क्षण - ओबामा आणि हिलरींची भेट

Submitted by मोहना on 7 January, 2021 - 07:52

ओबामांना भेटणार होते आणि हिलरी क्लिनंटना मी भेटले... हे लिहिताना मी अमेरिकेतली भारताची राजदूत वगैरे असल्यासारखं वाटतंय. एक दिवस काय झालं लेकाचा मित्र जेवायला आला. डॉर्टन. तो ओबामा प्रशासनात काम करायचा. लेक त्याला आणायला गेला होता तेव्हा त्याने त्याला काय सांगितलं काय माहित. जेवता, जेवता डॉर्टनने विचारलं,
"ओबामांना भेटायचं आहे का? तसेही ते येणारच आहेत शार्लटला." मी लाख भेटेन पण आलोच आहोत तर भेटू मोहनाला असं ओबामांनाही वाटेल का असा प्रश्न डॉर्टनला विचारावा की नाही ते समजेना. मुलगा, देवाची भेट घडवून देतोय आता मला देव मान या थाटात माझ्याकडे बघत होता.
"मी एकटं भेटायचं की विरेन आला तर चालेल?" काय प्रश्न हा पण अडीअडचणीला नवर्‍याचा टेकू बरा पडतो.
"तुमच्यावर आहे." डॉर्टन म्हणाला. नवर्‍याला काही ओबामांना भेटायचं नव्हतं. त्याला बरीच अतिमहत्वाची कामं होती.
"भेटायचं कसं?" मुलभूत प्रश्न होताच.
"मोटरकेड चालवावी लागेल." डॉर्टन म्हणाला आणि माझी बोलतीच बंद झाली. हजारदा टी.व्ही. वर बघितलेल्या लांबलचक गाड्या, ताफा डोळ्यासमोर नाचायला लागला.
"रणगाडे असतात ते. गाडा चालवण्यापेक्षा थेट भेट घेता..." लेकाने अडवलं.
"चालवेल ती मोटरकेड."
"मी कळवतो पुढचं." असं सांगून, भारतीय जेवण चापून डॉर्टन निघून गेला आणि माझी झोप उडाली.
"अरे, आपण एकांकिका नेली होती ओहायोला तेव्हा जी गाडी चालवली तशी असते ना ही?"
"हो. मागे कैदी बसल्यासारखे वाटतात छोट्याशा जाळीमुळे असं म्हणत होतीस ती." नवर्‍याने आठवण करुन दिली.
"किल्ली कुठे घालायची, आरसा कुठे, चाक कुठे, मागचं, बाजूचं कसं दिसणार असं पण विचारत होती." मुलीने पुष्टी जोडली.
"सगळ्यांनी तुझे प्रश्न ऐकल्यावर घाबरुन गाडीबाहेर उड्या मारल्या ती." मुलाने ठळक बातम्या दिल्यासारखं जाहीर केलं.
"तरी मी गाडी चालवली." माझ्या चिकाटीचा सार्थ अभिमान माझ्या शब्दांतून ओंसडला.
"तू गाडी चालवलीस हे महत्वाचं नाही. सगळे तू गाडी चालवताना बसले हे विशेष." नवरा खडूसपणे म्हणाला आणि लेकाच्या कानात एकदम धोक्याची घंटा वाजली.
"ओबामांचं काही खरं नाही. जमणार आहे ना तुला नक्की?" त्याचा चेहरा कावराबावरा झाला. त्याला जी चिंता वाटत होती तीच मलाही पण चिकाटी आणि डॉर्टनला दिलेला शब्द मध्ये आला.
विमानतळावरुन अतिउच्च पदावरच्या लोकांचं सारथ्य करायचं. ताफ्यात मिसळलेला आपला रणगाडा हॉटेलपर्यंत पोचवायचा, ओबामांना भेटायचं, बोलायचं आणि घरी परत यायचं इतकं सोपं काम होतं पण FBI ची प्रश्नमंजुषा सुरु झाली, वाढायला लागली. रोज उठलं की इ मेल. काहीतरी माहिती हवी असायची. हळूहळू ते मागच्या जन्मापर्यंत पोचतील एवढी माहिती पुरवून झाली. दिवस, रात्र ओबामा, गाडी, माहिती एवढंच मनात घोळायला लागलं. स्वप्न पडायला लागली.
"गाडी खड्ड्यात गेली, गाडी वळताना आपटली, गाडी रस्ता सोडून पळाली, गाडी बिघडली." या स्वप्नांमध्ये मी सोडून सर्वांनी ’राम’ म्हटलेलं असायचं आणि तरीही माझी सुटका नसायचीच. हिलरी क्लिंटनना भेटून मी जो गोंधळ घातला होता त्याचा सुगावा यांना लागला आणि या सुरक्षारक्षकांनी मला चारी बाजूंनी घेरलं आहे असंही स्वप्न पडायला लागलं. माझा जीव महत्वाचा की ओबामा मी हा प्रश्न आधी मनात मग मोठ्याने विचारायला सुरुवात केली. सवयीप्रमाणे सर्वांनी दुर्लक्ष केलं. एकदा कंटाळून नवरा म्हणाला,
"ओबामा महत्वाचे."
"मग चालव तू गाडी आणि भेट त्यांना." मी सुटका झाल्यागत त्याच्या मागे लागले.
"लेकाचा हिरमोड करु नको. आपण दोघं ओबामाप्रेमी आहोत असं सांगितलंय त्याने. आता तू त्यांना भेटलास काय किंवा मी काय, आपण काय वेगळे आहोत का? चालव तू." नवर्‍याला पटवून द्यायचा प्रयत्न केला. उपयोग शून्य. आपल्याला गाडी चालवता येत नाही याचा आनंद लेकीने साजरा केला. मुलगा माझं मनोधैर्य वाढावं म्हणून माझ्या हुशारीच्या कहाण्या सांगायला लागला. दोन वाक्यानंतर त्याला हुशारीची गोष्ट हुशारीची नव्हतीच हेही लक्षात यायला लागलं. मी माझ्या फटफजितीच्या कहाण्या ऐकून त्यात भर न पाडण्याच्या निश्चय केला. घरातल्यांच्या एका गाफील क्षणी डॉर्टनला वेगळं, मुलाला वेगळं आणि नवर्‍याला वेगळं कारण देऊन ’स्वप्नयात्रा’ संपवली. मी उगाच संधी घालवली असं वाटतंय? हिलरींना भेटले तेव्हा काय झालं ते कळलं की काय वाटतं ते ठरवा.

WakeTech कॉलेज - जिथे मी काम करायचे तिथे एक दिवस हिलरीबाई तरुण मुलांची मतं मिळवायची म्हणून आल्या. आम्ही सगळे कॉलेजचे कर्मचारी असल्यामुळे पहिल्या पाच रांगात. हिलरींचं भाषण ऐकणं, त्यांना भेटणं यापेक्षाही आज ऑफिसचं काम करायचं नाही या आनंदात आम्ही कडक सुरक्षाव्यवस्थेतून आत पोचलो. हिलरीबाईंना भेटलो, भाषण ऐकायला बसलो. सगळं छान रंगात आलं होतं पण मला लेकिला शाळेतून आणायचं होतं त्यामुळे माझी तिथे बसायची वेळ संपली. मध्येच उठून नक्की कसं जायचं कळेना पण क्षण न क्षण महत्वाचा होता. व्यासपीठावर बाई किंचित थांबल्या तशी वाकून सुळ्ळ्कन मी बाहेर पडले. माझ्या हालचालींमधली सुळ्ळकनता जरा जास्तच झाली असावी. इकडे - तिकडे न बघता मी धावत जिन्याच्या पायर्‍या उतरले आणि एका रुबाबदार सुरक्षारक्षकाच्या तावडीत सापडले. CBI चा माणूस. बंदूकीतून गोळ्या आल्यासारखे प्रश्न यायला लागले. मी चुकून (नेहमीप्रमाणे) ’नो एक्झिट’ मधून ’एक्झिट’ मारली होती. CBI चा माणूस उत्तरं मिळाल्यावर शांत झाला. तो शांत झाला पण मी, उत्तरं दिली ती चुकीची दिली की काय म्हणून थरथरायला लागले. तेवढ्यात तो म्हणाला,
"चला"
"आय कॅन गो?" मी सुटकेचा श्वास टाकत विचारलं.
"आय मीन, लेटस गो." तो कठोर चेहर्‍याने उत्तरला. आता हा मला कुठे घेऊन चालला?
"प्लीज..."असं त्याने म्हटल्यावर नक्की कुठे? असं न विचारता मी चालायला लागले. तो माझ्याबरोबर. वाटेत कॉलेजमधली तरुण मुलं आमच्याकडे बघत. मला एकाचवेळी मी हिलरी, खूनी, सेलिब्रेटी आहे असं वाटत होतं. तो मला कुठे घेऊन चालला होता कळत नव्हतं पण त्याला म्हटलं,
"माझं सामान माझ्या खोलीत आहे."
"ओके." एकूण मी जिथे नेईन तिथे तो येणार असं दिसत होतं. इतका रुबाबदार माणूस घरीच न्यावा असं मला वाटत होतं पण पाय ऑफीसच्या दिशेने जात होते. तिथे पोचलो. आता पुढे?
"धिस इज माय ऑफीस." मी त्याला सांगितलं. तो एकदम गर्कन वळला आणि त्याने माझ्याकडे पाठ फिरवली. कायमची. हाय रे दैवा असं मनातल्या मनात म्हणत मी माझं सामान घेऊन लेकीला शाळेतून घेण्यासाठी पळत सुटले.

हिलरींच्या भेटीपेक्षाही माझी ’नो एक्झिट तिथून एक्झिट’ कहाणीच बरेच दिवस घरीदारी चर्चेचा विषय झाली होती. कालचा गोंधळ बरा होता असं होऊ नये म्हणून मग मी पुढचा गोंधळ आधीच थांबवला. ओबामा माझ्या भेटीला मुकले. चालयचंच. बघू पुन्हा कधीतरी त्यांच्या घरीच भेट होईल. त्यात काय एवढं. नाही का.

माझी अनुदिनी - https://mohanaprabhudesai.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद.
म्हाळसा, हो. केरीत होते १३ वर्ष. २०१२ पर्यंत. खूप ओळखीची आहेत तिथे कारण आमची नाटकाची अभिव्यक्ती नावाची संस्था आहे. एकांकिका, नाटक करायचो दरवर्षी. आत्ताही तिथल्या कलाकारांबरोबर एक कार्यक्रम करणार आहे.

FBI ची प्रश्नमंजुषा सुरु झाली, वाढायला लागली. रोज उठलं की इ मेल. काहीतरी माहिती हवी असायची. हळूहळू ते मागच्या जन्मापर्यंत पोचतील एवढी माहिती पुरवून झाली. दिवस, रात्र ओबामा, गाडी, माहिती एवढंच मनात घोळायला लागलं. स्वप्न पडायला लागली.
"गाडी खड्ड्यात गेली, गाडी वळताना आपटली, गाडी रस्ता सोडून पळाली, गाडी बिघडली." या स्वप्नांमध्ये मी सोडून सर्वांनी ’राम’ म्हटलेलं असायचं आणि तरीही माझी सुटका नसायचीच.>> Rofl

मला एकाचवेळी मी हिलरी, खूनी, सेलिब्रेटी आहे असं वाटत होतं. >> Biggrin

कसलं भन्नाट लिहिलंय..!! Biggrin Biggrin