अगम्य : ४

Submitted by सोहनी सोहनी on 13 January, 2021 - 08:25

अगम्य : ४

मनाची समजूत घालून तसाच झोपलो आणि सकाळी उठलो तर अंग जड झालं होतं, थोडं अशक्त वाटत होतं. एक मोठा श्वास घेतला आणि लागलो कामाला पण आज प्रत्येक क्षणाला बा आणि माय आठवत राहिली.थोड्या वेळात आईंनी आवाज दिला भाजी आणायला, पिशवी आणि पैसे हातात देऊन काय काय आणायचं सांगितलं आणि मी जायला वळलो तर त्यांनी विचारलं 'नीट झोप झाली नाही का?? बघ कसा दिसतोय तू?'मी काही न बोलता जीवावर हसलो.
सवय नाही ना नवीन जागेची, होईल सवय काही लागलं तर माग घाबरु नकोस, इतकं बोलून त्या स्वतःच्या कामात गुंतल्या आणि मी बाहेर पडलो.
भाजी घेऊन आलो तर बाई साहेब जिन्यात बसलेल्या दिसल्या, तश्याच अवतारात मांडीवर बाळ घेऊन, आज त्यांनी बाळाला पदराने झाकल होतं, त्यांना पाहून मला रात्री घडलेला थरार आठवला आणि मी अक्षरशः शहारलो. मला त्यांच्या डोळ्यात पहायची हिंमत होत नव्हती म्हणून मी सरळ स्वयंपाक घरात शिरलो आणि तिथे उगाच घुटमळत राहिलो.
परत येताना त्या तिथे आहेत कि नाहीत हे पाहत घाबरत घाबरत आलो, त्या जिन्यावर नाहीत हे पाहून हायसं वाटत आणि मी जिन्याच्या उलट्या बाजूला वळलो तर नाकासमोर तसेच अंगार भरलेले डोळे घेऊन त्या माझ्या पुढ्यात उभ्या. माझी बोबडी वळली, मला आईंना आवाज देखील देता येईना, क्षणाचाही विलंब न करता माझ्या डोळ्यांत डोळे घालून जोरात ओरडल्या निघ इथून नाहीतर जीव जाईल तुझा जा.
त्यांचा आवाज इतका जोरात होता कि आई आणि डॉक्टर साहेब धावत आले, आईंनी त्यांना जोरात मागे खेचलं आणि गच्च धरून ठेवलं, त्या दोघांकडे एकदाही न पाहता त्या सुटायचा प्रयत्न करत होत्या पण त्यांना जमत नव्हतं, आईंच्या घट्ट पक्कडी मुळे नाही तर अशक्तपणामुळे, बाईसाहेब मला खूप अशक्त जाणवल्या, मी खूप घाबरलो होतो हे जितकं खरं होतं तितकीच खरी बाईसाहेबांच्या डोळ्यातली भीती होती पण ती नक्की कशाची होती?कोणाची होती??
मला आईंनी बाहेरचं काम पाहून घे सांगून बाहेर पाठवलं आणि मी बाहेर आलो.

त्या घटनेला एव्हाना आठवडा झाला, पण मला बाईसाहेब ना दिसल्या ना त्यांचा आवाज आला.
ह्या दिवसांत मी दोन दिवस घरी राहून आलो, बा न्यायचा तसाच खाऊ आणि सामान घेऊन गेलो होतो, माय खूप आनंदी झाली, तिला खूप समाधान वाटलं मला पाहून.
त्या घटनेनंतर मला पुन्हा एकदाही वाईट स्वप्न पडलं नाही, पहिले दोन दिवस इतके वाईट गेले होते कि मला तिथे राहायची इच्छा नव्हती, पण नंतर काही जाणवलं नाही सगळं नेहमीसारखं वाटत राहिलं आणि मी ते वाईट स्वप्न आणि विचार बाजूला ठेऊन दिले पण एक गोष्ट माझ्या डोक्यात घर करून राहिली ती म्हणजे बाईसाहेबांचे भीतिने भरलेले डोळे..
एव्हाना दोन आठवडे व्हायला आले तरीही बाईसाहेब मला दिसल्या नाही आणि त्यांचा कुणी विषय देखील घेतला नाही आणि माझी कोणाला विचारायची हिम्मत देखील झाली नाही.
पण देव जाणे का मला त्यांच्या विषयी कुतुहूल वाटत होतं?? मी ज्या डोळ्यांना घाबरलो तेच डोळे कशाला घाबरले असावेत?? नक्की त्या डोळ्यांची ओळख काय?? नक्की कोणते डोळे खरे??
मोठा प्रश्न हा होता कि त्यांना वेड्याचे झटके येऊन देखील त्यांचं बाळ कसं सांभाळतात त्या??
कारण मी दोन वेळा बाळाला फक्त आणि फक्त त्यांच्या जवळच पाहिलं, ना कधी आईंना बाळाला घेताना पाहिलं ना डॉक्टर साहेबांना??
जर त्या वेड्या आहेत मग बाळ त्यांच्याकडे का ठेवलं आहे?? ते सुरक्षित असेल त्यांच्याकडे?? असेलही तरीही बाळाला मी स्वतः कोणाकडे पाहिलं नाही, आई आणि डॉक्टर साहेब बाळाला का घेत नसावेत??
सगळ्यात मोठा प्रश्न हा होता कि बाळ आहे कि नाही??

काहीतरी विचित्र आहे जे माझ्या मनाला जाणवत होतं पण काय ते स्पष्ट नव्हतं.
जवळ जवळ एक महिना झाला, मी अजून दोन वेळा घरी राहून आलो, तरीही बाईसाहेब मला दिसल्या नाहीत.
तशी त्यांची काळजी करण्याचं मला काही कारण नव्हतं पण माझं मन आपोआपच त्यांचा विचार करायचा, बाईसाहेबांविषयी नक्की काय प्रकरण झालंय ते जाणून घ्यावं वाटायचं, एव्हाना त्यांची भीती नाही तर अतोनात काळजी वाटायला लागली होतो.

मी ठरवलं काहीतरी करून त्याच्या खोलीत जाऊन पहायचं त्या आहेत कि नाही आणि आणि त्यांचं बाळ पाहायचं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults