ऑटो भास्कर!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 12 January, 2021 - 08:02

हा माझ्य म्हातारपणाचा आधार आहे! तुम्ही म्हणाल मी मुलाबद्दल बोलतोय. पण तसे नाही. मी ऑटो भास्कर बद्दल बोलतोय. हो, याच नावाने तो ओळखला जातो. आणि याच नावाने,तो आपली ओळखपण सांगतो.

याची माझी पहिली ओळख एका पावसाळी रात्री, आकरा वाजता झाली.औरंगाबादहून मी नगरच्या ताराकपूर बसस्टँड वर उतरलो होतो. मी आणि बायको काहीश्या चिंतेतच होतो. कारण या वेळी रिक्षा मिळणे कठीण असल्याचा आजवरचा आमचा अनुभव होता. आणि मिळालीच तर अवाच्या सव्वा मागतात. त्यात आज पावसाची भर पडली होती. समोर एक ऑटो उभा होता, आम्हाला पाहून ऑटोवाल्याने, रिक्षा जवळ आणून उभा केली.
"प्रोफेसर चौकातून डावी कडे----" मी पावसात भिजत त्याला पत्ता सांगत होतो.
"बर! पैले गाडीत बसा! मग सांगा पत्ता!"
"पण किती घेणार?"
"दोनलाख! काका, पैले बसा!"
मी गुमान सामानासह बसलो. हा किमान शंभर रुपये तरी घेणार! नक्की! दिवस असता तर, पन्नास साठ रुपयात घरी गेलो असतो. बायको जाम गाल फुगवून बसली होती. 'नेहमी, मेल लेचपेच काम! आधी भाडं पक्क ठरवून बसलेले बर असत. पण या बाबाला व्यवहार कसा? तो जन्मात जमला नाही! घरी पोहंचल्यावर रिक्षेवाला 'द्या दोन शे!' म्हणलं तर? तर देऊन मोकळे होतील!' हा तिचा मनातला विचार, मला स्पष्ट वाचता येत होता.
घराच्या पोर्च पर्यंत त्याने रिक्षा आणून उभा केली. सामानातली जड बॅग त्याने ओट्यावर ठेवली. मी त्याच्या हातावर शंभराची नोट ठेवली. त्याने ती खिशात घातली. मी दार उघडण्यासाठी वळणार, तोच त्याने मला आवाज दिला. मी बायकोला दार उघडण्यासाठी किल्ली दिली आणि त्याचा कडे वळलो.
"कारे? कमी वाटतात का?"
"हा! हे घ्या!" त्याने पन्नास रुपये मला परत दिले!
"बरोबर झाले का?"
"हो. बस झाले. मी इतकेच घेतो!"
"तू, नगरचा दिसत नाहीस!"
"इथलाच आहे!"
तो निघून गेला.
"घेतले ना दीडशे? म्हणून म्हणते आधी ठरवत जा!" बायकोने घरात पाय टाकल्याबरोबर तडकली.
"नाही! फक्त पन्नास घेतले!"
"तरी ज्यास्तच घेतले! आधी घासाघीस करून ठरवलं असत तर, चाळीस मध्ये आला असता!" हि, अशीच आहे. तिला पैसे चाळीस-पन्नास महत्वाचे नव्हते, मी आधी भाडे ठरवले नाही याचा राग होता.
०००
एकदा मी बँकेतून पेन्शन घेऊन घरी निघालो होतो. मागून हा आला.
"चला काका, घरी सोडतो! मी त्याच भागात जातोय!"
"अरे जाईन कि चालत."
"कुठं उन्हात जाणार? अनमान नका करू बसा!" त्याच्या आवाजात एक प्रकारचा आग्रह होता.
मी बसलो.
चाळीशीच्या आसपास असावा. थोडासा स्थूल गालावर दाढीची काळी पांढरी खुंट वाढलेली. चेहऱ्यावर सात्विक भाव, अन गळ्यात तुळशीची माळ.
"तुझं नाव काय आहे?" मी विचारलं. तेव्हड्यात त्याचा फोन वाजला.
"हॅलो, बोला आजी?---- हा, आलोच! तिकडचं येतोय!"
"काय झालंय?"
"अहो, आजीला दवाखान्यात न्यायचंय. त्या एकट्याच हैत! तुमाला सोडतो कोपऱ्यावर, मग जाईन त्यांच्याकडं."
"का? त्यांच्या घरी नाही का कोणी?"
"पोरगा गेला आसन कामाला. सुनच पटत नाही म्हातारीशी. पोरगा माझ्यावर दवाखान्यात काम टाकून जात असतो. आजीला तर, माझ्या वर त्यांच्या पोरापेक्षा ज्यादा विश्वास आहे."
हे जरा मला अजब वाटलं. पोटच्या पोरापेक्षा एका रिक्षेवाल्यावर विश्वास?
"म्हणजे? काय जादू केलीस?"
"जादू काय नाय. त्येन्ला दवाखान्यात नेतो, डॉक्टरांनी दिलेल्या चिट्ठीची औषधे घेतो, मग फळाच्या गाड्यावर नेतो. केळी, मोसंबी घेत्यात. मग दोन गुड्डेची बिस्कीट पुड्याची खरेदी असते. म्हातारपणी काय तरी लागत तोंडात टाकायला. मग घरी सोडतो!"
"तू, इतकावेळ देतोस? मग पैशे पण ---"
"नाही काका! पैशे फक्त पन्नासच घेतो!"
"अरे, तासभर तरी मोडत असेल ना?"
"हो, पण माझं पैशाचं नुकसान होत नाही. वर आजीचा आशीर्वाद, बोनस मध्ये असतो!" पुन्हा त्याचा फोन वाजला. असेच कोणीतरी बोलावत होते.'तासभर लागलं!' त्याने उत्तर दिले.
"मी बोलावलं तर येशील?" मी विचारले.
"हा! घ्या माझा नंबर." मी त्याचा नंबर मोबाईल मध्ये घेतला.
"काय नावांन सेव्ह करू?"
"ऑटोभास्कर करा नाव! अन, मला एक मिसकॅल मारा, म्हणजे तुमचा नंबर येतो माझ्याकडे."
मी कॉल केला. त्याने तो सेव्ह करून ठेवला. घराजवळच्या कोपऱ्यावर सोडून तो आजीला घेऊन जाण्या साठी निघाला.
"अरे थांब. पैशे घे. इथवर आळस ना?"
"नको काका, इकडं यायचंच होत. तुमच्यासाठी काय वेगळं पेट्रोल लागलं नाही. खर्च्याच नाही मग उगाच पैशे कशाचे?"
तो निघून गेला.
०००
माझ्या व्हर्टिगोच्या त्रासामुळे, मला बाईक चालवणे बंद करावे लागले होते. मला एखादा विश्वासू रिक्षेवाला हवाच होता. तसे दोनचार ऑटोवाल्यांचे नंबर होते माझ्याकडे. पण ते वेळेवर येत नसत. पैशासाठी वाद घालत. त्यामानाने हा बरा वाटला.
हळूहळू या 'ऑटोभास्कर' बद्दल माहित मिळत गेली. आणि त्याच्यातला 'माणूस!' अधिक प्रभावी होऊ लागला. हा मलाच काय कोणालाच पैशासाठी आडवत नाही,हे कळले आणि एकदा अनुभव पण आला. मी बेंगलोरला निघालो होतो. रेल्वे स्टेशनवर पोहंचलो. दोन हजाराची नोट माझ्याकडे होती, त्याच्याकडे सुटे नव्हते. मी त्याचे भाडे तीन महिन्यानंतर, परत आल्यावर दिले.
समाज हा अव्हेलेबल नसेल तर, 'काका, संभाजीला पाठवू?, दुसरा रिक्षेवाला हाय, मी भाडं घेऊन भिस्तबागला जातोय!' म्हणून सोय करतो.
असच एकदा मी फोन केला.
"भास्कर, अरे उद्या गावात जायचंय! सकाळी आकाराच्या दरम्यान ये!"
"काका, उद्या नाही जमायचं! जोशी काकांना भिंगारला घेऊन जायचं आहे. पेन्शन काढून द्यायची आहे. माझ्या साठी ते तीन दिवस थांबलेत!" हे जोशी माझे सिनियर आहेत, मी याना ओळखतो. त्याच दिवशी ते संध्याकाळी मला रस्त्यात भेटले.
"सर, तुम्हीपण भास्करची ऑटो वापरता?" बोलताबोलता मी विचारले.
"फक्त त्याचीच रिक्षा मी वापरतोय! गेल्या तीन वर्षांपासून! दुसरी रिक्षा नाही करत."
"का? काही विशेष?"
"अरे, एक मुलगा अमेरिकेत, मुलगी ऑट्रेलियात! इथं कोण माझं? तिकडं जायला अनंत अडचणी. या नगरमध्ये, डॉक्टर गंधे आणि हा ऑटोभास्कर माझ्या पाठीशी आहेत! माझ्या म्हातारपणाचा आधार!"
हा मिळवणे विश्वास दुर्मिळच.
०००
आमच्या शेजारच्या मुलाला, शाळेत नेण्या-आणण्यासाठी रिक्षा लावलची होती. मी, या ऑटोभास्कराचा नंबर दिला. 'विश्वासू आहे. डोळे झाकून पोराला त्याचा स्वाधीन करा.' म्हणून पुस्ती पण जोडली. दुसरे दिवशी आमचे शेजारी 'काय उर्मट दिलात हो, रिक्षेवाला? जमायचं नाही म्हणाला!' मला हे भास्कर कडून अपेक्षित नव्हते.
"का रे भास्कर? मी सांगितले होते, भास्करची रिक्षा लावा म्हणून. तू 'जमायचं नाही!' म्हणालास म्हणे."
"काका, मी शाळेची पोर वहात नाही! माझं गिऱ्हाईक वेगळं असत."
" वेगळं म्हणजे?"
"मी ज्यादातर म्हाताऱ्या कोताऱ्यांची ने-आण करतो. त्यांच्या पैकी कोणी नसलं तर, मग इतर भाडं घेतो. पोरांच्या शाळेचं, म्हणजे बांधिलकी असते. मग माझं 'गिऱ्हाईक' अडचणीत येईल! म्हणून मी पोर घेत नाही. आता तर इतके लोक माझ्या भरोश्यावर आहेत, कि मलाच पेलनात. बाबानो, मला वेळ नाही, म्हणालो तर, आपली काम, माझ्या सवडीनं करत्यात! काय करू मी? कसा त्यांचा विश्वास लाथाडु?" हे रिक्षा भाड्याच्या पैश्यापलीकडचं काही तरी होत.
"भास्करा, आरे किती पुण्याचं काम करतोयस? हे तुला माहित आहे का?"
"काका, कसलं पुण्य? मी काही फुकट करत नाही. मोबदला घेतोच कि!"
"पण एक सांग, तू हे 'म्हाताऱ्याना' सेवा देण्याचे, व्रतं केव्हा पासून अन का करतोस?"
"खरं सांगू? मी कामासाठी मुंबईला होतो. मायबाप गावी. त्यांच्या म्हातारपणी मामानं त्यांची देखभाल केली. मायबाप गेल्यावर गावी आलो. मुंबईन कष्ट घेतले, तसा पैसा दिला नाही. म्हाताऱ्यांची सेवा या रिक्श्यापायी घडतीयय. आणि माझं घरपण आनंदानं चालतंय! माझ्या कडून, माझ्या मायबापाची नाहीतर कुणाच्यातरी, मायबापाच्या थोडी बहुत सेवा होती, यातच मला समाधान आहे. अन मी हेच करत रहाणार!"
त्याच्या वाढलेल्या दाढीच्या पांढऱ्या खुंटाकडे मी आदराने पहातच राहिलो.
००००
एकदा मी न बोलावता भास्कर घरी आला. कधी नव्हे तो, आज पायी आला होता.
"काका, पाच एक हजार पाहिजे होते."
"का रे, काय झालं?"
"ऑटो ट्रक खाली गेली! पार्किंग केली होती. ट्रकवाल्यान न बघता रिव्हर्स मारला!"
"परत कधी करणार?"
"दोन महिन्या दिन!"
मी त्याला पैसे दिले. आणि दुसऱ्या महिन्यात आम्ही बेंगलोरला आलो. अपेक्षेपेक्षा मुक्काम वाढला. चार एक महिन्यांनी आम्ही नगरला परतलो. नेहमी प्रमाणे, भास्करला रात्री स्टेशनवर येण्यासाठी फोन करून सांगितले होते.
तो आला. आम्ही घरी पोहंचलो. मी रिक्षाचे भाडे म्हणून शंभर रुपये दिले. त्याने ते नाकारले.
"नको! काका. भाडं नको. मीच तुम्हाला देणं लागतो." असे म्हणत, त्याने खिशात हात घालून नोटांचं पुडकं मला दिले.
"हे काय?"
"ते उसने पैसे घेतले होते ते!"
"अरे घाई कसली? सावकाशीने द्यायचे."
"दोन महिन्याचा वायदा होता. आता पाच महिने होत आले. माझ्या समोर मोजून घ्या."
त्याच्या आग्रहाखातर मी ते मोजले, तर हजार ज्यास्त भरले. मी ते त्याला 'जास्तीचे' आले म्हणून परत केले.
"ज्यास्तीचे नाहीत काका. ते व्याज----"
"भास्कर! मी व्याजबट्ट्याचा धंदा करत नाही! व्याजी पैसे हवे असतील, तर दुसरे घर बघ! अरे, हि तुझ्या अडचणीत आमची थोडीशी मदत होती. तू नाही का, आम्ही दवाखान्यांत गेल्यावर तास तास थाम्बतोस? तसेच हे."
त्याने खाली मान घालून ते पैसे परत घेतले.
"अन हे तुझं भाडं!" माझी शंभराची नोट हि त्यानं स्वीकारली.
मी त्याला कधी एक रुपयाही कमी देत नाही, आणि तो एक रुपयाही ज्यास्त घेत नाही. हे आमचे अंडरस्टॅण्डिंग आहे. पेट्रोल दरा प्रमाणे कधीतरी पाचएक रुपये भाडे वाढवतो. पण आमचा विश्वास आहे कि तो ज्यास्त पैशे घेणार नाही.
आता मुलं दूर असली तरी आम्ही नगरला आरामात रहातो. ऑटो भास्करचा आधार नाकारून चालायचे नाही.

सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
खरोखरच असा माणूस प्रत्यक्षात असेल तर तो आपल्या वाट्याला येणं हे मोठे भाग्याचे

ही अशी व्यक्ती खऱ्यात आहे का लेखन स्वातंत्र्य?
असेल तर कमाल आहे खरंच भास्कर
आणि नसेल तर लेखकाची कमाल आहे
अगदी डोळ्यासमोर उभी राहते व्यक्तिरेखा

<ही अशी व्यक्ती खऱ्यात आहे का लेखन स्वातंत्र्य?
असेल तर कमाल आहे खरंच भास्कर
आणि नसेल तर लेखकाची कमाल आहे
अगदी डोळ्यासमोर उभी राहते व्यक्तिरेखा>> खरय