बसवले. बायकोला पुढे ड्रायव्हर शेजारी बसवले. ड्रायव्हर तिचाच सख्खा भाऊ असल्याने हरकत घ्यायचा प्रश्न नव्हता. देवदर्शनाला म्हणे असेच जायचे असते, येताना पाहिजे तर बसवतो तुम्हाला एका सीटवर. ऊच्च संस्कार, मोकळे विचार, दोन्ही एकदमच.

गाडी सुटली, गावाला पोहोचली, प्रवासात अध्येमध्ये मला खाऊ घातले होते. त्यात जावयाचा मान वगैरे फारसा नव्हता. सर्वांनी आपला आपला मेदूवडा, ईडलीवडा वगैरे खाल्ले होते. ते सुद्धा का हे रात्री गावाला पोहोचल्यावर मला समजले. जेव्हा ताटात वरणभात आणि भेंडीची भाजी समोर आली. तिलाच ऊचलून तिची शिवी बनवून वाढणार्‍यालाच परत द्यावी असे वाटले होते. हा तर जावयाचा शुद्ध अपमान होता. पण सांगतोय कोणाला, त्या अपमानाचेच लोणचे बनवून गिळला तसाच वरणभातासोबत.

वाटलं रात्रीची वेळ आहे, आपण उशीरा पोहोचलो असावे, गावच्याकडे ईतक्या उशीरा पाहुणचार करायची पद्धत नसावी. उद्या दुपारच्या जेवणाला साग्रसंगीत बेत असेल. पण कसले काय. सकाळ होताच मेहुण्याने मला उचलले, गाडीत टाकले, आणि नेले मार्केटमध्ये. तिथेच मिसळपाव खाऊ घातले. बोलताना समजले की गावच्या काकांचा राग आहे या आंतरजातीय विवाहावर. त्यामुळे काल रात्रीपासून माझ्याशी तो बोलायलाही आला नाही. मला त्याने शून्य फरक पडणार होता. पण काकूंनाही माझी सरबराई करण्यास सक्त बंदी होती. त्यामुळे आता हेच आपले जेवण आहे समजून मी लागलीच वाटीभर तर्री आणि दोन पाव एक्स्ट्रा मागवले.

दिवसभर मग ईकडे तिकडे गाव ऊंडरून आम्ही संध्याकाळी घरी परतलो. काकांचा राग तसाच. माझ्यासमोरून गेले. मी हसलो. त्यांनी मान वळवली. मला शून्य फरक पडणार होता. पण आमचे मेहुणे मेहुणे मेव्हण्यांचे पाव्हणे यांचे पित्त खवळले. सासूबाईंना म्हटले भावोजींचा आता अधिक अपमान सहन नाही करायचा. एवढ्या गोर्‍यागोमट्या पोराकडे बघून हसत नाही म्हणजे काय! चला, रात्रीच्या मुक्कामाला हॉटेल गाठू. खरेच, हे आधीच का केले नाही हे मला समजले नाही.

पण मग सासूबाई जड अंत:करणाने म्हणाल्या, हे आमचे गावातले मूळ घर आहे. घरात राहणार्‍यांकडून ईज्जत का नसेना पण सातबार्‍यात वाटा आहे. ईथे मुक्काम करणे, या घराच्या ऊंबरठ्याला पाय लागणे गरजेचे आहे. दोन दिवसांचाच प्रश्न होता म्हणून आलो. पण हे असे होत असेल तर आता जाऊया. रात्रीचे एखाद्या लॉजवर मुक्काम करूया आणि सकाळी देवदर्शनाला निघायचेच आहे.

पण मग मीच म्हटले, राहूया! कारण सकाळी माझ्या तिथल्या स्त्रीलिंगी मेहुण्यांनी माझ्याशी छान गप्पा मारल्या होत्या. त्या रात्रीही गप्पा मारायला येतील अशी आशा होती. त्यामुळे आता रात्रीचे नुसते झोपण्यापुरते कुठेतरी निवार्‍याची शोधाशोध करण्यापेक्षा ईथेच वरणभात आणि शेपूची भाजी खाऊन लवंडूया म्हटले.

रात्री अपेक्षेप्रमाणे त्या गप्पा मारायला आल्या. छान थट्टामस्करी झाली. एक ईवलीशी क्याटबरी त्यांनीही मला दिली. पोटात शेपू ओठात क्याटबरी. म्हणजे हे नाराजीचे खूळ फक्त वडीलधारी मंडळीच जोपासत होती हे स्पष्ट झाले. त्यामुळे सकाळी मुद्दाम मेहुण्यांनाच लाडाने टाटा बाय बाय करत निघालो. काका अजूनही मान फिरवूनच होते. पण आता त्याने मला मायनस फरक पडणार होता. कारण त्यांच्यासमोरच त्यांच्या पोरींना मुंबईला आलात की आमच्याकडे यायचे बरे का असे लाडीक आमंत्रण मी दिले होते. आणि त्यांनीही ते आमंत्रण तितक्याच लाडीकपणे स्विकारले होते. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी हा मेहुणींचा मान कुठल्याही जावयाला चुकला नाही हेच खरे.

क्रमशः
असे बोलून ईथेच थांबायचा विचार आहे. पण त्याने लोकांना वाटेल की शीर्षकातला जावयाचा मान, ते जावयाचे लाड, ती जावयाची मज्जा हीच की काय Wink
पण तसे नाहीये हं. तो देवदर्शनाचा मानाचा किस्सा तर अजून पुढे आहे.
पण खरेच खूप झोप आल्याने क्षमस्व आणि क्रमशः .........

------------

भाग २ ईथे टिचकी मारून वाचू शकता - नव्हे वाचाच Happy
https://www.maayboli.com/node/78106

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शून्य फरक पडणार होता म्हणत बराच फरक पडला हे कळतंय. सासरी मिळत नाही म्हणून मायबोलीवर अटेन्शन सिकींग बरीच वर्ष चालू आहे की.

छान.
डौल जावयाच्या मानाचा रं, डौल मानाचा. येग धाग्याच्या बानाचा रं, येग बानाचा. Wink
पुभाप्र.

>>कारण माझे लग्न आमच्यात झाले नाही.<<
या कारणा वरुन अजुनहि रोष बाळगतात हे वाचुन थोडं नवल वाटलं. पुर्वि अशी उदाहरणं दिसायची, नाइन्टि सिक्स क्लॅन बाहेर लग्न केलं कि, टाका वाळीत. इथे तुला स्कोप आहे ऋन्म्या, त्या काकांचं मतपरिवर्तन करुन सलोखा करण्याचा... Happy

शांत चौरंगावर किंवा पाटावर बसून लग्न करावं रे... सही करून करायचे असेल तरी खुर्चीत बसावं. आता तिचा काका काय पीटी उषा काय की पळणार्‍यावर प्रसन्न होईल??!! असो, चाललं आहे सगळं चांगलं त्यावरून तू जिंकलसं - शाबाश!!

मी आतापर्यंत एक अनुभवलं आहे की लग्नकार्यात जवळपास सगळ्याच नातेवाईकांचा इगो जागा झालेला असतो. त्यांच्या मनाविरुद्ध जरा काही झालं की राग येतो. काही तर एव्हडे भयानक असतात की कानाखाली मारायला पण पुढेमागे पाहत नाहीत भले जिथे काम करतात तिथे त्यांना हाडतुड होत असेल पण लग्नात असे काय येतात जसे की हेच कंपनीचे मालक आहेत.

छान लिहीलं आहे. आवडलं.
महत्वाचं म्हणजे शीर्षक वाचून वाटलं तसं आता जावयाचा मान या विषयावर मायबोलीला कामाला लावलेले नाही. Happy
आमच्याकडे आंजा ची तिसरी पिढी आहे. त्यामुळे देवदर्शन, प्रथा, परंपरा यांना फारसे महत्व नाही. अर्थात गावाकडचे लोक (वडीलांचे) बरेच सनातनी आहेत. त्यामुळे रिलेट होता आले तुमच्या अनुभवाशी.

अरे पण पळून लग्न कशाला करायचं. बसायचं की एकाजागी. >>> Lol
खरंच, पळून जाणे म्हणजे रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रेन असं काहीही न वापरता हातात बॅगा घेऊन धावत सुटलेले जोडपे असे चित्र येते डोळ्यासमोर.

ऋन्मेष किती थापा मारशील अरे
काय तर म्हणे
खरेच खूप झोप आल्याने क्षमस्व आणि क्रमशः .........

काहीही हा ऋ

अवांतर -
पुणे परिसरात, घरच्यांच्या विरोधामुळे पळून जाऊन करायला लागणारी लग्ने आळंदीला होता. एका धावणार्‍या जोडीला त्यांच्या आंजा विवाहाच्या आधी आम्ही म्हणत असू पळून जाऊन लग्न करायचं असेल तर सांगा एखाद्या रवीवारी लाँग रनला म्हणून निघू, आळंदी पर्यंत पळत जाऊ म्हणजे साधारण हाफ मॅरॅथॉन होईल आणि मग तुम्ही तिकडे लग्न करा आम्ही साक्षीदार राहू. पण कसंच काय दोघांच्याही घरचे समंजस निघाले आणि
व्यवस्थित साग्रसंगीत लग्न लागले दोघांचे; एक जगात भारी संधी होती ती हुकली.

धन्यवाद,
काल मायबोलीवरच एका धाग्यावर प्रतिसाद लिहिताना जाणवले की या अनुभवाला स्वतंत्र लिहावे. लिहिताना काही संदर्भ द्यावे लागतील हे समजले तसे ते देत गेलो. त्यात जरा वाढले आणि क्रमशः करावे लागले. पुढच्या भागात संपवतो Happy

@सायो,
सासरी मिळत नाही म्हणून मायबोलीवर अटेन्शन सिकींग बरीच वर्ष चालू आहे की.
>>>>>>>
सासरी मिळते आता छानसे अटेंशन Happy वाटल्यास पुढच्या भागात देतो त्याचे संदर्भ.
बाकी मायबोली मला माहेर असल्यासारखी आपली वाटते. आपल्याच घरी अटेंशन मिळवायची धडपड कश्याला करेन. उलट माझे सरासरी दर्जाचे वैयक्तिक लिखाण ईथे लोकं वाचतात, त्यावर व्यक्त होतात, या ईथे मिळणार्‍या आपुलकीचा प्रेमाचा मी कायम ऋणीच राहील.

@ राज,
या कारणा वरुन अजुनहि रोष बाळगतात हे वाचुन थोडं नवल वाटलं. >>>>> याचे नवल वाटते याचे मला नवल वाटले Happy कित्येक ग्रामीण भागात स्थिती आणखी अवघड असेल, शहरांत देखील कित्येक ठिकाणी जे बाहेरून दिसते वा दाखवतात ते तसेच असेलच असे नाही. बाहेरून शांत वाटणार्‍या डोहात खडा मारल्यावरच समजते आतून काय वर येतेय.

@ सीमंतिनी,
असो, चाललं आहे सगळं चांगलं त्यावरून तू जिंकलसं - शाबाश!! >>> धन्यवाद, पण सध्या ईथे ज्यांच्याशी माझे संबंध येतात त्यांना जिंकायला डीडीएलजेच्या शाहरूखसारखे मुद्दाम फार एफर्टस घ्यावे लागले नाहीत Happy जे जसा आहे तसाच वागलो, काम झाले ..

@ सस्मित,
काकांशी सलोखा झाला का मग? हे देखिये अगले एपिसोडमे का? >>>>>>> तिथून निघालो आणि काकांचा चेहराही विसरलो. त्यांच्याशी जुळवून घेत राहायचे नव्हते म्हणून तर वर म्हटले की ते काय विचार करतात माझ्याबद्दल, वा माझा काय अपमान करतात याने मला शून्य फरक पडणार होता. बाकी मध्यंतरी त्या मेहुण्यांनी लग्नाचे आमंत्रण दिलेले. पण त्यांच्या गावीच असल्याने जाता आले नाही.

@ रानभुली,
महत्वाचं म्हणजे शीर्षक वाचून वाटलं तसं आता जावयाचा मान या विषयावर मायबोलीला कामाला लावलेले नाही. Happy
>>>
हाहा विचार तर तसाच होता. पण लिहिताना वेगळा ट्रॅक लागला Proud

@ हर्पेन,
चेक धागा टाईम, ३.२४. माझी झोपायची वेळ ३ ची आहे. तब्बल २४ मिनिटे जागरण. नाही हो जमत या वयात. आता तो गर्लफ्रेंड वाला ऋन्मेष नाही राहिलो मी Wink
बरी आठवण केलीत, या वयावर एक स्वतंत्र धागा यायला हवा.

@ आशूचॅम्प,
सर्व प्रतिसादांना उत्तरे एकाच पोस्टमध्ये दिलेत. प्रतिसाद वाढवल्याचा आरोप हा वय कमी केल्याच्या आरोपापेक्षा जास्त जिव्हारी लागतो Happy

छान किस्सा.
एक दाट शक्यता. त्यांना आंतरजातीय विवाह म्हणुन तेढ नसावी. तुझ्या ऑर्कुट समुहातले / मायबोलीकर असावेत ते, म्हणुन खार खाऊन असतील आधीपासूनच. आंतरजातीय विवाह हे सांगायचे कारण.

हा हा.. पण तसे नसणार, अन्यथा ते माझ्याशी भांडले असते, चार शालजोडीतले हाणले असते, पण असे इग्नोर नसते केले Proud

पुर्वि अशी उदाहरणं दिसायची, नाइन्टि सिक्स क्लॅन बाहेर लग्न केलं कि, टाका वाळीत > ते अजुनही चालते. ते एकवेळ ठीक आहे पण कडूच्या घरात लग्न केल्याने खून झालेले ऐकलेत.

पण कडूच्या घरात लग्न केल्याने खून झालेले ऐकलेत.>> कडू म्हणजे नावडती जात/घराणे का?

जेवणाच्या पंगतीत मटणाच्या मुद्यावरून कानाखाली मारलेली मी प्रत्यक्षात पाहिले.>>> हो, अशीच भिती तयार झालेली. आज वा उद्या रात्री वेळ मिळाला तर संपवतो किस्सा.

लग्नकार्यात जवळपास सगळ्याच नातेवाईकांचा इगो जागा झालेला असतो. त्यांच्या मनाविरुद्ध जरा काही झालं की राग येतो.>>>>>>
खरं आहे,. लग्नकार्यात एकत्र आलेले कुटुंब आपण जॉबला जातो त्या कार्पोरेट कल्चरसारखेच असते. ईगो क्लॅश होणे स्वाभाविक असल्यासारखे होतातच. मी पूर्वीच्या जॉबला ज्युनिअर असताना एकदा एका मीटींगला कॉन्फरन्स रूममध्ये बॉसच्या म्हणजे सेक्शन मॅनेजरच्या शेजारच्या खुर्चीवर बसलो. त्या खुर्चीवर डिजाईन मॅनेजरला बसायचे असायचे. आता सगळ्या खुर्च्या एकसारख्याच आहेत त्या रूममम्ध्ये, पण बॉसच्या शेजारी बसायचा मान आपला तिथे हा कालपरवाचा आलेला पोरगा कसा बसला याचा त्याला राग. आणि आता हे त्याला थेट बोलताही येत नव्हते म्हणून मग नंतर कामात उगाचच तो गरज नसताना मी ज्युनिअर आहे आणि तो सिनिअर हे मला व ईतरांना दाखवू लागला.
सेम लग्नातही कोणाला कुठे बसवायचे, स्टेजवर कोणाला किती मान द्यायचा, कोणाचा स्पेशल फोटो काढायचा यावरून फार मानपानाचे ईगो क्लॅशेस होतात. बरेच लोकं बोलून दाखवत नाही पण मनात ठेवतात. त्यात आंतरजातीय असेल तर समोरची पार्टी देखील आपल्याला किती मान देतेय हे डोक्यात असते. हायला आता समोरच्या पक्षात कोण किती जवळचा आहे आणि त्याला काय मान अपेक्षित आहे याचा अंदाज आपण कसा बांधायचा... काय तर म्हणे मी मुलीचा मामा आणि मला मुलाकडच्यांनी तिथे कोपर्‍यात उभे केले.. अरे बाबा मग टाक गळ्यात एखादी पाटी की मी मुलीचा मामा आहे.. त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवूनच कोणाचेच काहीही स्पेशल लाड करायचे नाही, आणि ज्यांना अशी वागणूक झेपत नाही त्यांना आमंत्रणच द्यायचे नाही हे ठरवले होते. आणि तरीही आमचीच सहाशे लोकं होती लग्नात. यार एकतर हे ईंडियाचे पॉप्युलेशन खूप आहे, त्यात झाडून सारे लग्नात येतात. उगाच कोणी दुखावले जाऊ नये म्हणून ओळखपाळख नसणार्‍यांकडे बघूनही उगाच हसून हसून जबड्याचे तेरा वाजले होते.

पण सध्या ईथे ज्यांच्याशी माझे संबंध येतात त्यांना जिंकायला डीडीएलजेच्या शाहरूखसारखे मुद्दाम फार एफर्टस घ्यावे लागले नाहीत Happy जे जसा आहे तसाच वागलो, काम झाले ..>>>>>> इतका सर्वगुणसंपन्न, समंजस, निर्व्यसनी, भला जावई असेल तर कुठलेच सासरचे जास्त दिवस नाराज राहू शकत नाहीत.

मीं इतरत्र पूर्वी पोस्ट केलेलं हें व्यंचि, शीर्षक वाचून इथे टाकण्याचा मोह मला झाला हें खरं -

आणि , येताना माझ्या आईला भेटून या . तुमचा भेदरलेला चेहरा प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय तिची खात्रीच पटत नाही कीं मीं इथे सुखात आहे !!20210128_223458.jpg

भाऊ Lol

भाऊंचं चित्र एकदम भारी !
भाऊ तुम्ही प्रत्येक वेळी सिक्सरच मारता आणी प्रत्येक वेळी चेंडू स्टेडियम बाहेरच पाठवता, धिस इज नॉट फेअर !

Pages