खेळ मांडला

Submitted by रूपाली विशे - पाटील on 8 January, 2021 - 09:34

खेळ मांडला!!
________________________________________

" आकाश, तुझं कामात बिल्कुल लक्ष नाहीये. बबलू दुबेच्या इन्कम टॅक्स स्क्रुटीनी केसचे पेपर तयार झाले का ? आज दुपारी जॉईन्ट कमिशनरसोबत मिटींग आहे इन्कम टॅक्स ऑफिसला... माहीत आहे ना तुला?" बॉसने झापल्यामुळे पडेल चेहऱ्याने आकाश आपल्या जागेवर येऊन बसला.

"साला... !! हा बबलू दुबे बिहारच्या भागलपूरमधून रिकामी झोळी घेऊन इथे येतो काय ....रस्त्यावर भाजीची गाडी लावतो काय.... आणि काही वर्षात कारखान्यातून निघणाऱ्या भंगाराच्या धंद्याच्या जोरावर शहरातला मोठा तालेवार माणूस बनतो काय .... सारं काही स्वप्नवत !! आता राजकारणातसुद्धा उतरलायं xxx!! पैसा बोलता है... भाई... पैसा...!! हिंमत पाहीजे ... हिंमत... ह्या निधड्या छातीत ...पैसा आणि नाव कमवायला!!" मोठ्या आवेशाने आकाशने हाताची मुठ टेबलवर आपटली.

"काय झालं आकाश ?" बाजूच्या डेस्कवर कामात गुंतलेल्या श्रुतीने हळूच आकाशकडे पाहत हसत- हसत विचारले.

"काही नाही.. !" आकाश उत्तरला.
ही श्रुती पण ना जेव्हा बघावं तेव्हा नुसती हसत असते. हसताना गालावर खळ्या पडतात म्हणून काय सारखं हसावं का एखाद्याने? मनातल्या मनात आकाश श्रुतीवर आणि तिच्या प्रश्नावर चरफडला. हया वेळेस खूप तयारी करायला हवी परीक्षेची. दोन वेळेस अपयश आलयं आपल्यापदरी. आता हार मानायची नाही. मन लावून अभ्यास करायचा आणि एकदा का सीए झालो की, भरभक्कम पगाराची नोकरी पटकवायची आणि एकदा नोकरी लागली की, बाबांना त्यांची नोकरी सोडायला लावायची. शिफ्ट ड्युटीचा खूप त्रास होतो त्यांना...!! आई- बाबांनी खूप कष्ट केलेत. त्यांना आता आराम करू द्यायचा!! छान नोकरी, मग लग्न... मुलंबाळं! बापरे ! आपण फार पुढचा विचार करतोयं!! " आकाशचे विचार आणि त्याची स्वप्ने उंच भरारी घेत होते. साडेपाच वाजले. आकाशने एकदाचे हुश्श केले. सुटलो बाबा एकदाचा ह्या कामाच्या व्यापातून!! ह्या बबलू दुबेच्या स्क्रूटीनी केसने तर डोक्याचा पार भुगा केलायं .!!
आकाशचे नित्यकर्म म्हणजे घर, ऑफीस, जीम आणि अभ्यास आणि मग कधीतरी वीकेण्डला मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाणं..! मित्रांसोबत हिंडण-फिरणं , खूप गप्पा ...धमाल .. फक्त मज्जा! तसा तो गुणी, अभ्यासू, सरळमार्गी मुलगा म्हणूनच आपल्या वर्तुळात प्रसिद्ध होता. आज नेहमीप्रमाणे तो ऑफीसमधून तडक जीममध्ये आला. आतमध्ये प्रवेश करताच ट्रेडमिलवर धावणाऱ्या एका नवीन तरुणीला पाहून तो मंत्रमुग्ध झाला. सडपातळ बांधा, केसांचा घट्ट पोनीटेल बांधलेल्या त्या उजळ कांतीच्या गौरांगनेवर त्याची नजर खिळून राहिली. तसं पण जीममध्ये बऱ्याच मुली यायच्या. पण आज जीममध्ये आलेल्या नवीन तरुणीला पाहून तो चुंबकीय आकर्षणासारखा तिच्याकडे आकर्षिला गेला. समोरचा तरुण आपल्याकडे एकटक पाहतोय हे लक्षात येताच त्या नवयौवनेने मोहक स्मित करत आकाशवर एक प्रेमळ कटाक्ष टाकला. त्या तरुणीने केलेल्या स्मितहास्याने आणि फेकलेल्या कटाक्षाने आकाश अक्षरशः घायाळ झाला. गोंधळलेल्या आकाशनेसुद्धा आपल्या चेहऱ्यावर गोड स्मित आणण्याचा प्रयत्न करत तिला प्रतिसाद दिला. आता हे नित्यनियमाने घडू लागलं. कधी एकदा ऑफिसमधून जीमला पोहोचतो असं आकाशला रोज वाटू लागलं. त्या तरुणीने तिच्या आरस्पानी सौदर्यांने आकाशला भुरळ घातली.

" हॅल्लो! मी मानसी ...!! " एके संध्याकाळी स्वतःहून पुढाकार घेत ती तरुणी आकाशशी ओळख करायला पुढे आली. तिच्या धीटपणावर आकाश फिदा झाला. मानसी एक योगशिक्षिका होती. ती योगवर्ग चालवायची. दोघांची ओळख वाढली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात होणार होतेच.. ते झालेचं!!. एकमेकांसोबत कधी पिक्चर , कधी कॉफीशॉप तर कधी समुद्रकिनाऱ्यावर... दोघांची एकत्र भटकंती सुरू झाली. सोनेरी... स्वप्नाळू दिवस होते ते आकाशसाठी! सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेल्या वाळूत बसून दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन भविष्याची सुंदर स्वप्नं पाहत असत. पण हे सगळं लपून - छपून चाललं होत बरं !! सध्या तरी दोघांना आपलं नातं जगजाहीर करायचं नव्हतं. वेळ आल्यावर दोघांनीही आपल्या प्रेमाची कल्पना आपापल्या घरी द्यायची असं दोघांत ठरलेलं. ऑफीसमध्ये आकाशसोबत काम करणाऱ्या श्रुतीला आकाश आवडायचा. प्रत्येक मुलीने कधीतरी आपल्या आयुष्यात एक स्वप्नातला राजकुमार असावा असं जे काही स्वप्नं पाहिलेलं असतं , अगदी तसंच श्रुतीने पाहिलेल्या आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराच्या प्रतिमेत आकाश अगदी फिट बसायचा. पण श्रुतीचे अबोल प्रेम आकाशपर्यंत काही पोहचत नव्हतं. आपल्याला आकाश खूप आवडतो, पण आकाशला आपण आवडत असू का बरं ? त्याच्याकडून तर कधीच जाणवत नाही असं काही! आकाशला पाहिल्यावर श्रुती ह्या विचारात गुंतून पडायची. आकाश मात्र तिच्याशी कामाव्यतिरिक्त जास्त बोलत नसे. श्रुतीला कधीकधी वाटतं असे की, आपण पुढाकार घेऊन आपल्या मनातल्या भावना आकाशसमोर व्यक्त कराव्या, पण जर आकाशने नकार दिला तर? ह्या कल्पनेने तिला पुढचं पाऊल टाकायचे धाडस होत नसे. मात्र एके दिवशी संध्याकाळी ऑफीसमधून घरी जात असताना अचानक समोरून येणाऱ्या मोटरसायकलवर आकाश आणि त्याच्या मागे चिटकून बसलेल्या तरुणीला पाहून तिच्या हृदयातील आकाशप्रती असणाऱ्या कोमल भावनांना ठेच पोहोचली. आकाशचे लक्ष श्रुतीकडे गेले नाही. तो आपल्या धुंदीतच मोटरसायकल चालवत पुढे निघून गेला. आकाशसोबत कोण असेल बरं ती सुंदरी? श्रृतीच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळू लागला. तिला आकाशला त्याच्यासोबत पाहिलेल्या तरुणीबद्दल विचारावेसे वाटले, पण आकाशला आपलं विचारणं आवडलं नाही तर? ह्या विचाराने तिने स्वतःला रोखले. आकाशचं बदलतं वागणं, फोनवर सतत हळू आवाजातलं बोलणं, त्याचं स्वप्नांच्या दुनियेत हरवून जाणं हे सारं तिच्या नजरेतून सुटलं नाही. आकाश कुणाच्या तरी प्रेमात पडलायं हे न समजण्याइतकी ती नक्कीच दुधखुळी नव्हती. आपल्या मनातल्या नाजूक भावना, आकाशप्रती वाटणारं प्रेम हे एकतर्फीच राहणार, ह्या कल्पनेने तिला उदास वाटू लागलं. जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि त्याच्याभोवती फिरतांना आपल्याभोवती गिरक्या घेते आणि तो सूर्य तटस्थपणे राहत तिच्या अस्तित्वाची दखलही घेत नाही, त्या पृथ्वीसारखी आपली अवस्था झालीयं असं उगाचच तिला वाटू लागलं. सूर्यापासून निघालेली सूर्यकिरणे आपल्या अंगावर झेलत , आपल्या तनावर सजीवता, आनंद, चैतन्यमय सृष्टी निर्माण करणारी पृथ्वी... !! आकाशचं बोलणं... त्याचं हसणं.... आपल्या आजूबाजूला असणारा त्याचा वावर हे सारं आपल्या मनात अलवार, कोमल भावना निर्माण करतं आणि आपलं मनही चैतन्यमय होऊन जातं... अगदी... अगदी... पृथ्वीसारखं... !! बापरे ! कित्ती मोठी उपमा देतोयं आपणं आपल्या प्रेमाला... सूर्य नी पृथ्वी !! नकळत तिला तिच्या विचारांचे हसू येई. हं... त्याला कधी कळतील का बरं माझ्या मनात उमलणाऱ्या भावना? की फक्त ह्या भावना एकतर्फीच राहणार ? एकतर्फी भावनेला प्रेमाच्या दुनियेत काडीची किंमत नाही हे मात्र त्रिवार सत्य आहे. जाऊ दे... किती विचार करावा बरं माणसाने?. हे असले विचार तिच्या डोक्यात उसळ्या मारू लागले की, मग त्या विचारांना मध्येच थांबवित, निश्वास सोडत श्रुती आपल्या कामात गुंतून जाई.

आणि ...इकडे मानसीच्या प्रेमात पडलेल्या आकाशला जणू जगाचा, वास्तवाचा विसर पडत चाललेला. अभ्यास, ऑफिसचे काम यात त्याचे मन आता पूर्वीसारखे रमेना. मानसीचं मोहक हास्य , तिचं गुंतवून ठेवणारं , अखंड धबधब्यासारखं कोसळणारं बोलणं ... !! खरचं..! प्रेम या नावात किती जादू आहे ना? आकाशला चित्रकलेची बालपणापासूनच अत्यंत आवड. मानसीचा सुंदर चेहरा आपल्या मिटल्या पापण्यांसमोर आणून तो तिचे फावल्या वेळेत चित्र काढत बसे. 'मानसीचा चित्रकार तो .... तूझे निरंतर चित्र काढतो! ' गाणं गुणगुणत स्वतःशीच हसणाऱ्या, मानसीच्या प्रेमात बेधुंद झालेल्या आकाशला काळ- वेळेचेही भान उरत नसे.

"मी पाच ते सहा दिवसांसाठी बाहेर जाणार आहे.... आकाश!" मानसीने आकाशला फोनवर गप्पा मारताना म्हटले.

"कुठे जाणार आहेस?" उत्सुकतेने आकाशने विचारले.

" हरिद्वारला...!! आमच्या योगाचा जो ग्रुप आहे ना , त्याचे शिबिर आहे योगगुरू बाबा शामदेवच्या योगविद्यापीठात!"

"बापरे ! तुझ्याशिवाय मला चैन पडणार नाही एवढे दिवस!" आकाश हिरमुसला.

"तू पण चल मग माझ्यासोबत!" मानसी फोनवर हसतच म्हणाली.

"मी ? पण मी कसा येऊ शकतो?"

"माझ्यासोबत ये...!! मी सांगेन सगळ्यांना की, तू योग शिबिरासाठी आलायं !"मानसी अगदी सहजतेने म्हणाली. हो-नाही करत आकाश मानसीबरोबर हरिद्वारला जायला तयार झाला. घरी आई - वडिलांना कधीही खोटं न बोलणारा आकाश मित्रांसोबत दिल्ली फिरायला चाललोय, असं चक्क खोटं सांगत मानसीसोबत हरिद्वारला जाण्याची तयारी करू लागला. आई- वडिलांनी भाबड्या विश्‍वासाने 'सांभाळून जा रे बाबा!' म्हणून प्रेमळ सल्ला दिला. ऑफिसमध्ये त्याने सुट्टी टाकली.

"कुठे चालला आहेस?" श्रुतीने विचारले.

" फिरायला....दिल्ली, आग्रा , ताजमहल वगैरे पाहूया म्हटलं !" आकाश तिच्या प्रश्नावर वैतागला.

"कोण आहे सोबत?" श्रुतीने कुतुहलाने प्रश्न केला.

" मित्र आहेत बालपणीचे ...आता सगळे एकत्र जमून जरा फिरायला निघालोयं.. तेवढीच धमाल!" आता हिला कशाला नको त्या चौकशा पाहिजेत बरं...!!पोलिसांसारखे प्रश्न विचारते उगाच..! श्रुतीसोबतचा संवाद खुंटविण्यासाठी तो जागेवरून उठला.

" हॅ! म्हणे ताजमहाल पाहायला चाललोयं! असेल याची मुमताज सोबत... !! मला ना आजकाल याचं वागणं खूप बदललेलं वाटतयं. ती नटमोगरीच असणार ह्याच्या बदलत्या वागण्याला कारणीभूत. जाऊदे...!! काय करायचे आपल्याला? नाही तरी एकतर्फी प्रेमाला काही अर्थच नाही!" एक दीर्घ श्वास घेत श्रुती आपल्या फाईलमध्ये डोकं खुपसून बसली.

मानसी आणि आकाशने बोरिवलीवरून दिल्लीला जाणारी ट्रेन पकडली. हरिद्वारला तीन दिवस बाबा शामदेवच्या योगशिबिरात दोघांनी भाग घेतला. मानसीने ग्रुपमधल्या सगळ्यांना आकाशची मित्र म्हणून ओळख करून दिली. परतीच्या प्रवासाला अजून तीन दिवस बाकी होते. सगळ्या ग्रुपने हरिद्वारच्या जवळ असणाऱ्या मसुरीला फिरायला जायचे ठरविले. मानसी आणि आकाश दोघेही मसुरीला जायला तयार झाले. एकमेकांसोबत काही क्षण एकांतात घालवता येतील, एकमेकांना ओळखायला... गप्पा मारायला ...असा एकांत पुन्हा दुसरीकडे कुठेही मिळणार नाही ह्या विचाराने दोघेही मसुरीला जायला तयार झाले. आपण आई-बाबांशी, मित्रांशी, ऑफिसमध्ये खोटं बोलून येथे मानसीसोबत वेळ व्यतीत करतोय ह्या विचाराने आकाशाचं मन त्याला टोचू लागलं. पण फक्त क्षणभर बरं! हे असले विचार त्याच्या मनात तरळताच, मानसीच्या नाजूक जिवणीतून तिच्या सुंदर चेहऱ्यावर उमटलेले दिलखेचक हास्य त्याच्या नजरेस पडलं की, त्याचे हे संस्कारी विचार त्या हास्यात अगदी खडीसाखरेसारखे विरघळून जात. प्रेमाची दुनिया जादुई असते असं म्हणतात ते खरचं असावं ...नाही का? दोघेही मसुरीला जाणाऱ्या टॅक्सीत बसले.
" अरे, भाईसाब कोई अच्छासा गाना लगाओ ना!"
टॅक्सीतील पहाडी गाणी ऐकून वैतागलेल्या मानसीने ड्रायव्हरला म्हटले.
" कौनसा गाना लगाऊँ मॅडम? हिंदी या मराठी?"
" मराठी गाना है आपके पास?" मानसीने ड्रायव्हरला विस्मयाने विचारले.
"हा, मॅडम !! यहाँ देशके हर कोनेसे टुरिस्ट आते है, तो हम सब भाषाओं के गाने उनके खुशीके लिये टॅक्सी में बजाते है!" ड्रायव्हर फारच खुशीत येऊन सांगू लागला.
" वैसे भी मै , मुंबई मे दो साल पेहले टॅक्सी चलाता था! तो मला बी ' मराटी' येते थोडी-थोडी!" ड्रायव्हर हसत - हसत म्हणाला. त्याच्या त्या मराठी बोलण्यावर आकाश आणि मानसी दोघेही खळखळून हसू लागले.
"तर मग वाजवा कुठलं बी 'मराटी' गाणं!" आकाशने फर्माईश केली.

" सावध हरिणी....सावध गं... करील कुणीतरी पारध गं... रसरसलेली तुझी जवानी ....चंचल नयनी गहिरे पाणी.....
घातुक तुजला तुझी मोहिनी.. सावध हरिणी... सावध गं..!!

टॅक्सीत गाणं वाजू लागलं. गाणं ऐकून आकाश फारच खुशीत आला. मानसीच्या गळ्यात हात टाकत तो हळुवार तिच्या कानात गुणगुणू लागला.

सावध हरिणी....सावध गं... करील कुणीतरी पारध गं...!! आपले डोळे मोठाले करत त्याच्याकडे लटक्या रागाने पाहत मानसीने त्याच्या हातावर हळूच चापट मारली. दोघे हॉटेलमध्ये पोहचले. सोबतचा ग्रुप जवळच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये गेला. सगळ्यांना एकाच हॉटेलमध्ये राहायला बुकिंग मिळाले नव्हते. शांत, सुंदर, निसर्गरम्य... मसूरी!!हिमालयाच्या कुशीत पडलेलं गाव .. उंच पर्वतरांगा...वर निरभ्र आकाश..... मनाला धुंद करणारं वातावरण... तिथल्या हवेतला नशिला गारवा... प्रेमीयुगुलांना मोहवणारा.. पुन्हा पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पाडणारा...

मानसी आणि आकाश हॉटेलच्या एकाच रूममध्ये थांबले. आकाशला एकाच रूममध्ये दोघांनी लग्नाआधी एकत्र राहणं योग्य वाटत नव्हतं . मध्यमवर्गीय संस्कार होते त्याच्यावर!!. त्याच्या मनात चाललेली चलबिचल मानसीने ओळखली. प्रेमाने, हळूवार आकाशला समजावत ती म्हणाली, "आकाश, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून तर तुझ्यासोबत इथे आले ना मी? एवढा विचार नको करू!". मानसीच्या बोलण्याने आकाश निर्धास्त झाला. पण... पण ... ती रात्र अखेर दोघांसाठी वादळी ठरली. दोघांनाही एका वेगळ्या अनुभवाच्या विश्वात सैर करवून आणणारी.... वेगळ्या धुंदीने मंतरलेली ...आणि तीच रात्र दोघांच्याही पुढच्या आयुष्यात एक जबरदस्त वादळ घेऊन येणारीसुद्धा!! त्यारात्री जे घडू नये असं वाटतं होतं ते घडलं. दोघांनाही मोहात पाडणारी ती रात्र सरली. दुसऱ्या दिवशी आकाशला खूप अपराधी वाटत होतं. तो शरमिंदा झाला होता. मानसीच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता. ज्या स्पर्शाचं पावित्र्य आपण जपायला हवं होतं ते आपण गमावलं आहे, ह्या गोष्टीची हुरहूर त्याच्या मनाला लागली. स्पर्शाचं पावित्र्य, आपलं कौमार्य लग्नाआधी गमावणं म्हणजे घोर पाप असे संस्कार त्याच्यावर झालेले. कुठेतरी त्याच्या हळव्या मनाला जे घडलं त्याबद्दल टोचणी लागली. मनातल्या कोमल भावना स्पर्शाद्वारे व्यक्त करण्यासाठी समाजाने दिलेली विवाहबंधनाची सीमा आपण अशी चोरटेपणाने ओलांडली, ह्या विचाराने तो अस्वस्थ झाला. मानसीची अवस्थाही आकाशपेक्षा वेगळी नव्हती. पण आपण दोघे भविष्यात आपलं नातं लग्नगाठीत बांधणारच आहोत तर आता जे घडून गेलयं त्याचा विचार करण्यात काहीही अर्थ नाही असा विचार करत, एकमेकांना विश्वास देत दोघेही परतीच्या प्रवासाला निघाले. हरिद्वारवरून परत आल्यावर आकाश पूर्णपणे बदलला. त्याला आपल्या आई-वडीलांच्या, ऑफीसमधल्या सहकाऱ्यांच्या, मित्र- मैत्रिणींच्या नजरेस नजर देण्याची हिंमत होत नव्हती. मानसीसोबत मात्र त्याची रोज भेट व्हायची आणि एके दिवशी मोबाईल घेऊन बसलेल्या आकाशला व्हाट्सअॅपवर अनोळखी नंबरवरून एक व्हिडिओ आला. त्याने व्हिडिओ सुरू केला. व्हिडिओ पाहताच आकाश मुळापासून हादरला. त्याच्या सर्वांगाला घाम सुटला. त्याचे हात- पाय लटपटू लागले. तेवढ्यातच हातातल्या मोबाईलची रिंग वाजली. अनोळखी नंबरवरून आलेला कॉल त्याने घाबरतच घेतला.
" ए... हिरो! कैसा लगा व्हिडिओ ?अच्छा है ना?"
फोनवरचा टपोरी आवाज ऐकून आकाशचे अवसान गळाले.
"कौन ....कौन बोल रहा है?"
"पैचान कौन? शीला भी नही... रानी भी नही.. तो बोलो कौन? " फोनवरच्या छद्मी आवाजाने आणि विकृत हास्याने आकाशच्या हृदयाचे ठोके वाढले.
"अबे ! सून ... बहुत मजा आ रहा था ना तुझे अपने हीरोइन के साथ ... अब उस मजेकी किमत चुकानी पडेगी तुझे! समझा क्या?" अज्ञात इसमाची फोनवर धमकी.
"क्या.... क्या.. चाहिये तुझे ? ये मेरी व्हिडिओ किसने बनायी?" आकाशचा आवाज कापरा झाला.
" इससे तुझे क्या मतलब? एक लाख... सुना तूने ... एक लाख ..देना पडेगा तुझे इस व्हिडीओके बदलेमें!"
" इतने पैसे? कहाँ से लाऊं मै?" आता आकाशला चक्कर येऊ लागली.
" कहाँसे भी ला..! चोरी कर ... पर मुझे पैसे चाहिए! अगर पुलिसके पास जाने की शानपत्ती दिखायी ना तो समझ लेना की, व्हिडिओ वायरल होही गया ! " अनोळखी व्यक्तीने आकाशला पुन्हा धमकावलं.
"नही... नही.. ऐसा मत करना ! मै... मै... दे दूंगा पैसे!"
फोन कट झाला .आकाश पूर्ण घामाने चिंब. एक लाख!! बापरे.. एवढे पैसे कुठून देणार आपण ? आपण एवढे मूर्ख कसे ठरलो, भावनेच्या भरात आपल्या डोक्यात हा
विचारसुद्धा शिवला नाही की, हे असं काही अघटीत आपल्याबाबतीत घडू शकतं. कुणी बनविला असेल हा व्हिडिओ? कोण असेल ह्या सर्वांच्या मागे? त्याच्या डोक्यात विचारांच्या लाटा उसळी मारू लागल्या. तो डोकं गच्च धरून बसला. त्याने पुन्हा त्या अनोळखी नंबरवर फोन करून पहिला पण आता तो नंबर बंद होता.
आकाशची मती कुंठीत झाली आणि तेवढ्यातच मानसीचा फोन आला. ती फोनवर रडत होती. तिलाही अनोळखी नंबरवरून फोन आला होता. मानसी आणि आकाशच्या हॉटेलमधल्या वास्तव्यचा , त्यांच्या उत्कट प्रेमभावनेतील आवेगाचा, प्रणयप्रसंगाचा कुणीतरी छुप्या कॅमेराने व्हिडिओ बनवून दोघांनाही गोत्यात आणलं होतं. या सर्वांमागे खूप मोठी सायबर गुन्हेगार टोळी असणार आणि आता ते आपल्याला पैश्यांसाठी ब्लॅकमेल करणार हया विचारांनी दोघे हबकून गेले. आपण पूर्णपणे फसवलो गेलोयं ह्या कल्पनेने तसेच जर त्यांना आपण पैसे दिले नाही तर ते अज्ञात ब्लॅकमेलर आपला व्हिडिओ व्हायरल करून आपली समाजात बदनामी करतील, ह्या विचाराने दोघेही भीतीने गारठले. आता ह्या सगळ्यातून मार्ग कसा काढणार? ब्लॅकमेलरला एक लाख रुपये कसे देणार? आपण तर अजुन शिकतोय. ऑफिसमध्ये तर आपल्याला फक्त स्टायपेंड मिळतेयं. घरी, नातेवाईकांना, ऑफिसमध्ये, मित्रमैत्रिणींना जर हे सगळं कळलं तर आपण कुणालाही तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही. ह्या असल्या विचारांच्या भुंग्यांनी रात्रभर आकाशच्या मेंदूचा पार भुगा पाडला.

दुसऱ्या दिवशी चेहऱ्यावर उसने अवसान आणत आकाश ऑफिसला गेला. बॉसने केबिनमध्ये बोलावून त्याला बबलू दुबेच्या इन्कम टॅक्स स्क्रुटीनी केसची कल्पना दिली. आयकर अधिकारी गरेवाल, बबलू दुबे आणि आकाशचा बॉस हया तिघांनी बबलू दुबेची इन्कम टॅक्सची स्क्रूटीनी केस सेटल केली होती... टेबलाखालून... पंचवीस लाखांमध्ये...!!
पहिला दहा लाखांचा हप्ता गरेवालला पोहोचवायचा होता. गरेवालचा विश्वासू माणूस हॉटेल सप्तर्षीमध्ये येऊन पैशांची बॅग घेऊन जाणार असे ठरले. बबलू दुबेच्या माणसाकडून पैशाची बॅग पोस्टऑफिस जवळून घ्यायची होती आणि हे काम बॉसने आकाशवर सोपवले.

दहा लाख!! दहावर पाच शून्य....!! आकाशचे चिंतेने ग्रासलेले, अनामिक भीतीने निस्तेज झालेले डोळे एका वेगळ्याच कल्पनेने चमकले. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या आकाशची एरव्ही सदैव जागी असलेली सद्सदविवेकबुद्धी ह्या घडीला पूर्णपणे नष्ट झाली. त्याला आता फक्त आणि फक्त पैसेच दिसू लागले. ते पैसे त्याला परिस्थितीला शरण जाण्यास भाग पाडत होते... संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दर्शवित होते. त्याने मोठ्या हिंमतीने बॅगतले एक लाखाचे बंडल उचलले. उरलेले पैसे घेऊन त्याने हॉटेल सप्तर्षी गाठले. त्याने गरेवालच्या माणसाकडे काही घडलचं नाही अश्या अविर्भावात बॅग सूपूर्त केली. गरेवाल आणि त्याच्या माणसासाठी हे नेहमीचं काम होतं. त्याला पैसे मोजायची काही गरज वाटत नव्हती. पैशांची बॅग गरेवालच्या माणसाने व्यवस्थित गरेवालच्या घरी पोहचवली. त्याच संध्याकाळी अनोळखी नंबरवरून आकाशला पुन्हा फोन आला. पैशांची सोय झाली आहे असं आकाशने म्हटल्यावर अज्ञात ब्लॅकमेलर खूश झाला. त्याने रात्री आठ वाजता आकाशला गोल्ड सिनेमागृहाच्या कोपऱ्यावर पैश्यांची बॅग घेऊन उभे राहायला सांगितले. परिस्थितीपुढे हतबल झालेला आकाश रात्री बॅग घेऊन गोल्ड सिनेमागृहाजवळ उभा असताना अचानक मोटारसायकलवरून आलेल्या दोन हेल्मेटधार स्वारांनी त्याच्या हातातली बॅग हिसकावून पळ काढला. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ही थरारक घटना घडल्याने आकाश जीवाच्या आकांताने त्या मोटरसायकलच्या मागे धावत सुटला . तेवढ्यात अचानक त्याचा फोन वाजला. फोन उचलताच फोनवर गडगडाटी हास्याचा कर्णभेदी आवाज ऐकून त्याचे पाय जमिनीला खिळले.
" अबे, ए हिरो ... क्यो हिरोगिरी कर रहा है रे तू? पैसे मिल गए!" तेच विकृत हास्य... तोच छद्मी आवाज.
"अभी ...अभी.. मेरा वो व्हिडिओ डिलीट कर दो ...प्लीज!" पायातले त्राण गेलेले... खोल गेलेला आवाज ...आकाश फोनवर ब्लॅकमेलरला विनवू लागला.
" ए , हिरो ! इतनी जल्दी क्या है? और सुन... अगले हप्तमें और पचास हजार तय्यार रख... ! इतने कम पैसे मे कैसे व्हिडिओ डिलीट होगा? " फोनवर पुन्हा तेच विकृत हास्य....!!
" नही..और पैसे नही दे सकता मै!" आकाश किंचाळला. फोन कट. आकाश होता त्या जागीच हताशपणे गुडघ्यावर बसला. त्याला रडू कोसळलं. काय करावं? कुठे जावं? कुणाला सांगावं ? पोलिसांकडे जावं का? पोलीस आपली मदत करतील का ? चेहर्‍यावर मोठं प्रश्नचिन्ह घेऊन कसातरी आकाश घरी पोहोचला. त्याचा उतरलेला चेहरा पाहून आईने त्याची काळजीने विचारपूस केली. आकाश ऑफीसच्या कामामुळे, अभ्यासामुळे थकला असेल ह्या विचाराने तिनेही जास्त खोलात जाऊन चौकशी केली नाही. त्या रात्री पुन्हा मानसीचा फोन आला. तिच्या आवाजावरून ती खूप घाबरलेली वाटत होती. अज्ञात ब्लॅकमेलरने पैश्यांसाठी तिला परत फोन केला होता. तिच्या घरच्यांच्या फोनवर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आणखी पन्नास हजाराची मागणी ब्लॅकमेलरने तिच्याकडे केली होती.आपण आता पूर्णपणे नागवले गेलोयं ह्या विचाराने आकाश हताशपणे डोक्याला हात लावून बसला. आपल्या पुढच्या ह्या संकटाने तो पूर्णपणे खचला. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये धैर्य करून तो जरा घाबरतच पोहचला. आपल्या जागेवर बसतच होता तेवढ्यात बॉसने त्याला केबिनमध्ये बोलावले. धडधडत्या छातीने आकाश बॉसला सामोरा गेला. त्याच्या कपाळावर घर्मबिंदु जमा झाले.

"आकाश, काल जी दहा लाख रुपयांची बॅग गरेवालला द्यायची होती , त्या बॅगमधले एक लाख रुपये गायब झालेत !" बॉसच्या खर्जातल्या आवाजाने आकाश दचकला.

" एक लाख? पण सर, मला त्याची काही कल्पना नाही!" चेहऱ्यावर साळसूदपणाचा भाव आणत आकाश उत्तरला.

"आकाश, मला माहित आहे पैसे तुम्हां तिघांपैकी एकाने उचललेत. बबलूचा माणूस, गरेवालचा माणूस किंवा तू..! संशय तुम्हां तिघांवरच जातोय!" बॉस आकाशचा चेहरा निरखित म्हणाला.

" सर, तुम्ही काय बोलतायेतं ते मला काहीच लक्षात येत नाहीये!" आतून जबरदस्त घाबरलेला आकाश बेडरपणाचा आव आणत म्हणाला.

"आकाश ..! पैसे तू चोरलेस काय किंवा त्या दोघांनी चोरले काय? भोपळा विळ्यावर पडला काय किंवा विळा भोपळ्यावर पडला काय ? कापला तर भोपळाच जाणार! लबाडी मी केलीयं असचं गरेवालच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होतं मला!" आकाशचा बॉस अस्वस्थ झाला.

" गरेवालला त्याच्या माणसावर पूर्ण विश्वास आहे. बबलू दुबेला त्याच्या माणसावर पूर्ण विश्वास असणार आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास ! पण शेवटी प्रतिष्ठा माझी पणाला लागतेयं... कळतयं तुला? मोठ्या विश्वासाने हे काम तुझ्यावर सोपवलं होतं मी. ह्या असल्या टेबलाखालच्या काळ्या व्यवहारात कुणी पोलिसांकडे जाऊ शकत नाही हे चोराला पक्कं माहित आहे. बबलू दुबेकडे शहानिशा करू शकत नाही कारण त्याच्याशी वाद घालणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखं! पैसे तर चोरीला गेलेत...पण कोणी चोरले? सांग आकाश.. तू गुन्हेगार तर नाहीस ना ? "आकाशच्या बॉसला आपल्या व्यवसायातील छक्के-पंजे पूर्णपणे ठाऊक होते.

"नाही सर, मी नाही चोरी केली!" आकाशच्या डोळ्यात अश्रू आले.

"ठीक आहे जा तू!"

आयकर अधिकारी गरेवाल किती पाण्यात आहे ते आकाशचा बॉस जाणून होता. चोरीला गेलेले एक लाख रुपये गरेवाल त्याच्याकडे असणाऱ्या आपल्या दुसऱ्या केसमध्ये नक्कीच दामदुप्पटीने वसूल करेलच.!! बॉस विचारात पडला.

आज आकाश आपल्या स्वतःच्या नजरेतून पार उतरला. एका चुकीमुळे त्याला त्याचा स्वाभिमान गहाण टाकावा लागला. बॉस समजूतदार होता. आकाशवर विश्वास दाखवित होता आणि त्याच्या विश्वासाचा आपण गैरफायदा उचलला, ह्या गोष्टीची आकाशच्या सात्विक मनाला खंत लागून राहिली. सुन्न अवस्थेत आकाश आपल्या जागेवर येऊन बसला. श्रुतीने त्याच्या चेहर्‍यावरचे भाव ओळखले. आकाशचं काहीतरी बिनसलंय हे तिला समजत होतं. पण नक्की काय बरं झालं असेल? बहुतेक त्या नटमोगरीमुळे काहीतरी बिनसलं असावं अशी शंका तिच्या मनात आली. पण आज आकाशला काही विचारण्यासाठी तिचे मन धजावलं नाही. ती मूकपणे आपलं काम करीत राहिली. आकाशच्या चेहऱ्यावरचा अस्वस्थपणा तिला अस्वस्थ करत होता. ती हळूच आणि अनिमिष नजरेने , चोरून डोळ्यांच्या कोपर्‍यातून त्याच्याकडे पाहू लागली. त्याला आपल्या नजरेत साठवू लागली. आज तिच्या मनाला एक वेगळीच हुरहूर लागली. आकाश पडेल चेहऱ्याने घरी आला. मला जेवायला नको असं आपल्या आईला म्हणत आपल्या खोलीत गेला. अजाणतेपणी आपल्या हातून एक मोठी चूक झाली आणि आता त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतायेतं. पैशांसाठी आपल्या शीलाचा, आपल्या पौरुषत्वाचा, आत्मसन्मानाचा खेळ कुणा अज्ञातांकडून मांडला जातोय आणि आपण अभिमन्यूसारखे ब्लॅकमेलरने रचलेल्या चक्रव्यूहात अडकत चाललो आहोत , ह्या विचारांचा ताण आकाश सोसू शकला नाही. हे सगळं आपल्या सहनशक्ती पलीकडलं आहे. त्यापेक्षा आपले जीवन संपवणे म्हणजे सारे प्रश्न , समस्या नाहीशा होतील या अभद्र विचाराने त्याला घेरले आणि मग मागचा पुढचा कुणाचाही विचार न करता त्याने गळ्यात फास अडकवला.

संपलं ....सारं काही संपलं... पण फक्त आकाशपुरतं! आपल्या आई-वडिलांना अतीव दुःख, वेदनेच्या दारात उभं करून आकाशने हताशपणे परिस्थितीपुढे सपशेल हार पत्करली. आपले अमूल्य जीवन संपविले. "आकाश.... तुला काय समस्या होती रे बाळा? एकदातरी आमच्याशी बोलायचे होते ना रे ? कुठे कमी पडलो रे आम्ही? " आकाशच्या आई-वडिलांचा आक्रोश बघवत नव्हता. पोलिसकेस झाली. आकाशच्या आई-वडिलांनी कुणावरही संशय व्यक्त केला नाही. किती दुर्दैवी माता-पिता!! आपल्या मुलाच्या आयुष्यात किती उलथा-पालथ सुरु होती ह्याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती. आपल्या नशिबाला दोष देत रडत राहिले बिचारे!!. आत्महत्या करण्याआधी आकाशने मानसीचा नंबर , अनोळखी फोनवरून आलेले कॉल , व्हिडीओ आपल्या फोनमधून नाहीसे केले. आकाशच्या आई-वडिलांनी कुणावरही संशय व्यक्त न केल्याने पोलिस तपास पण जास्त खोलात गेला नाही. ऑफिसमध्ये चौकशी केली तिथेही पोलिसांना संशय घेण्यासारखं काही वाटलं नाही. सीएच्या फायनल परीक्षेत बर्‍याचवेळा अपयश येत असल्यामुळे तो निराश राहत असे , असं आकाशच्या ऑफीसमधल्या तपासादरम्यान पोलिसांना समजलं. आकाशच्या आत्महत्येची केस बंद होण्याच्या मार्गावर पोहचली. आकाश कुणी बड्या बापाचा मुलगा नव्हता की कुणी चंदेरी दुनियेचा हिरो ज्याच्यासाठी सगळ्या न्याययंत्रणा उभ्या राहतील. देशात रोज हजारो लोक आत्महत्या करतात त्यातलीच एक आकाशची आत्महत्या... कुणाच्याही खिजगणतीत नसलेली!!

नंतर....नंतर पुढे काय झालं? वाचा तर मग पुढे काय झालं ते...!

आजही आकाशचे आई -वडील एखाद्या मोटरसायकलचा आवाज कानावर आला तरी घराबाहेर धावत येतात. त्यांचा आकाश आता परत घरात येईल, आई, मला खूप भूक लागलीये.. लवकर जेवायला वाढ गं... असं म्हणेल. पण हा त्‍यांना होणारा भास असतो. वास्तवाचं भान आलं की, आपल्या वेड्या, भाबड्या मनाला समजावत, एकमेकांना आधार देत , निस्तेज डोळ्यांतले अश्रू पीत दोघेही सुन्नपणे बसून राहतात . एरव्ही खळखळून हसणारी श्रुती आकाशच्या आठवणीने, त्याच्या रिकामी झालेल्या खुर्चीकडे पाहत मूकपणे अश्रू ढाळत फाइलमध्ये डोकं खुपसून ऑफीसमध्ये बसलेली असते. आकाशसमोर कधीही व्यक्त न करू शकलेल्या आपल्या भावनांचे ओझे सांभाळत! गरेवालची बदली झालीयं, त्याच्या जागी नवीन आयकर अधिकारी आलायं. टेबलाखालून कामं नेहमीप्रमाणे चालू आहेत. बबलू दुबे ह्या वर्षी आमदार पदाच्या निवडणुकीत उभा राहिलाय. त्याला पूर्ण खात्री आहे आमदार म्हणून निवडून यायची. आणि का नसणार? कारण पैसा बोलता है भाई... पैसा...!! तर आज त्याच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शहरात सभा घेणार आहेत.

" साहेब , त्या आकाश राऊत आत्महत्या केसचे काय करायचे ?" हवालदार मोरेनीं इन्स्पेक्टर साहेबांना विचारले.

" परिक्षेतील अपयशामुळे नैराश्यातून आत्महत्या ' असं लिहा रिपार्टवर! बरं... मोरे, आज मुख्यमंत्री साहेबांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी जायचे आहे ना आपल्याला? चला तयारीला लागा! " इन्स्पेक्टर साहेबांनी मोरेंना आज्ञा फर्मावली.

अरे! पण हया सगळ्यांत मानसी कुठे आहे ? तिची अवस्था तर खरचं वाईट झाली असेल ना ? पण ती आहे तरी कुठे?

" झालं ..झिंग... झिंग .. झिंग ...झिंगाट ....!!
झिंग... झिंग ...झिंगाट......!!

अरेच्चा! हातात दारूचा ग्लास घेऊन आपल्या नाजुक कमरेला नाजूक हिसके देत त्या डान्सक्लबमध्ये कोण बरं नाचतेयं? ....मानसी? एवढ्या लवकर कशी काय सावरली ती , आकाशच्या मृत्यूच्या धक्क्यातून ? नाही... नाही... तुमचा काहीतरी गैरसमज होतोयं. तिला सावरण्याची गरजच काय? असे कितीतरी आकाश तिच्या मागेपुढे फिरत असतात. तर आता तिची नजर वेध घेतेयं.. धुंडाळतेयं कुणालातरी... कुणाला म्हणून काय विचारतायं ? ती शोधतेयं आपल्या नव्या सावजाला... नवीन शिकारीसाठी....!!

" हॅलो ! मी स्वीटी!" मोहक हसत ती त्या लाल टीशर्ट घातलेल्या युवकाला आपली ओळख करून देतेयं.

तर आकाशला भेटलेली ही मानसी आता कुणाला कुठेही भेटू शकते. कधी मानसी, कधी स्वीटी , तर कधी बबली ...कुठल्याही नावाने!! आपल्या नवीन सावजाच्या शोधात ....नवीन खेळ मांडायच्या तयारीत....आणि तिचं खरं नाव कुणाला कधीच कळणार नाही.!! तर सावधान!!

समाप्त!!

धन्यवाद!!

रूपाली विशे- पाटील

(टिप - सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून सदर कथेतील नावं आणि घटनेत काही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कथेद्वारे कुणाच्याही भावना दुखविण्याचा कथा लेखिकेचा उद्देश नाही. कथेतील प्रसंगाची गरज म्हणून काही संवादासाठी हिंदी भाषेचा वापर केला गेला आहे.)

_________________ XXX________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरवात ते शेवट उत्कंठा वाढविणारी गूढ आत्महत्या कथा. कोण आहे सोबत? मानसी ऐवजी श्रुती असा बदल करावा. नविन वर्षातील नवीन कथा आवडली.

खूप धन्यवाद किशोरजी!!
पहिल्या प्रतिसादासाठी आणि चूक निर्दशनास आणून दिल्याबद्दल...

खूप सुंदर कथा.... श्रुती बद्दल काहीसं वाईट वाटत... पुढील लिखाणासाठी शुभेच्छा

लावण्या, तुषार, जाई...!!
खूप आभार तुमचे ... नेहमीच्या प्रोत्साहनपर प्रतिसादासाठी...!!

मृणाली, मोहिनी, वीरूजी, अज्ञातवासी, सांज, वावे....
मनापासून आभार तुम्हां सर्वांचे ... तुमचा प्रोत्साहनपर प्रतिसाद माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे.
@ सांज - खरं आहे तुझं म्हणणं... असं घडत असतचं फक्त त्याचा तपास खोलवर जात नाही हे कटू वास्तव आहे.

छान गोष्ट...

"सावध हरिणी....सावध गं... करील कुणीतरी पारध गं... रसरसलेली तुझी जवानी ...." दुसर्‍या नंबरवर सावध नाही तर सावज असे हवे.. "सावध हरिणी....सावज गं... " असे हवे. नाहीतर फार वेगळा अर्थ (कथेला समर्पक पण...) निघतो.

धन्यवाद योगी..
संपादनाची वेळ टळून गेलीयं पण बरं झालं तुम्ही प्रतिसादात लिहिलं ते..!