त्रिभंग - स्टार्रींग काजोल - तन्वी आझमी - मिथिला पालकर

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2021 - 16:46

त्रिभंग - स्टार्रींग काजोल - तन्वी आझमी - मिथिला पालकर
त्रिभंग - माझ्या आईने पाहिलेला काजोलचा शेवटचा(?) चित्रपट

कुठे बघाल - नेटफ्लिक्स

स्पॉईलर अ‍ॅलर्ट - चित्रपटाची स्टोरी नाही पण त्यातल्या शिव्या लेखात ऊघड केल्या आहेत!

नवीन वर्षाचे संकल्प केल्याप्रमाणे सध्या रोज रात्री पुर्णी फॅमिली मिळून एखादा चित्रपट बघतो. मुलगी सोबत असेल तर तिच्या आवडीचा चित्रपट बघितला जातो. ती जागी नसते तेव्हा तिने बघायला नको पण आपल्याला बघायचाय असा चित्रपट बघितला जातो. आज ती झोपली असल्याने बायको म्हणाली तांडव लाऊया. पण आई जागी होती. आणि तुम्हाला तर माहीत आहे सध्याच्या वेब सिरीजमध्ये शिव्यांचा किती सुकाळ असतो. तो देखील बरेचदा अनावशयक. त्यामुळे तांडवला नकोच म्हटले.

पण मग बघायचे काय? दर रोज दर रात्री आमचा अर्धा तास काय बघायचे या चर्चेतच जातो. म्हणून मग मीच पटकन त्रिभंग सुचवला. आज फेसबूकवर काही फेमिनिझम जपणार्‍या महिलांकडून याची चर्चा ऐकली होती. म्हटले काही नाही तर यावर मायबोलीवर धागाच काढता येईल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काजोल माझ्या आईची आणि एकूणच आमच्या घरात शाहरूख ईतकीच आवडीची हिरोईन आहे. तसेच ती आहे तर चित्रपटात फुकटच्या फाकट शिव्या नसणार याची खात्री होती. म्हणूनच लावला आणि फकलो !

म्हणजे सुरुवातीच्या एका दृश्यात तीने ड्रायव्हरच्या शेजारी बसून भोसडीके शिवी घातली ती फ्लो मध्ये आईला कळली नाही. पण नंतर कोमामध्ये गेलेल्या आपल्या आईला बघायला ती हॉस्पिटलला जाते तिथे बयेने "फ" ची बाराखडीच सुरू केली. फक, फकर, झाटू, चुतिये, आलटून पालटून दर दुसर्‍याही नाही तर दर वाक्यात शिवी गुंफत गेली आणि माझ्या आईला ईथे जेवताना दर दुसर्‍या नाही तर दर घासाला ठसके बसू लागले. ईथे आमची पोजिशन ऑकवर्ड. अरे देवा, मध्येच हे काजोलचे काय रुप दाखवले हिला. उगाच आईच्या मनातील अंजलीच्या आठवणी तुरट झाल्या असतील.

आईने चपात्या संपवल्या आणि भात खायला आत गेली. म्हटले झाले, आईला बघवल्या नाहीत काजोलच्या तोंडी शिव्या. पण पिक्चर तिला आवडला होता. जनरली बायकांच्या स्टोरया बायकांना आवडतात. त्यामुळे भात संपवून आली पुन्हा बघायला. एका अर्थी बरेच झाले, आमचा ऑकवर्डनेस आणि आलेले गिल्ट जरा कमी झाले.

काजोलचे मात्र चालूच होते. नवर्‍याला शिवी देते, आईला शिवी देते, येणार्‍या जाणार्‍यांना शिवी देते. जो डिजर्व्ह करतो त्यालाही देते, जो नाही करत त्यालाही देते. रागाने देते, प्रेमाने देते. आणि मग एका दृश्यात काजोल आपण ईतके फकफकाट का करतो याचे सुंदर विश्लेषण करते. ताजमहाल समोर उभे राहून लव्ह बोलण्यापेक्षा फक बोलणे कसे रोमांचकारी आहे आणि प्रत्यक्ष आयुष्यातही लव्ह पेक्षा फक कसे जास्त महत्व राखून आहे हे समोरच्या सहकलाकाराला पटवून देते. हे करताना देखील ती आपली फक बोलायची हौस वीस-बावीसवेळा त्या शब्दाचा उल्लेख करून भागवून घेते. गंमत म्हणजे ज्या सहकलाकाराला हे पटवते तो शिवीला अपशब्द आणि स्माईलला मुस्कुराईये बोलणारा तहजीबप्रेमी दाखवला आहे. त्याचे खरे नाव मला माहीत नाही, चित्रपटातलेही आठवत नाही, कारण अख्खा चित्रपट काजोल त्याचा उल्लेख झाटू असाच करते. गंमत म्हणजे क्लायमॅक्सला तो देखील काजोलसारखेच फक बोलत तिला सहभागी होतो आणि तिथेच या चित्रपटाचा शेवट होतो.

बाकी या शिव्यांच्या जोडीला जी तीन स्त्रियांची कहाणी दाखवलीय ती मला छान वाटली. म्हणजे फेसबूकवर जे उगाच काही बायकांनी यातल्या फेमिनिझमवर हल्लाबोल केलेला ती चर्चा चुकीची वाटली. पण हल्ली हे आढळतेच. प्रत्येकीची आपली एक बिनधास्त स्वतंत्र आयुष्य जगायची फेमिनिझमची व्याख्या असते आणि तीच सर्वांची असावी असा हट्ट आढळतो. त्यामुळे मी तरी चित्रपट बघताना यातल्या बायकांचे फेमिनिझम काय दाखवलेय, तेच योग्य की अयोग्य याचा विचार न करता त्यांना एक स्वतंत्र कॅरेक्टर म्हणूनच बघितले आणि चित्रपट आवडला. विशेष म्हणजे जिथे संपायला हवा असे मला वाटले तिथेच तो संपला.

काजोलच्या शिव्या थोड्या कमी चालल्या असत्या, तिला ड्रेसेस जरा आणखी चांगले दिलेले आवडले असते, ती लाऊड जरा कमी झाली असती तरी रुचली असती पण कदाचित तीच तिची स्ट्रेंथ असल्याने तिने त्यावरच बॅटींग केली असावी.. तन्वी आझमीला जरा जास्त बघायला आवडले असते, चित्रपट आणखी अभिनयसंपन्न झाला असता. मिथिला पालकरचा वावर नेहमीच सुखावतो, ती जेवढी दिसेल तेवढ्यातच मी सुख मानून घेतो. ईथेही तिने निराश नाही केले.

तीनही महिलांचे आपल्या मराठी मायबोलीशी कनेक्शन आहे हि चर्चा चित्रपट बघताना करणे कंपलसरी आहे, आम्हीही ती केली. चित्रपटात आलेले सारेच मराठीचे संवाद चांगले वाटले. काजोलच्या भावाच्या भुमिकेतही वैभव तत्ववादी या मराठी कलाकाराला घेतलेले. हिंदी चित्रपटात मराठी मालिकांतला ओळखीचा कलाकार दिसला की आमच्या आईला फार आनंद होतो. अश्या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच शिव्यांकडे दुर्लक्ष करून माझ्या आईने चित्रपट पुर्ण बघितला. हा चित्रपट रेणुका शहाणेचा आहे हा शोध आम्हाला शेवटीच लागला. सर्व मराठी माणसांनी एकदा बघायला काही हरकत नाही म्हणून हा लेखनप्रपंच.

तेवढे ते त्रिभंगचा अर्थ कोणाला माहीत असेल तर सांगा. म्हणजे एका दृश्यात काजोल आपल्या आईला अभंग, मुलीला समभंग, आणि स्वत:ला सेक्सी त्रिभंग म्हणवते. पण त्यातून झाट काही कळले नाही Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही लोक शिव्या देत नाही का? सगळेच शिव्या देतात... काही जास्त काही कमी...>>>> नाही देत आणि माझ्या जवळचे/ओळखीचे कोणीही देत नाहीत निदान माझ्या समोर तरी नाही. बाकी मुर्ख, बावळट, बिंडोक याला शिवी म्हणत असाल तर हो Happy
Netflix वर History of Swear Words ही मालिका आहे. ६ शिव्यांवर ६ भाग आहेत.

Happy ती फुलराणीवरून माझ्या भावना दुखावल्या नाहीत. "ती फुलराणी म्हणजे तीच ना... " विचारल्यावर मूळ माहिती असावं म्हणून मूळ स्वगत दिले.

सुमारे शतकापूर्वी बर्नार्ड शॉ यांनी पिग्मॅलियन नाटक लिहीले. त्यावरून नंतर 'माय फेयर लेडी' हे संगीत नाटक आले. त्यावर माय फेयर लेडी हा ऑड्री हेपबर्नचा सुंदर सिनेमाही आहे. इंग्रजी भाषेवर असलेले नाटक मराठीत आणणे अतिशय अवघड. पण ते काम पुलं नी केले आणि ते नाटक 'ती फुलराणी'. उच्चार, संवादफेक इ साठी कलाकारांना खूप वाव असल्याने हे नाटक माईलस्टोन आहे. नटसम्राट सारखं - सगळ्यांना जमत नाही. (ह्याच कथानकावर देवानंदने टीना मुनीमबरोबर 'मनपसंद' सिनेमा केलेला आहे. कदाचित तो माहिती असेल.). सई, शाहरूख, स्वप्निल यांचे कुठलेही सिनेमे असे भाषा, देश, काल मर्यादेच्या बाहेर लोकप्रिय झाले असले तर सांगावे...

(खालच्या पातळीची टीका कुणावरही करू नये पण तुलना करताना "उंच वाढला एरंड, तरि का होईल इक्षुदंड" हे भान असावे.)

पाहिला. ठिक ठाक. शिव्यांच्या बाबतीत आमची धाव मुर्ख, बिनडोक, बावळट्ट इथपर्यंतच, त्यामुळे फकफकाट (शब्द आवडला) जरा जास्त वाटला. मिथीला पालकर गोड दिसते. वैभव तत्त्ववादी अगदीच साधू मार्गावर जातो ते काही पटलं नाही.
बाकी तन्वी आझमी आणि कवलजीत यांना बघून फार पुर्वी सोनीवर फॅमिली नंबर 1 म्हणुन सिरियल लागायची ती आठवली.

पिक्चर आवडला. शिव्या एकवेळ ठीक आहेत पण काजोल चा लाऊड अभिनय नसता तर नक्कीच जास्त आवडला असता मूव्ही. तन्वी आझमी चा आवाज, अभिनय एक नंबर.
मराठी संवाद बोलायला मराठी कलाकार आहेत ते एक बरंय. श्वेता मेहेंदळे सुंदर दिसली आहे
Overall, good job Renuka Shahane

सई, शाहरूख, स्वप्निल यांचे कुठलेही सिनेमे असे भाषा, देश, काल मर्यादेच्या बाहेर लोकप्रिय झाले असले तर सांगावे...
>>>>>
फुलराणी बाबत जे कौतुक आहे ते नाकारण्याचा प्रश्न नाही, पण शाहरूखबाबत त्याचा कुठला सिनेमा भाषा, देश, काल मर्यादेच्या बाहेर लोकप्रिय झाले असले तर सांगायला नवीन धागा काढावा लागेल.. एका पोस्टचा विषय नाही तो, आणि हे आपल्यालाही माहीत आहे. मला तर आपले हे विधानच त्यामुळे धाडसी वाटले Happy

असो, पण मी असा धागा काढणार नाही. कारण शाहरूख सई स्वप्निल यांच्या कलेच्या आणि त्यांच्या कलाकृतीच्या दर्जाबद्दल जे आहे ते आपले वैयक्तिक मत आहे, जरी तेच फॅक्ट आहे असे समजले तरी त्या कलाकारांवर त्यांच्या कामापलीकडे जाऊन काहीही टिका करायचा हक्क कोणाला मिळाला असे तर होत नाही ना... तसे कोणी करत असेल तर त्याचा निषेध करायचा मला पुर्ण हक्क आहे. यासाठी त्यांच्या कलेचे मूल्यमापन करून त्यांचा दर्जा सिद्ध करायची गरज नाही.

बाकी फुलराणी, नटसम्राट म्हणजे क्लास आणि शाहरूखचे डीडीएलजे, चक दे वा सई स्वप्निलचे दुनियादारी, मुंबई-पुणे-मुंबई वगैरे म्हणजे मास असा जो सूर त्या पोस्टमध्ये आढळला त्यासाठी कधीतरी एक धागा नक्कीच काढेन Happy

हो, कलाकारांच्या कामापलिकडे टिका करू नये, खालच्या पातळीवर तर अजिबात करू नये. मी स्वतः याबाबत शक्यतो तारतम्य ठेवते, इतरांबद्दल माहिती नाही.

बॅक टू त्रिभंग - विमल पात्र खरं तर अजून हवे होते. ती आई-मुलीत 'मिडीएटर' असते. अशा स्त्रीची मनःस्थिती काय होत असेल??

चित्रपट पाहिला, एकंदर आवडला. अतिशय संयत लिहिला आहे, (कौटुंबिकतेचे महत्व अधोरेखित करणारा वाटला काहीवेळा.. किंवा रिव्हर्स फेमिनिजम!)

पण ह्यातून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे संवादाचे महत्व. संवाद कोणत्याही नात्याचा प्राण असतो.

बाकी शाहरुख मुद्दा: अभिषेक यांना खास करून सांगावं वाटतं, तुम्ही फॅन आहात, धागाही तुमचा आहे. पण जिथं तिथं एकच एक रांगोळी बरी वाटत नाही. असो.

सिनेमा पाहिला. आवडला.
काजोल लाऊड वाटते असा बर्‍याच जणांचा आक्षेप आहे. पण मला तिचे लाऊड असणे पटले. स्वतःचे दु:ख, त्रागा आणि तिच्यावरच्या अत्याचाराला जबाबदार अशा सर्वांवरचा राग लपवण्याची तिची ती स्टाइल आहे. काही जण मनातलं दु:ख हसून साजरं करतात. ( आठवा गाणं : तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो ? ) तिचा फकफकाट ( शब्द आवडला. ) कमी चालला असता, नव्हे कमीच हवा होता.
एकाच आईची मुलं. त्याच वातावरणात वाढलेली. पण बहीण मोठी. मोठेपण आणि मुलगीपण म्हणून बरंच सहन करावं लागलेली. भाऊ लहान. न कळत्या वयाचा. बहीणीकडून सतत प्रोटेक्टेड. . कळत्या वयात तो बहीणीला रिबेल होताना, स्वैराचार करताना बघतो. पण त्याचं तारुण्यापर्यंतचं आयुष्य तेवढं वाईट गेलं नाही. त्यामुळे बहीणीपेक्षा त्याच्याकडे मानसिक संतुलन जास्त आहे. तो बहीणीच्या एकदम विरुद्ध मार्ग स्वीकारताना दाखवला आहे. असो.

तन्वी आजमीला अजून काम हवं होतं. मिथीला गोड दिसते आणि अभिनयातही चांगली आहे. काजोलकडून अगदी अर्ध्या मिनीटांचं का होईना ओडीसी नॄत्य दाखवायला हवं होतं असं वाटलं. काजोल ज्याचा उल्लेख झाटू म्हणून करते, त्यानी काम चांगलं केलं आहे. नाव आठवत नाही. सिनेमातला त्याचा एक नॅरॅटरसारखा केलेला वापर आवडला.
एकंदर सिनमा आवड्ला.

खरंतर सिनेमात अनेक गोष्टी अपूर्ण आहेत. जसे कि मोहित रैना जेव्हा अनुला उठवतो तेव्हा एक वाक्य आहे. नयनचा लेखिका होण्याचा प्रवास.. आणि रॉबिन्द्रोचं तर काहीही नाही..

>>>>पण मला तिचे लाऊड असणे पटले. स्वतःचे दु:ख, त्रागा आणि तिच्यावरच्या अत्याचाराला जबाबदार अशा सर्वांवरचा राग लपवण्याची तिची ती स्टाइल आहे. >>>> करेक्ट इट इज कॉलड 'रेज'. पण हीच भावना, कोंडलेली वाफ, भूतकाळ न बदलता येण्यातून आलेली हतबलता, संताप, जिथे मन मोकळं करावं तिथेच (आई) झालेली फसवणूक - या भावना अन्य पद्धतीने दाखविता आल्या असत्या. रेणुका शहाणे यांना?लेखक व दिग्दर्शक म्हणुन, पहीला सिनेमा आहे ना/का? सुधारणेस वाव आहे. पण छान वाटला सिनेमा.

लेखक व दिग्दर्शक म्हणुन, पहीला सिनेमा आहे ना/का >>> तिने काही वर्षांपूर्वी "रिटा ' नावाचा मराठी सिनेमा डिरेक्ट केला होता. असाच फेमीनीझमवर आधारित होता. चांगला होता.

मला पण आवडला पिक्चर. शिव्या गाळून बघितला. आता जरा वेब सिरीज मुळे एवढं दचकायला होत नाही पण मलाही शिव्या ऐकल्या कि अस्वस्थ व्हायला होतं. च्रप्स नी आधी कुठे तरी विचारलय त्याला मी ही म्हणेन कि नाही बाबा मी नाही देत शिव्या आणि माझ्या आजूबाजूला पण अशी शिवराळ माणसं नाहीत.
बाकी बरीच मराठी कलाकार मंडळी पिक्चर मध्ये बघून बरं वाटलं. अस्मिता सिरीयल मधला अस्मिता चा नवरा, आणि मानबा मधली रेवती आहे ना?

च्रप्स नी आधी कुठे तरी विचारलय त्याला मी ही म्हणेन कि नाही बाबा मी नाही देत शिव्या आणि माझ्या आजूबाजूला पण अशी शिवराळ माणसं नाहीत
>>>>
खरे तर तुमच्या बाजूलाही असतील अशी माणसे जे शिव्या देतात, फक्त ते तुमच्यासमोर देत नसावीत.
झोपडपट्टी अन चाळीपासून उच्चभ्रू सोसायटी सगळीकडे असतात शिवीगाळ करणारी माणसे, पण ते ठराविक सर्कलमध्ये देतात. भान ठेऊन देतात. असे चण्याफुटाण्यासारखे सदासर्वकाळसर्वत्र वाटप नसते.
एखाद्या भुमिकेला शिव्यांची गरज आहे म्हणून वास्तव चित्रीकरण वाटण्यासाठी त्या दाखवणे हे समजू शकतो. पण विनाकारण ईतक्या दाखवतात की त्यामुळे उलट ते अवास्तव वाटते.

मी स्वतः शिव्या देत नाही. कोणत्याही सर्कल मध्ये असले तरी. मला ऐकायला आणि द्यायला आवडत नाही.

माझ्या सारखी अनेक लोकं असतीलच जगात

माझ्या सारखी अनेक लोकं असतीलच जगात
>>>>
खूप असतील
जगात तीन प्रकारची लोकं असतात.
१) कधीच शिव्या न देणारे - खूप आहेत असे, ईतकाही दुर्मिळ प्रकार नाही हा.
२) शिव्या देता येणारे पण ठराविक सर्कलमध्येच शिव्या देता येणारे - तुमच्या आजूबाजूलाही असे असतील, पण तुम्ही शिव्या न देणारे असल्यामुळे ते तुमच्यासोबत देत नसतील, त्यामुळे शक्य आहे तुम्ही त्यांना पहिल्या प्रकारातलेच समज असाल Happy
३) उठसूठ कुठेही शिव्या देणारे हा प्रकार दुर्मिळ असतो जो या वेबसिरीजमध्ये खचाखच भरलेला दिसतो.

मी स्वतः कॉलेजपर्यंत प्रकार २ मध्ये होतो. आता प्रकार १ मध्ये आलो आहे Happy
(अपवाद च्यायला, साला, आणि आईच्या गावात हे शब्द उद्गारवाचक म्हणून तोंडात येतात पण ते घरीच )

अपवाद च्यायला, साला, आणि आईच्या गावात हे शब्द उद्गारवाचक म्हणून तोंडात येतात पण ते घरीच )>> आई काही ऑब्जेक्षन घेत नाही? हॉरिबल.

सिनेमा चांगला आहे.

अपवाद च्यायला, साला, आणि आईच्या गावात हे शब्द उद्गारवाचक म्हणून तोंडात येतात पण ते घरीच >>
सतत शीव्या हाणणाऱ्या बहुतेकांच्या तोंडीही अगदीच अर्वाच्य शिव्या उद्गारवाचक म्हणुन तोंडात येतात. म्हणजे शिवीचा अर्थ काय याचा तिथे संबंध नसतो.
तर असे अर्वाच्य शब्द ज्याचा अर्थ आपल्याला अजिबात अभिप्रेत नाही आपल्या तोंडात बसले आहेत, ती सवय मोडून योग्य/ साजेसे शब्द वापरण्याची सवय का लावून घेऊ नये? काहीही कठीण नाहीय ती सवय मोडणे.

@ मानवमामा,
सतत शीव्या हाणणाऱ्या बहुतेकांच्या तोंडीही अगदीच अर्वाच्य शिव्या उद्गारवाचक म्हणुन तोंडात येतात. म्हणजे शिवीचा अर्थ काय याचा तिथे संबंध नसतो.
>>>
छे, शिव्या वाईट नसतात आणि त्या सोडायच्या नसतात असे कोण म्हणतेय ईथे.
मी जे करतो ते सांगितलेय. त्याची वकिली करत नाहीये.

आई काही ऑब्जेक्षन घेत नाही? हॉरिबल.
>>>
याबद्दल मात्र भाष्य करायला आवडेल, कारण आई आलीय ईथे Happy
पण याचे उत्तर एका पोस्टमध्ये मावणार नाही, यावर मी स्वतंत्र धागा काढणार. कारण एकूणच हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे . पण आज वेळेअभावी शक्य नाही, उद्या परवा लवकरच ......

कारण आई आलीय ईथे >> काकू, स्वागत आहे! आता ऋन्मेष खोड्या काढायला लागला तर आम्हाला तक्रार करायला कुणीतरी उपलब्ध आहे Happy

काल पाहिला ... आवडला. शिव्याची इम्युनिटी आली आहे फक्त काजोलसारख्या मेनस्ट्रिम नट्यांचा पण आता आइसब्रेक झाला म्हणता येईल.
पूर्वार्धात अधिक शिव्या आहेत. नंतर ती शांत होत जाते. तिने ओडिसी न्रुत्य केले नाही याचे समाधान वाटले. कारण तिचे ते कपडे घालून चालणे सुद्धा खराटा घेऊन अंगण झाडणार आता असे वाटले. तन्वी आझमी उत्तम, मिथिला छान , काजोल ओके. वैभव तत्ववादीचे काम व दोघा बहिणभावांचे सिन खूप आवडले. कुणाल रॉय कपूर पण आवडला त्याचे मराठी उच्चारातले हिंदी चांगले वाटले . शेवटी मिथिलाची तडजोड चांगली दाखवली आहे. तिला सरळ केस छान दिसलेत. कुरळे ठेवले असते तर तिचे पात्र पण करारी वाटले असते , जशी माशा अजिबात नाही. हे उगाच वाटले. मिथिलाचे ड्रेसेस अतिशय आवडले. काजोल ओव्हरप्लेड, मिथिला अंडरप्लेड, तन्वी पर्फेक्टलीप्लेड पात्र वाटली. सगळा फोकस काजोलवरच होता . तिचे दवाखान्यात घातलेले कपडे मेकप पण भडक वाटला. मानव गोहिल तिचा कोण आहे हे कळाले नाही. त्यांचे बाबा त्यांना कधी भेटायला का नव्हते यायचे हेही नीट कळले नाही. रोबिन्द्रोचा राग फक्त अनुच्या रागामुळे होता असं वाटलं. बहीण स्वैर व मनस्वी आणि भाऊ संत हे दोन टोकं दिसली. मराठी सिनेमा पाहिल्यासारखे वाटले. रेणुका शहाणे यांच्या व्यक्तिगत आयुष्याचे अनुशी असलेले साधर्म्य पाहून गलबलूनही आले. स्त्रियांनी काही वेगळेपर्याय निवडले की त्यांच्या मुलांवर का अन्याय होतो हा प्रश्न मला नेहमीच छळतो. ओव्हर ऑल आवडला. रेणुका शहाणे यांचे दिग्दर्शन आवडले.
बाकी शिव्या, रक्तपात असणाऱ्या वेबसिरीज/ नेटफ्लिक्स पहायचे म्हणजे 'मन करा रे निबर , सर्व सिरीज चे कारण' Wink . मी अजिबात शिव्या देत नाही. दोन चारच येतात. शिव्या न देताही राग, उद्विग्नता दाखवता येते ही तर पळवाट वाटते.

Pages