द्रुम

Submitted by ज्येष्ठागौरी on 25 December, 2020 - 06:11

द्रुम...
आमच्या मागच्या अंगणात खूप धमाल गोष्टी होत्या.विहीर आणि त्याच्यावर सावली धरणारं भलं मोठ्ठं चिंचेचं झाड.अतीव सुंदर दत्ताचं देऊळ, उंबराचं झाड,भरपूर मोकळी जागा,सणसणीत वारं आणि आमची आवडती नारळाची चार झाडं असा जामानिमा! ह्या नारळाच्या झाडांपैकी दोन आमची आणि दोन, आमच्या आणि मंगलाकाकूच्या वाड्याच्यासीमेवरची त्यांची, अशी सरळ विभागणी.आमची दोन्ही झाडं ही उंचनिंच आणि काकूची दोन्ही सिंगापूर जातीची,जरा कमी उंचीची.नारळ पडल्याचा आवाज आला की काकू आणि आई दोघी मागच्या अंगणात डोकावायच्या.साधारण जिच्या झाडापाशी पडला असेल ती तो उचलून घ्यायची आणि दोघी गप्पा मारत परत घराकडे परतायच्या.ह्या त्यांच्या क्रमाला सुरुंग लावला तो आमच्या घरच्या श्वानसम्राज्ञीनी.ती लॅबरेडोर रिटरीव्हर जातीची होती.ह्या जातीच्या कुत्र्यांना विशेषकरुन शिकारीसाठी नेलं जातं म्हणजे शिकाऱ्यानी पक्षी टिपला की ही कुत्री अचूक माग काढत तिथपर्यंत जातात आणि ती शिकार उचलून आणतात.हे त्यांच्या रक्तातच असतं.तर अशा रीतीनं आमच्या श्वान सम्राज्ञीला नारळ पडल्याचा आवाज आला की असेल तिथून सुसाट सुटायची आणि आई आणि काकू पोचायच्या आत तिथं पोचून नारळ तोंडात धरुन धूम ठोकायची.तो नारळ नक्की कुठल्या झाडाचा होता हे कळायच्या आत तो नारळ आमच्या घरात जमा व्हायचा आणि पुढच्या काही मिनिटात दातांनी हिसकून त्याच्या बऱ्याचश्या शेंड्या काढून टाकायची.आई आणि काकूच्यात एक तह झाला की एक नारळ आमचा आणि एक तिचा अशी विभागणी झाली.ही नारळाची झाडं आईबापूंच्या खिडकीतून,अंगणातून दिसायची. मी कित्येक रात्री आईचं गाणं ऐकत नारळाच्या झावळ्यांकडे बघत पेंगुळत्या डोळ्यातली झोप परतवण्याचे प्रयत्न केले आहेत.त्या सुमारास 'हा खेळ सावल्यांचा'सिनेमा आला आणि माझी पाचावर धारण बसली.माझ्या भावाला, संजयला आयती संधी मिळाली, तो नुसतं नरसूचं भूत म्हणला की त्या झाडांकडे बघायची भीति वाटायची काही काळ, मग तोही सरला.बापूंचं विशेष प्रेम होतं ह्या झाडांवर,जवळपास पन्नास वर्षं ती झाडं होतं अंगणात.बापू त्याला आळं करणं,पाणी घालणं, जंतुनाशक घालणं ही सगळी कामं करायचे.तीन चार महिन्यातून एकदा "नारळवाला" यायचा. झाडावर चढून नारळ काढून द्यायचा.आई त्याला जेवायला वाढायची,ते जेवून आणि बिदागी घेऊन जायचा. बापू दापोलीला राहिले होते त्यामुळे त्यांना झाडावर चढायचं माहिती होती,ते ह्या झाडावरही पूर्वी चढत असत.एकदा माझ्या आग्रहामुळे त्यांनी चढूनही दाखवलं पण आता त्यांची सवय मोडल्यानं आणि हातात हवी तेवढी ताकद नसल्यानं दहा फूट जाऊन ते परत आले.उतरले तेंव्हा त्यांचे गुलाबी रंगाचे गादीसारखे गुबगुबीत तळवे सोलवटून रक्ताळले होते ते बघून अगदी मुसमुसून आलं.तर अश्या ह्या नारळाच्या झाडांची ही गोष्ट. एका प्रचंड पावसाळ्याच्या संध्याकाळी कडाड असा आवाज करत आमच्या घराजवळचं एक नारळाचं झाड कोसळलं. आमच्या वाड्यात एक पत्र्याची शेड होती त्यावर पहिला प्रहार होऊन पलीकडच्या वाड्यात कोसळलं. म्हणजे खोड सगळं शेडवर आणि शेंड्याचा भाग भरपूर नारळांसकट पलीकडच्या वाड्यात कोसळला.तो आवाज इतका भयानक होता की घरात आमच्या काळजाचा ठोका चुकला.आम्ही धावत गेलो तर कोणालाही शारीर किंवा आर्थिक नुकसान झालं नव्हतं. आईनं दत्तापुढे हात जोडले.त्या वाड्यातल्या लोकांनी ते नारळ घेतले की नाही काही माहिती नाही.त्या पडलेल्या नारळात, कश्यातही तिचा जीव अडकला नाही.आईनं पुढे अनेक वर्षं गुरुवारी घरच्या दत्ताला अभिषेक केले.ते आमच्याही घरावर पडलं असतं किंवा दुसऱ्या कोणाच्या घरावरही कोसळलं असतं पण दत्तानी वाचवलं असं आईला कायम वाटत राहिलं.झाड पडल्यानंतरची ती रिकामी जागा डोळ्यात खुपत राहिली कायम.एक दुःख सतत राहिलं,वृद्ध वडिलधाऱ्या व्यक्तीच्या जाण्यानं होतं तसं!अपरिहार्य तरीही दुःखद! पण त्या प्रसंगानी बापू सावध झाले.दुसरं झाडंही जीर्ण झालं होतं हे निश्चितच होतं.दुसऱ्या झाडावर त्यांनी बारीक लक्ष ठेवलं. अधूनमधून ते अगदी जवळ जाऊन त्याच्या खडबडीत बुंध्यावर हात फिरवून बघत असत.नारळवाला वृद्ध झाला होता आणि झाडही,आता तो येऊन जायचा, पण फक्त बिदागी घेऊन आणि जेवून. आता झाडावर चढायला मनाई होती.आता फक्त पडलेले नारळ घरी यायला लागले. एक दिवस बापूंना जवळजवळ सत्तर फूट उंच झाडाच्या पाऊण भागानंतर एक ढलपा दिसला.जवळ जवळ फाळ निघाला होता.झाड नक्कीच तिथं मोडणार होतं, आज ना उद्या ,झाडाच्या परिघाच्या अगदी जवळ आमचं घर आणि दुसऱ्या बाजूला दुसरा वाडा होता. झाडाला तर धोका होताच आणि झाडांमुळे इतरांना.बापूंची झोप उडाली. झाड अगदी निवासी भागाच्या जवळ होतं आणि जोराचा वारा,पाऊस ह्या कशानेही ते पडू शकलं असतं.मोठी झाडं कापायला परवानगी लागते.ती बापूंनी मिळवली पण मुख्य प्रश्न होता तो असं काम कोण करतं त्याचा शोध घेण्याचा..ते झाड कापणं हे जरा जिकीरीचं होतं. त्याची उंची, जवळची घरं आणि पाऊण अंतरावर दुभंगलेलं खोड.कोकणातली काही माणसं हे काम करतात असं कळलं आणि आमच्याकडे कौलं शाकारणारी काही मंडळी होती त्यातल्या ओळखीतल्या एकांनी त्या गटाचा पत्ता आणून दिला.त्यांनी पैसे खूप सांगितले म्हणजे पाच हजार , पस्तीस वर्षांपूर्वी ही रक्कम जास्त होतीच.पण दुसरा पर्याय नसल्यानं आणि काम जोखमीचं असल्यानं बापूंनी ती मान्य केली आणि एका भल्या सकाळी ती टोळी येऊन उभी राहिली. आजूबाजूच्या वाड्यातली मंडळीही हे बघायला आली होती.टोळीमध्ये एक विशीची तरुणी होती.दिवसातली होती,चेहरा ओढलेला पण विशिष्ट तेजाचा होता.आईनं त्या मुलीला बसायला,पडायला एक खोली उघडून दिली. चहापाणी झाल्यावर त्यांनी झाडाचं निरीक्षण केलं आणि हे काम खरोखर कठीण आहे असं लक्षात आलं.पण त्या टोळीतला एक मुलगेलासा, चणीनं बारीक असा तरुण झाडाकडे टक लावून बघत म्हणाला"होऊन जाईल काम".मग तो भरभर वर चढून गेला,कमरेला हत्यार आणि दोरखंड! सगळ्यांचे प्राण कंठात,पाऊण झाड चढल्यानंतर त्यानं अत्यंत कठीण असं धाडस करून तो दुभंगलेलं, जुनं खोड पार करुन शेंड्यापर्यंत गेला ,हे सगळं बघायला त्याची पूर्ण टोळी आणि इतर माणसं होती,धोका फार होता,ती मुलगीही खोलीतून बाहेर येऊन पुढच्या अंगणातून झाडाकडे अनिमिष डोळ्यांनी बघत होती आणि त्यानं पहिल्यांदा फांद्या छाटल्या,एका हातानं झाड पकडायचं आणि दुसऱ्या हातानं घाव घालायचे अशा पद्धतीनं काम करत त्यानं झावळ्या खाली पडल्या. तिथे कदाचित कावळ्यांची घरटी असतील,त्यामुळे कावळ्यांनी कालवा करत त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली पण त्यांना परतवून लावत ह्या मुलानं शांतपणे शेंडा बराचसा छाटून टाकला,मग तो थोडा खाली आला आणि त्यानं त्याच्या डोक्यावरच्या भागात हत्याराने खोड बऱ्यापैकी कापलं. त्याला कमरेला बांधून नेलेला दोर बांधला.मग तो सरसर खाली उतरला, आता बाकीच्या गटानं पुढच्या अंगणातून दोर खेचायला सुरुवात केली आणि बऱ्याच प्रयत्नाने तो शेंड्याकडचा भाग धाडकन मागच्या अंगणात कोसळला. खूप नारळ, काही कोवळे, काही तयार सगळे कोसळले..परत हा मुलगा वर चढला आणि जिथे खोड दुभंगलेलं होतं त्याच्या थोडंच खाली त्यानं घाव घातले ,दोर बांधला ,परत पुढच्या अंगणातून खेचून हा भाग खाली पडला.हा मुलगा कापायला तर वर चढायचाच पण दोर ओढायलाही पुढे.. आता जो धोकादायक भाग होता तो तोडून झाला होता.
सगळे जण थोडे शांत झाले, त्यांनी डबे आणले होते तरी आईनं त्यांना सगळ्यांना गरम आमटी भात जेवायला घातला.पण ह्या मुलानं काही खाल्लं नाही. काम होऊदेत मग खातो म्हणाला.ती बरोबरची मुलगी खायला तयार नव्हती पण आईनं तिला आग्रह करुन जेवायला बसवलं. संध्याकाळपर्यंत सगळं झाड तोडून खाली आलं.अतिशय कष्टाचं, धोकादायक काम पार पडलं. चहापाण्याच्या वेळी आई त्या मुलीशी बोलत होती, ती मुलगी जरा अबोल होती पण आईनं आस्थेनं चौकशी केल्यावर ती त्या तरुणाची पत्नी आहे हे कळलं.आईचा कल्पनेनं थरकाप झाला.संध्याकाळी काम संपल्यावर त्यांची ठरलेली रक्कम तर त्यांना दिली गेलीच पण बापूंनी त्या धाडसी मुलाला वर वेगळे भरपूर पैसे दिले, आईनं त्या मुलीची ओटी भरली.दोघांनी आईबापूंना वाकून नमस्कार केला तेंव्हा त्या दोघांनीही "औक्षवंत व्हा"असा अगदी मनापासून आशीर्वाद दिला.सगळी मंडळी आपापल्या घराकडे परतली.
बापू मात्र मागच्या अंगणात स्वस्थ बसून राहिले.ह्या सगळ्या प्रक्रियेत कोणालाही जराही इजा होऊ नये ह्यासाठी सकाळपासून असणारं त्यांच्या मनावरचं मणभर ओझं गेलं होतं तरीही मन जड होतं.त्यांचं लाडकं झाड धारातीर्थी पडलं होतं.इतक्या वर्षांचा सहवास असा संपला होता. त्यांच्या लहानपणापासून असलेल्या सवंगड्याची संपलेली किंबहुना संपवायला लागलेली यात्रा भरल्या डोळ्यांनी ते बघत राहिले.आई ओल्या डोळ्यांनी त्यांना म्हणाली अहो हे अनिवार्य होतं. ते हो म्हणाले. हे सगळं, झाडाखेरीज कोणालाही दुखापत न होता झालं ह्यासाठी त्यांनी दत्ताला नमस्कार केला.
आता नारळ पडला तरी आई काकू ह्यांच्यात संभ्रम होणार नव्हता.आमच्या बाजूची ती जागा रिकामी,अगदी पूर्ण रिकामी झाली होती,आता नरसू घाबरवणार नव्हता,नारळवाला येणार नव्हता,घरचं खोबरं मिळणार नव्हतं, ओटीला घरचा असोला नारळ नव्हता.डोळ्यात दिसणाऱ्या चौकटीत नारळाच्या झाडाची जागा जरी मोकळी असली तरी तिथं एक वेगळं,अद्वितीय चित्र काढलं गेलं.अनादि अनंत असा एक प्रवास....एक प्रवास संपत असताना, तो अनिवार्यपणे संपायला मदत करणारा तो असामान्य माणूस, त्याचं धाडस प्रत्यक्षपणे बघणारी, दिवसातली त्याची धैर्यवान पत्नी आणि अप्रत्यक्षपणे पराक्रमी पित्याकडे तिच्या आतून बघत असणारा,प्रवास लवकरच सुरु करणारा एक जीव ह्यांच्यामुळे तो एक दिवस मनावर लेणं कोरुन गेला..
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

निसर्गाच्या सहवासात राहीलात आणी वर देवाची कृपा. नशीबवान आहात. लेख आवडला. तुमच्या आठवणी लिहीत जा, आम्ही पण कणाकणाने समृद्ध होत जातो. थोडेसे वाईट पण वाटले नारळाच्या झाडाबद्दल, पण निसर्ग त्याचे काम करतोच.

सुंदर लेख.
हर्पेन, द्रुम म्हणजे झाड.
जगद्द्रुमाचे पिकले पर्ण, गलित असे मी अगदी जीर्ण...
(वातचक्र -केशवसुत)

द्रुम म्हणजे वृक्ष, नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात.द्रुम अनादि अनंत असतो.. लेख आवडला,त्याबद्दल सर्वांना धन्यवाद!

खूपच सुंदर. आमच्या वाड्यापुढेपण चिंचेची झाडे होती. साधारण मार्च एप्रिलमध्ये त्याच्या चिंचा तोडायला महानगरपालिकेची माणसे यायची , वाड्यात पण खूप चिंचा पडायच्या मग हे छाटणी कामगार वाड्यात येऊन पोती भरून चिंचा नेत. आता वाडा पण नाही आणि चिंचेची झाडे पण गेली रस्ता रुंदीकरणात. तुमचे लेख वाचले की हटकून जुन्या आठवणी जाग्या होतात , मग ती एखादी व्यक्ती असो किंवा घटना किंवा अजून काही.

द्रुम म्हणजे झाड. >>
इतपत माहीत होते पण हे म्हणजे समानार्थी शब्द म्हणून.
उदा. पंकज म्हणजे कमळ हे माहिती आहे त्याशिवाय पंकज म्हणजे चिखलातून जन्मलेले हा पंकज चा अर्थ माहीत असणे हा वेगळा भाग. असा द्रुम चा अर्थ माहीत नाही असे म्हणायचे होते मला. असो.

धन्यवाद वावे, ज्येष्ठागौरी

ज्येष्ठागौरी, हा पण लेख अतिशय सुंदर लिहिला आहेस. तुझा प्रत्येक लेख म्हणजे 'अगदी अगदी' मोमेंट्स असतात. जुन्या आठवणी प्रसंगात जाऊन आल्यासारखं वाटतं.

ज्येष्ठागौरी, हा पण लेख अतिशय सुंदर लिहिला आहेस. तुझा प्रत्येक लेख म्हणजे 'अगदी अगदी' मोमेंट्स असतात. जुन्या आठवणी प्रसंगात जाऊन आल्यासारखं वाटतं.

सुंदर शब्धचित्र...अवघं बालपण आणि अगणित व्ययक्तींच्या आठवणी जाग्या करून गेलं.
आमच्या वाड्याच्या अंगणातून पलीकडच्या बाजूला कौलारू घरांच्या वर डोके काढून उभी राहिलेली नारळ आणि जांभळाची द्वयी होती.. त्यांची मनातली सर्व रूपे आणि त्याच्या शी असलेले अनाम दृढ नाते ...सगळं तुमच्या शब्दांत दिसंत राहिलं..

अप्रतिम लेखन! सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि त्या मुलाबद्दल जरा धास्तीही वाटली. काय करत असेल तो आता? देव न करो, पण त्याला अश्या कामात पुढे कुठे दुखापत झाली नसेल ना? अशी कामं करणार्‍यांबद्दल बर्‍याचदा कौतुकमिश्रित धास्ती आणि वाईटही वाटतं. ही कामं कुणी सहसा आवडीनं करत नाही. असो. ते सर्व सुखरूप असोत ही सदिच्छा!

अवांतर, "ह्या जातीच्या कुत्र्यांना विशेषकरुन शिकारीसाठी नेलं जातं म्हणजे शिकाऱ्यानी पक्षी टिपला की ही कुत्री अचूक माग काढत तिथपर्यंत जातात आणि ती शिकार उचलून आणतात" >> डाउंटन अ‍ॅबीमध्ये हा प्रकार पाहिला.