बांद्रा वेस्ट- १७  

Submitted by मिलिंद महांगडे on 22 November, 2020 - 02:22

बांद्रा वेस्ट- १७  

रॉड्रीक आणि मॉन्ट्या  घरी आले तेव्हा रात्रीचे साडे तीन वाजून गेले होते . 

“ रॉडी  हे काय आहे बाबा  ? कसा काय  झाला  हे ? काय बोललास त्याला ?   कसली जादूची कांडी  फिरवलीस  ? ”  मॉन्ट्या  अविश्वासाने त्याच्याकडे पाहतच राहिला . कारण एवढं  सगळं  झाल्यावरही  त्यांना घरी जायची परवानगी त्या क्रूर इन्स्पेक्टर जामसंडेने दिली होती .  आणि ह्याचंच कोडं मॉन्ट्याला पडलं  होतं . 

“ फक्त तीन दिवस , त्यानंतर जर सगळं  व्यवस्थित झालं  तर आपण सुटू शकू . ” रॉड्रीक  हताशपणे बोलत होता . 

“ तीन दिवस , म्हणजे ? मला नाय कल्ला . ”

“ यार मी एक जुगार खेळलोय , ब्लाइण्ड  गेम   ”

“ कसला ब्लाइण्ड  गेम   ? मला नीट  सांग  ”

“ मी त्या इन्स्पेक्टरला म्हणालो कि  माझ्याकडे  नाईन्टी  नाइन क्रोरस आहेत . जर त्याने आपल्याला ह्या प्रकरणातून सोडवलं  तर मी त्याला त्यातले टेन  पर्सेंट देईन . मला हे सगळं  सांगण्यावाचून दुसरा कोणताच ऑप्शन दिसत नव्हता .    ”

“ काय ?  रॉडी  तू मूर्ख आहेस का ?   नाईन्टी  नाइन क्रोरसचे टेन  पर्सेंट किती होतात तुला कळतंय का ? जवळपास दहा करोड रुपये !  एवढे पैसे तू  त्याला देणार ? अरे टेन  पर्सेंट त्याला मिळाले तर तो त्याची ती सरकारी नोकरी सोडून देईल . येडा झालास काय ? ” मॉन्ट्या वैतागून बोलू लागला . 

“ नाही . खरं  तर मी फाईव पर्सेंट बोलून गेलो , पण तो काही तयार झाला नाही . शेवटी  टेन पर्सेंट वर कसाबसा तयार झाला . ”  रॉड्रीक नकारार्थी मान हलवत म्हणाला . 

“ बरोबर , तू येड्यासारखा बोलून गेलास . त्याने लगेच हिशोब लावला असेल . आणि एवढे पैसे इतक्या सहज मिळतात म्हटल्यावर त्याने आणखी  ताणून पाहीलं असेल . आणि तू लगेच तयारही झालास  ?  तू खरच येडपट आहेस . आणि  आता हे दहा करोड  कुठून आणणार  ?  ” 

“ त्यासाठीच तर तीन दिवसांची मुदत त्याने दिलीय . मी त्याला जे घडलं  ते  सगळं खरं  खरं  सांगितलं . फक्त ती नोट मला मिळाली आहे . आणि मी ती सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे असं  खोटंच सांगितलं .  आमच्या दुर्दैवाने आम्ही ह्यात अडकलोय हेही सांगितलं . तीन दिवसात काहीतरी करावं  लागेल ,  तोपर्यंत ते कोकेनचं  पाकीट त्याच्याकडेच राहील . आपण जर यात फेल झालो तर जे आज होणार  होतं  तेच आणखी तीन दिवसांनी होईल . ”

“ अरे , पागल मानसा , तू काय केलंय  तुझं  तुला तरी कळतंय का ? तू त्याला दहा करोड देणार असं  कबुल करून आलायस , तुझं  डोकं ठिकाणावर आहे का  ? ” मॉन्ट्याचं  डोकंच  फिरलं  ते ऐकून … 

“ अरे हे केलं  नसतं  तर आता आपण लॉक  अप मध्ये असतो ”

“ अरे पण हि कसली कमीटमेंट देऊन बसलास  ? ” मॉन्ट्या डोक्याला हात लावून मटकन मागच्या खुर्चीत बसला . 

“  त्याला कशाला खोटं  सांगितलंस की  आपल्याला ती नोट मिळालीय  म्हणून ? आता त्याला कळलं  कि आपली कसली हालत करेल तो … ! मघाशी  जी बसलीय ती  चांगलीच लक्षात आहे माझ्या . ! ” मॉन्ट्या  गाल चोळत म्हणाला . 

“ हो रे ,  यु आर राईट .  पण त्यावेळी मला जे सुचलं  ते मी केलं . ” रॉड्रिक  कसनुसं  तोंड करून म्हणाला . 

“ म्हणजे तुझ म्हणणं आहे कि आपल्याला ह्या तीन दिवसात ती तुझी दहा रुपयांची नोट  शोधली पाहिजे . ” 

“ येस  , राईट . दुसरा ऑप्शन नाही .   ” 

“आणि नाही मिळाली तर ? ”

“ तर तुला सांगितलं  ना कि जे आज होणार  होतं  तेच आणखी तीन दिवसांनी होईल .  ”

“ म्हणजे काहीच फायदा नाही . आपण जिथे आहोत तिथेच आहोत. फक्त तीन दिवसांनी जेल मध्ये जाणार आहोत. ” मॉन्ट्या पुन्हा  डोक्याला हात लावून बसला . 

“ लुक मॉन्ट्या , आय डोन्ट थिंक कि हेच बरोबर आहे . पण तुझ्या लक्षात येतंय का ? कि आपल्याला ह्या सगळ्या झंझटीतून वाचण्यासाठी एक चान्स मिळाला आहे . टेक इट  पॉझीटीवली .” त्यावर मॉन्ट्या काही बोलला नाही .  तो तसाच डोकं धरून शांतपणे विचार करु  लागला . 

“  हे बघ जर मी हे बोललो नसतो तर त्याने सरळ आपल्याला पोलिस स्टेशनला नेलं  असतं . आणि एकदा का आपल्या अगेन्स्ट  क्राइम  रजिस्टर झाला कि मघाशी तू म्हणालास तसं  देव जरी वरून खाली आला तरी आपल्याला वाचवू शकणार नव्हता . त्यामुळे जे काही करायचं  होतं  ते त्याच वेळी . आणि   म्हणून मी हा एक चान्स घेतला . एटलिस्ट आपल्याकडे  एक रस्ता अजून बाकी आहे .  ” रॉड्रीक त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत होता . मॉन्ट्या अजूनही विचारातच होता . 

“ पण मला एक कळत नाही  , कि त्याने तुझ्यावर विश्वास कसा ठेवला ? ” 

“ मी त्याला पहिलीच ऑफर देऊन टाकली  , आणि एवढी मोठी अमाउंट ऐकल्यावर जामसंडेचे डोळेच फिरले . तो ह्या गोष्टीला नकार देऊच शकला नाही . ”

“ आपण ह्या तीन दिवसात पळून जाऊ असा त्याने विचार केला नसेल का ? ”

“  हो , तसा विचार त्याने मला बोलूनही दाखवला , पण मी त्याला शब्द दिला कि आम्ही पळून जाणार नाही . ”

“आणि त्याने विश्वास ठेवला ? ” 

“हो . कसा काय मला माहित नाही . पण तो ह्या सगळ्या गोष्टीला तयार झाला हे नक्की . ”

“ रॉडी , तुला वाटतं कि  जामसंडे इतका मूर्ख असेल . तो आपल्याला असा फ्री कसा काय सोडेल  ? ह्यात नक्कीच काहीतरी झोल आहे बॉस  ! ”  मॉन्ट्याच्या व्यवहारी मनाला हे सगळं  पटत नव्हतं .   ‘  एकतर एवढा सबळ पुरावा , आणि मुद्देमालासहित पकडलेले आरोपी असेच सोडून द्यायला जामसंडे सारखा अनुभवी इन्स्पेक्टर कसा काय तयार होईल ? आणि कोणत्या आधारावर त्याने आपल्याला सोडून दिले ? आणि समजा पैशाच्या लालसेपायी जरी त्याने हा निर्णय घेतला असेल तरी तो आपल्याला इतकं  स्वातंत्र्य कसे काय देऊ शकतो ? ‘ मॉन्ट्या विचारात पडला . 

“ व्हॉट  हॅपन्ड मॉन्ट्या ? कसला विचार करतोयस ?  ” रॉड्रीक विचारू लागला . 

“ मला अजुनही  हे पटत नाही  ”

“ ओके , मग तुला काय म्हणायचं  आहे  ? ”

"त्याने आपल्यावर नक्कीच पाळत ठेवली असेल.  तो काही कच्च्या गुरुचा चेला नाही. "

"  आय डोन्ट थिंक की  तो सतत आपल्यावर पाळत ठेवील .  तुझ्या अजुन लक्षात येत नाही. ठिक आहे आपण आता उद्याच बोलु मला जाम झोप येतेय.  " 

" आयला, माझी झोप उडालीय इथं. काय करु काय कळत नाही. " मॉन्ट्या काळजीने इकडे तिकडे फिरु लागला. 

" माझं ऐक,  आता झोप. सकाळ व्हायला फक्त दोनच तास बाकी आहेत.  आपल्याला अजुन बरीच कामं करायचीत. आराम करुन घे. " म्हणत म्हणत रॉड्रीक बिछान्यावर आडवा झालादेखील. ' काय म्हणायचं ह्या माणसाला.?  स्वतःचं आयुष्य एवढं पणाला लागलंय तरी ह्या माणसाला शांत झोप कशी लागु शकते.?  ' विचार करता करता मॉन्ट्या समोरच्या आरामखुर्चीत बसला. दिवसभर आणि रात्रभराच्या थकव्यामुळे त्याचा केव्हा डोळा लागला त्याचा त्यालाही कळला नाही. 

क्रमशः

लडाखचे  प्रवासवर्णन

Ladakh Bike Trip – दुचाकी लडाखायण 1

माझी अर्धदशक  नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users