बांद्रा वेस्ट - २०

Submitted by मिलिंद महांगडे on 2 December, 2020 - 00:58

बांद्रा वेस्ट - २०

                 दोघे तिसऱ्या  मजल्यावर पोहोचले .  आता समोरच्या चार बंद दरवाज्यांपैकी नाझनीनचं  घर कोणतं ह्या विचारात दोघे असतानाच त्यांच्या डाव्या बाजूचा दरवाजा उघडला . दोघांनी तिकडे पाहिलं . समोर जी उभी आहे ती कोणी स्वर्ग लोकीची अप्सरा आहे ? कि कोणी सिनेमात काम करणारी  हिरोईन  आहे असा  प्रश्न दोघांना  पडला .   कोरलेल्या भुवया ,  सरळ पण चिंचोळं  नाक , गुलाबी ओठ ,  हे सगळं  जागच्या जागी एका गोऱ्या  वर्णाच्या चेहऱ्यात  व्यवस्थित बसवलेलं  आढळलं  .  तिच्या केसापासून ते हनुवटीपर्यंत भाग काळ्या कापडात गुंडाळलेला  होता . दोघे तसेच डोळे विस्फारून तिच्याकडे पाहू लागले .  ते पाहून ती लगेच आत जाऊ लागली . ती दरवाजा बंद करणार तेवढ्यात , 

“ एक्सक्यूज मी …  कँन यु गाईड   मी टु  मिस  नाझनीन स  हाऊस   ??   ” रॉड्रिकच्या इंग्लिश मधल्या प्रश्नाने योग्य तो परिणाम साधला . बंद होत असलेलं  दार तिथेच थांबलं . ती त्यांच्याकडे निरखून पाहू लागली . थोडा वेळ मधे  शांतता पसरली .  तिच्याकडून कसलीही प्रतिक्रिया येइना . “ क्या आप मुझे बता  सकती है  कि मिस नाझनीन कहां  रेहती है  ?  ” पुन्हा त्याच अदबीत  त्याने विचारलं  . 

“ जी ,  यही  पे रेहती है  ।  आपको क्या काम है  आपा  से  ?  ” 

 रॉड्रिक  काही बोलणार एवढ्यात  मॉन्ट्याने मध्ये तोंड घातलं  , “ तू उसकी बेहेन है  क्या  ? ” आणि तो तिच्याकडे डोळे विस्फारून पाहू लागला . 

“ हां . ” तिने हलकासा मानेला झटका  दिला .  ते सुद्धा  पाहण्यालायक  होतं  . 

“ अक्चुली , हमारा एक काम था   उनसे  । वो है  घर में   ? ” 

तिने थोडा विचार केला . “ ठीक है  , आईये । ”

दोघे आत आले . 

“ बैठीये ”  तिने  सोफ्याकडे बोट दाखवत म्हटले . दोघेही  त्यावर बसले . तो सोफा इतका मऊ होता की ते बसल्या बसल्या आत रुतले गेले.  मग पुन्हा नीट सावरुन बसले. त्यांना बसवुन नाझनीनची बहीण आत गेली. दोघेही आजुबाजुला न्याहाळु लागले. घर नेहमीसारखंच होतं.  बसायला सोफा,  खुर्च्या, समोर टीपॉय,  त्यावर प्लॅस्टीकच्या रंगीबेरंगी फुलाची एक फुलदाणी ठेवलेली होती. खिडक्यांना योग्य रंगसंगतीचे पडदे लावलेले होते. भिंतीवर मक्का-मदिनेचा फोटो होता.   समोरच्या भिंतीवर मोठा एल सी डी लावलेला.  त्यावर नेहमीच्या अगणित सास-बहु च्या सिरीयलस् पैकी    कोणती तरी एक सिरीयल लागलेली. त्यातली खाष्ट सासु बिचाऱ्या सुनेवर बरीच चिडलेली दिसत होती. का?  तर तिने सकाळच्या नाष्ट्यात मीठ जास्त घातलं होतं म्हणुन ...! एखाद्या बारबालेचं घर म्हणजे  फिल्म मधे दाखवतात तसं एकदम झगरीमगरी,  चकमकीत, कोठ्यासारखं असेल ही मॉन्ट्याची अपेक्षा पार धुळीला मिळाली. बराच वेळ ते दोघे त्या हॉल मधे इकडे तिकडे बघत बसले, पण आतुन कोणी यायचं चिन्ह दिसेना. अचानक आतल्या खोलीतुन जोरजोरात खोकण्याचा आवाज आला,  कोणीतरी म्हातारं माणुस खोकावं तसा.  आतुन कुणा मुलीचा बोलण्याचा अस्पष्ट आवाज येत होता. थोड्या वेळाने आत गेलेली नाझनीनची बहीण बाहेर आली.  तिच्या हातात पाण्याचे दोन ग्लास असलेला ट्रे होता. दोघेही पाणी प्यायले. मॉन्ट्याला तर खुपच तहान लागली होती.  त्याने एका झटक्यात ग्लास रिकामा केला. 

" आपा आ रही है ।  " एवढ बोलुन ती पुन्हा आत गेली.  बराच वेळ पुन्हा कोणीच येईना. ते दोघे समोर लागलेली ती सिरीयल असहाय्यपणे पहात होते.  आता त्यामधे सिरीयल मधली बहु आणि तिच्या नवऱ्याचा म्हणजेच हिरोचा बेडरुम मधला सिन सुरु झाला. हिरोने तिला जवळ ओढले . मॉन्ट्या इकडे चुळबुळ करु लागला. तो बहुदा रिमोट शोधत असावा. एका बारबालेच्या घरी टिव्हीवर असलं प्रणयदृश्य दिसणं म्हणजे आगीत तेल पडण्यासारखं होतं. तो सिन चालु असतानाच आतुन नाझनीन बाहेर आली.  अप्रतीम लावण्य ! घारे डोळे,  त्यावर तलवारीसारख्या कोरलेल्या भुवया. ओठांच्या वर उजव्या बाजुला असलेला  एक बारीकसा तिळ लक्ष वेधुन घेत होता. आधीच्या सर्व लेखकांच्या लिखाणात आलेल्या स्त्रीच्या ओठांच्या बाबतीतल्या साऱ्या उपमा फिक्या पडाव्या असे तिचे ओठ होते. बाजीरावाच्या मस्तानीचा गळा नितळसुंदर असावा की हिचा असा दोघांना प्रश्न पडला.  दोघेही काही क्षण तिच्याकडे पहातच राहीले. ह्या असल्या नजरांची तिला सवय असावी.  तीनेही थोडा वेळ त्यांना तसं पाहु दिलं. 

" आपको मुजसे क्या काम है...?  "  दुरुन कुठल्यातरी पोकळीतुन मंजुळ कोकीळेचा आवाज कानी पडावा तसं काहीसं त्यांना वाटलं.  तिच्या प्रश्नाने दोघेही भानावर आले.  

" अं ... हां  .... आपसेही काम था. " रॉड्रीक कसाबसा म्हणाला. 

" कहीये....? " पुन्हा कानांना गुदगुल्या झाल्या.  

" ऍक्च्युली क्या है की हम लोग एक चीज ढुंड रहें है  । ... कल रात आप वो करीष्मा बार में थी ना  ? " दुसरं वाक्य रॉड्रीकने जरा अडखळंत विचारलं. तिने काही वेळ दोघांकडे निरखुन पाहीलं.  कदाचित ती काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होती. 

" मेरे खयालसे आप दोनो भी थे वहां पे ...!  देखीये आप अगर उस शौकत की तरफदारी करने आये है तो प्लीज जाईये ।  मुझे  उस्से कुछ लेनादेना नही ।  " ती थोडी रागातच म्हणाली. 

" अरे नही.  आपको कुछ मिसअंडस्टँडींग हुई है ।  हम तो उसे जानते भी नही ।  हमारा अलगही काम है आपसे  । " 

" लेकीन कल तो आप लोग उसीके साथ थे। " तिला अजुनही खरं वाटेना.  

" ऍक्च्युली,  कल रात जो हुआ,  उसका हमसे कोई संबंध नही। हमे शौकत का भाई वहां लेके आया था ।   हम तो एक दस रुपय के नोट के लिये आए थे,   जो उस शोकत के पास थी।  वो नोट मेरे डॅड ने मुझे दी थी । वो उनकी आखरी निशानी थी ।    " तिचा आणखी काहीतरी गैरसमज होऊ नये म्हणुन रॉड्रीकने एकदम सरळ सगळं सांगुन टाकलं.  

" हां.... तो ..?  " 

" हम लोग वो नोट ढुंढ ही रहे थे तभी वहां पे कुछ गुंडे आए और वो पैसे उठाकर उन्होने फेंक दिये । उसीमे मेरी वो दस रुपय की नोट थी। जब हमे ले जा रहे थे तब मैने वो नोट देखी ।  " 

" ठिक है.  फिर...?  " 

" आज सुबह वो नोट ढुंडने के लिये हम जब बार गय़े तब एक वेटरने आपका नाम बताया., की कल रात वो सभी नोट आपने उठा लिये थे।  " 

" वो मुत्तुस्वामी ने बताया होगा.... साला हरामी ...! " ती रागातच म्हणाली.  

" हमने नाम नही पुछा उसका....  आपसे एक रिक्वेस्ट है की वो नोट मुझे दे दिजीये प्लीज.... मै उसके बदले दुसरा नोट देता हुं आपको।  या फिर आपको ज्यादा चाहीय़े तो भी दुंगा,  लेकिन वो मेरे डॅड की आखरी निशानी मुझे लौटाईये प्लीज.... " रॉड्रीक कसनुसं तोंड करीत म्हणाला.  

" कितना देंगे आप मुझे ...?  " ती सरळ रॉड्रीकच्या डोळ्यात डोळे घालुन म्हणाली.  तिच्या असल्या पहाण्याने तर तो तिथेच खलास झाला.  काय नजर होती बाईची ...!  त्याला काही बोलायचं सुचेना .... त्यावर ती जोरात हसत सुटली ." कुछ देनेकी जरुरत नहीं.... मै अभी अपनी पर्स लाती हुं ... आप ढुंढ लेना अपनी नोट ।  " म्हणत ती आत गेली.  दोघांनीही एकमेकांकडे पाहीलं . रॉड्रीकला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.  आता ती नोट त्याच्या हाती लागणार होती ... थोड्याच वेळात तो खुप  श्रीमंत बनणार होता.  त्या नोटेसाठी त्याने काय काय केलं होतं.... त्याची चांगलीच किंमतही त्याला चुकती करावी लागणार होती. पण ती जास्त असली तरी त्याची सगळ्या गोष्टींतुन मुक्तता होणार होती.  आणि उरलेल्या पैशात त्याचं पुढचं आयुष्य मस्त जाणार होतं.  त्याच्या उज्वल भविष्याची स्वप्ने डोळ्यासमोरुन तरळुन जात असतानाच नाझनीन तिची पर्स घेऊन आली .... तिने तिची पर्स उघडली.  

" दस रुपय का नोट था नं...?  " म्हणत तिने तिच्या पर्स मधल्या सगळ्या नोटा काढल्या.  नोटा पाहुन तर दोघांचे डोळेच फिरले... हजार - पाचशेच्या नोटांची बंडलं होती. ती तिने बाजुला ठेवली.   काही शंभरच्या नोटा होत्या . त्याही विलग केल्या.  आता बऱ्याच पन्नास,  वीस आणि दहाच्या नोटा होत्या.  रॉड्रीक आणि मॉन्ट्या एक एक दहाची नोट निरखुन बघत होते... ' कोणत्याही क्षणी ती नोट आपल्या हाती असेल.... ' ह्या विचारानेच रॉड्रीक उत्साहीत झाला होता. परंतु त्या दहा रुपयांच्या नोटेची किंमत चुकती करणं अजुन बाकी होतं. 

क्रमशः

https://kathakadambari.com

माझी अर्धदशक  नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users