असे आगळा राम आदर्शमूर्ती

Submitted by पुरंदरे शशांक on 20 January, 2021 - 05:23

असे आगळा राम आदर्शमूर्ती

जना दावूनी श्रेष्ठ कर्तव्यपूर्ती
वरी भाविका देतसे दिव्य भक्ती
अशा राघवासी स्मरावे भजावे
किती रामदासे जना बोधवावे

असे आगळा राम आदर्शमूर्ती
तया टाळूनी वाउगेची पूजीती
भ्रमा वाढवोनी रती आत्मघाती
अभक्ते स्वये देशही नासविती

बहु भक्त झाले इथे राघवाचे
पुढे गोडवे दिव्य ते सद्गुणाचे
तया पाहता कीव ये दुर्जनाचे
रवी तेज ते येई का काजव्याचे

जना उद्धराया स्वये राम येई
तया सांडूनी नष्ट ते दुष्ट ध्यायी
भ्रमाने भ्रमाते जगी वाढवीती
जनासी तरी व्यर्थचि घोळविती

................................................................

कर्तव्यदक्ष म्हणून प्रभू श्रीराम जसे प्रसिद्ध आहेत, तसेच भाविकांना दिव्य भक्ती प्रदान करणारे म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत. अशा प्रभूंचे स्मरण, भजन..पूजन करावे या प्रबोधनाकरता श्री समर्थ रामदास स्वामींनी आपले उभे आयुष्य वेचले.

अशा आदर्शमूर्तीला टाळून जे अभक्त व रामद्वेष्टे इतरच भलत्या सलत्याच्या नादी लागतात ते पूर्णतः भ्रमित झालेले असून आत्मघातासच प्रवृृृृृत्त झालेले आहेत. इतकेच नव्हे तर ते अभक्त अपप्रचार करुन देशातील जनतेची दिशाभूल करुन देश नासवित आहेत.

या अभक्तांच्या हे लक्षातही येत नाहीये की श्री तुलसीदास, श्री समर्थ, इ. अनेक महान रामभक्त संपूर्ण भारतवर्षात होऊन गेलेत. श्रीरामांचे सद्गुण सर्वसामान्यांना कळावेत याकरता या रामभक्तांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्यापुढे या दुर्जनांचे चमकणे हे काजव्याने सूर्यापुढे चमकण्यासारखे अति क्षुल्लक आहे.

प्रभू श्रीरामांचा अवतार हा भाविकांचा उद्धार करण्यासाठी झालेला आहे. त्या प्रभूंचाच द्वेष करुन ही दुर्जन मंडळी दुष्ट शक्तींना पूजण्यात गुंतलेली आहेत. स्वतः भ्रमात राहून इतरांनाही या भ्रमात ओढण्याचे अति निंद्य काम ही दुर्जन मंडळी करीत आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!
आपल्याकडे विरुद्ध भक्ती अशीही संकल्पना आहे ना? म्हणजे हे जे रामाचे विरोधी आहेत ते सगळं आयुष्य विरोध करण्यात खर्च करतात. म्हणजे तेही रामाचं नाव घेतात, चिंतन करतात.
कृष्ण-कंस, राम-रावण. त्यांचा अंत रामाच्या हस्ते होण्याचं भाग्य लाभतं.