कायापालट..... दुसरी आवृत्ती

Submitted by स्वरुप on 6 February, 2021 - 09:12

"कायापालट..... दुसरी आवृत्ती"

घाव स्वताचे अभिमानास्तव मिरवत गेले
हाल भोगले स्वताच आता गिरवत गेले...
मजल्यांवरती मजले नवनवे चढवत गेले
जुनेजाणते वाडे हळूहळू हरवत गेले...

तीर तटीचे उभ्याउभ्या बावचळून गेले
पाणी नदीचे रंग हजारो बदलत गेले...
जो आला तो रमला येथे रहाता झाला
नवे नकाशे जुन्या वेशींना हाकलत गेले...

बोली गेली, बाणा गेला, बंधही गेले
निगुतीने जपलेले वैभव विसरत गेले...
शुद्ध चवीचे आता काही उरले नाही
अखंड नव्याने काहीबाही मिसळत गेले...

दिसता जागा घरे नवनवी वसवत गेले
वरुनि सांधता आतुन काही उसवत गेले...
"मी जगात भारी" शेजाऱ्यांवर ठसवत गेले
कुणास ठाऊक कोण कुणाला फसवत गेले....

-स्वरूप कुलकर्णी

(तळटीप: दुसरी आवृत्ती लिहण्याचे कारण असे की ही कविता काही वर्षांपूर्वी मायबोलीवरच प्रसिध्द केली होती... पण बऱ्याचदा आपल्याच कविता परत वाचताना कधीकधी त्यात काही बदल करावेसे वाटतात.... असेच काही बदल करुन ती कविता इथे परत प्रसिद्ध करत आहे म्हणून दुसरी आवृत्ती)

मूळ कवितेची लिंक: (रिक्षा Wink )
https://www.maayboli.com/node/2538

Group content visibility: 
Use group defaults