यमीचं लग्न!

Submitted by सांज on 26 November, 2020 - 10:52

भाग-१

“यमे, आवर गं लवकर.. पाहुणे अर्ध्या तासात पोचतायत!”

“अहो.. तुम्हाला वेगळं सांगायला हवय का! आणि हे काय? आधी तो बनियन बदला बरं.. शर्ट मधून आतली छिद्र दिसतायत!”

“नलू ताई चार कांदे घ्या चिरायला.. मी पोहे भिजवते.”

सुमन काकूंची प्रचंड धांदल उडालेली होती. त्यांच्या कन्येला, म्हणजेच ‘बीएश्शी फश्ट क्लास’ यमीला पहायला आज मंडळी येणार होती. घरातले सगळेच एकदम जय्यत तयारीत होते. ठेवणीतले पडदे, बेडशीट्स, आभ्रे, पायपुसणं सगळं काही आज बाहेर आलं होतं. पायपुसणं सुद्धा ठेवणीतलं असू शकतं याची कल्पना फक्त मध्यमवर्गीय गृहीणींनाच असते. असो.

यमी उगाचच पुन्हा पुन्हा स्वत:ला आरशात पाहत होती. सगळे आज आपल्याकडे जरा जास्तच लक्ष देतायत म्हणून तिला मजा वाटत होती. एवढ्यात, काहीतरी खूप महत्वाचं काम असल्या सारखं सुलभा काकू तिच्यापाशी आल्या आणि तिला म्हणाल्या,

“हे बघ यमे, तिथे जास्त काहीही बोलायचं नाही. शक्यतो ‘हो’ किंवा ‘नाही’ मध्ये उत्तरं द्यायची. आणि काय-काय येतं विचारल्यावर विणकाम-भरतकाम वगैरे हमखास सांगायचं.. काय?”

“अगं पण काकू, मला येत नाही विणकाम-भरतकाम!”

“यमु अगं, तसं म्हणायची पद्धत असते. तुझी काही कोणी परीक्षा घेणार नाहीये तिथे! आणि लग्ना नंतर म्हणशील तर, तुला ब्लाऊज उसवायलाही वेळ मिळणार नाही.. विणकाम वगैरे खूप लांबची गोष्ट आहे!”

‘काजळाचा ठिपका द्या गं कोणीतरी हिच्या कानामागे’ असं म्हणत सुलभा काकू तिथून गेल्या.

इकडे कांदा चिरता चिरता नलू ताई सुमन काकुंचा अंदाज घेत होत्या,

“तू काही म्हण सुमन, पोरीने नशीब काढलं हो! विठू म्हणत होता माणसं घरंदाज आहेत!”

ते ओळखून सुमन काकू म्हणाल्या,

“हो.. पण आपणही काही कमी नाही. लगेच हुरळून जाऊन चालत नाही नलू ताई, सगळं पाहावं लागतं!”

बाहेर बैठकीत, सुरेश अडकित्त्याने सुपारी कातरत होता. सुरेश म्हणजे यमीचा मोठा भाऊ! बनियन बदलून येऊन पद्माकरराव त्याच्यावर खेकसले,

“चिरंजीव, पाहुण्यांसाठी पण ठेवा थोड्या सुपार्‍या! नंतर दिवसभर पानपुडा तुमच्याच सेवेत राहणार आहे!”

त्यांच्या तिरकस टोमण्याला, स्वत:च्या तिरकस नजरेने उत्तर देत सुरेश तिथून उठला आणि वर्तमानपत्रात तोंड खुपसून बसला.

इकडे इंदु आजी स्वयंपाकघरात येऊन उगाच पुटपुटत होत्या,

“मला मेलीला कशाला हवय चांगलं लुगडं! पण आपलं उगाच चार माणसात पद्मकराचं नाव खराब नको व्हायला!”

“इंदु काकू अहो, काढून ठेवलय तुमचं लुगडं. तुम्हीच देवळात जाऊन बसला होतात. दिंनूच्या खोलीत ठेवलय, घ्या नेसून!”

“असं होय.. तू ठेवतेस हो सुमन सगळीकडे लक्ष. चुलत असून पण सख्ख्या सुनेसारखं करतेस बरं. यमीसाठी नवस बोलायलाच गेले होते मी देवळात!”

एवढ्यात दाराबाहेर गाडीचा हॉर्न वाजला.. आणि कोणीतरी ओरडलं, ‘पाहुणे आले, पाहुणे आले..’

आणि सगळ्यांचीच एकदम धांदल उडाली!

यमीची धडधड वाढली, इंदु आजी गडबडीने लुगडं नेसायला गेल्या. सुमन काकू साडी एकसारखी करून स्वागतासाठी धावल्या.

मंडळी दारातून आत आली. नमस्कार-चमत्कार झाले. अशावेळी जनरली एक संकुचित स्माईल एकमेकांना पास करायची एक पद्धत असते. मोकळेपणाने भेटणं या अशा कार्यक्रमात वर्ज्य असतं! शक्यतो मुलाकडची मंडळी तर अशा स्माईलचा जरा जास्तच उपयोग करतात.

मध्यस्थ असलेल्या खेडकर काकांनी हवा-पाण्याच्या गप्पा सुरू करून मध्यस्थाची भूमिका अगदी चोख पार पाडली.. त्या गप्पा, नंतर रस्ते किती खराब आहेत, प्रवासात किती अडचणी आल्या वगैरे मार्गाने पीक-पाण्यावर येऊन थांबतात!

मुलाकडच्या बायका, आधी घर आणि मग माणसं न्याहाळण्यात मग्न होत्या. समोरच्या पार्टीतल्या बायकांनी नेसलेल्या साड्यांच्या क्वालिटी वरून, लग्नात हे लोक कितपत ‘देऊ’ शकतील याचा अंदाज लावण्याची अचाट बौद्धिक क्षमता त्यांच्या ठायी असते!

सुमन काकू आणि सुलभा काकू पाहुण्यांना पाणी वगैरे देतात. आपण किती सभ्य आणि सुसंस्कृत आहोत असं दाखवण्याचा दोन्ही बाजूंकडून पुरेपूर प्रयत्न चालू असतो.

मुलगा इकडे तिकडे पाहत बसलेला असतो. खरतर आतून तो प्रचंड संकोचलेला असतो.

पद्माकरराव सगळ्यांची ओळख करून देतात. सगळ्यात शेवटी, कोपर्‍यातल्या सुरेश कडे बोट दाखऊन ते म्हणतात,

“हा सुरेश, आमचा दोन नंबरचा मुलगा!”

सुरेश नमस्कार करतो. पलिकडून मुलाचे वडील विचारतात,

“हो का! काय करता आपण?” (ठरलेला प्रश्न)

“मी ‘लिहतो’!” सुरेश उत्तरतो.

‘लिहणे’ म्हणजे ‘चोर्‍या करणे’ कॅटेगरी मधलं काम असल्या सारखं सगळे संशयित नजरेने त्याच्याकडे पाहतात.

“हो का! काय लिहता आपण?” त्यांनी पुढे विचारलं.

सुरेशला अशा प्रश्नांची सवय असते. तो म्हणाला,

“सुचेल ते लिहतो!”

यावर मग ते गप्प बसतात. खरंतर, ‘पोटापाण्यासाठी काय करता’ असं त्यांना पुढे विचारायचं असतं पण तो मोह ते टाळतात!

पोहे खात खात मुलाकडचे स्वत:च्या कुटुंबाची थोरवी गायला लागतात (ब्रॅंड प्रमोशन). मुलाचंही भरपूर कौतुक सुरू असतं. तो बोर्डात आला होता इथपासून त्याच्या ऑफिस मध्ये तोच एकटा कसा हुशार आहे आणि कसं त्याला पुढच्याचं महिन्यात मोठ्ठं प्रमोशन मिळणार आहे इथपर्यंत सगळ्या गोष्टी अगदी रंगवून रंगवून सांगितल्या जातात (प्रॉडक्ट प्रमोशन)! यमीच्या घरचेही काही कमी नसतात. तेही यमीच भरपूर कौतुक करतात. ती ‘बीएश्शी फश्ट क्लास’ असल्याचं ठासून सांगतात!

त्यावर मुलाची आत्या का मामी कुणीतरी खोचकपणे म्हणते,

“आमच्या दिनेशला सगळ्या इंजिनियर मुलीच सांगून येतायत बरका.. खेडकर काकांनी गळ घातलीये म्हटल्यावर पहायला हवी मुलगी म्हणून आलो आम्ही!”

(मॅरेज मार्केट मधल्या नवीन नियमांनुसार, एमबीए/एमएस मुलगा आणि इंजिनियर मुलगी यांना सोडून बाकी तमाम उमेदवार निकृष्ट आणि दुय्यम समजले जातात! असो.)

या सगळ्यात मुलगा अतिशय संकोचून बसलेला असतो, सगळ्यांच्या नजरा फिरून फिरून त्याच्यावरच येत असतात. त्याचं त्या चालू असलेल्या चर्चेत अज्जीबात लक्ष नसतं. आतून मुलगी कधी बाहेर येतेय याची तो वाट पाहत असतो.

यमी आतून कान देऊन सारं ऐकत असते. तिची धडधड आता भलतीच वाढलेली असते. इतक्यात ‘मुलीला बोलवा’ असं फर्मान निघतं.

यमी चहा घेऊन बाहेर येते. एव्हाना लुगडं बदलून इंदु आजीही बाहेर येऊन बसलेल्या असतात. मुलाकडच्यांना चहा देऊन यमी ठरलेल्या जागी येऊन बसते.

एक-दोन मिनिट पिनड्रॉप सायलेन्स असतो. सगळे तिला निरखत असतात. तिची मान खाली. दिनेश, आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही ना हे पाहून यमीला नीट पाहून घेतो.

ती शांतता भंगत मध्यस्थ म्हणतात, “विचारा कोणाला काही विचारायचं असेल तर..”

मग मुलाकडचे एक अनुभवी वयस्कर गृहस्थ विचारतात,

“नाव काय मुली तुझं?” (अतिशय निरर्थक प्रश्न!)

“यामिनी पद्माकरराव भाटकर”

मग कोणीतरी शिक्षण, ‘छंद’ वगैरे वगैरे विचारतं. यमी तिला पढवलेली उत्तरं देते.

मग मुलाची आई तिचा ठेवणीतला प्रश्न काढते,

“स्वयंपाकाची आवड आहे का?” (पूर्वी ‘येतो का’ विचारायचे, आता ‘आवड आहे का’ असं विचारतात. एवढच काय ते आधुनिकीकरण)

त्यावर यमी, “हो” म्हणते.

“अगदी पुरणा-वरणाचा स्वयंपाकही छान करते बरं आमची यमी!” सुलभा काकू जोड देतात.

त्यावर ‘हो का! कळेलच ते’ अशा अर्थाच तेच संकुचित स्माईल मुलाची आई पुन्हा देते.

आणि मग आता ते मगाशीचे अनुभवी गृहस्थ दिनेशला म्हणतात,

“तू विचार काही विचारायचं असेल तर..”

दिनेश आधी नाही-नाही म्हणतो.. त्याला खरतर यमी आवडलेली असते. विचारायचे म्हणून एक-दोन प्रश्न तो विचारतो.. यमी खाली मान घालूनच जुजबी उत्तरं देते.

“ठिकाय तर मग” असं म्हणत सगळे एकमेकांकडे पाहत ‘झालं’ असं दर्शवतात. सुमन काकू यमीला आत घेऊन येतात. यमी हुश्श! म्हणते. आणि अशाप्रकारे आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या निर्णयामागची प्रक्रिया यमीपुरती तरी संपलेली असते!

इकडे बाहेर पाच-दहा मिंटात पान-सुपारी घेऊन मुलाकडची मंडळी जायला निघतात. जाताना, ‘कळवतो आम्ही निरोप’ असं म्हणतात. सगळं पसंत जरी पडलेलं असलं तरी एक-दोन दिवस घेऊन निरोप कळवायची आपली एक पद्धत असते. थोडा भाव खाण्याचाही हेतु त्यामागे असतो म्हणा!

पाहुणे गेल्यावर दिवसभर मग घरात सगळीकडे चर्चा सुरू होते..

‘मुलाची आई जरा शिष्ट च वाटली बुवा!’ इति सुलभा काकू..

‘पण घरंदाज वाटली हो माणसं!’ इंदु आजी मत नोंदवतात.

‘यमीला पण विचारा कोणीतरी कसं वाटलं ते..’ सुरेश म्हणतो.

त्यावर ‘आधी तिकडचा निरोप तरी येऊ देत, मुलगा तसा चांगला वाटला!’ पद्माकरराव विषयाला विराम देतात.

इकडे यमीला काही कळत नसतं तिला काय वाटतय ते.. ती आपली टि.व्ही. लाऊन ‘राजा राणी ची गं जोडी’ पाहत बसते. या सिरियल्स पाहून जगातले सगळे नवरे त्यातल्या हिरोंसारखे आयडियल असतात असा तिचा ठाम समज झालेला असतो.

आणि मग दोन दिवसांनी भाटकरांच्या घरचा फोन खणाणतो. सगळे या फोन ची वाट च पाहत असतात. फोनवरून खेडकर काका मुलाकडच्यांचा होकार असल्याचं कळवतात. बोला-चालीची बैठक झाल्यावर पुढच्या गोष्टी ठरवू म्हणतात.. पद्माकर रावांना प्रचंड आनंद होतो. ते सगळ्यांना बोलाऊन ही बातमी देतात. यमी लाजून आत निघून जाते..

आणि मग संपूर्ण भाटकर फॅमिली बैठकीच्या आणि येऊ घातलेल्या लग्नाच्या तयारीला लागते..

...क्रमश:

- सांज https://chaafa.blogspot.com/2020/07/blog-post_6.html

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“यमु अगं, तसं म्हणायची पद्धत असते. तुझी काही कोणी परीक्षा घेणार नाहीये तिथे! आणि लग्ना नंतर म्हणशील तर, तुला ब्लाऊज उसवायलाही वेळ मिळणार नाही.. विणकाम वगैरे खूप लांबची गोष्ट आहे!”>>>>>> Rofl

सुरुवात छान आहे, पुढचे येऊ द्या.

मस्त सुरुवात!

मॅरेज मार्केट मधल्या नवीन नियमांनुसार, एमबीए/एमएस मुलगा >>>>
हे वाचून आत्मा सुखावला Lol

छान लिहिलंय. क्रमशः आहे तर पटापत येउद्या पुढचे भाग.

“यमु अगं, तसं म्हणायची पद्धत असते. तुझी काही कोणी परीक्षा घेणार नाहीये तिथे! आणि लग्ना नंतर म्हणशील तर, तुला ब्लाऊज उसवायलाही वेळ मिळणार नाही.. विणकाम वगैरे खूप लांबची गोष्ट आहे!”>>>>>> Lol

च्रप्स, रश्मी, अज्ञातवासी, सस्मित.. खूप धन्यवाद Happy पुढचा भाग लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे!