कबंध घोडेस्वाराचे रहस्य : भाग २

Submitted by पायस on 8 January, 2021 - 04:15

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/77668

दुसरा दिवस

ख्रिसने तपासाचा पुढील टप्पा म्हणून स्थानिक पोलिस आणि शवाची तपासणी करणारे डॉक्टर यांची भेट घ्यायचे ठरवले. यासाठी त्याला गावात जावे लागणार असल्यामुळे प्रिन्स विजयची भेटही सोबतच घडली असती. मग जमल्यास शवाची पाहणी करण्याचे ठरवले. नाश्ता त्याने खोलीतच मागवून घेतला. आल्बस चहाचे साहित्य घेऊन आला. अ‍ॅलेक्सी लगबगीने पुढे झाला पण आल्बसने नम्रपणे त्याला तसदी न घेण्यास खुणावले. कालचा चहा आवडल्याने ख्रिसने पुन्हा त्याच सौम्य अर्ल ग्रेची फर्माईश केली होती. आल्बसने आणलेला टी-सेट सुंदर होता. पांढर्‍या बोनचायनावर निळ्या रंगाने फुलांची आकर्षक रचना चितारली होती. तो टी-सेट बघून अ‍ॅलेक्सीला खूपच आश्चर्य वाटले. त्याला हे ठाऊक होते की चिनीमातीच्या वस्तु बनवण्यास प्रसिद्ध वेजवुड कंपनी स्टॅफोर्डशायरमध्येच कुठेशी आहे. पण त्याने पाहिलेले सर्व वेजवुड टी-सेट्स बिस्किट कलरचे होते. असे निळे-पांढरे टी-सेट्स त्याने पूर्वी पाहिले नव्हते. तसेच वेजवुडचा मेकर्स मार्कही कुठे दिसत नव्हता.

बाहेर पडताना त्याने आल्बसला न राहवून विचारलेच. आल्बसने खुलासा केला की सर गॅविन हे टी-सेट्स युरोपातून कुठून तरी मागवत असत. त्याला केवळ गशेल असे नाव लक्षात राहिले होते. ख्रिसही हे संभाषण ऐकत होता.
"अ‍ॅलेक्सी लंडनला परत गेल्यावर या ब्रँडची चौकशी करायची आठवण कर. असा एक टी-सेट आपल्या संग्रही असायला हरकत नाही."
"अ‍ॅग्रीड, सर"
"आल्बस मला आणखी एक प्रश्न होता. आज सकाळपासून घड्याळ्याच्या मनोर्‍यापाशी बरीच खुडबूड चालू आहे. त्याबद्दल काही सांगू शकतोस?"
"होय सर. इतर घड्याळांप्रमाणेच या घड्याळालाही नियमित तेलपाणी करावे लागते. त्याची वेळ मागे-पुढे झाली नाही ना हे बघावे लागते. यासाठी एक घड्याळजी महिन्या-दोन महिन्यातून एकदा चक्कर मारतोच. आमच्या घड्याळजीचे नाव आहे ग्रँट मॉरिसन. आज ग्रँटची नियोजित भेट होती. तरी तो काही दुरुस्ती करत आहे."
"तो लगेच परतणार आहे का?"
"नाही आजची रात्र तो इथेच राहून मग उद्या सकाळच्या गाडीने लंडनला परतेल."
"गुड. मला त्याची भेट घ्यायला आवडेल."

~*~*~*~*~*~

ख्रिसने स्थानिक पोलिस अधिकार्‍यांची भेट घेतली. तपास प्रमुख होते इन्स्पेक्टर केविन कुक. त्यांची मदत करत होता सार्जंट जॉन मॅकिन्ले. केविन पन्नाशीकडे झुकले होते. चौकोनी चेहर्‍यावर हलक्या सुरकुत्या दिसायला सुरुवात झाली होती. पण मुद्रा प्रसन्न होती. तुलनेने जॉनचा चेहरा लांबुळका आणि मख्ख होता. त्याची पकडही सैलसर होती. पण ख्रिसला त्याच्या डोळ्यांमध्ये एक हलकी चमक दिसली. त्या मख्ख चेहर्‍यामागे एका तरुण, होतकरु पोलिस अधिकार्‍याचा मेंदू होता.

"सर, तुम्ही उगाच लंडनहून यायची तसदी घेतलीत. ही खूप सरळ साधी केस आहे. सर गॅविन कैक वर्षांपासून परदेशांत व्यापारिक गुंतवणूक करत आहेत. त्यांचे कित्येक वाद झाले आहेत/असतील. यात कधी दोन्ही पक्षांना पटेल असा तोडगा सापडतो किंवा बोलणी फिस्कटतात. यावेळेस तसे झाले नाही."
ख्रिस केविनकडे बघतच राहिला. याला खरंच तपास करायचा पण आहे का नाही? जर याने आधीच असे ठरवून टाकले की खूनी कोण आहे तर हा अनेक पुराव्यांकडे दुर्लक्ष करणार आहे. केविननी आपले बोलणे चालूच ठेवले.
"तशी त्या मॅनोरमध्ये इतर काही शस्त्रे आहेत. शॉर्टस्वोर्ड्स, बॅटलअ‍ॅक्स इ. पण ती शस्त्रे वापरून घाव घातला गेला तर शिरच्छेद करायला अनेक वेळा वार करावा लागेल. हा शिरच्छेद एका वारात केला आहे. यासाठी हिंदुस्थानी राजकुमाराची तलवार वगळता इतर कुठले शस्त्र आम्हाला सापडले नाही."
"पण त्यावर रक्ताचे डाग होते? ती तलवार राजकुमाराने मॅनोरच्या आत-बाहेर कशी काढली हे कळले?"
"नाही. पण रक्ताचे डाग धुतले जाऊ शकतात. आता धुतलेले रक्ताचे डाग कसे शोधता येतील हे अजून कोणालाच माहित नाही. आपले फॉरेन्सिक्स तेवढे अजून पुढे गेलेले नाही. आणि तलवारीवर कोणी चोवीस तास लक्ष ठेवून नसतं. काढली असेल कधीतरी. याचा अर्थ असा नाही की तुम्ही चिंता केली पाहिजे. आपण ही केस कोणा अज्ञात शत्रूवर ढकलून देऊ. ज्युरीसमोर उभं राहायची वेळ तेव्हाच येईल जेव्हा हॉवर्ड्सपैकी कोणी विजयवर खटला भरेल. त्यावरही बोलाचालीने काही तोडगा काढता येऊ शकतो. मी गॅरेथ-विल्यमशी बोलू शकतो. तुम्ही प्रिन्सला तयार करा."

केविनना हे प्रकरण वाढवत बसायचे नव्हते. त्यांना लवकरात लवकर ही लंडनची टांगती तलवार दूर करायची होती. त्याचे तीन मार्ग त्यांच्या डोक्याने शोधून काढले होते. १) ग्रीन नाईटच्या शापावर सगळं काही ढकलून देणे. यात प्रॉब्लेम असा होता की गॅरेथ, जो कॅनहॅम्प्टनचा लॉर्ड बनणार हे जवळपास निश्चित होते, तो हे स्पष्टीकरण कधीच मान्य करणार नाही. स्थानिक धनाढ्य व्यक्तीसोबत विनाकारण शत्रुत्व ओढवून घेण्यात कसलेच शहाणपण नव्हते. २) सर्व काही प्रिन्स विजयवर ढकलून देणे. यात प्रॉब्लेम असा होता की प्रॉपर तपास न करता असा निष्कर्ष काढल्यास लंडनहून त्यांच्यावर शाही आपत्ती ओढवली असती. या दृष्टीने पर्याय दोन पर्याय एक पेक्षाही वाईट होता. ३) अज्ञात खुन्याच्या नावावर बिल फाडणे. या फायलीला कोल्ड केसचा रस्ता दाखवून आपल्या डोईचे ओझे उतरवणे. यात प्रॉब्लेम इतकाच होता मध्यस्थी कोण करणार? केविन यांची अपेक्षा होती की ख्रिसने हे काम आपल्या अंगावर घ्यावे.

आणि ख्रिसला चौथा पर्याय हवा होता. कसून तपास करून यामागील सूत्रधाराचा छडा लावणे. आपल्याला केविनकडून सहकार्य मिळू शकेल पण मदत नाही हे त्याला कळून चुकले. किमान पाच दिवस केविन कोणतीच कायदेशीर कार्यवाही करणार नाही हे त्याला पक्के ठाऊक होते. त्यामुळे केविनकडून तपासाच्या सखोल नोंदी त्याला हव्या होत्या. त्याला मिळालेला प्राथमिक अहवाल चांगल्या प्रतीचा अहवाल होता. हा केविनने नाही तर इतर कोणी बनवला असणार हे स्पष्ट होते.
"तुम्ही जॉनला सोबत घेऊन जा. जॉन तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल." चिरुट शिलगावताना केविन उत्तरले.
जॉन! या सार्जंटनेच काय तो तपास केला असणार. याच्याकडून शक्य तितकी माहिती काढणे गरजेचे होते.

******

जॉनने एक छोटी खोली चर्चेसाठी म्हणून रिकामी केली. ख्रिसने हळूच आपण प्राथमिक अहवाल पूर्ण वाचला असल्याचे सांगितले. पुन्हा एकदा जॉनच्या डोळ्यांत एक हलकी चमक दिसली. ख्रिसची खात्री पटली की जॉन अन्वेषणाचे मूलभूत धडे कोळून प्यायला आहे. त्यामुळे जे दुवे, धागे एव्हाना गुन्ह्यासंबंधित जागांवरून नाहीसे झाले आहेत ते जॉनच्या मेंदूत शाबूत असतील. त्याने व जॉनने जी चर्चा केली त्याचा सारांश असा

शव जरी चॅपलमध्ये सापडले असले तरी चॅपलमध्ये खून झाला नसावा. खून करण्याकरता खंडा तलवारीसदृश काहीतरी हत्यार वापरले गेले हे जॉनचेही मत होते. पण तसे असेल तर हत्या एका फटक्यात झाली. याचा अर्थ हत्याराचे पाते मान कापल्यानंतर हवेत वक्राकार फिरायला हवे. ग्रीन चॅपल छोटेसे चॅपल आहे. समजा रक्ताचे डाग जरी पुसले तरी हत्यार धडकल्याच्या खुणा दिसायलाच हव्यात. या खुणा भग्नावशेषांमध्ये शोधायला कठीण असल्या तरी अशक्य नाहीत. जॉनने कसून शोध घेऊनही त्याला कसल्याच खुणा आढळल्या नाहीत. याचा अर्थ खून इतरत्र घडून शव चॅपलमध्ये हलवण्यात आले.

खून सकाळी सात ते साडेसातमध्ये झाला असावा. सर गॅविन याच वेळी रपेटीला गेले होते. जर हे खरे मानले तर खून मोकळ्या माळरानावर कुठेतरी झाला असावा. सगळे माळरान धुंडाळणे शक्य नसले तरी जॉनने आपल्या परीने प्रयत्न केले होते. त्याला कुठेही मारामारी झाल्याच्या खुणा आढळल्या नाहीत. टेकडीवर काही घोड्यांच्या टापांचे ठसे दिसले पण ते हॉवर्ड यांच्या पागेतील घोड्यांचेच होते. म्हणजे त्रयस्थ व्यक्ती तिथे आली असलीच तर घोड्यावरून तरी आली नव्हती. जॉनचे वैयक्तिक मत होते की कोणी त्रयस्थ व्यक्ती/अज्ञात शत्रू तिथे आला नव्हता. यामुळे विजयवर संशय अधिक बळकट होत असला तरी किमान यामागे एक तर्कसंगत स्पष्टीकरण होते. जॉनने बर्टीला खोदून खोदून विचारले पण बर्टीला त्या सकाळी खंडा तलवार विजय सोबत घेऊन गेला का नाही हे आठवत नाही. जर हे सिद्ध करता आले की विजय त्या सकाळी खंडा तलवार सोबत घेऊन गेला नव्हता तर विजय निश्चितपणे निर्दोष सिद्ध होत होता. पण त्यासाठी आवश्यक पुरावे जॉनला मिळाले नव्हते.

"आणखी एक गोष्ट सर. जेव्हा आम्हाला शव सापडले तेव्हा सर गॅविनचे कपडे काहीसे ओलसर होते. कफलिंक्स आणि पँटची कड खासकरून."
"कदाचित त्यांना घाम आला असेल?"
"पण मग त्यांचे सगळेच कपडे दमट असता कामा नयेत."
जॉनचा मुद्दा बरोबर होता. ख्रिस नाकावर एक बोट ठेवून शांत बसला. त्याच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नसले तरी त्याच्या नजरेवरून आणखी एक दुवा सापडल्याचे जाणवत होते.
"जॉन आता थोडा वेगळा प्रश्न. आदल्या रात्रीच्या कबंध घोडेस्वाराविषयी तुझे काय मत झाले?"
"थँक गॉड तुम्हालाही ती घटना महत्त्वाची वाटते. केविननी तिच्याकडे जवळपास दुर्लक्ष केले आहे. माझ्यामते या घोडेस्वाराचा आणि खुनाचा निश्चितच काहीतरी संबंध आहे. इट इज जस्ट लाईक अ मॅजिक ट्रिक! त्या घोडेस्वाराचा वापर करून घरातील सर्वांचे लक्ष दुसरीकडे वेधून काहीतरी हेतु साध्य केला गेला. ती तलवार पळवली असेल असे मला आधी वाटले पण ती तलवार कोणालाही पेलत नाही. शोधार्थ सगळे बाहेर पडल्यानंतर घरात मागे राहिलेल्या व्यक्तींपैकी केवळ बर्टीच कदाचित तिला हलवू शकला असता. बर्टी आणि सर गॅविन मिळून नक्कीच तिला हलवू शकतात. पण इतक्या कमी वेळात तिला चॅपलच्या टेकडीपर्यंत नेणे अशक्य आहे."
"तू घराबाहेर टापांचे ठसे पाहिलेस?"
"नाही सर. घराभोवती दगडी पायवाट आहे आणि बाकी गवत. यात कोणाचेही ठसे मिळणे दुरापास्त आहे. गवत टापांनी तुडवलेले दिसले. त्यावरून हे नक्की की कोणीतरी घोडेस्वार तिथे आला होता. पण दक्षिणेकडे त्याचा पाठलाग पागेपर्यंतच करता येतो."
"म्हणजे तो घोडा पागेतीलच होता?"
"निश्चित नाही सांगता येणार. कारण पागेपाशी पुन्हा जमीन सुरु होते. तिथे मग पागेतील सगळ्याच घोड्यांच्या टापांची भाऊगर्दी आहे. तसेच पूर्वेकडेही गवत थोडे तुडवलेले होते. तो घोडेस्वार पूर्वेकडेही गेलेला असू शकतो. या तुटपुंज्या निरीक्षणावरून काढलेला कोणताच निष्कर्ष न्यायालयात टिकणार नाही."
"ठीक आहे. मला शवाची पाहणी करायची आहे."

********

शव एका फ्यूनरल होममध्ये हलवण्यात आले होते. आणखी तीन ते चार दिवसांत दफनविधी करण्याचे ठरले होते. या मधल्या काळात शव पुन्हा (डोके व धड शिवून) मूळरुपात आणणे, इतमामास साजेशी शवपेटिका बनवणे वगैरे कामे होती. ख्रिसला शव बघायला मिळाले तेव्हा डोके अर्धवट शिवून झाले होते. कबंध घोडेस्वाराने घेतलेला हा बळी जवळपास कबंध दिसत होता. डॉक्टरचा रिपोर्टही ख्रिसकडे होता. प्रेत तपासणीकरता ताब्यात येईपर्यंत जवळ जवळ पाच वाजले होते. प्रेत ताब्यात आले तेव्हा रिगर मॉर्टिस जवळजवळ पूर्ण झाला होता. पायाचे अंगठे आणि घोट्यापासचा भागच काय तो अजून कडक झाला नव्हता. हा भाग सर्वात शेवटी कडक होतो आणि त्यास जास्तीत जास्त बारा तास लागू शकतात. यावरून डॉक्टरने साधारण अंदाज सकाळी सात ते साडेसात लावला होता. सुदैवाने अजून थंडीचे दिवस नसल्याने प्रेतावर बाह्य वातावरणाचा काही परिणाम झाला नसावा. ती जखम एखाद्या लांबट, धारदार हत्याराने केली असावी असे डॉक्टरांचे मत होते. इस्टेटीवर असलेल्या हत्यारांमध्ये कोणतीच तलवार तशी नव्हती. डॉक्टरांच्या मते ते हत्यार तलवारीपेक्षा एखाद्या करवतीसारखे होते. जशी करवत पुढे मागे करून कापतात तसे हे हत्यार पुढे मागे करून वापरले गेले असावे. पण करवतीला दात असतात तसे दात मात्र या हत्याराला नसावेत. डॉक्टरांनी दिलेली उपमा स्टेक नाईफची होती. ख्रिसने याची मनोमन नोंद घेतली. खंडा तलवारीचा असा उपयोग करणे अतिशय अवघड होते. तिची मूठ बास्केट हिल्ट होती. या आपल्या हातांची वाट न लावता या हिल्टचा वापर करून करवतीचा परिणाम साधणे अशक्यप्राय होते. ठोस नसला तरी हा विजयच्या बाजूचा पुरावा होता. अर्थात इतर काही प्रकारे तलवारीचा वापर झाला असण्याची शक्यता होतीच. आणि अजूनही पुढे-मागे करत का होईना, एकच वार सलग गतीने झाला होता. यासाठी आवश्यक वजन, ताकद हे सर्व असलेली तीन फुटी ब्रॉडस्वोर्ड केवळ खंडाच होती.

खून डोके कापून झाला हे स्पष्ट असले तरी डॉक्टरांनी मानेखाली आणखी एका जखमेचा उल्लेख केला होता. ख्रिसने ती जखम बघितली. मानेपासून अदमासे तीन इंचांवर काहीतरी रुतले होते. जर अरुंदशा पट्टीवर निजवले तर थोड्या वेळाने पट्टी बोचून अशी जखम होऊ शकते. ती पट्टी शरीरात खोलवर रुतली होती. म्हणजे वरून जोर लावला गेला होता. केलेल्या वाराच्या धक्क्याने शरीर कशात तरी रुतले तर नसेल? पण कशात? आणि ती जखम चांगलीच लांब रुंद होती. जणू ती पट्टी तिच्याखालून फरफटत काढून घेतली होती. दुसरे म्हणजे पाय बांधलेल्या खुणा. हातही बांधल्याच्या खुणा होत्या असे जॉन म्हणाला पण त्या आता अस्पष्ट होत्या. पाय बांधल्याच्या खुणा मात्र अजूनही सुस्पष्ट होत्या. पाय नुसते बांधले नव्हते तर पाय उचलता येऊ नयेत म्हणून काही वजनही लावले असावे असे वाटत होते. पण का? ख्रिसला जॉनने याहूनही बुचकळ्यात टाकणारी गोष्ट दाखवली. गॅविनच्या तोंडात रुमालाचा बोळ्यासारखे काहीतरी कोंबले असावे. जे काही होते त्याला गॅविनने सर्व शक्तीनिशी चावले होते कारण काही रेशमी धागे दातांत अडकले होते. हे धागे जॉनने जपून ठेवले होते. गॅविन यांचे हलणारे दात या गोष्टीचा पुरावा होते. अशातच ख्रिसच्या मनात वीज चमकावी तसा एक विचार आला.

"जॉन ही शिवण जखमेवर केली आहे का? आय मीन टू आस्क की जखमेचा आकार असाच होता का थोडा बदलला आहे?"
जॉनने जरुर ती विचारपूस करून आकार तसाच असल्याचे कळवले.
"तसं असेल तर ही जखम अतिशय विचित्र आहे. जेव्हा आपण तलवारीने शिरच्छेद करतो तेव्हा दोन शक्यता असू शकतात. एक म्हणजे लढाईत दोघे समोरासमोर उभे आहेत आणि तलवार आडवी फिरवून शिरच्छेद केला जातो. विजय सहा फूट उंच आहे तर सर गॅविन साधारण साडेपाच फूट (पाच फूट सहा इंचापेक्षा थोडे कमी). विजयने जर वार केलाच तर तो गॅविनच्या डावीकडून उजवीकडे तिरका असला पाहिजे, जर विजय डावरा असेल तर उजवीकडून डावीकडे. पण तसे झालेले नाही. आता दुसरी शक्यता बघावी लागते. दुसर्‍या शक्यतेत गॅविनना आडवे झोपवून वार केला गेला. मग तिरकी जखम होण्याची गरज नाही. या शक्यतेत खुन्याची उंची बिनमहत्त्वाची बाब आहे. तसेच त्या स्टेक नाईफच्या उपमेलाही अर्थ प्राप्त होतो."
"गुड ऑब्झर्व्हेशन सर. ही शक्यता मी गृहीत धरली नव्हती. इट ऑल्सो मेक्स सेन्स की मानेखालची ती जखम कुठून आली. गॅविनना एका अतिशय पातळ वुडन प्लॅंकवर किंवा धारदार दगडावर झोपवले असावे."
ख्रिसने फ्यूनरल होमचालकांचे आभार मानून रजा घेतली. जॉनसोबत एक चहाची फैरी होऊन तो अ‍ॅलेक्सीसोबत विजयच्या भेटीस गेला.

~*~*~*~*~*~

विजय गावातील एका छोट्या बंगलीत थांबला होता. त्याची बडदास्त अजूनही उत्तम ठेवली होती पण त्याच्यावर घेण्यात आलेला आळ अपमानास्पद होता. स्थानिक पोलिसांनी जर त्याची नीट चौकशी केली असती तरी एकवेळ त्याला चालले असते पण इन्स्पेक्टर कुकने परस्पर काढलेले निष्कर्ष आणि एकूणच हलगर्जीपणा त्याला खटकला होता. सुदैवाने त्याला लंडनला एक तार त्याच दिवशी करू दिली गेली. 'काहीही अडचण आली तर सर हेन्री मॅक्सवेल यांच्याशी संपर्क साधणे' हा कानमंत्र उपयोगी पडला होता. ख्रिस्तोफर काल्डवेल हे नाव जरी ओळखीचे नसले तरी सर मॅक्सवेल यांनी शिफारस केली असेल तर काही विचार करूनच केली असेल. अर्थात यंत्रणा भराभर हलून काल्डवेल ज्या वेगाने दाखल झाले होते तो विजयसाठीही आश्चर्याचा सुखद धक्का होता. बंगलीच्या अभ्यासिकेत त्याने ख्रिसची भेट घेतली.

"सर काल्डवेल."
"हिज हायनेस तुम्ही मला केवळ ख्रिस म्हटलं तरी चालेल. हॉनर्ड टू मी यू."
"इन दॅट केस, तुम्हीही मला विजय म्हटलं तरी चालेल. मला पस्तीस-चाळीस वयाची व्यक्ती अपेक्षित होती पण तुम्ही खूपच तरुण आहात. माझ्याहीपेक्षा तरुण असाल."
"मी बावीस वर्षांचा आहे, विल्यमच्याच वयाचा."
"हं, इंटरेस्टिंग. तुम्हाला माझ्या नशीबातील गोंधळ सावरायला भाग पाडल्याबद्दल मी दिलगीर आहे. पण मी स्वतः खूप गोंधळलो आहे. कोणी सर गॅविनना का मारेल?"
"हाच प्रश्न सोडवण्यासाठी माझी नेमणूक झाली आहे. यासाठी तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील."
"विचारा."
"त्या रात्रीचा घटनाक्रम थोडक्यात सांगू शकता."
"माझ्या खोलीत विल्यम आणि आयरीन खंडा तलवार बघायला आले होते. दहा वाजता ते आपापल्या खोल्यांत झोपायला गेले. त्यानंतर मीही झोपी गेलो. रात्री तीन नंतर कधीतरी लिंडाची किंकाळी ऐकू आली. मी कपडे सारखे करून वर्‍हांड्यात आलो. विल्यमही जागा झाला होता. आल्बसही आपल्या खोलीतून येताना दिसला. आम्ही जिन्यापाशी आलो तर गॅरेथ आणि पीटर दिसले. आम्ही जिना उतरतच होतो तर आयरीनची हाक ऐकू आली. गॅरेथने घाईघाईतच तिला लिंडाची काळजी घेण्याची तोंडी सूचना दिली. आल्बसने ग्रेटाला ग्रेट हॉलमध्ये थांबवले होते. आम्ही येईपर्यंत ती तिथेच थांबली होती. तिची नजर चुकवून कोणी मॅनोरमध्ये प्रवेश केला असेल असे वाटत तरी नाही. किल्ली वापरून फक्त तेवढाच दरवाजा उघडून आम्ही बाहेर पडलो."
"यापुढचा घटनाक्रम मला ठाऊक आहे. मग तुम्ही काही न सापडल्याने घरी येऊन झोपलात. सकाळी काय घडले?"
"मी सातच्या आसपास उठलो असेन. हलका नाश्ता म्हणून टोस्ट व कपभर दूध होते. परत येऊन मग भरपेट नाश्ता झाला असता. इथे आल्यानंतर नाश्ता मी या वेळेला घेतला तर गॅविनसोबत लायब्ररीत घेतो. पण त्या सकाळी गॅविन माझ्याही आधी उठून रपेटीला निघून गेले होते. आल्बसने सांगितले की त्यांनी इशार्‍यानेच चहा खोलीत ठेवून जायला सांगितले. बहुधा कसल्यातरी विचारात गढले होते ते."
"म्हणजे आल्बसनेही त्यांना पाठमोरेच बघितले?"
"हो. आल्बस चहा घेऊन गेला तेव्हा ते पाठमोरे खुर्चीत बसले होते. कसल्याशा विचारात गढले असावेत. पण खुर्चीतली व्यक्ती गॅविनच असावी यात शंका नाही. इतर कोणाचेच केस पिंगट नाहीत. आल्बसला ते पागेकडे जाताना दिसले म्हणून नाहीतर त्याचीही गॅविनशी भेट झाली नसती. आणि बर्टीला सुद्धा माझ्यामते ते पागेतून फक्त बाहेर पडतानाच दिसले असावेत."
"बर्टी व आल्बसनेही साधारण अशाच प्रकारचे वर्णन केले होते. आणि तुम्हाला रपेटीच्या दरम्यान ते कुठे दिसले नाहीत?"
"नाही. पण कोणीतरी टेकडी चढले होते हे नक्की! गॅविन एका विशिष्ट वाटेने टेकडी चढतात. ही वाट चॅपलच्या दरवाज्यासमोर संपते. तिथून पुढे तुम्ही चॅपलमध्ये जाऊ शकता किंवा चॅपलच्या विरुद्ध दिशेने कड्याच्या टोकाला जाऊ शकता. मी विरुद्ध दिशेला गेलो कारण मला सूर्योदय पाहायचा होता. तसेही त्या चॅपलमध्ये बघण्यासारखे काही नाही."
"पण त्या चढावर, त्या विशिष्ट वाटेवर तुम्हाला कोणी घोड्यावरून गेल्याच्या खुणा दिसल्या?"
"हो. विशेष काही नाही, पाचोळा तुडवल्यासारखा वाटत होता."
"गुड, धिस इज युजफुल! शेवटचा प्रश्न. तुम्हाला जर हा खूपच खासगी स्वरुपाचा वाटला तर तुम्ही उत्तर नाही दिलेत तरी चालेल. आदल्या दिवशी तुमच्यात व सर गॅविनमध्ये काय स्वरुपाची बोलणी झाली?"
विजयने मिनिटभर विचार केला. उत्तराची जुळवाजुळव झाल्यावर तो बोलू लागला
"सर्व तपशील तर मी तुम्हाला सांगणार नाही. पण एक सांगू शकतो की आमच्यात कसलेही वाद झाले नव्हते. विल्यमला तशी या व्यवहाराची थोडीशी कल्पना आहे. त्याच्याकडूनही तुम्हाला काही माहिती मिळू शकते. थोडक्यात सांगायचे तर आमच्या राज्यात काही जमीन ही कारखाने उभारण्याकरता उपलब्ध आहे. याने राज्यातील अनेक लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ शकते. सरकारची याला हरकत नसली तरी पुरेसा पैसा उभारणे तितके सोपे नाही. मला जेवढे समजले त्यानुसार सर गॅविन परदेशांत गुंतवणूक विपुल प्रमाणात करतात. आम्ही त्यांच्याकडे एक भांडवलदार या दृष्टीने बघत होतो."
"आणि त्यांचा प्रतिसाद अनुकूल होता?"
"हो. त्यांना ही गुंतवणूक मान्य होती. अर्थात कायदेशीर बाबींचे तपशील आम्ही चर्चेस घेतले नव्हते पण ती सर्व प्रक्रिया सुलभ असेल याची गॅविन यांना माझ्याहीपेक्षा अधिक खात्री होती."
"थँक यू. मी गरज पडल्यास पुन्हा संपर्क साधेनच. काही लागलेच तर मॅनोरला निरोप पाठवा. मी किंवा अ‍ॅलेक्सी तत्परतेने हजर होऊ."
"जरुर."

~*~*~*~*~*~

जेवणापूर्वी घड्याळजी ग्रँटशी भेट घडली. पण ग्रँटचा बडबड्या स्वभाव बघता ख्रिसने त्याच्याकडून माहिती मिळवण्याचे काम अ‍ॅलेक्सीवर सोपवले आणि रात्री जेवणाची वेळ होईपर्यंत एक डुलकी काढली. रात्रीच्या जेवणात कॉक-अ-लीकी सूप विथ कॉटेज लोफ, ड्रंकन कार्प, सशाच्या मटणाचा स्ट्यू, व्हाईट वाईन व्हिनेगारमध्ये मुरवलेल्या भाज्या आणि डेझर्टमध्ये ट्रीकल स्पंज पुडिंग विथ हॉट कस्टर्ड. जेवणानंतर ख्रिसने अ‍ॅलेक्सीकडून घड्याळाची माहिती काढायला सुरुवात केली.

"ग्रँट जवळ जवळ दहा वर्षांपासून या घड्याळाची देखभाल करतो आहे. तो महिन्यातून एकदा तरी चक्कर मारतोच. याचे मुख्य कारण ग्रासहॉपर एस्केपमेंट."
"ग्रासहॉपर एस्केपमेंट काय असते?"
"प्रत्येक घड्याळात काटे पुढे सरकावेत म्हणून एक यांत्रिकी रचना असते जिला एस्केपमेंट असे म्हणतात. ही रचना ठराविक काळानंतर काट्यांना जोडलेल्या गिअर्सना ठराविक इंपल्स देते जेणेकरून गिअर विशिष्ट कोनात रोटेट व्हावेत आणि त्या रोटेशनने काटे पुढे सरकावेत. या एस्केपमेंटचे विविध प्रकार असतात. यातील एक आहे ग्रासहॉपर एस्केपमेंट."
"हा काही वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे का?"
"वेल, ग्रासहॉपर एस्केपमेंट फारशी प्रसिद्ध नाही. इन फॅक्ट ग्रँटच्या अखत्यारीत असलेल्या टॉवर क्लॉक्सपैकी फक्त या एकाच घड्याळास ग्रासहॉपर एस्केपमेंट आहे. हिचे दोन फायदे आहेत. एक या रचनेत दिले जाणारे इंपल्स एक्सेप्शनली रेग्युलर असतात. याने पेंड्युलमचा पिरिअड, गिअर्सचे रोटेशन इ. सर्व काटेकोर प्रमाणात चालते. दोन अतिशय कमी फ्रिक्शन असल्यामुळे वंगणाची मुळीच गरज पडत नाही."
"आणि तरीही हिचा वापर फारसा होत नाही?"
"अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचनेसोबत काही तोटेही येतात. ग्रँटने मला लांबलचक लेक्चर दिले पण थोडक्यात सांगायचे तर घड्याळाच्या स्प्रिंगवर प्रमाणाबाहेर ताण आला तर ही रचना ताण नाहीसा होताच इंपल्सची वारंवारिता वाढवते. दुसर्‍या शब्दांत घड्याळ वेगाने पळू लागते. हा ताण चुकीची सेटिंग्ज, पक्ष्यांनी केलेली घाण, जुने पार्ट्स अशा कारणांनी येऊ शकतो. याचे प्रॉपर रिसेटिंग करायला मग घड्याळजी बोलवावा लागतो. ग्रँटच्या म्हणण्यानुसार हे घड्याळ गेल्या दोन महिन्यांत बिघडण्यास सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी इट वॉज एक्सेप्शनल!"
"आणि तो बिघाड या एस्केपमेंट संदर्भातला होता?"
"हो."

थोडा वेळ ख्रिस डोळे मिटून विचार करत होता. अ‍ॅलेक्सीला अनुभवाने ठाऊक होते की त्याचा तंद्रीभंग करण्यात काही अर्थ नाही. त्याच्या डोक्यात आज गोळा केलेल्या माहितीमधले सहज न दिसून येणारे दुवे जोडले जात होते. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा अ‍ॅलेक्सी झोपण्यापूर्वीच्या चहाची तयारी करत होता. हातात वाफाळता कप येताच प्रथम तो सुगंध आपल्या नाकात खेळवून मग त्याने एक घोट घेतला. आता परत चर्चा होऊ शकत होती.
"सर, बाकी तर सगळं कळलं पण या घड्याळात एवढा रस का?"
"अ‍ॅलेक्सी, 'खून कुठे झाला' या प्रश्नाच्या उत्तरासाठी एक उमेदवार तर हा घड्याळाचा मनोराही आहे. कदाचित हत्याराच्या स्विंगने घड्याळाचे काही पार्ट्स खराब झाले असतील. ग्रँटची साक्ष घड्याळासोबत काहीतरी घडले हे स्पष्टपणे सांगते."
"पण एवढे मोठे हत्यार मोकळेपणाने फिरवण्यालायक जागा तिथे नाही सर."
"तू टॉवरमध्ये जाऊन आलास?"
"हो. जागा दमट, अंधारी आणि गार आहे. पहाटेच्या वेळी तिथे बोचरी थंडी वाजत असेल."
ख्रिसचे डोळे "बोचरी थंडी" हा शब्दप्रयोग ऐकून चमकले. "मग तर मनोर्‍याला लवकरात लवकर भेट दिलीच पाहिजे."
"हम्म. आय अ‍ॅम नॉट कन्व्हिन्स्ड सर. पण मीही एवढ्या बारकाईने निरीक्षण केले नाही. कदाचित काही सापडेलही."

ख्रिसने स्मित केले. "अ‍ॅलेक्सी, डोन्ट बी सो हेस्टी. कोणत्याही गुन्ह्याचा तपास पुढील चार मार्गांनी करता येऊ शकतो. १) कारण, २) अवकाश, ३) योजना, ४) स्वरुप!
"प्लीज एलॅबोरेट."
"कारण म्हणजे व्हाय डन इट. विनाकारण गुन्हा करणारे गुन्हेगार जवळपास नसतातच. असलेच तर एखाद्या अतिरंजित कथानकात. त्यामुळे तपासाचे रुपांतर गुन्हा करण्यास सबळ कारण असणार्‍या व्यक्तीच्या शोधात केले जाऊ शकते. अवकाश म्हणजे व्हेन अ‍ॅन्ड व्हेअर डन इट. गुन्ह्याची जागा आणि वेळ जर निश्चित करता आली तर त्या वेळेत कोण कोण गुन्हा करू शकेल याच्यावर लक्ष केंद्रित करता येते. योजना म्हणजे हाऊ डन इट. गुन्हा नक्की कसा घडला हे कळू शकले तर ही योजना कोणाला प्रत्यक्षात उतरवता येऊ शकेल हे शोधता येते. शेवटी गुन्ह्याचे स्वरुप किंवा व्हॉट वॉज इट! घडलेला गुन्हा नक्की काय होता. उदा. वर वर दिसणारी आत्महत्या खरंच आत्महत्या होती की खून होता. गुन्हा नक्की काय होता हे कळल्याखेरीज गुन्ह्याचा तपास व्यर्थ आहे. हे सर्व प्रश्न विचारून संशयितांच्या यादीतून संशयित वगळता येतात किंवा योग्य ते संशयित निवडता येतात. अ‍ॅन्ड दॅट इज हू डन इट!"
"इंटरेस्टिंग!"
"प्रत्येक डिटेक्टिव्हची आपापली खासियत असते. काही डिटेक्टिव्ह्जना मानसशास्त्राची चांगली समज असते. ते व्हाय डन इटवर लक्ष केंद्रित करतात कारण गुन्ह्याचे सबळ कारण शोधून ते संशयितांच्या यादीतून गुन्हेगारास शोधून काढण्यात वाकबगार असतात. काही डिटेक्टिव्ह्जची फॉरेन्सिक्सवर पकड असते. त्याचा वापर करून ते गुन्ह्याचे अनेक तपशील शोधून काढून गुन्ह्याची अचूक वेळ, गुन्ह्याच्या जागेचे अचूक वर्णन करू शकतात. थोडक्यात ते वेळ म्हणजे केवळ घड्याळी वेळ नव्हे तर टेम्पोरल स्पेस, चतुर्मिती अवकाश डोळ्यांसमोर आणतात. मग संशयितांपैकी या अवकाशात कोणाचे अस्तित्व असू शकेल यावरून ते गुन्हेगारास शोधतात. काहीजण गुन्हेगाराची पावले मागे मागे नेत संपूर्ण गुन्हा मनोमन सिम्युलेट करतात. यासाठी हाऊ डन इटचे अतिशय अचूक उत्तर मिळावे लागते ज्यात त्यांचा हातखंडा असतो. माझ्यामते जेवढा क्रिएटिव्ह गुन्हा तेवढे हाऊ डन इटचे महत्त्व वाढते. एडगर अ‍ॅलन पो लिखित 'द मर्डर्स इन द र्‍यू मॉर्ग" याचे उत्तम उदाहरण आहे. आणि या सर्वांचा मनोरा तोलून धरतो व्हॉट वॉज इट. ज्यासाठी पोलिसी फील्डवर्कशिवाय गत्यंतर नाही.
या सर्वांना तर्क आणि अनुमानाची जोड दिली की हू डन इट इज ट्रिव्हिअल!"
"यू मेक इट साऊंड लाईक इट इज अ गेम."
"इन्डीड इट इज. हा खेळच तर आहे. असो, आपल्या खेळाकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार आय हॅव अ गुड आयडिआ अबाऊट व्हॉट डन इट. व्हेन डन इटही आता पुरेसे स्पष्ट आहे. हाऊ विषयी मी अजूनही काहीसा चाचपडतो आहे पण मला वाटते की थोडा विचार केला की मला त्याचेही उत्तर सापडेल. द ओन्ली थिंग वी डोन्ट नो अबाऊट इज व्हाय डन इट."
"कारण अजूनही आपल्याला हा गुन्हा घडण्यामागचे सबळ कारण सापडलेले नाही."
"उम्म, चित्र अगदीच धूसर नाही वाटत मला पण तू म्हणतोस ते बरोबर आहे. अजूनही व्हाय डन इट बव्हंशी अनुत्तरित आहे. अर्थात निव्वळ खुनी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी व्हाय डन इटचे उत्तर मिळायलाच हवे असे नाही.
"म्हणजे...."
"माझ्या डोक्यात एक अटकळ आहे पण ती सिद्ध करण्याकरता कसलाच पुरावा नाही. जर व्हाय डन इटविषयी थोडे अजून कळले आणि हाऊ डन इटमधल्या मिसिंग लिंक्स सापडल्या तर पुरावा शोधणे सोपे जावे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की सर गॅविनचे हितसंबंध अनेक ठिकाणी गुंतलेले आहेत. यासाठी प्रचंड पैसा हवा. या गॅविनविषयी अधिक खोलात जाऊन चौकशी करायला हवी."
"मग उद्या कॅनहॅम्प्टनमध्ये चक्कर?"
"नाही. मी लंडनला जाऊन माझ्या पद्धतीने माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेन. तू कॅनहॅम्प्टनमध्ये हिंडून काही समजतंय का बघ. यू आर गुड अ‍ॅट कनेक्टिंग विथ कॉमन फोक्स, आय अ‍ॅम नॉट. वाटल्यास जॉनला सोबत घे. तो भरवशाचा वाटतो. मला एक-दोन दिवसांपेक्षा अधिक वेळ लागणार नाही. आय फील कॉन्फिडंट की व्हायविषयी उत्तरे मिळू लागली की या केसचा चुटकीसरशी निकाल लागेल."
"व्हेरी वेल, सर. आपण मनोर्‍याला सकाळी भेट देऊयात. मग तिथून थेट स्टेशन गाठू शकाल. मी उद्याच्या प्रवासाची तयारी करतो. शुभरात्री."
"शुभरात्री, अ‍ॅलेक्सी"

~*~*~*~*~*~

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/77821

Group content visibility: 
Use group defaults

मस्तच. हा भागही अपेक्षेप्रमाणे उत्तमच झालाय. गुन्हा तपासाचे विश्लेषण फारच आवडले.

क्रमशः नको पण आणि हवा पण...

नको कारण क्रमश: म्हणजे पुढे वाट पाहणे आले आणि हवा
कारण क्रमशः नाही म्हणजे गोष्ट संपली. दोन्ही नकोत Happy

सर गवीनना सकाळी समोरून कोणीही पाहिले नाहीत. म्हणजे लायब्ररीत पिंगट केस परिधान करून गविन असल्याचा भास निर्माण केला गेला. आणि नंतर ते घोड्यावरून गेल्याचाही भासच. मनोरमधली बोचरी थंडी मृत्यूची नेमकी वेळ निश्चित करण्यात गोंधळ घालू शकते का याचा अंदाज नाही. म्हणजे शत्रू आतलाच आहे हे ख्रिसचे म्हणणे खरे आहे. गविनना आधीच मारून नंतर नाटक उभे केले असावे.

अगाथा ख्रिस्तीच्या मिस्टर क्वीनच्या दोन कथा आठवल्या. एकात असाच भास निर्माण करून गुन्हेगार गुप्त होतो. दुसऱ्यात खून आधीच केलेला असतो पण खून झालेली व्यक्ती नंतर ओझरती, चेहरा न दाखवता वावरताना दाखवून ती जिवंत असल्याचा भास निर्माण केला जातो.

ह्या गोष्टीत खुनी कोण ह्याचा अंदाज अजून तरी आलेला नाही.... श्वास रोखून वाचत असताना अचानक क्रमश:ची पाटी तोंडावर आपटली Sad

बाकी घरातील एक माणूस मृत्यूमुखी पडले असतानाही जेवण मात्र व्यवस्थित साजरे केलेय.... नाहीतर आम्ही दोन्ही वेळेस तीच ती डाळभातभाजीभाकरी खातो.. Sad

ख्रिस व अलेक्सिचे संवाद मस्त.... छान माहिती मिळतेय.

क्रमशः नको पण आणि हवं पण...
ह्या गोष्टीत खुनी कोण ह्याचा अंदाज अजून तरी आलेला नाही.... श्वास रोखून वाचत असताना अचानक क्रमश:ची पाटी तोंडावर आपटली

ह्या दोन्हीला अनुमोदन

सर्व प्रतिसादकांचे आभार.

एक्स्ट्रा फीचर १

ल्युमिनोल

या कथानकात ख्रिस व अ‍ॅलेक्सी एका प्रतिकूलतेचा सामना करत आहेत. मर्डर वेपनवर रक्ताचे डाग पडले असणारच. ते पुसल्यानंतरही कसे शोधावेत याचे ज्ञान १९०२ मध्ये अन्वेषकांना नव्हते. हल्ली सीआयडीमध्ये जे फवारे मारून रक्त शोधले जाते त्या पद्धतीचा शोध १९२८ मध्ये लागला. अल्ब्रेख्ट नामक जर्मन रसायनतज्ज्ञाने ल्युमिनोल आणि हायड्रोजन पेरॉक्साईड यांची प्रतिक्रिया रक्ताच्या उपस्थितीत वेगाने घडते हे शोधून काढले. यामागची कारण मीमांसा व्हायला बराच काळ जावा लागला. आता हे स्पष्ट आहे की रक्तातील लोह या प्रतिक्रियेसाठी उत्प्रेरकाचे (कॅटालिस्ट) काम करते. यासाठी अतिशय कमी प्रमाणात रक्त असले तरी चालते आणि रक्तातील कोणताच घटक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत नसल्यामुळे ही चाचणी परत परत करता येते. अर्थात या चाचणीचे परिणाम दिसण्याकरता खोलीत फारसा उजेड असून चालत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा सीआयडीत भर दिवसा लाल/हिरवा/पिवळा रंगाचे डाग पाडणारा स्प्रे दाखवला की 'कुछ तो गडबड हैं'.
(ल्युमिनोल प्रक्रियेनंतर अंधारात निळसर चमकते.)

दुर्दैवाने १९०२ मध्ये ही माहिती उपलब्ध नसल्याने मर्डर वेपन शोधण्यासाठी अधिक मेहनत करावी लागत आहे.

एक्स्ट्रा फीचर २

रिगर मॉर्टिस

मृत्युनंतरही शरीर आपल्या उर्जेचा स्रोत, एटीपी बनवण्याचे काम चालूच ठेवते. एटीपी बनवण्याचे दोन मार्ग आहेत - ऑक्सिजन आणि ग्लायकोजन. प्रेताचा ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्याने शरीराला यकृतात साठवलेल्या ग्लायकोजनचा वापर करावा लागतो. जोपर्यंत एटीपी आहे तोपर्यंत आपले स्नायू व्यवस्थित काम करू शकतात (आपण हालचाल करू शकतो, हृदय चालू राहते, श्वासोच्छ्वास करता येतो इ.). एटीपी संपताच आपले स्नायू आखडतात आणि शरीराला ताठरपणा येतो. यानंतर प्रेत कडक होते. मृत्युनंतरच्या या टप्प्याला रिगर मॉर्टिस म्हणतात. सर्वसाधारणपणे पूर्ण शरीर कडक पडायला सहा ते बारा तास लागतात.

साहजिकच कोणत्याही रासायनिक प्रक्रियेप्रमाणे या प्रक्रियेवरही बाह्य वातावरणाचा परिणाम होतो. सहसा बाह्य तापमान कमी असेल तर ही प्रक्रिया पूर्ण होण्यास अधिक वेळ लागतो. यासाठी शवघर थंड असते जेणेकरून शव लवकर खराब होऊ नये. त्यामुळे रिगर मॉर्टिस हा सबळ पुरावा मानला जात नाही. त्याचा वापर केवळ प्राथमिक अंदाज लावण्याकरता होतो. हे ज्ञान मटण साठवण्याकरता कैक वर्षांपासून चालत आले असल्याने अगदी गणिती अचूकता नसली तरी याबाबतची माहिती विसाव्या शतकाच्या सुरुवातीस डिटेक्टिव्ह्जना नक्कीच असावी.

एक्स्ट्रा फीचर ३

होनकाकु हा (本格派)

'होनकाकु हा' चा शब्दशः अर्थ होतो ऑर्थोडॉक्स स्कूल. द्वितीय विश्वयुद्धापर्यंत रहस्यकथांचा सुवर्णकाळ होता. खासकरून १९२० आणि १९३० च्या दशकात त्यांनी शिखर गाठले असे म्हणता येईल. या कथांचे वैशिष्ट्य असे की 'गुन्हा' हा कथानकाचा केंद्रबिंदू असे. मुख्य डिटेक्टिव्ह आणि 'वॉटसन' वगळता इतर पात्रांचे स्थान हे कथानक पुढे नेण्याचे असे. याचा अर्थ असा नाही की या पात्रांना फुलवले जात नसे. पण स्टोरीज कॅरॅक्टर ड्रिव्हन नसत हे खरे. विविध मोटिव्ह्ज, मिसडायरेक्शन्स, फॉल्स क्लूज, लेखनकौशल्याने वाचकांच्या काकदृष्टीपासून गुन्हेगारास शेवटपर्यंत लपवणे हे या कालखंडाचे वैशिष्ट्य बनले.

दुसर्‍या विश्वयुद्धानंतर अशा कथांची लोकप्रियता ओहोटीस लागली. अजूनही या छापाच्या कथा लिहिल्या जात असल्या तरी त्यातील तर्क व अनुमानाच्या कसरतींना मानसशास्त्राची किंवा समाजशास्त्राची जोड असतेच असते. जवळपास ठरवून दिल्याप्रमाणे 'गुन्ह्यामागील कारण' ठरवण्यात प्रचंड वेळ खर्च केला जातो. या ट्रेंडला छेद दिला जपानी लेखकांनी. १९९० च्या दशकापासून जपानी रहस्य कथा या मोटिव्ह्ज पेक्षा गुन्ह्याच्या स्वरुपावर आणि प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतात. या स्कूल ऑफ रायटिंगला होनकाकु किंवा शिन-होनकाकु (नवे होनकाकु) म्हटले जाते.

होनकाकु रहस्यकथांमध्येही मोटिव्हला महत्त्व असते पण यातील डिटेक्टिव्ह मोटिव्ह/हेतुकरता अडून बसत नाही. सहसा गुन्ह्याचे स्वरुप आणि प्रक्रियेवरून ते गुन्हेगार कोण असू शकेल हे शोधण्यात यशस्वी होतात आणि मग गुन्ह्यामागची कारणमीमांसा/पुरावे गोळा करणे/आपले तर्क पडताळून बघणे याकरिता हेतुचा वापर करतात. हा एलरी क्वीनचा होनकाकु लेखकांवरील पगडा असल्याचा परिणाम म्हणता येऊ शकतो. याचे सर्वोत्तम उदाहरण अ‍ॅलिस अरिसुगावा लिखित मोआई आयलंड पझल आहे (किंडलवर इंग्रजी भाषांतर उपलब्ध). गेल्या चाळीस वर्षांतील, कुठल्याही भाषेतील सर्वोत्तम रहस्यकथांपैकी एक (माझ्यामते पहिल्या तीनात).

पायस, कथा भारी चालली आहे आणि हे एक्स्ट्रा फीचर्सही वाचायला फार रंजक वाटत आहेत.
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

तिन्ही भाग सलग वाचले. उत्तम शैली. सखोल अभ्यास. सर्जनशील मन. दर्जेदार लेखन.
उत्कंठावर्धक कथा..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

मस्त झालाय हाही भाग! एक्स्ट्रॉ फिचर्स पण रोचक आहेत.
सर गवीनना समोरून कोणी पाहिले नसले तरी ते त्यांच्या घोड्यावरून रपेटीला गेले होते. जर अनोळखी माणूस असता तर घोडा बिचकला असता. याचा अर्थ माणूस ओळखीचा असणार. एवढाच अंदाज बांधता आला.

वा ! कथा आणि extra फीचर्स दोन्हीही भारी .

ल्युमिनोल निळसर दिसतं हे NCIS च्या बऱ्याच भागात पाहिलंय. रिगर मोर्तीस हा शब्दही तिथेच ऐकला पहिल्यांदा₹

शक्य असल्यास याचे मराठी भाषांतर (तुम्ही केलेले) आवडेल वाचायाला >> Happy याचे भाषांतर मायबोलीवर येणे शक्य नाही कारण प्रताधिकार. कधी पुढे संधी मिळाली तर मला भाषांतर करायला निश्चितच आवडेल. या पुस्तकाची ओळख करून देण्याचे काम मी 'वाचू आनंदे' ग्रुपमध्ये एक लेख लिहून करू शकतो. ही कथा संपली की जमवण्याचा प्रयत्न करेन.

मस्त. घड्याळात दोन महिन्यांपासून गडबड आहे म्हणजे दोन महिन्यांपूर्वी काय घडलं ह्याबद्द्ल पुढे काही माहिती मिळते का ते पहायला हवं Happy पीटर किती दिवसांपासून आहे मॅनोरमध्ये काय माहित. तो हॉस्बोर्ग घराण्याचा वारस असू शकतो. हीच बाब बर्टी आणि आल्बसबद्दलसुध्दा.