ए ऍसिडिटी,तुमने भी बहोत कुछ सिखाया - भाग ५ (अंतिम )

Submitted by me_rucha on 3 December, 2020 - 06:25

तर अशी ही 2014 च्या शेवटी सुरु झालेली,2015-16 मध्ये उग्र रूप धारण केलेली,2017 मध्ये सहनीय आणि 2018च्या शेवटाला शेवटाकडे गेलेली ऍसिडिटी. मी त्यावर 2018मध्ये विजय मिळवला असं म्हणायला हरकत नाही.
ह्या सगळ्यातून मी काय शिकले?
जेव्हा मी ह्या सगळ्या आजाराचा मागोवा घेतला तेव्हा ह्या सगळ्यात मी कुठे चुकले ते बघितलं.
सगळ्यात आधी मी माझी छोट्या छोट्या गोष्टीवरून होणारी चिडचिड बंद केली.
आज भांड्याच्या मावशी नाही आल्या झाली चिडचिड, अचानक लाईट गेले चिडचिड झाली, आज पाणी आलं नाही किंवा अचानक गेलं परत चिडचिड म्हणजे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून माझी चिडचिड व्हायची.माझ्या नवऱ्यानी मला प्रकर्षानी ह्या गोष्टीची जाणीव करून दिली. पण हा काही एका दिवसात घडणार बदल नव्हता. त्यासाठी खूप जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले.

दुसरं म्हणजे कुणाच्याही वाईट वागण्याचं, किंवा एकंदरीतच कोणतीही गोष्ट मनाला लावून घेणं, स्वतः च्या मनाला त्रास करून घेणं मी बंद केलं किंवा कमी केलं. माझा मुलगा अगदी लहान असताना त्याची काळजी घेण्यासाठी माझ्या सहवासात काही लोकं आली. त्या सगळ्यांचे मी हौशेने वाढदिवस साजरे केले नव्हे त्यांच्यासाठी केक आणणं, त्यांच्यासाठी 5-6हजाराचे गिफ्ट आणण, त्यांच्या आवडीचं जेवण बनवणं हे सगळं केलं आणि माझ्या वाढदिवशी साधं गिफ्ट सोडा पण सुहास्य वदनानी एक विशही मला त्यांच्याकडून मिळालं नाही.
माझा मुलगा डायरिया मुळे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता (वय सव्वा वर्षे तेव्हा ) तेव्हा ही लोक इथे पुण्यात नव्हती पण आल्यानंतर साधं त्याला काय झालं होतं किंवा तुम्ही दोघांनी (मी आणि माझ्या नवऱ्याने ) सगळं कसं मॅनेज केलं हे विचारण्याची साधी तसदीही घेतली नाही. पण आम्ही त्याची ऑपेरेशन पार पाडली. त्यांच्या तब्येती जपल्या. त्याच्यावर भार नको म्हणून घरात सर्व कामासाठी बायका ठेवल्या. पण ह्या बदल्यात मला जी वागणूक मिळाली ती केवळ आणि केवळ संतापजनक नाही तर मन :स्वास्थ्य बिघडवणारी होती. ह्या सगळ्याचा मला नको तेवढा त्रास झाला. खरंतर मी त्यांच्याप्रती जे काही केलं ते मला वाटलं म्हणून केलं पण त्या बदल्यात त्यांनीकाही कराव ही अपेक्षा केली इथेच माझं चुकल.ह्या सगळ्या नंतर मी let go करायला शिकले. खरंतर मी इतरांना म्हणजे नातेवाईक किंवा इतर मंडळी ह्यांना जी वागणूक देते तशी वागणूक मला अभावानेच मिळते. पण आता मी ह्या गोष्टी सोडून द्यायला शिकलीय.

माझ्या ह्या आजारासंबंधी मी बऱयाच डॉक्टरांना भेटले. गॅस्ट्रोनटॉलॉजिस, न्यूरॉलॉजिस्ट इथपासून प्रथितयश होमीओपॅथस पर्यंत . आणि त्या सगळ्यांशी चर्चा केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की माझा आजार हा शारीरिक नसून मानसिक आहे. काही जवळच्या लोकांचे ( लौकिक अर्थानी जवळच्या ) वागणे फार खटकले. माझ्या आय टी करिअर मध्येही ऑफिस पॉलिटिक्स चा अनुभव फार संतापजनक होता.
त्यात मुलगा 15-20 दिवस बरे गेले की आजारी पडायचा. त्याची आजारपण काढण्यात होणारी जागरण त्यात दुसऱ्या दिवशी गाठलेलं ऑफिस. ह्या सगळयांचा एकत्रित परिणाम म्हणजे माझी ऍसिडिटी होती. त्यानंतर असे कित्येक प्रसंग आले त्यात मला अगदी माझ्या जवळच्या लोकांचं वागण फार दुखवून गेलं पण आताशा मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं बंद केलंय. खरंतर आम्ही मीनेचे लोकं स्वभावाने फार हळवे असतो पण असो.
आणि तिसरं म्हणजे मी अगदी छोट्या गोष्टीतही आनंद मानायला शिकले. आधी असं होतं की सबंध दिवस माझ्या मनासारखा गेला तरच मी खूष त्यातली एखादीही गोष्ट मनाविरुद्ध झाली की झाला माझा मूड ऑफ. पण कोण्या एकेकाळी जिला पाणीही पचत नव्हते अशी मी," आज सकाळी उठून मी आल्याचा चहा घेत माझ्या टेरेस मध्ये बसून सूर्योदय पाहतीय " ह्याचाही आनंद घ्यायला शिकले. खरंतर आयुष्य हे ह्या छोट्या छोट्या क्षणांनीच सुंदर बनत. तुम्ही सुखी राहण्यासाठी तुमच्या आयुष्यात काहीतरी extravagent किंवा out of the world घडलं पाहिजे असं नाही. छोट्या गोष्टीही मोठा आनंद देऊ शकतात फक्त तो तुम्हाला शोधता आला पाहिजे.

खरंतर आजही माझ्यावर खाण्यापिण्यावर काही निर्बंध आहेत. म्हणजे मला वडापाव आवडला म्हणून मी दोन किंवा तीन खाऊ शकतं नाही एकच खावा लागतो किंवा बासुंदी आवडली म्हणून मी 2-3 वाट्या ओरपत नाही एकच वाटी खाते. पण मी त्यात समाधानी आहे. आणि ह्या साठी लागणार मनावरचा ताबा मी मिळवला आहे.

ह्या 5-6 वर्षात प्रकृती अस्वास्थ्यामुळे बऱयाच गोष्टी करता आल्या नाहीत. पण आता मी त्या करतीय. मला की बोर्ड (वाद्य )शिकायची इच्छा होती ज्याचा मी नुकताच क्लास लावला आहे. मी नियमित ध्यान, योगा आणि फिरण्याचा व्यायाम घेते. आणि कुठल्याही आणि कितीही बिकट परिस्थितीत मन :स्वस्थ ढळू न देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. अजून बऱ्याच इच्छा आकांक्षा बाकी आहेत बरंच काही करायचं आहे. शेवटी एवढंच म्हणेन की,

हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले.

समाप्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला नवल वाटले नाही.अशा प्रकारे आढळलेल्या तुम्ही तिसर्‍या आहात.मीच पहिली,पण माझे त्रास उलट्या नसून वेगळे होते.आम्च्या फॅ.डॉ.नी मला कसले टेन्शन आहे हे दुसर्‍या खेपेस विचारले होते.

तुमच्या लेखाच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या भागात,तुमचा हा प्रकार सायकोसोमॅटिक आहे का असे विचारणारही होते.पण माझ्या छोट्या अनुभवावरुन इतका मोठा घास घेणे योग्य वाटले नाही.असो.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

सगळे भाग वाचले.
प्रतिसाद आताच देतोय.
भयानक त्रास सहन केलात. आता पूर्ण उतार पडो
हा मनोकायिक विकार आहे हे नक्की केव्हा आणि कसं कळलं?
त्याचं मूळ कशात आहे, हे कसं शोधलं?

Happy हा भाग खूप आवडला. आपण आस्थेने कुणाचं काही करतो तर ज्यांचा स्वभाव खुसपटं काढण्याचा असतो त्यांना खुसपटंच दिसत राहतात. सोडून द्या म्हणणे सोपे असते पण व्यवहारात आपल्या तब्बेतीवर लक्ष, बाकी झूठ असे वागणे फार अवघड असते. शाब्बास आहे तुमची - फक्त बर्‍या झाल्या म्हणून नाही तर इथे लिहीले म्हणूनही... अवघड काम होतं...

छान. मानसीक ताण तणावामुळे ऍसिटीडी, अपचन होते हे ऐकुन आहे पण ते एवढ्या प्रचंड प्रमाणात आणि तेही सतत, सलग याची कल्पना नव्हती. आणि ती तुम्ही मनावर नियंत्रण मिळवून एवढ्या नियंत्रणात आणली हे खुप प्रशंसनीय आहे.
पूर्ण बरे होण्यास शुभेच्छा.

खूप खूप रिलेट झाले हे. ... गेलेय या सगळ्यातून. तब्येतीची खूप वाट लागली. पण ज्यांचामुळे हा त्रास झाला त्यांना साधी दखल सुद्धा घ्यावी वाटली नाही. तुमची किती तळमळ झाली असेल हे मी समजू शकते. बर्‍याच मैत्रिणींच्या बाबतीत पण हे पाहिले आहे.
या बाबतीत आपण जितके लवकर मानसिक स्तरावर " detach" होऊ तितके आपले पुढील आयुष्य आणि तब्येत चांगली राहते. - स्वानुभव. ..
आता पुढच्या रोजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा.

सगळे भाग वाचले
या भागातील सकारात्मक दृष्टिकोन विशेष विशेष भावला
शुभेच्छा..!

जब तक एण्ड अच्छा ना हो तब तक समझो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ! Happy

शुभेच्छा तुम्हाला हेच निरोगी आयुष्याचे दिवस कायम राहण्यासाठी... Happy

आणि हो,
जमल्यास या भागाच्या सुरुवातीला गेल्या चारही भागांची लिंक द्या.

हा भाग खूपच छान लिहिला आहे. तुमच्या त्रासची फक्त कल्पना करुन मन शहारते. मी ऍसिटीडीचा अनुभव घेतला नाही कधी पण मानसिक तणाव खूप सहन केला आहे.

तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडून निरोगी आणि हसरे आयुष्य जगताय याचे समाधान वाटले.

तुम्हाला पूर्ण बरे होण्यास शुभेच्छा !
होमिओपॅथी वाल्या डॉक्टर नी मानसिक ताण तणावाचा संबंध कसा शोधला ? कि तो संबंध तुम्हालाच समजला ? अलोपथी च्या डॉक्टर नी ही शक्यता विचारात घेतली नाही का ?

हा मनोकायिक विकार आहे हे नक्की केव्हा आणि कसं कळलं?
त्याचं मूळ कशात आहे, हे कसं शोधलं?>>+१

गोष्टी सोडून देणे, छोट्या गोष्टीतला आनंद, नियमित ध्यान, योगा आणि फिरण्याचा व्यायाम आणि कुठल्याही / कितीही बिकट परिस्थितीत मन:स्वस्थ ढळू न देण्याचा पुरेपूर प्रयत्न>>>> योग्यच करत आहात. या आजारातून लवकरच पूर्ण बरे व्हाल ही सदिच्छा.

कोणतीही गोष्ट मनाला लाऊन न घेणे फार अवघड असते. तसेच जवळच्या लोकांशी अंतरराखून वागणेही.
तसे प्रसंग आलेच तर रागावणे, आपल्याला काय पटले नाही ते समोरच्याला सांगणे, कश्याचे वाईट वाटले तेही कळवणे आणि माफ करणे जेणेकरून आपल्या मनात काही साचायला नको.

गेले काही महिने एक जवळची नातेवाईक अल्सेरेटिक कोलायटीस ने त्रस्त आहे. औषधोपचार चालू आहेत. त्यावेळी मानसिक काही कारण असू शकेल असे वाटले नव्हते. पण अशात (३-४ महिने) तिला जबडा फिक्स होणे, दात एकमेकांना घासणे असा त्रास होतोय. दातांचा आवाज होत नाही पण ते आपोआप फिक्स होतात एका पोझिशन मध्ये. डेंटिस्ट ने हे स्ट्रेस मूळे असेल, मानसिक आहे असे सांगितले. सध्या तर तिचा हा त्रास प्रचंड वाढलाय. जबडा आणि दात दुखतात खूप.
आत्ता आम्हाला वाटतेय कदाचित तिच्या पोटाच्या विकारामागे पण हाच स्ट्रेस असू शकेल. दोन्ही त्रास याच वर्षी सुरू झालेत.

हा भाग खूप आवडला आणि पटला देखील.
स्वतः च्या चुका शोधून स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा आवडला.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!

हा भाग आवडला. आता एकदम व्यवस्थित वाटत असेल ना?
सगळ्याचा मनाशी कुठेतरी संबंध असतो हे खरेच आहे.

even I had moderate trouble of acidity
Dr advised me , to
Have 7 hours sleep
No stress

And with these 2 things, I am feeling better

सगळे भाग वाचून काढले. छान लिहिले आहे तुम्ही. मानसिक तणावचा थेट शरीरावर किती परिणाम होतो हे खूप छान रीतीने समजावलेत

आणि तिसरं म्हणजे मी अगदी छोट्या गोष्टीतही आनंद मानायला शिकले. आधी असं होतं की सबंध दिवस माझ्या मनासारखा गेला तरच मी खूष त्यातली एखादीही गोष्ट मनाविरुद्ध झाली की झाला माझा मूड ऑफ. >>>> खूपच खर आहे.

<<< दुसरं म्हणजे कुणाच्याही वाईट वागण्याचं, किंवा एकंदरीतच कोणतीही गोष्ट मनाला लावून घेणं, स्वतः च्या मनाला त्रास करून घेणं मी बंद केलं किंवा कमी केलं. >>>> हो , ह्याने खूपच फरक पडतो. काही मूर्ख लोक असतात , त्यांच्या वागण्याचा त्रास करून घेतला नाही पाहिजे Happy

हा अनुभव शेअर केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. Happy
माझे वडिल आनि आता मी आम्ही दोघे ही ह्या व्याधी मुळे त्रस्त आहोए. पण त्याचे मुळ क्कारण पित्त प्रकृती आहे. थोडे खाणे नियंत्रणात ठेवले कि मग दिवस बरे जातात. मानसिक स्वा स्थाअचा सल्ला डॉक ने दिलाच आहे.

माझे अगदी उलटे म्हणणे आहे... तुमचे पित्त आता शमल्यामुळेच ; न चिडणे, सोडून देणे , अपेक्षा नठेवता माफ करणे , प्रत्येक गोष्टी त आनंद दिसणे , वगैरे सगळं आता तुम्ही करू शकत आहात...
वरकरणी अजिबात पटणार नाही ...पण हेच सत्य आहे...

माझे अगदी उलटे म्हणणे आहे... तुमचे पित्त आता शमल्यामुळेच ; न चिडणे, सोडून देणे , अपेक्षा नठेवता माफ करणे , प्रत्येक गोष्टी त आनंद दिसणे , वगैरे सगळं आता तुम्ही करू शकत आहात... >> मला सुद्धा ह्यात थोडे तथ्य वाटत आहे. कदाचित दोन्हीहि गोष्टींचा एकत्रित परिणाम असावा ...

मला नवल वाटले नाही.
तुमचा हा प्रकार सायकोसोमटिक आहे का असे विचारणार होते

devkee +११ मलाही असेच वाटले.

तुम्हाला तुमच्या त्रासावर उपाय मिळाला हे वाचून बरे वाटले. हा अनुभव इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

मलाही ॲसिडीटीचा त्रास आहे आणि माझ्या मेव्हण्याला तर तो अतिप्रमाणात असल्याने खूप अपेक्षेने तुमची लेखमाला वाचली.
बरेच जण होमिओपॅथी ला नावे ठेवतात त्यापैकी मी पण एक आहे, माझे मत चुकीचे आहे कि काय अशी शंका चौथा भाग वाचून आली होती. पण शेवटी यासगळ्याचा संबंध तुम्ही मानसिक ताण/अवस्थेशी जोडलेला पाहून होमिओपॅथी हा प्लासिबो इफेक्टच असल्याचे माझे मत आणखीन ठाम झाले आहे Happy
कृ.ह.घ्या. शेवटी कशानी पडला हे महत्वाचे नसून फरक पडला हे महत्वाचे आहे. खूप त्रास सहन केलात आपण, आता बऱ्या आहात हे वाचून खूप बरे वाटले.

हा आजार शारीरिक नसून मानसिक आहे हे समजायला बराच काळ गेला. हे समजण्यासाठी दोन गोष्टींची मदत झाली एकतर माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते त्यामुळे गॅस स्ट्रॉंटेरोलॉजिस्ट चा रोल तिकडेच संपला होता आणि त्यांनी मला न्यूरॉलॉजिस्ट ला रेफर केलं. तिकडे त्यांनी मला मानसिक तणावातून हे झालं आहेह्या निष्कर्षाप्रत आणून सोडलं आणि माझ्या नर्व्हस सिस्टिम ला शांत करण्याचे काही बेसिक व्यायामप्रकार सांगितले. त्यानंतर जेव्हा मी होमीओपॅथ ला भेटले तेव्हा माझी पहिली व्हिजिट दोन तास चालली. माझी हिस्टरी घेताना त्यांनी ह्यातल्या बर्याचश्या गोष्टी उलगडल्या.
पण फक्त अँटासिड्स, अँटिडिप्रेसंट्स किंवा फॉर दॅट मॅटर होमिओपॅथीक पिल्स घेऊन थांबणारं हे प्रकरण नाही हे माझ्या लक्षात आलं. ऍलोपॅथी मेडिसिन बद्दल तर "रोगापेक्षा इलाज भयंकर "असं होऊन बसलं होतं.
म्हणून त्यापुढचा शोध आत्मपरीक्षण करून आणि डॉक्टरांशी चर्चा करून माझा मीच घेतलं. कुठलेही मेडिसिन हे तात्पुरते इलाज करतात त्या व्याधीला मुळातून घालवण्यासाठी रूट कॉझ शोधन हे पेशंट चं काम आहे. नाहीतर आयुष्यभर त्या गोळया आणि त्या गोळ्यातून होणारे साईड इफेक्ट्स ह्या दुष्टचक्रात मी अडकले असते.

ह्या सगळ्यात "मी किती ग्रेट किंवा मी फार भारी " हे सांगण्याचा प्रश्न येतोच कुठे?
मी तर म्हणेन कॅन्सर पेशंट किंवा हार्ट अटॅक आलेल्या लोकांचे अनुभव वाचले तर माझा अनुभव फार वाटणार नाही कारण त्या आजारामध्ये तुम्ही जन्म आणि मृत्युंच्या उंबराठ्यावर उभे असता. आपले प्रियजन आपल्याला परत दिसतील की नाही भेटतील की नाही ह्या विचारांनी ते ऑपेरेशन थीअटर मध्ये जातात.
माझ्या केस मध्ये मला पाणी जात नव्हता त्या काळात मी सलाईन घेऊन का होईना पण जगले.
खरंतर ह्या लेखात लिहिण्याच्या ओघात हा पॉईंट राहायचा राहून.
जेव्हा मला प्रश्न पडायचा की "हे सगळं माझ्यासोबततच का? " असा प्रश्न विचारून स्वतः ला त्रास करून घ्यायचे तेव्हा मी कॅन्सर सारख्या अनुभवातून गेलेल्याचे अनुभव वाचले त्यात सायली राजध्यक्ष ह्याच्या पोस्ट्स चा उल्लेख करावासा वाटतो. एवढं कशाला माझ्या वडिलांना त्यांच्या वयाच्या पन्नासव्या वर्षी हार्ट अटॅक आणि त्या नंतर झालेल बायपास ह्याचा अनुभव घेतला (वडील आता हयात नाहीत.ते काही महिन्यापूर्वी गेले.).ह्या सगळ्यापुढे माझा आजार नक्कीच मोठा नाही तसं माझं म्हणणही नाही.
फक्त ह्या सगळ्या आजारपणातून माझ्या मध्ये झालेल्या अंतरबाह्य बदलाचा प्रवास इथे मांडावासा वाटला.
सर्व सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्यांचे मनापासून आभार.!

Me_rucha, तुम्हाला उपाय सापडला आणि आता तुम्ही बऱ्या आहात हे वाचून छान वाटलं!

Me_rucha, मनमोकळेपणे तुमचे अनुभव मांडल्याबद्दल धन्यवाद. मनाची शक्ती खूप मोठी असते. तुम्ही बऱ्या आहात हे वाचून छान वाटलं. काळजी घ्या.

Pages