आठवणीतील एस.टी.

Submitted by DJ.. on 6 January, 2021 - 08:54

** डिस्क्लेमर : लेखात 'एस.टी.' म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट ची प्रवासी बस या अर्थाने वापरले आहे (स्टेट ट्रान्सपोर्ट ने प्रवास करणारे त्यांच्या सर्वसाधारण श्रेणीच्या बसचा 'एस.टी.' असाच उल्लेख करतात.. ते लालपरी/लाल डब्बा ही विशेषणे नाईलाजाने कधीतरी आणि कुणामुळे तरी एस.टी. ने प्रवास करावा लागणारे लोक वापरतात..! Wink ). एस.टी. आणि बी.ई.एस.टी / पी.एम.पी / टी.एम.टी/ एन.एम.एम.टी ई.ई. महापालिका प्रवासी कंपन्या हे सर्व एकच असते अशी कृपया गल्लत करु नये..!

बरेच जण कधी ना कधी एस.टी. ने प्रवास करत असतात. प्रवासा साठी सर्वात प्रथम आपण एस.टी. बस स्थानक अथवा बस थांब्यावर जाऊन इच्छीतस्थळी जाणार्‍या एस.टी.ची वाट बघत बसतो. आपणाला हवी ती एस.टी. केव्हा येणार हे विचारायला 'चौकशी कक्ष' शोधुन तिथे बसलेल्या ३ जणांपैकी नक्की कुणाला विचारायचे या संभ्रमात पडलेल्यांना फलाटावर लागलेल्या गाड्यांचे ड्रायव्हर्/कंडक्टर त्याच केबिन मधे येऊन फेर्‍या मांडताना दिसतात. अन मग घाईत असणार्‍या त्यांच्यापैकीच कुणाला तरी गाठुन अमुक-तमुक गावाला जाणारी गाडी किती वाजता येणार हे विचारल्यावर तो बिचारा कणव येऊन केबीन मधे बसलेल्या तीघांपैकी एकाकडे बोट दाखवून सटकतो.

चौकशी कक्षात बसलेल्या तिघांपैकी एकाचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी नोंदींसाठी उभ्या असलेल्या ड्रायव्हर्/कंडक्टर अन इतर प्रवाशांच्या झुंबडीमधुन खूप प्रयत्न करावे लागतात. मग आपण ज्या गाडीची चौकशी केली ती गाडी 'येईल आता ५-१०मिनीटांत' असं ऐकवलं जातं. आपणालाही गाडीचं टाईम माहीत असतंच पण उगीचंच आपलं खात्री करुन घेण्यासाठी चौकशी कक्षात येरझर्‍या घालुन मनाची शांती करत बसायचं असतं Proud . कधी कधी ३-४ वेळा अशा फेर्‍या घातल्या तर मात्र चौकशी कक्षातला माणुस जाम चिडतो अन सर्वांसमोर 'कितीदा सांगायचं येईल ५-१० मिनिटांत म्हणुन' असा खेकसतो Biggrin . हा अनुभव बर्‍याच जणांनी घेतलेला असतोच Wink . या पार्श्वभुमीवर चौकशी कक्षातील अनाऊंसर कम नोंद करून घेणारा कर्मचारी रुमाल बांधलेल्या माईकवरून फलाटावर येणार्‍या गाड्यांची अनाउंसमेंट करत असतो. मधुनच एखाद्या कंडक्टर्/ड्रायव्हरचं नाव घेऊन " वाहक अमुक-तमुक यांनी ताबडतोब केबीनमध्ये यावे" असा दम टाकणार्‍या अनाऊंसमेंटही सुरुच असतात. Biggrin

अशात आपणाला इच्छीत स्थळी घेऊन जाणारी एस.टी. (किंवा निम-आराम/शिवशाही/शिवनेरी/आश्वमेध) फलाटावर येते. एस.टी. मधे चढण्यासाठी एकच झुंबड उडते. समजा ती बस आहे त्याच ठिकाणच्या डेपोतुन सुटणारी असेल तर कंडक्टरला न जुमानता पटापट खिडक्या उघडून आपल्याजवळचे रुमाल्/पिशव्या/आपल्या पोराबाळांना आत सिटवर टाकुन सीट रिझर्व केले जाते. ड्रायव्हरच्या केबीन मधुन अथवा 'संकटकाळी बाहेर जाण्याच्या' मार्गातून आत शिरून सीट पकडली जाते. निम-आराम्/शिवशाही/शिवनेरी/अश्वमेध ने प्रवास करणार्‍यांचा ऑनलाईन रिझर्वेशन वर भर असतो अन त्या श्रेणीच्या बसेसचे भाडे अव्वाच्या-सव्वा असल्याने त्यांना अशी झुंबड अनुभवायला मिळत नाही. Wink

एकदाचे गर्दीतून आतमधे शिरल्यावर आपण खालुन रुमाल/पिशवी/मूल टाकुन रिझर्व केलेल्या सीटपर्यंत पोचुन अन तिथे दुसरं कोण बसलं असेल तर [हे बहुदा घडतेच असे नाही.. अगदी नवशिक्या अन कधीतरीच प्रवास करणार्‍या अथवा अक्कलवंत (सीट आरक्षीत केलेल्यांच्या नजरेतून Wink ) प्रवाशाने सीटवर कब्जा केला असेल तरच..!] त्याला तिथुन उठवणे अथवा दोन सीट वर त्यालाही सामावून घेणे असा मध्यम मार्ग स्विकारावा लागतो. भांडा-भांडी झालीच तर प्रवासातील 'इथे भेटलात... वर भेटु नका' हे पेटंट वाक्य ऐकवले जाते. Proud

शेवटी गाडी सुटण्याच्या टायमाला कंडक्टर अन ड्रायव्हर आले की गर्दीने फुललेल्या एस.टी.त चैतन्य पसरते अन कंडक्टरने दोन वेळा बेल ओढुन टिंग टिंग (ही टिंग टिंग ची मिजास एस.टी. तच अनुभवता येते.. ती निम-आराम्/शिवशाही/शिवनेरी/अश्वमेधच्या नशीबी नसते Wink ) असा आवाज दिला की गाडी सुरु होऊन स्थानकातील गर्दी चुकवत एकदाची रस्त्याला लागते. मग गार वार्‍याची झुळूक खिडक्यांतुन आत शिरू लागते अन तापलेले प्रवासी गार होतात.. पुढच्याच क्षणाला भांडाभांडी झालेले पण गप्पा मारू लागतात. पुढच्या स्टॉप ला काही शीटं रिकामी झाली की मघाशी २ सीट वर ३ जण बसलेल्यांतील एकजण उठून रिकाम्या शीटावर जाऊन बसतो Bw .

प्रवासात अनेक छोटे मोठे थांबे येतात अन काहीजण चढ-उतार करतात. मोठ्या स्थानकांतील प्रवाशी आत चढण्याआधीच खारे शेंगदाणे, लेमनच्या गोळ्या, पार्ले आणि क्रीमची बिस्कीटे, मसाला डाळ, बॉबी या सर्वांना अपल्या ट्रे मधे व्यवस्थीत मांडुन विकायला आलेल्या पोर्‍यांचीच चढाओढ जास्त असते. अगदी तिखट-मीठ लावलेली काकडी किंवा गरमागरम वडापाव अन उसाचा रसही अशा मोठ्या स्थानकात थेट एस.टी. मधेच विकत घेता येतो. हे ही स्थानक मागे पडत आपला प्रवास एस.टी.ने सुरुच असतो... अन तो थांबतो (पुढचा प्रवास घडेपर्यंत Wink ) तो आपले इच्छीत स्थळ आल्यावर.

प्रवासात बरेच अनुभव येत असतात. 'प्रवाशांच्या सेवेसाठी' या ब्रीदवाक्याबरहुकुम चांगल्या-खराब रस्त्यावरुन धावताना एस.टी.ची चाके झीजतच असतात. मात्र एस.टी. ला त्याची फिकीर नसते. एस.टी. धावतच असते. तिला आत बसलेल्या प्रवाशांना सुरक्षीत आणि आरामदायी प्रवास घडवायचा असतो. तिच्या मदतीला फक्त ड्रायव्हर-कंडक्टरच नसतात तर फिटर्/वॉशर्/मेकॅनिक्/आगार प्रमुख्/स्थानक प्रमुख आणि चढत्या भाजणीने थेट परिवहन मंत्रीही साथ देत असतात.

सर्वसामान्य प्रवाशांच्या अंतरंगी विराजलेल्या एस.टी. प्रवासात तुम्हालाही काही बरे/वाईट अनुभव आले असतीलच ना..? शेअर करा Bw

STlogo.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलापण लालपरी/ लाल डबा ही दोन्ही नावं वापरायला आवडत नाहीत. एसटीच खरी!
लक्षात राहिलेले तसे बरेच अनुभव आहेत. आठवतील तसे लिहीन.
एकदा मी पुण्याला जाणाऱ्या एका एसटीने जात असताना गाडीत एक नवराबायको आणि सासू वगैरे होते. साधारणपणे बांधकामावर वगैरे मजूर असतात तसे दिसत होते. एसटी एका मध्यवर्ती गावच्या स्टँडवर पंधरा मिनिटं थांबली. तेव्हा त्या लोकांच्या बोलाचालीवरून असं लक्षात आलं की त्या सुनेने गुपचूप स्वतःचं पुण्याचं तिकीट काढलं होतं. बाकी सगळ्यांचं तिकीट त्या गावापर्यंतचंच होतं. सून त्यांच्याबरोबर जायला तयार नव्हती आणि तिला पुण्याचं तिकीट दिलेलं असल्याने कंडक्टरसमोर वैधानिक पेच निर्माण झाला होता. ते सगळे खाली उतरले होते, पण तिला ठेवून कंडक्टरला गाडी सोडता येत नव्हती. आता ते भांडण हळूहळू मारामारीच्या दिशेने जाणार असा रंग दिसायला लागला. सुदैवाने तेवढ्यात पोलीस आले. त्यांनी परिस्थिती ताब्यात घेतली आणि कंडक्टरला गाडी सोडायला परवानगी दिली.
पुढे तिचं काय झालं असेल याची चुटपूट लागून राहिली खरी.

एका रात्री एसटी प्रवासादरम्यान अचानक चाकातुन फाट-फाट असा आवाज यायला लागला. लुटमारीसाठी चोरट्यांचा एसटी थांबवण्याचा प्रयत्न असावा असा सगळ्यांचा समज झाला. आणि "थांबु नका, स्पीड वाढवा" असा एकच गलका सुरु झाला. ड्रायव्हरसाहेबांनी पण जमेल तशी न थांबवता गाडी पळवली. पुढे गाव आल्यावर एका ठिकाणी बस थांबवुन पहाणी केली तेव्हा मागच्या टायरचा काही भाग निघाल्याने आवाज येत असल्याचे दिसले तेव्हा सगळ्यांना हायसे वाटले.

माझा हायस्कूलचा पूर्ण प्रवास एस.टी. तूनच झाला. शाळा सुटल्यानंतर ५.४५ वाजता स्कूलबस ( एस.टी) असायची. मग सगळ्या मुला-मुलींची सीट पकडायला झुंबड उडायची. सीटच्या मागे काढलेले बदाम आणि बदामाला छेद देणारे बाण, त्याखाली लिहलेली मुला-मुलींची नावे हे सारं ह्या लेखाने डोळ्यासमोर आले. कधीतरी एस.टी. ब्रेकडाऊन व्हायची आणि मग अर्ध्या रस्त्यातून घरापर्यंत सर्वांना पायपीट करायला लागायची. रिक्षा चालू झाल्यामुळे आता गावात येणाऱ्या सगळ्या एस.टी बंद झाल्यात. आता एस.टी.च्या नुसत्या आठवणी उरल्यात. शाळेत असताना एस.टी.ची तिकीट जमा करायचा छंद लागला होता. एस.टी. ची एक आठवण अशी की, साधारण ९७ किंवा ९८ साली राज्यात युतीचे सरकार होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशींनी सर्व शालेय विद्यार्थीनींना मोफत पासची घोषणा केली होती. घोषणा होऊनही आम्हांला मोफत पास मिळाला नव्हता. डेपोत चौकशी केली की आम्हांला अजून ऑर्डर नाही असे उत्तर मिळे. शेवटी आमच्या प्रिन्सिपलांनी एस.टीतून प्रवास करणाऱ्या सर्व विद्यार्थीनींच्या वतीने मोफत पास मिळावा ह्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाला विनंती अर्ज लिहायला सांगितले. मग सर्व विद्यार्थीनींच्या सह्या घेऊन सर्वांच्या वतीने केलेला विनंती अर्ज आणि मग पुढच्या महिन्यापासून सर्व विद्यार्थीनींना सुरु झालेली मोफत पास सेवा हे सारं एस्.टी.च्या प्रवासादरम्यान स्मरणात राहिलयं.

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या आधी मी माझ्या गावी निघालो होतो. चौकशी कक्षाच्या समोरच गावी जाणार्‍या गाड्यांचा फलाट होता त्यामुळे मी, माझी आई अन मामा त्यासमोरच्या बाकावरच बसलो. आईने पाण्याची बॉटल आणायला सांगितली म्हणुन मी एस.टी. उपहारगृहात जाऊन ती घेऊन आलो पण दरम्यानच्या काळात गावी जाणारी एस.टी. फलाटावर लागली अन आई अन मामा आत जाऊन बसलेही. त्यांनी खिडकीतुनच मला पाणी बॉटल घेऊन येताना पाहिलं अन हाक मारून थेट आत बोलवलं. मी माझी ऑफिसची बॅग ज्यात माझं वॉलेट, ऑफिस आयडी, आणि काही कपडे वगैरे होते ती मामांच्या शेजारी फलाटाच्या बाकावर ठेवली होती ती बॅग हे घेऊन आत गेले असावेत असा समज होऊन मीही थेट एस.टी.त जाऊन बसलो. गाडी सुरु झाली अन चांगली १०-१५ किलोमीटर ट्राफिक तुडवून पुढे गेल्यावर अर्ध्या तासाने मी आईला बॅग कुठे ठेवली असं विचारलं तेव्हा "कुठली बॅग..?" असा प्रतिप्रश्न आल्यावर मी जे समजायचो ते समजलो Uhoh . मग ती बॅग घेण्यासाठी आता एस.टी. मधुन उतरून पुन्हा स्टँडवर जाऊन शोध घे असा सल्ला आई अन मामांनी दिला. मी मात्र शांतपणे एस.टी. स्टँडच्या चौकशी कक्षाचा नंबर गुगलवरुन शोधला अन फोन लावला. तिथं बसलेल्या कर्मचार्‍यास हकिगत सांगितली अन त्यांच्या केबीनच्या बाहेर माझ्या ऑफिस चं नाव असलेली बॅग दिसली तर प्लिज ताब्यात घ्या असं सांगितलं. त्यानेही लगोलग बाहेर जाऊन पाहिलं तर बॅग तिथंच होती. मग त्याने पुन्हा रिसिव्हर उचलून बॅग आहे असं सांगितलं. मग ही बॅग तुमचीच आहे याला काय पुरावा असं विचारल्यावर त्यांना कुठल्या कप्प्यात वॉलेट अन कुठल्या कप्प्यात ऑफिस आयडी आहे हे सांगितलं तेव्हा कुठे त्याचा विश्वास बसला. मग त्याने घरच्या कुणालातरी ओळखपत्र घेऊन बॅग घेऊन जायला सांगितलं अन मग मी माझ्या बहिणीला सांगुन ती बॅग ताब्यात घ्यायला लावली.

हे सर्व सोपस्कर चालत्या एस.टी. मधुन फोनवर संभाषण करत सुरु होतं ते ऐकुन आई-मामांसहीत आजु-बाजुच्या प्याशेंजरांनीही कौतुकमिश्रीत कटाक्ष टाकला. Bw

मस्त लिहीलंय.
मी लहानपणी खूप एसटी प्रवास केलेत. त्यामुळे विषकन्येसारखी इम्युनिटी येऊन आता एसटी लागत नाही.

@ धन्स मृणाली आणि mi_anu Bw
त्यामुळे विषकन्येसारखी इम्युनिटी येऊन आता एसटी लागत नाही.>> विषकन्येसारखी Biggrin

पुर्वी एसटीचा दरवाजा मागच्या बाजुला असायचा. साधारण सन २००० च्या दरम्यान पुढे दरवाजा असलेल्या नवीन येष्ट्या आल्या असाव्या. अशाच एका प्रवासादरम्यान थांब्यावर एसटी थांबल्यावर एक आजीबाई लगबगीने उतरण्यासाठी पुढे येणाऱ्या प्रवाशांना ढकलत मागच्या दिशेने निघाल्या. मागे कोणी ओ‍ळखीचे असेल म्हणुन लोकांनीही त्यांना वाट करुन दिली. मागे गेल्यावर आजींनी शोधाशोध सुरु केली. "काय शोधताय आजी" एकाने कुतुहलाने विचारले. "दार शोधते आहे रे बाबा. उतरायचे आहे मला." आजीचे हे उत्तर ऐकुन सगळ्यांनी कपाळा‌ला हात लावुन घेतला.

असाच एक दुसरा किस्सा: बस स्थानकातुन निघणारी येष्टी एकाने लगबगीने 'थांबा थांबा' ओरडत थांबवली आणि मुख्य दरवाज्याने यायच्या ऐवजी ड्रायवर सीट मागच्या संकटकालीन मार्गाने एस्टीत घुसण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्याचा हा खटाटोप सगळे पहातच राहिले. शेवटी ड्रायवरने त्याला थांबवले आणि 'शाळेत गेला होता तु?' असा प्रश्न विचारला तेव्हा एकच हशा पिकला.

वीरु : Rofl

सेम किस्सा मीही अनुभवला होता... एका रस्त्याच्या कडेला असणार्‍या बसथांब्यावर एक बाई तिच्या २ मुलांसोबत एसटीची वाट बघत होती. एस.टी. आल्यावर तिने हात दाखवून थांब्यावर थांबवले अन लगबगीने हातातील पिशवी अन दोन पोरं सांभाळत समोरच्या दारातुन आत येण्या ऐवजी मागे आधी जिथे दरवाजा असायचा तिथे गेली. तिथे दरवाजा नाही हे बघुन एस.टी.च्या उजव्या बाजुला दरवाजा असेल असं वाटुन उजवीकडे आली. तिथेही दरवाजा नाही हे बघून ती कपाळावर हात मारत ड्रायव्हरच्या केबीन कडे आली अन त्याला म्हणाली, "बया... कस्ली येष्टी हाय बाबा तुजी.. तुज्या येष्टीला दारच न्हाई.. आता हितुनच आत येते..!" म्हणत केबीनच्या दारातून तिने मुलांना आत ढकलले अन आख्खी एस.टी. दात काढू लागली. Biggrin

महाराष्ट्राची एसटी केविलवाणी होत आहे.
राजस्थान, मध्य प्रदेशची वरती गेली केव्हाच.
कर्नाटकाची 'रेड बस' म्हणतात ( निळी, पाढरीही असते). कोणतंही सरकार आलं तरी तिची ऐट भारीच असते. तिचे वस्त्रहरण होत नाही.

कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसला रेड बस म्हणत नाहीत. रेडबस नावाची बस तिकीट बुक करण्यासाठी वेबसाईट /app आहे, ज्यात केएसआरटीसीच्या बसचं बुकिंग करता येत होतं (अजूनही येत असू शकेल, पण आता केएसआरटीसीच्या वेबसाईटवर अतिशय सुलभतेने बुकिंग करता येत असल्याने रेडबसवर जाणं होत नाही)
रेडबसवर प्रायव्हेट बस ऑपरेटर्सचंही बुकिंग करता येतं.

कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्टची सेवा उत्कृष्ट आहे. बंगलोर-पुणे प्रवास अनेक वेळा केला आहे. लोकल प्रवासही केलाय. अनुभव चांगलाच आहे.

पूर्वी पुणे नाशिक पुणे असा तब्बल सहा( कधीकधी तर सात) तासांचा प्रवास एकटीने बऱ्याचदा करायचे. तेव्हा नवीन रस्ता नव्हता आणि बस सगळे थांबे घेत असायची. परंतु बऱ्याच वेळेला सहप्रवासी खूप छान असायचे. एकटाच पुरुष शेजारी एवढा वेळ बसणार म्हणून आधी संकोचलेली मी नंतर मात्र ढीगभर गप्पा मारायची. सुदैवाने रात्रीच्या वेळी सुध्दा काही वाईट अनुभव आले नाहीत. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक नेहमी प्रवास करत असतात त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळायचं.

माझ्या आठवणीतली एस टी म्हणजे पुण्यातून गावाला जाण्याचा प्रवास लहानपणीचा ...
पुणे ते दापोली .. पण दापोली ते माझं छोटस गाव हा प्रवास अधिक लक्षात राहतो कारण त्या एस टी त बसलं कि कोळणींच्या टोपलीतील सुकटीचा वास , फणसाच्या गरयांचा वास , कैरीच्या चिका चा वास ,अत्तरचे वास असे एकत्रित वास यायचे कि कधी एकदा उतारतीये असं व्हायच आणि उतरले कि इतका आनंद व्हायचा मोकळ्या हवेत श्वास घेतल्याचा ...

कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसला रेड बस म्हणत नाहीत. - @वावे
.
होय. पण
मार्चमध्ये उडुपीला गेलो होतो. श्रिंगेरीसाठी केएसआरटीसीच्या बसचा स्टँड शोधत विचारत होतो. पण खासगी मोठा आणि स्थानिक दाखवला. मग एकाने सांगितले रेड बस विचारायचं. मग सापडला.

रेडबस ही खाजगी कंपनी आहे. तिचा कर्नाटक एस टी शी संबंध नाही.

गेल्या भारत भेटीत जुन्या मित्रांबरोबर एस टी स्टँड समोर अमृततुल्य चहा, एखादी सिगारेट, सोलापूरची प्रसिद्ध कट भजी वगैरे कार्यक्रम केला.
पण एस टी स्टँड ची पार रया गेली आहे. बसेसही फारच जुन्यापुराण्या आहेत. एकंदर वातावरणही मला डिप्रेसिंग वाटले. मध्यमवर्गीयांनी आजकाल एस टी सोडूनच दिली आहे असे दिसते. तिथे गेलो की इंजिनियरिंग साठी पहिल्यांदा घर सोडून जाताना केलेला प्रवास आठवतो.

कर्नाटकात खासगी बसचा सुळसुळाट फार आहे. त्यांची एकी आहे. काही ठिकाणी मेन स्टँडला ठरलेल्या ५,१०,१५ मिनिटांनी बस सोडायला लावणारा शिट्टी मारून पुढच्या बसला आणतो.
केएसआरटीसीच्या बसला तिकडे काय म्हणतात? कर्नाटका बस?
---------------------------
भ्रषाटाचार असल्याशिवाय स्टे ट्रान्सपोर्ट डब्ब्यात जात नाही. खासदार, आमदार आपल्या खासगी बसेस चालवतात. किंवा एसटीचे टायरस सीटस रिपेर खाऊन जेमतेम चालू ठेवतात.
हरयाणातल्या एसटींना ठराविक खासगी रेस्टारंटालाच बसेस थांबवतात. पदार्थांचे भाव काहीही असतात.

आपल्या एसटीचंही हेच झालेलं आहे. कधीही टायर वर करेल. शिवशाही च्या बसेस एसटीला घ्यायला लावून परत खासगी कंत्राटदारांना कमी भाड्याने दिल्या.

५-६ वर्षापुर्वीची गोष्ट आहे , लातूरहून औरन्गाबादला दुपारी २ च्य्या बसने निघालो . कन्डक्टर शेजारीच बसलो .
गप्पा मारताना त्यान्चा पगार , सुविधा ची माहीती घेतली तर फार वाईट परिस्थीतीत ते काम करतात .
तो परमनन्ट होता पण चालक contract वर होता ( पगार त्यावेळी ६००० ) , विचार करा ६००० महीना असलेला चालकाच्या डोक्यात कितीतरी problems असतील आणी तो जवळजवळ ५० लोकाना घेउन निघाला होता .
ती गाडी त्या दिवशी औरन्गाबादला मुक्कामी होती तर त्यावेळी त्याना ६ रु. भत्ता मिळत होता , ६ रु. त चहा तरी मिळतो का ?

मध्य महाराष्ट्रातल्या एका निर्जन रस्त्यावरून रात्रीचा एसटीनी प्रवास सुरु होता . रास्ता परिसर माझ्या साठी अनोळखी होता. मी ड्रायव्हर च्या मागच्या सीट वर बसलो होतो. एक स्त्री प्रवासी लहान मुलाला घेऊन दारा जवळ येऊन उभी राहिली. बहुदा पुढच्या गावात उतरणार असेल. कंडक्टरनी सिंगल बेल दिली आणि अगदी निर्जन फाट्यावर एसटी थांबली. कंडक्टरने त्या स्त्री प्रवाश्याला विचारले की कोणी येणार आहे का न्यायला. घरचे कोणी तरी येणार आहे असे काहीसे उत्तर त्या स्त्रीने दिले. ती स्त्री उतरल्यानंतर ड्रायव्हरने गाडी बंद केली आणि शांतपणे बसून राहिला. 5 मिनिट नंतर एक मोटरसायकल आली. स्त्री प्रवासी मुलाला घेऊन त्या मोटारसायकल वर बसली आणि निघून गेली. ड्रायवरने गाडी सुरू केली आणि आमचा पुढचा प्रवास सुरु झाला.
त्या निर्जन स्थळी त्या स्त्रीला आणि लहान मुलाला एकटं थांबू लागू नये म्हणून कोणी ही न सांगता एक सामाजिक जबाबदारी म्हणून ड्रायवर आणि कंडक्टरने दाखवलेले ते jesture खूप भावले होते.

झम्पू, अगदी अगदी खरे आहे हे.. प्रवाशांची अशाप्रकारे आजही काळजी घेणारे एस.टी. चे कर्मचारी आहेत हे खरेच कौतुकास्पद आहे.