©अज्ञातवासी! - भाग १८ - मुमताज!

Submitted by अज्ञातवासी on 12 December, 2020 - 06:58

भाग १७ - https://www.maayboli.com/node/77421

पुढील भाग पुढच्या शनिवारी रात्री ९ वाजता

आणि अप्पाने सांगण्यास सुरुवात केली...
पुढे....
----------------------
एक मोठा टेबल. त्याभोवती अनेक माणसे बसलेली.
"बाहेर माणसं थांबलीत अण्णा."
"थांबू दे."
"अण्णा, तरीही."
"वारसदार निवडायचाय आमचा. घाई करून चालणार नाही."
"ज्ञानेश्वर, मुंबई काय म्हणते? कधी नाशिकलाही चक्कर टाकावी."
"अण्णा, जमत नाही..."
अण्णा हसले.
"ज्ञाना, जमत नाही की जमवून घेत नाही. जाऊदे, पोरं कशी आहेत? चांगली शिकलीत. आता नोकरी की धंदा करायचा म्हणतात?"
"अण्णा मोठा इंग्लंडला चाललाय. लहान मात्र धंदा करायचा म्हणतोय."
"कशाचा?"
"गाड्यांचा..."
"बिनधास्त कर. भांडवल आमच्याकडून घे. जितकं भांडवल लागेल तितकं गुंतव. कोणती रे ती गाडी आपल्याला आणायची होती..."
"लेक्सस आण्णा."
"हा तीच. बंदूक त्या कस्टमवाल्याच्या खनपटीला लावावी लागली तेव्हा मिळाली. घरचंच दुकान असलेलं बरं."
"जी अण्णा."
"तात्या, आमच्या भगिनी काय म्हणतात?"
"आठवण काढते तुमची अण्णा."
"तात्या, नगरच्या विधानसभेची तयारी करा. किती दिवस फक्त दूधसाखरेवर जगणार? मागून लोक पुढे चाललेत."
"अण्णा, यावेळी जकपकडून तिकीट नक्की आहे."
"जनता कल्याण पक्ष? तो येड्यागबळ्यांचा पक्ष? ते हाफ चड्डीवालेच ना?"
तात्या अस्वस्थ झाला.
"भिकेचे डोहाळे लागल्यासारखे करू नका. थांबा. आम्ही गृहमंत्र्यांशी बोलतो. यावेळी इंडियन काँग्रेस कडूनच निवडणूक लढवायची? कळलं?"
"जी अण्णा. तुम्ही म्हणाल तसं."
"राऊत, तुम्ही तर आमदार. समजवा यांना."
"आम्ही काय सांगणार अण्णा, यांचा घोडा जकपकडेच उधळतोय."
"आता नाही उधळणार. अण्णांनी शब्द दिलाय." तात्या लाचारपणे म्हणाला.
"बरं. आता सुरू करू." अण्णा म्हणाले. "स्वर्गवासी निवृत्तीअण्णांनी आमच्या खांद्यावर हे शिवधनुष्य दिलं. कसं चालवायचं, काय करायचं, कळत नव्हतं. त्यातच दामुअण्णा गेले. एकाकी आणि एकटेपणा काय असतो, ते मला कळलं.
मात्र सगळ्यांची साथ लाभत गेली. उत्कर्ष बघितला, आणि जीवघेणा संघर्षही. महादेवाच्या कृपेने आमची सरशी झाली, पण मोल फार द्यावं लागलं. आमचा संपूर्ण परिवार संपायची वेळ आली होती, पण शेवटी, जो शेलारांना संपवायला येईल, तोच आधी संपेन...
तर, आता हे शिवधनुष्य कुणा दुसऱ्याकडे द्यायची वेळ आली आहे. आमचा परिवार कायम मोठा आहे, पण निर्णय घ्यायचा अधिकार फक्त शेलारांनाच आहे. म्हणून ज्ञानेश्वर तू इथे आहे. रखमाबाई नाहीत, पण तात्या आहे. शंकरराव आहेत. आमची लाडकी अस्मिता आहे, बाकीची मंडळी आहेतच. पण अधिकार फक्त शेलारांच्या नातेवाईकांनाच...
कुणाला काही नावे सुचवायची आहेत का? नसल्यास मी सुचवतो."
बोलता बोलताच अण्णांनी बंदूक काढून टेबलावर ठेवली.
उपस्थितांमध्ये एक अस्वस्थता पसरली.
बराच वेळ अण्णा सगळ्यांकडे निरखून बघत होते.
"ठीक आहे, जर कुणाची काही हरकत नसेल, तर आम्ही नाव सुचवतो.
...राजशेखर शेलार...
या नावाला कुणाची हरकत?"
थोड्यावेळ कुणीही हात वर केला नाही. मात्र त्यानंतर लागोपाठ चार हात वर झाले.
तात्या जाधव...
शंकरराव राऊत...
ज्ञानेश्वर शेलार...
आणि अस्मिता राणे...
अण्णा हसले.
"बाकीच्यांच एकवेळ समजून घेऊ शकतो, असतील काही कारणं. पण अस्मिता तू? तू भावाला का विरोध करतेय?"
"कारण नेहमी मुलांनीच खुर्चीवर बसायला हवं असा नियम का?"
"अस्मिता, जर राणेंमध्ये किंवा तुझ्यातही गादी चालवण्याची धमक असती, तर आधीच प्रश्न मिटला असता. पण लग्नानंतर काहीही कर्तृत्व न दाखवता सरळ खुर्ची मागायची हा कुठला न्याय?"
"मग आमच्या वाट्याचं काय?"
"वाटणी नाही चालू इथे..." अण्णा गरजले. "आणि मला वाटण्या करणारा नकोय, तर सर्व बांधून ठेवणारा हवा आहे कळलं?"
कुणी काहीही बोललं नाही.
"ठीक आहे. अस्मिता शेलार या नावाला कुणाचा पाठींबा?"
कुणीही हात वर केला नाही.
"ठीक आहे, अस्मिता, तुझा आता राजशेखर शेलार या नावाला पाठींबा आहे?"
"पर्याय नाहीये अण्णा माझ्यासमोर."
"मी कोणालाही आजपर्यंत पर्याय दिलेले नाहीयेत. ठीक आहे. तात्या, तुझं काय?"
"अण्णा, मी काय म्हणतो..." तात्या घुटमळला.
"पटकन बोल काय म्हणतो."
"अप्पाच्या नावाचा विचार..."
"अच्छा. शंकरराव, ज्ञानेश्वर, तुमच्याही मनात अप्पाच ना?"
दोघांनीही माना डोलावल्या.
"म्हणून ही बंदूक काढली होती. जो कुणी अप्पाच्या नावाने वाद घालू लागला, त्याला जागीच उडवायचा..."
आता मात्र सगळे भीतीने गारठले.
"अण्णा अण्णा, जा, इब्राहिमबरोबर सौदा करा. अण्णा, माघार घ्या. अण्णा, आपण दूर निघून जाऊ. हल्ला झाला तेव्हा बायकोला घेऊन दूरवर लपून बसला होता. नेहमी फक्त माघारीची भाषा...
शंकरराव, तुमचा जावई फक्त माझा मुलगा आहे म्हणून वाचलाय, नाहीतर आतापर्यंत मीच त्याला गोळी घातली असती. वाड्यावर हल्ला झाला होता, आठवतंय ना?"
"हो." शंकरराव म्हणाले.
"कारण वाड्यावर कधी कमीत कमी सुरक्षा असणार आहे, कधी सगळे गाफील असणार आहेत. कधी कुठे वार करायचा ही सगळी माहिती इब्राहिमच्या माणसांना कुणी पुरवली होती, माहितीये?"
शंकरराव गप्पच बसले.
"अप्पाने..."
सगळे चकितच झाले.
"जिवंत ठेऊ ना शंकरराव त्याला?" अण्णा शंकररावांकडे बघत म्हणाले.
"राजशेखर शेलार या नावाला कुणाचा विरोध???"
अण्णांनी आता बंदूक हातात घेतली.
कुणीही विरोध केला नाही.
"चला, एकमताने निवड झाली." अण्णा हसले. "पेढे वाटा रे." आणि ते बाहेर निघाले.
◆◆◆◆◆
"अप्पा, तुम्ही एवढा मोठा गेम खेळायला निघाला होतात?"
"हो, अण्णांचं दादावरच प्रेम काही कमी होत नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी इब्राहिमजवळ जाण्यापेक्षा दुसरा मार्ग नव्हता."
"तरीही तुम्ही जिवंत कसे?"
"माझ्यामुळे." सौदामिनीबाई म्हणाल्या.
"म्हणजे?"
"एक गर्भार बाई दादासाहेबाच्या पायावर लोळली, नवऱ्याच्या जीवदानासाठी."
"आई?"
"हो रे. अपमान सोसायची सवय झालीये आता, आणि शेवटी जीवदान पदरात पडलं."
"त्यादिवशी दोन सगळ्यात वाईट घटना घडल्या संग्राम. एक... दादा खुर्चीवर बसला... आणि दोन... मुमताज पहिल्यांदा वाड्यावर आली..."
"अहो... गप्प एकदम गप्प." सौदामिनीबाईंच्या चेहऱ्यावर वेदना जाणवली.
अप्पा भानावर आले.
"नाही. संग्राम... कळलं ना, खुर्चीवर बसणं इतकं सोपं का नाही. अण्णांमध्ये धमक होती, बंदुकीच्या बळावर सगळ्यांना गार करायची."
"धमक माझ्यामध्येही आहे अप्पा..."
"हो... पण गार करण्याची ताकद नाही."
"म्हणजे?"
"काही नाही. मला थोडा वेळ दे. सगळं जुळवून आणतो. मग तुला कुणीही थांबवू शकणार नाही. कळलं?"
संग्रामने संभ्रमाने मान डोलावली.
◆◆◆◆◆
वाड्यावर जल्लोष सुरू होता. गुलाल उधळला जात होता...
"दादासाहेब." शेखावतने दादासाहेबांना हाक मारली.
"शेखावत, अरे तू अजून कोरडा कसा, घे." दादासाहेबांनी शेखावतवर गुलाल उडवला.
"आतातर दररोज जल्लोष करेन दादासाहेब." शेखावत म्हणाला.
"बाकीची मंडळी कुठे आहेत?"
"असतील इथेच नाचत. एवढ्या गर्दीत शोधणार कुठं?"
"तेही बरोबर आहे म्हणा."
तेवढ्यात खान दादासाहेबांजवळ आला, व त्याने त्यांच्या कानात काहीतरी सांगितले.
दादासाहेबांची चर्या गंभीर झाली.
"शेखावत, चल, जरा अर्जंट काम आलंय, मी येतो."
"ठीक दादासाहेब."
दादासाहेब आत गेले. त्यांनी चेहरा स्वच्छ धुतला व ते कोपऱ्यावरच्या खोलीत गेले.
आत दोन बाया बसल्या होत्या. त्यापैकी एका बाईने साडी घातली होती. तर दुसऱ्या बाईने बुरखा घातला होता. तिचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता.
"जुलैलाबाई, भीती नाही वाटली?"
"नाही. सगळं हिरावून गेल्यावर कशाची भीती?" जुलैला कोरडेपणाने म्हणाली.
"युद्ध होतं ते जुलैलाबाई."
"आता संपलय ना दादासाहेब की इब्राहिमच्या सगळ्या नातेवाईकांचा कत्लेआम करूनच संपेल?"
"ज्यांनी आमच्याविरुद्ध कारवाया केल्या, ते सगळे जातील."
"पण निष्पाप लोक?"
"कोण निष्पाप जुलैलाबाई. अजूनही आमच्या निष्पाप माणसांच्या आरोळ्या ऐकू येतात आम्हाला."
"दादासाहेब. मी फक्त माझ्या मुलासाठी जीवदान मागायला आले आहे."
"कोण? तुमचा मुलगा?"
"हो, माझा आणि इब्राहिमसाहेबांचा मुलगा. दादासाहेब, त्याला कधीही या मार्गाविषयी माहिती नव्हती. त्याला जीवदान द्या."
"पण जर तो आमच्या मार्गात आला तर?"
"कधीही नाही. खुदाकसम! कधीही नाही... फक्त तुम्ही इब्राहीमचा मुलगा म्हणून सूड घेऊ नका."
दादासाहेब हसले.
"वचन दिलं जुलैलाबाई. सूडाची आग त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही."
"धन्यवाद!" जुलैलाने हात जोडले.
"या बाई कोण?" दादासाहेबांनी विचारले.
"माझी मैत्रीण." जुलैला गडबडीने म्हणाली. "चला येते मी."
दोघीजणी उठल्या व निघाल्या.
जाता जाता बुरखा घातलेल्या स्त्रीने दादासाहेबांकडे वळून बघितले...
निळे, भेदक डोळे. अंगार असलेले डोळे. समोरच्याला राख करणारे डोळे दादासाहेबांवर रोखले गेले.
...दादासाहेबांचासुद्धा थरकाप उडाला...
...आणि पुढच्याच क्षणी ते संमोहन केल्यासारखे त्या डोळ्यांच्या प्रेमात पडले...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच उत्कंठावर्धक भाग....!
ईतक्या उशिरा भाग टाकल्यामुळे अगदी आधाश्यासारखा वाचला आणि भाग कधी संपला हेच कळाले नाही!
भाग संपल्यानंतरही काय प्रतिसाद देऊ हेच सुचत नव्हते ईतके गुंतायला झाले!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत....

मस्तच!!
खूप उत्कंठावर्धक झालायं भाग...

@गार्गी - धन्यवाद. तरी हा भाग बराच मोठा लिहिता आला Happy
@पद्म - धन्यवाद।
@च्यवनप्राश - धन्यवाद!
@आसा - धन्यवाद
@रुपाली - धन्यवाद!