आधार

Submitted by तुषार विष्णू खांबल on 7 February, 2021 - 04:21

अंकुर कलामंच महाराष्ट्र
उपक्रम काव्य लेखन
७/२/२०२१
विषय -आधार

शीर्षक - आधार

विस्कटलेल्या तिच्या आयुष्याची
घडी त्याने सावरली होती
मधुचंद्राच्या पहिल्या रात्रीस
नववधू थोडी बावरली होती

त्याच्या हाताचा स्पर्श
तिला भूतकाळात नेत होता
घडलेल्या विकृत घटनांना
काहीसा उजाळा देत होता

पहिल्या मिलनाची रात्र
तिला काळरात्र वाटत होती
त्या रात्रीसारखीच स्वतःला ती
निराधार वाटत होती

त्याच्या प्रत्येक कृतीला
ती मध्येच तोडत होती
स्वर्ग-सुखाचे हे सारे क्षण
ती त्या अतिप्रसंगांशी जोडत होती

तिच्या मनातील घालमेल
आता त्याला कळली होती
समजूतदारपणे त्याची पावले
दरवाजाकडे वळली होती

पुन्हा फिरून माघारी
तो तिच्या जवळ आला
मन मोकळे बोलून तिच्याशी
तिला धीर देऊन गेला

पाठमोरा देह त्याचा
तिला आता देवदूत भासत होता
त्याच्या प्रत्येक शब्दात तिला
आयुष्याचा आधार दिसत होता

शब्दरचना
@ तुषार खांबल
विरार - पश्चिम
फोटो साभार - गूगल

Group content visibility: 
Use group defaults