कारल्याचे काप (फक्त मिठाचे)

Submitted by DJ.. on 22 December, 2020 - 04:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कारलं आवडीनं खाणार्‍या गटातला असल्याने अन लहाणपणापासुनच घरी कारल्याच्या विविध भाज्या खात आल्याने 'कारलं कडु असतं' हे माझ्या गावी आजिबातच नव्हतं अन नाही. आजवर केवळ आई, आजी, काकी, मावशी, मामी यांच्याच नव्हे तर अगदी शेजारी-पाजारी, टीम मेट्स यांच्या हातचे कारल्याचे विविध पद्धतींनी बनवलेले कितीतरी प्रकार खाल्ले. प्रत्येक भाजीत नाविन्य होतं. कुणी कारल्याचा कडवटपणा(म्हणे..!) घालवण्यासाठी त्याला कापुन मीठ ठाकुन तिरप्या ताटात ठेऊन पीळ-पीळ-पीळलं होतं तर कुणी त्याला चाळणीत ठेऊन उकडुन घेतलेलं. कुणी-कुणी कारलं शिजवताना साखर, गुळाचा लेप दिलेला. कुणी चिंचेच्या जोडीने त्याला आंबुस बनवलेलं तर कुणी सुकं पण अगदी मसालेदार बनवलं होतं. कुणी-कुणी कारल्याचा रस्साही बनवला होता. या सर्व वेगवेगळ्या प्रकारांनी बनवलेलं कारलं मला आवडतंच.

कारल्याला विविध प्रकारे अन वेगवेगळ्या मसाल्यात बनवता येते पण मला भावतं ते कारलं फक्त मीठातलं Bw . घरी कारलं बनवताना मी आईला नाहीतर 'ही'ला आधीच ते जास्त बनवायला सांगतो अन त्यासाठी त्या दोघी कारल्याला थोड्या तेलात परतुन घेत असतात तेव्हाच त्यातील निम्मं कारलं 'तसंच' खाण्यासाठी काढुन ठेवायला संगतो.

तर कारल्याची अगदी चवदार आणि कुठल्याही मसाल्याची/चिंच/गुळा/साखरेची गळाभेट होण्याआधीच फक्त मीठाशी जी गट्टी जमते ती अनुभवण्यासाठी खाली दिलेले मोजकेच जिन्नस लागतात.

१. एक-दोन (आकारानुसार) ताजी कारली (मी शक्यतो पांढरट-पोपटी रंगाची लांबट कारली घेतो). ताजी या साठी की ताज्या कारल्यांचे पातळ काप होतात.
२. चवीनुसार मीठ
३. परतण्यासाठी पळीभर (किटलीची) तेल.

बस्स... एवढंच Bw

क्रमवार पाककृती: 

१. आधी कारली स्वच्छ धुवून पुसुन आपल्या आवडीप्रमाणे गोल-गोल चकत्यांच्या स्वरुपात किंवा लांबट आकारात विळीने काप करुन घ्यावेत (विळीने छान पातळसे काप करता येतात.. आपणाला कारल्याचे काप करायचे आहेत बोटाचे नाहीत हे लक्षात ठेऊन विळीने काप करावेत.. अन्यथा चाकु, कटर वापरावे..!).
२. कापलेल्या कापांवर जरा जास्तच मीठ भुरभुरावे अन ताटलीमधे ठेऊन ताटलीखाली कशाचेतरी टेकण लाऊन ती तिरपी राहील अशी ठेवावी.
३. १०-१५ मिनिटांत ताटलीच्या उतरत्या बाजुला जे पाणी जमा होईल ते टाकुन द्यावे अन काप हातानेच थोडे दाबुन त्यातील उरलेले पाणी काढुन टाकावे. हे सर्व करत असताना एकीकडे गॅस ऑन करुन तवा (हिंडॅलिअम किंवा लोखंडाचा असावा.. टेस्ट येते Wink ) सणसणीत तापवुन घ्यावा.
४. तापलेल्या तव्यात पळीभर(किटलीतील) तेल टाकुन ते उलथण्याने तव्याच्या सर्व बाजुला लावुन घ्यावे (मी सांडशीने तवा धरुन तो गप्पकन गोल फिरवुन सर्व तव्याला एकसारखे तेल लावतो.. पण हे जरा जपुन करावे लागते नाहीतर कारलं शेकण्या ऐवजी पोट शेकुन मिळण्याची १००% खात्री..!)
५. तवा आधीच सणसणीत तापलेला असल्याने आता गॅस मंद करुन तेलही लग्गेच तापुन त्याचा धूर व्हायच्या आत पिळलेले कारले शिताफिने त्यात टाकावे. चर्र..र्र..र्र...र्र असा आवाज आला की लागलीच त्यावर झाकणी उपडी करुन ठेवावी.
६. इकडे-तिकडे बघेपर्यंत तो चर्र..र्र..र्र...र्र आवाज थांबला की झाकणी हळुच उघडुन उलथण्याने कारल्याचे काप वर-खाली करत तेल सर्व बाजुंनी लागले आहे याची खात्री करावी.
७. आता आपणाला कारल्याचा एकेक काप सुट्टा-सुट्टा करुन ते सर्व तवाभरुन पसरुन ठेवायचे आहेत.. यात १-२ मिनिटं जातील.
८. हे सर्व काप ४-५ मिनिटं मंद गॅसवर झाकणीखाली शेकुन पुन्हा एकदा उलटे करुन ४-५ मिनिटं ठेवावेत (जाळून कोळसा करु नयेत..!) अन हे स्वादिष्ट काप खाण्यासाठी तयार...!!! Bw

या प्रकारे कारल्याचा अंगभूत स्वाद चाखता येतो. असं बनवलेलं कारलं मी एकटाच पुर्ण संपवु शकतो Bw . परंतु ज्यांना हे अपुर्ण वाटेल त्यांनी तेल तापवताना त्यात जिरे-मोहरी-ठेचलेला लसूण-हळद-हिंगाचीफोडणी देऊन पण करता येते (मग त्याच फोडणीत काप टाकण्या आधी चिरलेला कांदा, तिखट, चिंच, गूळ, खोबरं/शेंगदाणे, सलाणा, फलाणा... अशी यादी वाढवत शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर असं हव्या त्या प्रकारचं कारलंही बनवता येतं..) .

वाढणी/प्रमाण: 
एकट्याने गट्टम करु शकता.. पण आसपास कुणी असेल अन त्यांना खावंसं वाटलं तर टेस्ट साठी थोडं देऊ शकता... :)
अधिक टिपा: 

कारली ताजीच घ्यावी अन चिरलेल्या कापांवर मीठ टाकल्यानंतर ते काप मोडेपर्यंत म्हणजे जोरात दाबुन पिळु नये.

हा प्रकार नुसताच खाण्यासाठी आहे म्हणुन नंतर करताना मीठ टाकलं नाही. चपाती/भाकरीसोबत खावासा वाटला तर वरुन थोडे मीठ भुरभुरावे.

हे असे मीठाचे कारले काप लहान मुले आवडीने खातात यावर माझा पुर्ण विश्वास आहे. त्यांना लहानपणापासुनच आवड निर्माण झाली तर ते मोठेपणी विविध प्रकारे बनवलेल्या कारल्याच्या भाज्या आवडीने खातील.. अन बनवतील. Bw

माहितीचा स्रोत: 
आई किंवा 'ही' स्वयंपाक करताना किचन मधे होत असलेल्या फेर्‍या :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

मस्त लिहिलिए रेसिपी Happy
कारलं माझ्या पण आवडीचे.. नुसत्या मिठाचे नाही केले कधी... आता करून पाहिन..

छान रेसिपी...

कारले तब्येतीला चांगले ( मोठी चुलत भावंडे सांगायची) म्हणून लहानपणी वाडीत लावलेल्या कारल्याच्या मांडवावरून पिकलेली कारली ( आतला लाल गर) मी आवडीने खायचे.
आताही कारले आवडतेच.

देवकी, किशोर, मानव, मृणाली, रुपाली, मनिम्याऊ,जाई. सर्वांना मनापासुन धन्यवाद Bw

@ रुपाली तै, तुम्ही पिकलेल्या कारल्याबद्दल लिहिलं आहे ते वाचुन थ्रिल्लिंग वाटलं.. त्याचा गोडसर वास येतो पण मी कधी खाल्लं नाही.. एकदा नक्की ट्राय करेन. Bw

अरे वा, मस्त.

नक्की करणार. फक्त मीठाचे काप नव्हते केले..
कापाकापी करताना माझी पण पसंती विळीलाच.

>> चिरलेल्या कापांवर मीठ टाकल्यानंतर ते काप मोडेपर्यंत पिळु नये.

तुम्ही असं लिहिलंय टीपेत, ते नीट नाही कळालं...
मीठ टाकून ठेवल्यावर काप मोडतात का काही वेळानं? म्हणजे तोवर थांबायच का?

@ वावे, ब्लॅककॅट अन अर्पणा तै धन्यवाद.

@ अर्पणा तै, अहो, मीठ टाकुन ठेवलेल्या चकत्यांना पाणी सुटल्यावर त्या हलक्या हाताने दाबा/पिळा म्हणजे ते काप तुटणार्/मोडणार नाहीत या अर्थाने मी लिहिलं होतं. एडिट केलं आहे आता Bw

पाककृती लेखन आवडले. मला कारले आवडते. कारल्याच्या काचऱ्या तव्यावर परततानाच बऱ्याचश्या गट्टम करते.
१०-१५ मिनिटांत ताटलीच्या उतरत्या बाजुला जे पाणी जमा होईल ते टाकुन द्यावे अन काप हातानेच थोडे दाबुन त्यातील उरलेले पाणी काढुन टाकावे.>>>>> पण असे केल्याने कारल्याची मूळ कडवटपणा आणि त्यातली जीवनसत्वे त्या पाण्यावाटे कमी होतात असे मला वाटते. कारल्याचे पाणी, बिया टाकून द्यावेसे वाटत नाही.

वरील पाकृ च्या स्टेप 3 नंतर चकत्या कडकडीत उन्हात वाळवून साठवून ठेवता येतील.
ऐनवेळी पटकन तळून वर तिखट, चाट मसाला भुरभुरून एकदम मस्त लागेल

@ सियोना धन्स..! Bw

@ सोनालि : बिया मी पण टाकुन देत नाही.. पण मिठाचं पाणी टाकुन दिलं नाही तर ते खूप खारट होईल म्हणुन फेकून द्यायचे. अन्यथा जीवनसत्त्वांसाठी खाणार असू तर काप तसेच तेलात परतायचे अन वरून मीठ भुरभुरायचे.

@ अर्पणा तै : भन्नाट आयडिया Bw