कबंध घोडेस्वाराचे रहस्य : भाग ५ (अंतिम)

Submitted by पायस on 20 January, 2021 - 02:01

कबंध घोडेस्वाराच्या रहस्याचा हा अंतिम भाग! ट्रॅडिशनल मिस्टरी मी पूर्वी कधी लिहिलेली नाही. त्यामुळे सर्व धागे जुळून आले असतील अशी मी केवळ आशाच करू शकतो पण जर तसे न झाल्यास तो माझ्या मर्यादित लेखनकौशल्याचा दोष समजावा. हे कथानक इथे प्रकाशित करू दिल्याबद्दल मी मायबोली प्रशासानचा सदैव ऋणी असेन. वेळोवेळी प्रतिसाद देऊन हुरुप वाढवणार्‍या मायबोलीकर वाचकांचे विशेष आभार! आशा आहे हा भागही तुमच्या पसंतीस उतरेल.

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/77880

-------------------------------------

"एक्सलेंट" आय क्राईड.
"एलमेंटरी" सेड ही.

- वॉटसन आणि होम्स, द क्रूक्ड मॅन, मेमॉयर्स ऑफ शेरलॉक होम्स

-------------------------------------

होस्बोर्ग मॅनोर गाढ झोपेत होता. दोन सावल्या अंधारात हालचाल करत होत्या. एक सावली संग्रहालयाच्या खोलीची लोटलेली खिडकी ढकलून बाहेर पडली. दुसरी पागेचे कुलूप उघडून घोडा बाहेर काढत होती. पहिल्या सावलीने तो घोडा ताब्यात घेतला आणि वायुवेगाने ती चॅपलच्या दिशेने निघाली. दुसर्‍या सावलीने खिशातून तंबाखूची चंची बाहेर काढली. तिच्यातून थोडी तंबाखू आणि एक तंबाखूचे पान घेऊन जाडसरशी सिगारेट वळली. दुसर्‍या खिशातून काडेपेटी बाहेर काढेपर्यंत फर्रर्र असा आवाज झाला.
"हॅलो बर्टी" अ‍ॅलेक्सी हातात पेटती काडी घेऊन उभा होता.

*******

चॅपलच्या छतांमधल्या वेलींच्या जाळ्यातून पांढुरक्या चांदणे सांडले होते. त्यातून ती व्यक्ती सावधगिरीने गाभार्‍याकडे चालली होता. तिने भसाभसा गाभार्‍याच्या विटा उपसून काढल्या. सर्व कागदपत्रे शाबूत असलेली पाहून तिचा जीव भांड्यात पडला. कागदपत्रे काखोटीला मारून जलदगतीने तिने उर्वरित वस्तु आणि मुख्य म्हणजे परदेशी चलनाचा ढीग केला.
"दा!" आता फक्त हे अवशेष जाळून टाकले की परत चॅपलकडे यायची जरुर नाही.
"न्येत!"
चमकून मागे पाहिले तर हातभर अंतरावर ख्रिस दिसला.
"नु, एतो निकुदा ने पायद्येत" (वेल, धिस वोन्ट डू)
........
"पीटर!"

~*~*~*~*~*~

अजूनही साखरझोपेची वेळ होती. मॅनोरमधले अजूनही बहुतांश लोक झोपेतच होते. गॅरेथ, ख्रिस व अ‍ॅलेक्सी लायब्ररीत बसले होते. अ‍ॅलेक्सीने एकीकडे चहा बनवला. थोड्याच वेळात आयरीन तिथे आली. आयरीन आल्यानंतर ख्रिसने जॉनला इशारा केला आणि जॉनने लायब्ररीचे दार बंद केले.

"जेव्हा मी लंडनहून कॅनहॅम्प्टनची ट्रेन पकडली तेव्हा मला जराशीही कल्पना नव्हती की या प्रकरणाचे फलस्वरुप एक मोठी असामी आमच्या हाती लागणार आहे."
"पीटर? तो एवढा महत्त्वपूर्ण आहे?" गॅरेथ ख्रिसच्या आग्रहास्तव चॅपलमध्ये हजर राहिला होता. ती गुप्त खोली पाहून त्याचे डोके चक्रावले होते पण चॅपलची डागडुजी करायला वडलांचा विरोध का होता हे त्याच्या ध्यानात आले होते.
"नॉट नेसेसरीली तो स्वतः. पण त्याच्याकडची कागदपत्रे. पण ते गौण आहे. मुख्य प्रश्न असा की हे कबंध घोडेस्वाराचे प्रकरण काय होते? सर्व काही सिद्ध करणे तर माझ्या शक्तीपलीकडचे आहे पण एक चांगला अंदाज नेहमीच बांधता येतो. तेच करण्याचा मी गेला आठवडाभर प्रयत्न केला."
ख्रिसने चहाचा एक मोठा घोट घेतला आणि आपला तर्क मांडण्यास सुरुवात केली.

*********

घटकाभर आपण मर्डर वेपनचा प्रश्न बाजूला ठेवू नाहीतर पुन्हा गाडी विजय आणि त्या तलवारीवर घसरते. मी पहिला प्रश्न हा विचारला की सर गॅविनना मारण्यासाठी शिरच्छेद हीच पद्धत का वापरली गेली? ग्रीन नाईटची दंतकथा खूप प्रसिद्ध असली तरी तिच्या कॅनहॅम्प्टनमधील रुपांतरात तुम्ही ग्रीन नाईटवर जो काही वार करता, तो वार ग्रीन नाईट परत करतो. मग ग्रीन नाईटला भोसकले तरी पुरेसे नाही का? तसेही ग्रीन नाईटची दंतकथा वापरायची गरज होती का? कारण शिरच्छेद घरातच किंवा घराजवळ केला तरी विजयवर संशय गेलाच असता.

शिरच्छेद करण्यामागे मला चार कारणे सुचतात - १) खून करण्यासाठी शिरच्छेद वगळता इतर कोणताही निर्धोक मार्ग उपलब्ध नाही, २) खून कोणाचा झाला हे कळू द्यायचे नाही, ३) प्रेत हलवणे सोईचे जावे, ४) शिरच्छेद करण्यालायक एकमेव व्यक्तीवर संशय यावा. यातील दुसरे कारण बाद, कारण डोके लपवण्याचा प्रयत्न केला गेला नाही. चौथ्या कारणात मेख अशी आहे की ग्रीन नाईटची दंतकथा वापरण्यामागे मग काहीच कारण उरत नाही. पहिल्या कारणात अर्थातच फारसा अर्थ नाही कारण सर गॅविनना मारण्याचे इतर अनेक मार्ग असू शकतात. मग असे धरून चालण्यास वाव आहे की शिरच्छेदामागचा मुख्य हेतु हा प्रेत हलवण्याची सोय हे असावे.
याचा अर्थ प्रेत चॅपलमध्ये हलवण्याचे आधीपासूनच निश्चित होते. तसे असेल तर ग्रीन नाईटची दंतकथा वापरण्यास सबळ कारण मिळते. केविन यांच्या पदाचा मान राखूनही असेच म्हणावे लागेल की ते तडफदार पोलिस अधिकारी नाहीत. त्यांना ग्रीन नाईटवर बिल फाडण्याची संधी दिली तर ते भराभर केस गुंडाळून मोकळे होतील यात शंका नसावी. याचा अर्थ विजय असो वा नसो, खुन्याला ग्रीन नाईटचा वापर करून केविनकरवी या प्रकरणाचा लवकरात लवकर सोक्षामोक्ष लावायचा होता. उलट विजय आल्यामुळे लंडनच्या हस्तक्षेपाने खुन्याची अडचणच झाली. इथे विजयचा संबंध माझ्यापुरता संपतो. त्याला डिडक्शनमधून काढून टाकल्यास विचार करणे सोपे जाते.

आता प्रेत हलवण्याची सोय या धाग्याचा पाठपुरावा करूयात. गॅविनना सकाळी आठपर्यंत निश्चित चॅपलमध्ये हलवले गेले होते. या मधल्या वेळात तुम्ही सर्व घोड्यावर बसून मॅनोरबाहेर पडला होतात. यात गॅविन यांची सकाळची रपेटही आली. ही सकाळची रपेट सर्वात संशयास्पद आहे कारण गॅविनना पाहिले असे कोणी नाही. आल्बसने त्यांना पाठमोरे पाहिले ते खुर्चीत. पागेतून बाहेर पडतानाही आल्बस व बर्टीने त्यांना ओझरतेच पाहिले. 'एवढ्या सकाळी इतर कोणी रपेटीस जात नाही' यावरुन रपेटीला गेलेले गॅविनच होते असा अंदाज बांधला गेला. पण बर्टीची जबानी खरी मानायची तर पागेचे कुलूप गॅविननी स्वतःची किल्ली वापरून उघडले. मग ती किल्ली गॅविनच्या शवासोबत सापडायला हवी. पण गॅरेथच्या म्हणण्यानुसार ती किल्ली घरीच आहे. दोन शक्यता - १) खुन्याने किल्ल्या परत जागच्या जागी आणून ठेवल्या. तसे असेल तर गॅरेथ वगळता कोणीही खून करू शकत नाही कारण ग्रेटाच्या जबानीनुसार गॅविन आणि गॅरेथ या दोघांनाच लायब्ररीतल्या तिजोरीचे कॉम्बिनेशन ठाऊक आहे. गॅरेथ किल्ल्या परत आणून स्वतःवर संशय का ओढवून घेईल? त्यामुळे ही शक्यता बाद! २) पागेचे कुलूप गॅविननी उघडलेच नाही. पागेच्या किल्ल्या आल्बस व बर्टीकडे आहेत. गॅविननी पागेचे कुलूप उघडले असावे हे थेटपणे केवळ बर्टीची जबानी सांगते. आल्बस जर पळत आला नसता तर त्याला पागेतून घोडा बाहेर पडताना दिसलाही नसता. आल्बसने जर पागेचे कुलूप उघडले असते तर बर्टीची जबानी त्याने आल्बसला पागेकडून परत येताना पाहिले अशी हवी. त्यामुळे आल्बसने पागेचे कुलूप उघडले नसावे. अर्थात बर्टी व आल्बस दोघेही संगनमताने खोटे बोलण्याची शक्यता आहेच. पण सर्वात सरळ, साधा निष्कर्ष असा की बर्टी खोटे बोलला व पागेचे कुलूप त्याने उघडले. आणि सरळ, साधे निष्कर्ष कधीही श्रेयस्कर!

आता आपल्याकडे एक संशयित आहे. बर्टीच्या हालचालींचा विचार करू. बर्टी सकाळी उठला होता आणि त्याने पागेचे कुलूप वापरून कोणाला तरी घोडा उपलब्ध करून दिला. हे कोणीतरी प्रेताचा वाहक असलेच पाहिजे. बर्टीची स्वयंपाकघरातली खोली आणि लायब्ररी यामध्ये पश्चिमेच्या क्लॉयस्टरमधून थेट रस्ता जातो. चहा देऊन आल्बस वरच्या मजल्यावर गेला की तिथे कोणाचेही लक्ष जाऊ शकत नाही. आल्बसला लायब्ररीत सर गॅविन पाठमोरे दिसले म्हणण्यापेक्षा, त्यांचे पिंगट केस असलेले डोके दिसले. माझ्यामते खुर्चीत आधार देऊन कापलेले डोके तिथे पाठमोरे ठेवलेले असावे. 'त्या' व्यक्तीला आल्बसची पाठ वळताच लायब्ररीतून डोके ताब्यात घेऊन बर्टीची भेट घेणे सहज शक्य आहे. अशा वेळी सर गॅविन लायब्ररी लॉक करायचे विसरले हा बहाणाही तयार होतो कारण लायब्ररी लॉक करणे या दोघांना शक्य नाही. एवढे पटले तर हा धागा आणखी पुढे नेता येतो.

जर डोके लायब्ररीत असेल तर धड पागेत किंवा स्वयंपाकघरातच आणले गेलेच पाहिजे. पण हे सर्व सकाळी सातला जर घडले असेल याचा अर्थ मधल्या वेळेत बर्टी धड घेऊन आला. म्हणजे खून सकाळी सातच्या आधी झालाच पाहिजे. जर खुनाची वेळ चुकवायची असेल तर धड थंड जागेत ठेवायला हवे कारण डॉक्टर अंदाज बांधताना आधी पायांकडे बघतील. अशा खूप कमी जागा आहेत - स्वयंपाकघरातील वाईन सेलार आणि घड्याळाचा मनोरा. वाईन सेलारमध्ये हवा काहीशी गार असली तरी अपेक्षित गारठा तिथे नसतो. घड्याळाच्या मनोर्‍यात मात्र अशी परिस्थिती निर्माण करणे तुलनेने सोपे आहे. खासकरून जर प्रेत केवळ पहाटेच्या वेळात तिथे राहणार असेल तर ते अजूनच सोपे बनते. त्यामुळे खून मनोर्‍यात करून रात्रभर प्रेत तिथेच लपवले गेले असे मानता येते.

आता आपण मर्डर वेपनचा विचार करू शकतो. डॉक्टरांचा अहवाल, रिगर मॉर्टिसनुसार ठरवलेली वेळ वगळता, अचूक असावा. म्हणजे वेपन तीन फूट लांब आहे. खंडा तलवार वेपन असू शकत नाही. विजय वगळता कोणालाही ती चालवता येत नाही आणि मनोर्‍यात ती तलवार उभी, आडवी, तिरकी तारकी फिरवल्याचा मागमूस नाही. मग तीन फूट लांब मनोर्‍यात काय आहे? घड्याळाचा मिनिट काटा! धिस कुड बी अ टफ वन टू स्वॅलो. एक सलग वार म्हणजे नक्की काय? जोवर हत्यार तुम्हाला जखमेतून उपसून काढून पुन्हा जखमेवरच आघात करावा लागत नाही तोवर आपण 'एक सलग वार' च्या चौकटीतच फिरतो. जर शिरच्छेद करायचा असेल तर नुसते अजस्त्र हत्यार असून उपयोग नाही, प्रचंड ताकदही हवी. तलवारबाज जेव्हा स्टान्स घेतात तेव्हा ते शरीरात स्थितिज उर्जा साठवतात. वार करतेवेळी याचे गतिज उर्जेत रुपांतर होते. तरीही बव्हंशी वेळी ही ताकद कमीच पडते. अशावेळी वेगाचा (धावत येणे, गलोटिनप्रमाणे वरून खाली आघात करणे) वापर केला जाऊ शकतो. पण वेग नसेल तर स्थितिज उर्जेचाच वापर झाला पाहिजे. अशी उर्जा मानवी शरीरात नसली तरी या घड्याळ्याच्या यंत्रणेत आहे. याचा पुरावाही आहे. महिन्याभरापूर्वी घड्याळ का बिघडले? कारण घड्याळात पुरेशी ताकद आहे का नाही याची चाचणी घेतली गेली. माझ्यामते गवतावर झोपवून किंवा गवतात बांधून हरीण किंवा तत्सम प्राणी वापरला गेला असावा. तीन इंची गवताचे ठोकळे याचा पुरावा आहे. म्हणूनच गॅविन यांचे घड्याळही चोरले. कारण ग्रँट येऊन बिघाड दुरुस्ती करेपर्यंत कोणाच्या डोळ्यावर हा बिघाड येता कामा नये. त्यासाठी टेम्पररी रिसेट करता एक घड्याळ हाताशी असणे कधीही सोयीचे! यात एक अडचण अशी की बॉडी काट्याच्या मार्गात कशी आणावी? कारण नुसती बॉडी धरुन उभे राहणे अवघड आहे. खाली काहीतरी सपोर्ट प्लॅटफॉर्म हवा.

ही सगळी प्रोसेस भाजी चिरल्यासारखी आहे. तासकाट्यावर हा जामानिमा रेलावा. तो तुमचा कटिंग बोर्ड. पायांना वजन बांधावे जेणेकरून मिनिट काटा गळ्यात रुतला की सी सॉ प्रमाणे बॉडी फ्लिप होऊ नये. आपण भाजी दुसर्‍या हाताने धरून ठेवतो तसेच. मग मिनिट काट्याला आपल्या वेगाने काम करू द्यावे. यात घाई करण्याचे काहीच कारण नाही कारण अजस्त्र मनोर्‍यातील सर्व यंत्रणा जीव खाऊन काटा खोलवर रुतवत नेणार आहे. ही सर्व प्रक्रिया अतिशय सावकाश घडली असावी. एखाद्या बांबूत चाकू रुतवून, वरून ठोकून ठोकून त्याचे दोन तुकडे करतात तसेच काहीसे. गॅविनना अखेरच्या क्षणांमध्ये प्रचंड यातना झाल्या असल्या पाहिजेत. म्हणूनच त्यांच्या तोंडात बोळा कोंबला होता. यास आणखी एक पुरावा म्हणजे गॅविनच्या पाठीवरची जखम. मानेपासून साधारण तीन इंच अंतरावरची जखम म्हणजे रुतलेला तासकाटा! तसेच कितीही झाले तरी मिनिट काटा काही तलवार नाही. तो अडकून बसण्याची शक्यता बरीच आहे. सहसा आपण सुरी मागेपुढे करून अडकलेली सुरी बाहेर काढतो किंवा चिरण्याची क्रिया पूर्ण करतो. इथे सुरी हलू शकत नाही. त्यामुळे कोणीतरी मनोर्‍यात उभे राहून गॅविननाच काट्याच्या लंब दिशेने पुढेमागे केले असावे. फॉरेन्सिक अहवालात अशा खुणांचा उल्लेख आहे. जर असे काहीतरी झाले असेल तर खून सव्वातीनला होणे सयुक्तिक ठरेल कारण त्यावेळेस तासकाटा जवळपास जमिनीस समांतर असेल आणि मिनिट काटा संथ गतीने आपल्या भक्ष्याकडे सरकत राहील. तासकाटाही थोडा खाली सरकला असेलच पण त्याने कट अगदी सरळ दिसणार नाही आणि तलवारीच्या जखमेच्या जवळ जाईल. आणि हा अंदाज लिंडाच्या हकीगतीशी मिळता जुळता आहे.

लिंडाला रात्री तीन ते चारच्या दरम्यान कधीतरी ग्रीन नाईट दिसला. आपण ही वेळ सव्वातीन धरु शकतो. कडाड असा आलेला आवाज म्हणजे जेव्हा घड्याळाच्या यंत्रणेवर प्रचंड जोर पडून तिने कुरकुर केली तो क्षण. आणि धप्प असा आवाज फक्त डोके खाली पडण्याचाच असू शकतो. मनोर्‍यातील व्यक्तीला डोके उचलण्यासाठी खाली येण्यास वेळ लागू शकतो. एवढ्या वेळात जर कोणी, खासकरून सावध झोप असलेली लिंडा, जागे झाले तर तिच्यासमोर डोके उचलणे धोकादायक आहे. त्यामुळे दुसरी कोणी व्यक्ती तिथे कबंध घोडेस्वार बनून हजर हवीच हवी. इथे अर्थातच लिंडाला सोयीस्कररित्या संशयाच्या घेर्‍यातून बाजूला काढले जाते आहे पण तिला संशयित बनवल्यास गॅरेथलाही संशयित धरावे लागेल. जोवर आपल्या थिअरीत काहीतरी त्रुटी येत नाही तोवर ही अ‍ॅडिशनल कॉम्प्लिकेशन आणण्याचे काही कारण नाही. मग ही दुसरी व्यक्ती कोण? इथे लिंडाच्या 'सहा फूट' वर विचार गरजेचा आहे. जेव्हा आपण कोणाची उंची सांगतो तेव्हा उंची डोके ते पाय अशी सांगतो. लिंडाचा पूर्ण विश्वास आहे की पडलेले डोके ग्रीन नाईटचेच आहे तर ती ते डोके आणि ग्रीन नाईटची उंची याची साधारण बेरीज करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच हाही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की रॉबर्टला दिसलेला नाईट साडेपाच फुटी होता. थोडक्यात त्या चिलखताची उंची साडेपाच फुटापेक्षाही कमी पाहिजे. बहुतेक मानवी डोकी अंदाजे सहा ते आठ इंची असतात. रॉबर्ट व लिंडाचे अंदाज अचूक नसतील हे गृहीत धरले तरी या व्यक्तीची उंची पाच फूट चार इंचापेक्षा अधिक असणे दुरापास्त आहे. त्यातही रॉबर्टचा अंदाज चुकण्याची शक्यता अधिक आहे कारण त्याने नाईटला लिंडापेक्षा अधिक दुरून पाहिले. आणखी एक शक्यता अशीही असू शकते की 'त्या' ग्रीन नाईटने वेगळे चिलखत वापरले होते. पण लिंडाचा घोडेस्वार पाच फूट चार इंचांपेक्षाही बुटका हवा. पाच फूट चार इंचांपेक्षा कमी उंचीच्या तीनच व्यक्ती आहेत - लिंडा स्वतः, ग्रेटा आणि आयरीन!

ग्रेटा व आयरीन पैकी कोण हा आपला पुढील प्रश्न. आल्बस व ग्रेटा एकत्र असल्यामुळे ग्रेटाला हे सर्व आल्बसच्या मदतीशिवाय करणे अशक्य आहे. पण मग आल्बस यात सामील असेल तर त्याने बर्टीच्या खोट्या जबानीतील कच्चे दुवे लपवण्याचा प्रयत्न केला असता. त्यामुळे एकमेव संशयित आयरीन! आयरीनच्या हालचालींमध्ये तशाही अनेक विसंगती आहेत. आयरीन खोलीतून बाहेर आलेली कोणाला दिसली नाही. गॅरेथला केवळ तिची हाक ऐकू आली. मॅनोरच्या रचनेनुसार ही हाक देणारी आयरीन किमान वर्‍हांड्यात यायला हवी. याने ती लिंडाच्या खोलीच्या अगदी जवळ येते. अशावेळी लिंडाला तिची हाक ऐकू आली नाही हे दुरापास्त आहे. पण जर ती हाक संग्रहालयाच्या खोलीतून दिली असेल तर? बहुतेक तरी जेव्हा बर्टी मॅनोरबाहेर पडला तेव्हा त्याने गुपचूप संग्रहालयाच्या खोलीची खिडकी उघडी ठेवली. आयरीनने तीनच्या सुमारास घड्याळांच्या टोल्यांच्या आवाजात आपल्या हालचाली लपवून ती खोली गाठली असावी आणि कबंध घोडेस्वाराचे सोंग वठवून ती बाहेर पडली असावी. बर्टी बाहेर घोडा घेऊन तिची वाट बघत असू शकेल. लिंडाला घाबरवल्यानंतर तिने घोडा मोकळा सोडून दिला असावा. घोडा हुशार जनावर आहे. फिरून फिरून तो परत पागेत येईलच. तोपर्यंत इतर सर्व बाहेर पडले की बर्टी त्याला परत आत घ्यायला तिथे हजर राहू शकतो. समजा तो इतरांना सापडला तरीही बर्टीवर हलगर्जीपणाचा ठप्पा लागण्याची शक्यता अधिक आहे. लायब्ररीत डोके ठेवणारी आयरीनच! ग्रेटा जेव्हा दहा पंधरा मिनिटे ग्रेट हॉलमध्ये नव्हती तेव्हा आयरीन सहज हे काम करू शकते.

यात धोका एकच! गॅरेथ बाहेर पडण्याआधी आयरीनला उठवेल. अशा वेळी त्याला प्रवृत्त करायला, ग्रीन नाईटच्या पाठलागावर जाण्यास उत्तेजन देणारे कोणीतरी हवे. त्या मजल्यावर अशी एकच व्यक्ती आहे - पीटर! पीटर जवळपास ताबडतोब गॅरेथच्या खोलीबाहेर हजर होता. कारण त्याला शक्य तितक्या लवकर गॅरेथला मॅनोरबाहेर काढायचे होते. सुदैवाने गॅरेथही ग्रीन नाईटच्या मागावर जाण्यास उत्सुक होता. यावरून थिअरी बनते ती अशी - काही कारण काढून सर गॅविनना लायब्ररीतून बाहेर काढून मनोर्‍यात नेण्यात आले. त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना मनोर्‍यातच बंदी बनवून ठेवले गेले. रात्री तीनच्या सुमारास बर्टीने त्यांना डेथ ट्रॅपमध्ये ठेवले. रक्ताचे डाग मर्यादित राहावेत म्हणून खाली गवत वापरले असावे. सव्वातीन वाजता त्यांचा शिरच्छेद झाला. पडलेले मुंडके कबंध घोडेस्वाराच्या वेषातील आयरीनने परत मॅनोरमध्ये आणले. दुसर्‍या दिवशी या मुंडक्याचा वापर करून आल्बसला भासवण्यात आले की गॅविन जिवंत आहेत. सकाळी सर्व उठण्याआधी बर्टीने धड पागेत आणले असावे. ग्रेटा सहालाच उठली असणार पण तिला टोले सात ऐकू आले असावेत कारण घड्याळ पुढे गेले होते. एवढा मोठा एरर रिसेट करायलाच हवा. बर्टीने हा एरर प्रथम रिसेट ग्रेटा उठल्यानंतर केला असावा. ग्रँट येईपर्यंत हे काम तिघे आलटून पालटून करत असावेत. मग पीटरने (कारण गॅविन यांच्याइतकीच उंची केवळ त्याचीच आहे) गॅविनचे प्रेत चॅपलमध्ये नेऊन टाकले. इथे एक धोका होता की कोणा चौकस व्यक्तीने जर गाभारा खणलाच तर पीटरची महत्त्वपूर्ण कागदपत्रे, परदेशी चलन इ. सापडू शकते. पण असे कोणी करण्याची शक्यता कमी कारण चॅपलमध्ये कसल्याही संघर्षाच्या खुणा न आढळल्याने पोलिस खून कुठे झाला असेल याची जागा शोधण्यावर लक्ष केंद्रित करतील. आणि झालेही तसेच! वर्थ द रिस्क! विजय नसता तर हे सर्व खापर ग्रीन नाईटवर फोडले जाऊन प्रकरण मिटले असते. पण विजयच्या उपस्थितीमुळे या बेतात अशी काही पाचर मारली गेली की ती निघता निघाली नाही.

~*~*~*~*~*~

गॅरेथ थरथरत होता. त्याने आयरीनकडे नजर टाकली. आयरीन ख्रिसकडे एकटक बघत होती. तिचा चेहरा दगडी होता. तिने शांतपणे विचारले
"तुमच्याकडे पुरावा नसल्यामुळे तुम्ही मृत्युपत्राचा सापळा रचलात?"
"हो आणि नाही. तू ते चिलखत वापरल्याचा पुरावा आम्हाला सापडला. गॅविनचे पिंगट केस पीटरने अ‍ॅलेक्सीला एक्स्प्लेन करण्याचा प्रयत्न केला. पण एका स्त्रीचे लांब केसही तिथे आम्हाला सापडले. थिअरीनुसार तू वगळता दुसर्‍या कोणा स्त्रीला अशी संधी मिळणे कठीण आहे. गॅविनचे चोरीला गेलेले घड्याळ आम्ही बर्टीच्या खोलीतून हस्तगत केले. तुम्ही कितीही टाळलेत तरी मनोर्‍याच्या भिंतीवर शिंतोडे उडणारच. इतक्या दिवसानंतर वाळलेले रक्त आता राखाडी दिसू लागते. तसे पॅचेस आम्ही हस्तगत केले आहेत. गॅविन यांचे पिंगट केसही मनोर्‍यात सापडलेत. त्यांच्या दातांत मिळालेले धागे तुमच्या रुमालांपैकी एका धाग्याशी मॅच झाले. पीटरवर आमचा संशय पहिल्या दिवसापासूनच होता. पण या सापळ्यामार्फत सर्व अंदाजांवर शिक्कामोर्तब झाले."
जॉनने पुरावे गोळा करण्याचे काम चोख बजावले होते.
"पीटरवर तुमचा संशय होता? का?"
"वेल, इतिहास अभ्यासक थाप अगदीच पपलू आहे. दुसरे म्हणजे त्याचा तथाकथित जिव्हाजडपणा! त्याला थ, ध, घ उच्चारता येत नाहीत. जर त्याचे घराणे शतकाभरापूर्वी इंग्लंडमध्ये आले असेल तर त्याचे उच्चारण इंग्रजीला जवळ हवे. पण त्याचे उच्चार युरोपीय भूखंडाला जवळ जाते. त्याचे आडनाव तो सिमियन सांगतो जे फ्रेंच आहे. पण तो स्वतःला जर्मन भासवतो. कारण त्याचे स्वरांचे उच्चारण जर्मनला अधिक जवळ आहे, फ्रेंच स्वर खूपच भिन्न आहेत. तो लगेच पकडला गेला असता. म्हणजे तो अशी कोणती तरी भाषा बोलतो जिच्यात थ, ध, घ इ. नाहीत. रशियन अशी एक भाषा आहे. तसेच त्यांच्यातील सिम्यॉन Семён चा अपभ्रंश सायमन किंवा सिमियन केला जाऊ शकतो. तो पीटर सिमियन नसून प्योत्र सिम्यॉन आहे. गॅविन यांच्या रशियन व्यापारी संबंधांबाबत कळल्यानंतर माझी खात्रीच पटली की पीटरच यामागचा सूत्रधार आहे."
"एक मिनिट!" अ‍ॅलेक्सी मध्ये बोलला. "पण तरीही हा गुन्हा तीन जणांनी मिळून केला असेल हा संशय तुला का आला?"
"ग्रीन नाईटची दंतकथा! बहुधा तरी ही कल्पना लेडी आयरीनची असावी. जर त्या दंतकथेनुसार वागायचे तर तुम्हाला ग्रीन नाईट हवा - लेडी आयरीन. त्याची बायको हवी - या प्रकरणात मी अंदाज बांधतो आहे की ते भूमिका बर्टीच्या वाट्यास आली आहे. आणि तिसरी भूमिका राहते मॉर्गन ल फे ची. पीटर या प्रकरणातील मॉर्गन ल फे, अर्थात पडद्यामागचा सूत्रधार!"
"पण का?" गॅरेथचा कंठ दाटला होता.
"का म्हणजे? ग्रीन नाईटच्या बुरख्या आड लपणे ....."
"ख्रिस, गॅरेथ मोटिव्ह विषयी विचारतो आहे." अ‍ॅलेक्सीला ख्रिस मोटिव्ह वाला डिटेक्टिव्ह नसल्याचे एव्हाना कळून चुकले होते.
"आय गेस, यासाठीच तुम्ही मला इथे बोलावले आहे." आता बोलण्याची पाळी आयरीनची होती.

~*~*~*~*~*~

मला कळायला लागण्याच्या आधीच आई गेली. किरा, माझी सावत्र आई, सर्वसामान्य स्त्री होती. तिने आपल्या परीने माझे लाड केले पण त्यात हातचे राखल्याची भावना होती. आमची कधी भांडणे नाही झाली पण फारसे जुळलेही नाही. अ‍ॅना, माझ्या आईची मेड, तिच्याशी माझे चांगले जुळायचे. मेड असल्यामुळे अ‍ॅना कधी थेट बोलली नाही, पण हळू हळू माझ्या आईची झालेली फरफट माझ्यापर्यंत पोहोचली. गॅविनमधल्या व्यापार्‍याने समाजाच्या दृष्टीने काही चूक केले नसेलही. पण मला हे कसे पटेल? आता माझ्यापुढे एकच मार्ग होता, आपले आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगायचे. सुदैवाने बाबांनी वयात येईपर्यंत फारशी आडकाठी केली नाही. त्यानंतर मी बर्‍याच जणांना नकार दिला. बाबा नाराज झाले पण प्रत्यक्षात तरी त्यांनी काही कृति केली नाही. आणि अशातच मॅनोरमध्ये बर्टी आला.

बर्टी आणि ग्रेगरीमध्ये पुष्कळ साम्य आहे. तुमच्या समोर आम्ही त्याला मितभाषी वागायला लावले असले तरी तो बोलघेवडा, प्रेमळ नवरा आहे. हो, आम्ही लपून लग्न केले. बाबांना हे मान्य नव्हते. ते तर नुसती कुणकुण लागताच बर्टीला घरातून काढायला निघाले होते. जर त्यांच्यापर्यंत लग्नाची बातमी आली असती तर त्यांनी ते खरेही केले असते. म्हणून बर्टीला मॅनोरमध्ये खोली दिलेली नाही. शक्य असते तर आम्ही कधीच पळून गेलो असतो पण माझ्यात अलीनासोबत गॅविनचाही अंश आहे. आर्थिक स्थिती चांगली नसताना पळून जाणे व्यवहार्य नाही हे मी जाणून होते. बाबांच्या मृत्युपत्रात माझ्यासाठी काही सोय असल्याचे मी जाणून होते. तोवर रेटायचे. आणि अशातच विजेचा लोळ कोसळावा तशी बातमी पीटरने दिली.

पीटरचा आणि माझा संबंध तोपर्यंत नामधारीच होता. त्याच्या मार्फत गशेलची भांडी, चित्रे वगैरे मी युरोपातून मागवत असे. मला हा अंदाज होता की पीटर दिसतो तसा साधा नाही. पण तो येऊन बोलेपर्यंत मला त्याच्या आणि बाबांतील संबंधांची कल्पना नव्हती. तुमच्या कानावर आले असेलच की रशिया आपले आर्थिक धोरण बदलत आहे. या बदलांमुळे आता बाबांना पीटरची गरज नव्हती. पीटरने बाबांचे जुने मृत्युपत्र पाहिले होते. त्यानुसार पीटरलाही काही धनलाभ होणार होता. पीटरच्या म्हणण्यानुसार त्यात असा क्लॉज होता की बर्टी मॅनोरमधून बाहेर पडलाच पाहिजे आणि मी अविवाहित असेन तर मला काहीच संपत्ती मिळणार नाही. लवकरच त्यात बदल होऊन पीटरलाही बेदखल केले जाईल अशी पीटरची खात्री होती. हे होण्याआधीच मी व बर्टीने लग्न करणे आणि बाबांची हत्या करणे श्रेयस्कर ठरेल असे पीटरने सुचवले.

बर्टीचा या योजनेला विरोध होता. पण माझ्यातील ग्रीन नाईट बाहेर काढण्यात पीटर यशस्वी झाला. पीटरच्या शब्दांत सांगायचे तर गॅविनने ग्रेगरीवर केलेल्या वाराची परतफेड कधी झालीच नाही, तीही झाली असती. पीटरला ही माहिती कशी मिळाली हा प्रश्न मला तेव्हा नाही पडला पण त्याने अ‍ॅनाची भेट घेतली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रीन नाईटवर खापर फोडण्याची कल्पना मात्र माझी होती. बाकी योजना पीटरने बनवली. बर्टीचा योजना बनवण्यात सहभाग अगदी नगण्य होता. तो केवळ माझ्या शब्दाखातर यात सहभागी झाला. आम्ही महिन्याभरापूर्वी चाचणी घेतली तेव्हा माझा विश्वास बसला की पीटरने कल्पना केल्याप्रमाणे ते घड्याळ शिरच्छेद करू शकेल. तुमच्या तपशीलांत काही त्रुटी राहिली असेल तर माझ्या तरी ती लक्षात आली नाही. साधारण घटनाक्रम तुम्ही म्हणालात तसाच घडला. रात्री बर्टीने बाबांच्या खाण्यात गुंगीचे औषध मिसळले होते. लायब्ररीचे दार लोटलेले ठेवून त्याने बाबांना संग्रहालयाच्या खोलीमार्गे मॅनोरबाहेर काढले. आल्बसने दार बंद केल्यानंतर तो वळसा घालून पूर्वेच्या भिंतीकडे गेला आणि तिथून त्याने बाबांना घड्याळ्याच्या मनोर्‍यात नेले. तिथून पुढचे तुम्हाला ठाऊक आहेच.

~*~*~*~*~*~

थोडा वेळ सर्व शांत बसले होते. समोरचा चहा गार झाला असला तरी त्याला कोणीही हात लावला नाही, अगदी ख्रिसनेही नाही. गॅरेथ तळहातात चेहरा खुपसून बसला होता. ख्रिस पुन्हा बोलू लागला.
"रॉबर्टला दिसलेला ग्रीन नाईट बहुधा तरी स्वतः सर गॅविन होते. ग्रीन चॅपलपासून इतरांना दूर ठेवण्यात त्यांचाही फायदा होता. तसेच आयरीन, पीटरने तुला सांगितलेले मृत्युपत्र खोटे होते. गॅविन वारल्यानंतर तुला हवा तो जोडीदार निवडण्याची मुभा तर होतीच पण त्याशिवाय महिन्याभरापूर्वी त्यांनी वकिलांना हे पत्रही दिले होते."
पत्रात एकच ओळ होती - 'जर आयरीन विवाहित असलीच तर आयरीनच्या पसंतीस माझी संमती आहे.'
"बहुतेक तरी त्यांना पीटरकडून काही घातपात होण्याची शंका आली होती. जाता जाता एक सत्कार्य करण्याचा प्रयत्न त्यांनी केला इतपत संशयाचा फायदा मी तरी त्यांना द्यायला तयार आहे."
इतका वेळ धरलेला संयम सोडून आयरीनच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ख्रिसने इशारा करताच अ‍ॅलेक्सी तिला दुसर्‍या खोलीत घेऊन गेला.
"गॅरेथ. आय नो धिस इज टू मच टू डायजेस्ट इन अ नाईट पण मला तुला या प्रकरणातील शेवटचा टप्पा समजावावाच लागेल."
गॅरेथने ख्रिसच्या परवानगीने चिरुट शिलगावला. दोन झुरके घेतल्यानंतर त्याने ख्रिसला खूण केली.
"आपण खटला उभा केला तर गॅविनच्या खुनासोबत पीटरवर बेकायदेशीर परदेशी गुंतवणूकीचाही खटला उभारला जाईल. यात आयरीन व बर्टीच्या बरोबरीने गॅविनचेही नाव गोवले जाईल. पण याने गॅविन यांच्या खुन्यांना उचित शिक्षा मिळेल. किंवा मी सर मॅक्सवेलच्या मदतीने हे सर्व प्रकरण पीटरच्या अंगावर ढकलू शकतो. व्यापारिक वैमनस्यातून त्याने खून केला असे भासवता येण्यास वाव आहे. त्यासाठी त्याला कोणा रशियन साथीदार्‍याची मदत झाली असे सांगता येऊ शकते. यासाठी आल्बस व बर्टीच्या जबान्या बदलाव्या लागतील पण ते तितकेसे अवघड नाही."
"पण हे तुम्ही मला का सांगता आहात?"
"कारण गॅरेथ तू गॅविन नाहीस! मला खात्री आहे की तुलाही हे पटतंय की या सर्वामागचा सूत्रधार पीटर आहे. आयरीन-बर्टी जोडी तुला मान्य आहे का नाही हे मी सांगू शकत नाही पण ते दोघे मूळचे गुन्हेगार प्रवृत्तीचे नाहीत. बर्टी तर मुळीच नाही आणि आयरीनमधला कडवटपणाही अ‍ॅनाकडून आलेला आणि पीटरने चेतवलेला. त्यांनी कॅनहॅम्प्टनमधून कायमचे बाहेर पडणे आणि होस्बोर्ग इतिहासाची उरली सुरली निशाणी मिटवणे इतपत पुरेसे ठरावे. हे माझे वैयक्तिक मत आहे. तुला जर त्यांना कायदेशीर शिक्षा करायची असेलच तर माझे तुला पूर्ण सहकार्य राहील."
गॅरेथ ख्रिसच्या डोळ्यांत रोखून बराच वेळ बघत राहिला. चिरुट विझवून तो उठून उभा राहिला. भेट संपल्याचा तो संकेत होता.
"मी विचार करेन. निरोप घेण्यापूर्वी एक विचारू ख्रिस?"
"?"
"हा केवळ एक अंदाज आहे पण काल्डवेल घराणे यासदृश परिस्थितीतून गेले होते का? फील्स लाईक यू हॅव डेल्ट विथ सिन्स ऑफ फादर्स बिफोर."
उत्तरादाखल ख्रिसचे ओठ विलग झाले.

~*~*~*~*~*~

अ‍ॅलेक्सी व ख्रिसने लंडनची ट्रेन पकडली. दफनविधीसाठी थांबण्यात ख्रिसला रस नव्हता. विजयवर गॅरेथ कसलाही आरोप लावणार नव्हता आणि विजयच्या संस्थानात नियोजित गुंतवणूक करण्यास तयार होता. त्यामुळे मिशन अकम्प्लिश्ड!
"विल्यमचे काय?" अ‍ॅलेक्सीने प्रश्न विचारला.
"गॅरेथ विल्यमला चांगला ओळखतो. तो विल्यमला लंडनला स्थिरस्थावर होण्यात मदत करेल. कदाचित पुढल्या वर्षी आपण विल्यमला लंडनमध्येही भेटू."
"आता तुझी मॉर्गन ल फे कमेंट समजते आहे. पीटरने आपल्या स्वार्थाकरिता आयरीन व बर्टीला वापरून घेतले."
"बहुतेक तरी आयरीनला पीटर आपल्याला वापरून घेतो आहे याची जाणीव झाली होती. तिने ग्रीन नाईट केवळ सोयीस्कर टार्गेट म्हणून नाही सुचवला. कुठेतरी तिला दोन्ही घटनाक्रम मिळते-जुळते आहेत याची जाणीव होती."
"पण तू आल्बसला इतक्या सहजा सहजी संशयिताच्या यादीतून बाहेर का काढलास? विल्यमलाही?"
"विल्यमला खून करण्याची संधीच नाही. त्याचा तू सांगितलेला मोटिव्हही अतिशय वीक आहे. आल्बसवर माझा संशय होता पण तसे असेल तर आल्बसने स्वतःहून मला आयरीनची कूळकथा सांगण्याचे काही कारण नाही. मान्य की मला येनकेनप्रकारेण ती माहिती काढून घेता आलीच असती पण तरीही स्वतःहून हा धोका ओढवून घेण्याचे काही कारण नाही. याने ज्या व्यक्तीला वाचवायचे तिच्यावर संशयाचे जाळे अजूनच पक्के होते. तसेच आल्बसला गॅविन पाठमोरे दाखवून फसवण्याचे काही कारणच उरत नाही. उलट आल्बस व ग्रेटाही जर या कटात सामील असते तर त्यांनी गॅविनना मारणे अजूनच सोपे गेले असते आणि या क्लिष्ट योजनेची गरजच उरत नाही. त्यांची सहानुभूति निश्चितच आयरीनच्या बाजूने असेल पण त्यांचा सक्रिय सहभाग नसावा आणि असलाच तरी तो सिद्ध करणे अशक्य आहे."
"......"
"बोल अ‍ॅलेक्सी. तुला अजूनही काही प्रश्न आहेत."
"गॅरेथ काय निर्णय घेईल हा एक प्रश्न आहेच."
"त्याचे उत्तर मी देऊ शकत नाही. पण ऑस्ट्रेलियात आयरीन व बर्टी निघून जाणे गॅरेथला मान्य व्हावे. हू नोज. माणसे विचित्र असतात. कधी कोण कसा वागेल हे सांगणे अशक्य आहे. त्यामुळे तार्किक विसंगतींवर भर देणेच इष्ट!"
"आणि खून याच रात्री का? ग्रँट पुढच्या महिन्यातही आलाच असता."
"त्यापूर्वी राज्यारोहण समारंभ आहे अ‍ॅलेक्सी. यासाठी गॅविन लंडनला जाणार हे नक्की! या वारीतच त्यांनी मृत्युपत्र बदलले तर? पीटरला ही संधी गॅविनना मिळू द्यायची नव्हती. त्याला कायदेशीर पद्धतीनेच ग्रीन चॅपल गिळंकृत करायचे होते. माझ्यामते ती जागा पीटर व गॅविन इतर मध्यस्थांना भेटण्यासाठी वापरत असावेत. पीटर कागदपत्रे दुसरीकडे हलवू शकला असता पण शक्यतो अशी मोक्याची जागा हातची जाऊ देणे त्याच्या जीवावर आले असावे. त्याच्याकडून अशा इतर मध्यस्थांची माहिती काढणे अवघड जाऊ नये. नरमाईची वागणूक हे गाजर त्याच्यासमोर लटकावता येईल."
"हम्म. मग राज्यारोहणाकरिता खरेदी कधी करायची, सर?"
"आय डोन्ट नो अ‍ॅलेक्सी. गेल्या गेल्या मला एकच गोष्ट हवी आहे. ती व्यवस्था करायची जबाबदारी तुझी."
"सर?"
"युनान होंगचा चहा, उत्तम सँडविचेस आणि स्ट्रँडचे गेल्या ऑगस्टपासून एप्रिलपर्यंतचे अंक!"
"व्हेरी वेल, सर"

(समाप्त)

(कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रण करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक! माबोव्यतिरिक्त ही कथा सध्यातरी कोठेही नसेल. चौर्यकर्म झाल्याचे निदर्शनास आले तर कळवणे ही विनंती!)

Group content visibility: 
Use group defaults

मस्तच. काही दुवे सुटल्याचे माझ्या तरी लक्षात नाही आले. खूप सुंदर पद्धतीने कथा पूर्ण केलीत. फार आवडली. श्रद्धा यांचा खूनाच्या पद्धतीचा अंदाज खरा ठरला.

पण मग डायल चे काय...... ?>>
भाग ३ -> डायल्सच्या खिडक्या आतल्या बाजूने उघडतात -> तो बॅकग्राऊंडचा जामानिमा या गोष्टीतल्या मनोर्‍यात खिडकी आहे.
चित्रातील बिग बेनमध्ये अशी व्यवस्था नाही. मी चुकत नसेन तर डायल्सच्या वरती गच्ची आहे आणि या गच्चीतून बाहेरच्या बाजूला दोरी लावून उतरतात. आपले घड्याळ बिग बेन नाही.

पण मग डायल चे काय...... ? बॉडी मिनीट काट्याच्या मार्गात कशी अडकविली? >>>>>डायल्सच्या खिडक्या आतल्या बाजूने उघडतात. मग आपण काट्यांना हात लावू शकतो. हे स्पष्टीकरण भाग ३ मध्ये आहे. डायल ची खिडकी उघडल्यानंतर मधला भाग पोकळ राहत असेल तर बॉडी मिनीट काट्याच्या मार्गात अडकवणे शक्य आहे.
पण चारही बाजूच्या घड्याळांची काट्यांची यंत्रणा एकत्र जोडलेली असताना डायल ची खिडकी कशी उघडणार??? हा प्रश्न मलाही पडला होता.

मस्त कथा पायस.

आयरिन आणि बर्टी नवरा - बायको हा अंदाज कठीण होता. Happy पीटर यात असणारच ही खात्री होती.

चांगला शेवट! Happy आयरीनचा प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग असेल असे वाटले नाही. स्वप्नाने बहुधा तसे लिहिले होते. शिवाय तिचा आयरीन + बर्टी अंदाजही बरोबर आला. :टाळ्या: Happy

पीटरने भरीला घातले तरी बर्टी आणि आयरीन यांनी व्यवस्थित कटात सहभागी होऊन गुन्हा केलेला आहे, त्यामुळे त्यांना अजिबातच फारशी शिक्षा न होणे तितके पटले नाही. पण अर्थात कथेत दाखवलेल्या कालखंडात मातब्बर उमराव घराण्यात असे होणे, हेही शक्य असावे.

पण एकंदरीत जाम मजा आली तपशील वाचून स्वतःचे अंदाज बांधायला. ख्रिस - अलेक्सी जोडगोळीची नवी कथा लौकरच येऊ दे.

सुंदर कथा पायस ...एकदम उत्कंठावर्धक !!

त्या तसल्या घड्याळाचा एक फोटो डकवा प्लिज

>>शिवाय तिचा आयरीन + बर्टी अंदाजही बरोबर आला

"बर्टी एकटा जीव" हे शब्द हजम नही हुए Happy आणि ज्यांच्यावर आपला संशय नसतो तेच खुनी निघतात.

>>त्यांना ग्रीन नाईटवर बिल फाडण्याची संधी दिली तर ते भराभर केस गुंडाळून मोकळे होतील यात शंका नसावी.

मलाही हेच वाटलं होतं.

>>फील्स लाईक यू हॅव डेल्ट विथ सिन्स ऑफ फादर्स बिफोर

ह्याचा 'फ्री' मध्ये काही रेफरन्स होता का हे पुढल्या कथेचं बीज आहे??

>>पीटरला ही संधी गॅविनना मिळू द्यायची नव्हती. त्याला कायदेशीर पद्धतीनेच ग्रीन चॅपल गिळंकृत करायचे होते.

पीटरला ते चॅपेल का हवं होतं हे मला नाही कळलं. वर त्याचं स्पष्टीकरण आलंय का?

रच्याकने, त्या रशियन मुळाक्षरांची टोटल लागली नाही. ख्रिसला ते पुस्तक वाचून काय कळलं? 'म्हणजे तो अशी कोणती तरी भाषा बोलतो जिच्यात थ, ध, घ इ. नाहीत. रशियन अशी एक भाषा आहे. तसेच त्यांच्यातील सिम्यॉन Семён चा अपभ्रंश सायमन किंवा सिमियन केला जाऊ शकतो. तो पीटर सिमियन नसून प्योत्र सिम्यॉन आहे. ' हे त्याचं स्पष्टीकरण आहे काय?

>>ख्रिस - अलेक्सी जोडगोळीची नवी कथा लौकरच येऊ दे.

आणि ही रहस्यकथा स्वयंपाकघराच्या आसपास घडलेली असू देत. म्हणजे आम्हाला एक्स्ट्रा फीचर्समध्ये मस्त नव्या रेसिपीज वाचायला मिळतील. अरे हो, त्या सरबताची रेसिपी द्या की.

पीटरला ते चॅपेल का हवं होतं हे मला नाही कळलं. वर त्याचं स्पष्टीकरण आलंय का?>>>>

गविन सारखे त्याचे अजून क्लायंट असतील, चॅपल तो गविन व्यतिरिक्त इतर धंदे सांभाळायला ऑफिस म्हणून वापरत असेल, जिथे कुणाचाही वावर नाहीये.

मस्त शेवट. आयरिन व बर्टी गुन्हेगार खरेच पण गविनने केलेल्या अन्यायाची त्यांच्या परीने शिक्षा द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. गॅरेथला अर्थात हे आवडणारे नाहीच पण ह्या गोष्टी कोर्टात गेल्यावर सगळेच बाहेर येणार, ज्यात गविनचे रशियासोबतचे काळे धंदे पण आले. गॅरेथला कुटुंबाचे नाव या संदर्भात आलेले आवडणार नाही, शिवाय धंद्यावर परिणाम होणार ते वेगळे.

ख्रिसची ती कथा वाचायलाही आवडेल.

दोन माणसे पीटर आणि आयरीन असतील असा अंदाज होता, पण बर्टीचा संशय आला नव्हता. घड्याळाचा उपयोग खुनाकरता केलेला असेल हे वाटले होते.

मस्त जमलेली कथा एकदम.

@ पायस --
पाचव्या भागाची हमी आल्यावर वाचली. खूप आवडली. लिखाणाचे कौशल्य आणि बारकावे सुंदरच.
पण ०-४ च्या मानाने क्लायमॅक्स भाग पूर्ण पटला नाही. काहीतरी कमी आहे. हो रे खरंच! असे नाही वाटले.
पीटर, बर्टीचा कबुलीजबाब अजून यात घातला तर?

घड्याळाचे काटे वेपन वाटले होते, पण ते काढून, मुंडके कापून पुन्हा जागेवर लावले, त्यात वेळेचे सेटींग गेले असा माझा अंदाज होता. पण इतकी ताकद + तांत्रिक माहितीवाला कोणी वर्णनात नव्हता. म्हणून सोडून दिले.
चालत्या काट्याच्या दाबाने शीर धडावेगळे होण्याइतका वेग व दाब मिळेल, तेही घड्याळ यंत्रणेवर उलटे प्रेशर न येता, हे व्हिज्युअलाईज होत नाहीये मला. एखादी टॉवर क्लॉक यंत्रणा मी पाहिलेली नाही म्हणून.

मॉर्गन ल फे --- आयरीन असावी आणि तिच्या इच्छेनुसार २ पुरूषांनी / एक जोडपे आल्बस-ग्रेटा यांनी ( मूळ-होस्बोर्ग-अंश निष्ठेपायी) मारले असावे गॅविनना, असे सरधोपट वाटले होते.
कारण (अंदाज) --- मूळ होस्बोर्ग असण्याचा खानदानी अहंकार + मूळ होस्बोर्ग असल्याने तिला या सामाजिक ऑराचा फायदा मिळून गॅविनच्या मृत्यूपत्राबद्दल off the record सांगणारे कुणी आहे. तपशील कळल्यावर उपेक्षित वाटून + आईवर झालेल्या अन्यायाचा राग यामुळे तिने हा निर्णय घेतला. आयरीन ही ग्रेगरीची (जीवशास्त्रीय) मुलगी हा फिल्मी सह-अंदाज.

पीटर रशियन + धंद्यातील रहस्ये जाणणारा. तोच चिलखतात फिरून लोकांना चॅपेलपासून दूर ठेवणारा. त्यातही तो ग्रेगरीचा कुणी भाऊ / पुतण्या असेल --- अन्यायाची परतफेड करण्याची संधी मिळावी म्हणून आश्रित बनून आलेला. म्हणून खुनात सहभागी. पश्चात्ताप नाही. पुन्हा फिल्मी अंदाज
ग्रेटाला उठण्याच्या वेळेबद्दल आश्वस्त करून विषय मिटवायला बघणे. संग्रहालय बघताना शस्त्र दालनातून दूर न्यायची खटपट --- जेणेकरून शोध करणार्‍यांना काही क्लिक होऊ नये.

खुनाची वेळ, पद्धत, प्रेत चॅपेलपर्यंत नेणे --- याचा अंदाज मात्र मला स्वतःलाच योग्य वाटेल असा लावता आला नाही.

** जर सर गॅविनचे फक्त मुंडके खुर्चीत होते तर विजयच्या बोलण्यातून ( भाग २)
आल्बसने सांगितले की त्यांनी इशार्‍यानेच चहा खोलीत ठेवून जायला सांगितले. बहुधा कसल्यातरी विचारात गढले होते ते."
--- हे वाक्य वगळायला हवे.

** ठेवलेला चहा प्यायला गेला नाही हे आल्बसच्या बोलण्यात आले नाही.

** रईस लोकांचा घोडा वगैरे राखीव असतो ना. एकाच स्कूटीवर घरातले कुणीही असे नसते बहुतेक त्यांच्यात. तो सर गॅविन यांना सरावलेला खास घोडा पीटरला सहजी पाठीवर घेणार नाही, हा माझा अंदाज. पाडले नाही तरी खिंकाळेल अस्वस्थ होऊन. त्यांचे प्रेत तर अजिबात नेणार नाही गुपचुप. आणि गॅविन रपेटीला गेले भासवायला घोडा तर त्यांचाच घ्यावा लागेल प्रिकॉशन म्हणून.

** चिलखत आणि खुन्याच्या उंचीचे कॅल्क्युलेशनही. चिलखतही अंगासरसे बसेल ना योद्ध्याच्या. डोके असलेला माणूस चिलखताच्या सहाय्याने स्वतःला कबंध कसा भासवू शकेल? केल्टिक चिलखत पाहिले नेटवर. की मला योग्य डिझाईन नाही मिळाले जे कथेत अपेक्षित आहे?

अजूनही १-२ गोष्टी / शंका वाचताना सुचल्या होत्या. शोधते पुन्हा मिळाल्या तर.
थोडक्यात भाग ५ किंवा त्याला अनुसरून आधीचे थोडे बदल हवे वाटतात. बाकी मस्तच.

कारवी....मस्त मुद्दे! Happy
चिल खत म्हणजे असेच असेल ना?

body armour.jpgचिलखतही अंगासरसे बसेल ना योद्ध्याच्या. डोके असलेला माणूस चिलखताच्या सहाय्याने स्वतःला कबंध कसा भासवू शकेल? ...हा तुमचा मुद्दा योग्य वाटतो...

चिलखतही अंगासरसे बसेल ना योद्ध्याच्या. डोके असलेला माणूस चिलखताच्या सहाय्याने स्वतःला कबंध कसा भासवू शकेल? >> त्यात डोकं कसं लपवता येईल स्वतः चे असा प्रश्न आहे.... >> कारण तुम्ही नीट व्हिज्युअलाईझ करत नाही आहात. इंग्रजी शब्दांता त्याला चेनमेल शर्ट किंवा चेनमेल जॅकेट म्हणता येईल. हे तुमच्या डोक्यातील आर्मर प्लेट नाही. वरुन फ्लेक्झिबल लोखंडी जाळी असलेला टीशर्ट आहे तो. हा सहज डोक्यावरून ओढून घेता येईल. दिवसा ढवळ्या ही ट्रिक कामी येणार नाही. पण त्या दिवशी अंधार होता. चंद्र पश्चिमेला कलला आहे. मनोर्‍याच्या पायथ्याशी मॅनोरची सावली पडली आहे. लिंडाच्या डोक्यात ग्रीन नाईटची कथा पक्की बसली आहे. असे असताना तिने कबंधाची कल्पना करणे का शक्य नाही? पूर्वेच्या विंगेत फक्त गॅरेथ, पीटर व लिंडा. पीटर तिच्या बाजूचा आणि गॅरेथपेक्षा लिंडा जागी होण्याची शक्यता जास्त. अशावेळी ही कॅलक्युलेटेड रिस्क होते.

** ठेवलेला चहा प्यायला गेला नाही हे आल्बसच्या बोलण्यात आले नाही.

>> जाता जाता खिडकीतून चहा ओतून देणे पीटरला अशक्य नाही.

रईस लोकांचा घोडा वगैरे राखीव असतो ना. एकाच स्कूटीवर घरातले कुणीही असे नसते बहुतेक त्यांच्यात. तो सर गॅविन यांना सरावलेला खास घोडा पीटरला सहजी पाठीवर घेणार नाही, हा माझा अंदाज. पाडले नाही तरी खिंकाळेल अस्वस्थ होऊन. त्यांचे प्रेत तर अजिबात नेणार नाही गुपचुप. आणि गॅविन रपेटीला गेले भासवायला घोडा तर त्यांचाच घ्यावा लागेल प्रिकॉशन म्हणून.

>> पागेतून घोडा काढताना पाहण्याचा दावा करणारा एकमेव व्यक्ती बर्टी. कोणता घोडा बाहेर काढला गेला हे कोणीही सांगू शकलेले नाही. अशावेळी पीटरने गॅविनचाच घोडा वापरला हे कशावरून? उलट पागेचा अ‍ॅक्सेस असलेला बर्टी यात सामील आहे हे ओळखण्याची ही आणखी एक हिंट नव्हे का?

पीटरला ते चॅपेल का हवं होतं हे मला नाही कळलं. वर त्याचं स्पष्टीकरण आलंय का? >> याच भागातील
पीटरला ही संधी गॅविनना मिळू द्यायची नव्हती. त्याला कायदेशीर पद्धतीनेच ग्रीन चॅपल गिळंकृत करायचे होते. माझ्यामते ती जागा पीटर व गॅविन इतर मध्यस्थांना भेटण्यासाठी वापरत असावेत. पीटर कागदपत्रे दुसरीकडे हलवू शकला असता पण शक्यतो अशी मोक्याची जागा हातची जाऊ देणे त्याच्या जीवावर आले असावे. त्याच्याकडून अशा इतर मध्यस्थांची माहिती काढणे अवघड जाऊ नये. नरमाईची वागणूक हे गाजर त्याच्यासमोर लटकावता येईल.
>> हा परिच्छेद

मी तर ते घड्याळाचे पण सगळे बारकावे नीट वाचून काढले... न जाणो, पुढच्या रहस्याशी काही तरी संबंध असला तर? ??

Submitted by धनवन्ती on 31 December, 2020 - 12:08

बघा, मी शून्य भागातच " सूचक " प्रतिसाद दिला होता.
या बाबतीत माजा आनि त्या त्यांचा मत एकदम बराब्बर जमता. - पुन्हा एकदा दत्ता कदम From बेन्सन जान्सन Happy Happy

बाकी कथा एकदम मस्त, जबरदस्त आहे. वाचनाचा पुरेपूर आनंद देणारी आहे. लिहीत रहा. . या प्रकारच्या कथा फारशा प्रचलित नाहीत मराठीमध्ये.

कथा एकदम मस्त, जबरदस्त आहे. वाचनाचा पुरेपूर आनंद देणारी आहे. लिहीत रहा. . या प्रकारच्या कथा फारशा प्रचलित नाहीत मराठीमध्ये. +१११

अतिशय गुन्तवून ठेवणारी कथा..मजा आली.

धन्यवाद पायस! छान जमली आहे कथा. वाचायला मजा आली!
ख्रिस - अलेक्सी जोडगोळीची नवी कथा लौकरच येऊ दे. >> +१

@ पायस,
जाता जाता खिडकीतून चहा ओतून देणे
उलट पागेचा अ‍ॅक्सेस असलेला बर्टी यात सामील आहे >>>>>

मी आता असलेले भाग ०-४ आणि ५ यात जाणवलेले मुद्दे म्हणतेय. शोधू तर शक्यता अगणितच. बर्टी ५-६ तासच पण गाढ झोपतो / व्हिस्कीच्या अमलाखाली झोपतो तेव्हा कुणी त्याच्याच चाव्यांचा गुच्छ वापरला. पीटरचे प्लॅनिंग पक्के तेव्हा त्याने आधीच हव्या असलेल्या चाव्या डुप्लिकेट बनवल्या. त्याचा वावर सर्वत्र आहेच. इत्यादि.

इंग्रजी शब्दांता त्याला चेनमेल शर्ट किंवा चेनमेल जॅकेट म्हणता येईल. हे तुमच्या डोक्यातील आर्मर प्लेट नाही. वरुन फ्लेक्झिबल लोखंडी जाळी असलेला टीशर्ट आहे तो. हा सहज डोक्यावरून ओढून घेता येईल. >>>>>>

तुम्हाला विंटर जॅकेटला असते तसे हूड म्हणायचे आहे का? हे असलं --
https://www.qoo10.sg/item/WARRIOR-MEN-T-SHIRTS-DIRECT-FROM-USA-MEDIEVAL-...

अ‍ॅलेक्सीच्या संग्रहालय भेटीत आलेले वर्णन म्हणते --
ते केल्टिक पद्धतीचे जुने चिलखत व शिरस्त्राण होते. लेदर जर्किनवर लोखंडी जाळे होते. छातीपाशी एक ब्राँझ प्लेट होती. शिरस्त्राण लोखंडी होते. या सर्वांना निळसर हिरवा रंग होता.

यात {चेनमेल शर्ट किंवा चेनमेल जॅकेट म्हणता येईल. हे तुमच्या डोक्यातील आर्मर प्लेट नाही. वरुन फ्लेक्झिबल लोखंडी जाळी असलेला टीशर्ट आहे तो. हा सहज डोक्यावरून ओढून घेता येईल} हे स्पष्ट होत नाही. केल्टिक पद्धतीत फक्त प्लेट, चेनमेल, चेनमेल + पोटावर प्लेट तिन्ही होते बहुतेक. हूडशिवाय चेनमेलही होते.

शिवाय चिलखत व शिरस्त्राण वेगळे म्हटलेय. चेनमेल हूड = शिरस्त्राण नाहीये.
पूर्वीच्या शिरस्त्राणाला वर वाडग्यासारखी टाळू झाकणारी लोखंडी पत्र्याची टोपी आणि त्यातून खाली रूळणारी लोखंडी जाळी ज्याने बाकी डोके, मान, कान गाल गळा सुरक्षित होईल असेही डिझाईन आहे.

लिंडाला दिसले + तिची साक्ष :
...तो घोड्यावरून उतरला. आता त्याची पाठ लिंडाकडे होती. सर्वांगावर कवच होते. एक मिनिट!!
.....या घोडेस्वाराचे डोके गायब होते. तो वाकून काहीतरी उचलत होता. तो जेव्हा पुन्हा ताठ उभा राहिला तेव्हा लिंडाला त्याचे नीट दर्शन घडले. त्याच्या हातात शिरस्त्राणाने संरक्षित त्याचे शिर होते. >>>>>
जुन्या पद्धतीचे कवच त्याने घातले होते हे नक्की. त्याची उंची सहा फूट असावी. जास्तच असेल पण कमी नक्की नाही. त्याचे डोके त्याने हातात धरले होते. डोक्यावर शिरस्त्राण होते त्यामुळे मला चेहरा दिसू शकला नाही. >>>>>>

ती आयरीन होती. हूडवाले चेनमेल असेल तर घालायला डोके हवेच + डोक्याचा आकार दिसणारच. शिरविहीन माणूस कशाच्या आधारावर लोखंडी हूड तोलेल? ते वजनाने कोलॅप्स होऊन मानेवर / पाठीवर राहील आणि नसलेले मुंडके ( रिकामी जागा) दिसेल.

चिलखत दिसतय, हूड उभारलेले दिसतेय पण आत डोकेच नाहीये हे लिंडाला कळायला तिला त्या व्यक्तीला समोरून बघणे + उजेडात बघणे गरजेचे आहे. जे घडले नाही.

व्यक्ती आयरीन होती आणि डोके गॅविनचे उचलत होती तर हातात "शिरस्त्राणाने संरक्षित त्याचे शिर" कसे? मग ग्रीन नाईटचा चेहरा झाकणारे शिरस्त्राण कुठले?

शीर उडवले जाण्यासाठी व्यक्ती कवचरहित हवी. हूड, शिरस्त्राण काहीच नको. किंवा वार + तलवारीची धार इतकी मजबूत की डोके + लोखंडी हूड कापले जाईल. मग तर लिंडाला प्रॉपर कबंध दिसेल. शीर-रहित, हूड-सहित ग्रीन नाईट नाही दिसणार.

पण घाबरलेली + ग्रीन नाईट दंतकथेवर विश्वास ठेवणारी लिंडा इतका विचार नाही करणार. तपास अधिकारी करेल.

सर्व प्रतिसादकांचे खूप खूप आभार. सर्व वाचकांना खूप खूप धन्यवाद!

कारवी >> मी समजावण्यात कुठेतरी कमी पडतो आहे. मी टीशर्ट म्हटलेलो असतानाही तुम्ही हुडी/विंटर जॅकेटचा विचार का करता आहात हे माझ्या आकलनापलीकडचे आहे. बहुधा मी चिलखत, कवच, शिरस्त्राण याऐवजी दुसरे कोणतेतरी शब्द वापरायला हवे होते. तरी वर नमूद केल्याप्रमाणे >> मर्यादित लेखनकौशल्याचा दोष समजावा <<

ह्याचा 'फ्री' मध्ये काही रेफरन्स होता का >> हो.

कारवी... Happy हे पहा, पायस यांच्या टी शर्ट कल्पनेप्रमाणे जरी विचार केला....तरी आयरीन ने तो टी शर्ट डोक्यावरुन ओढून घेतला असेल, व त्याचा गळ्याचा मोकळा भाग पुढे ठेवला असेल.....कदाचित दोन्ही कानाच्या बाजून वीत- वीत भर दोन काड्याही लावल्या असतील... सपोर्ट्ला व खांद्यांचा आभास निर्माण करायला....त्यामुळे ती पाठमोरी आकृती अंधारात कबंध भासली...... बाय द टाईम लिंडाने पाहीले..... आयरीन ने सोबत आणलेले शिरस्त्राण त्या मुंडक्याला चढविले असणार...... व उचलण्याची अ‍ॅक्शन रिपीट केली असणार..........

Happy
किती कोल्ड ब्लडेड ती आयरीन!!!

नवीन Submitted by पायस on 22 January, 2021 - 11:58 >>>>

तुम्ही तुमच्या कल्पनाचित्रातले चिलखत फोटोत दाखवले असते तर सोपे झाले असते कदाचित.
किलो किलो वजनाचे चेनमेल टीशर्ट आर्मर साध्या टीशर्ट प्रमाणे डोक्यावरून कसे खेचून घेता येईल हे माझ्या आकलनापलीकडचे ठरल्यामुळे मी हूडवाले चेनमेल वर गेले.

कदाचित आयरीनची चण ( स्त्री असल्याने ) चिलखताच्या आकारापेक्षा बरीच लहान असेल तर शक्य असेल हे.
आता हा चेनमेल आर्मर टीशर्ट २ प्रकारे खेचता येईल :
१. मानेकडून वर -- पदर डोक्यावर घेतात तसे -- पुन्हा हूडप्रमाणे. टीशर्टचा गळा चेहर्‍याभोवती.
२. जमिनीला काटकोनात सरळ वर. आर्मरच्या काखा घालणार्‍याच्या काखांना अडकून अजून वर जाऊ शकणार नाही अशा लिमीटपर्यंत. आर्मर टीशर्टचा गळा साधारण डोक्याच्या / टाळूच्या लेवलच्या वर येईल असे ज्यामुळे डोके लपेल. पिंपात उभे माणूस लपल्यासारखे.

प्रकार १ मध्ये पुन्हा हूड्मुळे डोक्याचा आकार आहे. कबंध नाही दिसणार.
प्रकार २ मध्ये कबंध दिसेल. पण किलोनी वजन असणारे चिलखत काय आधारावर खेचल्या पोझिशनला राहील? चिलखताचा आणि आयरीनचा खांदा यात आधार घातला तर एकवेळ. मग आत लेदर वर लोखंडी जाळी अशा टीशर्ट आर्मरमधून आयरीनला दिसेल कसे आजूबाजूचे, जमिनीवरचे मुंडके इत्यादि? तिच्या हालचाली तर सरळ वर्णन केल्यात.
आयरीनचे ६ इंची उंच डोके झाकले जायला टीशर्ट आर्मर तिच्या खांद्याच्या ६ इंच तरी वर खेचले गेले पाहिजे. ही कमाल मर्यादा धरली ( काखेला काख अडकली) तर आर्मरचा दंड ( खांद्याजवळील शिवण) किमान ६ इंच रूंद हवा किंवा त्यापेक्षा जास्तही चालेल. ज्या योद्ध्याचे हे आर्मर आहे त्याचा दंड ६ इंच+ असेल तर खांदे, गळा आणि एकूण भव्यता लक्षात घेता.... आयरीन ते घालणे वावरणे आणि डोक्यावरून स्टेबल राहील असे खेचून कबंधस्वरूप होणे.... शक्यप्राय वाटत नाही.

या दोन प्रकारा व्यतिरिक्त चेनमेल टीशर्ट आर्मर डोक्यावरून खेचायची कल्पना मला येत नाही.
पण तुम्ही म्हणताय तर असूही शकेल. तेव्हा माझ्या मर्यादित आकलनाचा अधिक त्रास मी अजून देत नाही.

Pages