प्रजोत्पादनासाठी

Submitted by निशिकांत on 19 November, 2020 - 11:00

(एका ज्वलंत विषयावर आगळी वेगळी कविता.)

सुडौल तरुणी गरीब, पुसते खळगी भरण्यासाठी
गर्भाशय का हवे कुणाला प्रजोत्पादनासाठी?

जाहिरात वाचुनी जोडपी कैक चौकशा करती
सरोगेट मम्मी होण्याचा भाव काय? ते पुसती
हवी उच्चभ्रू वांझ स्त्रियांना दीपक अथवा पणती
निपुत्रिकाचे जीवन जगणे नको नको त्या म्हणती
अपत्त्य होऊ शकणार्‍या ललनांचे तर्क निराळे
"नकोच आई होणे" बांधा, उभार जपण्यासाठी
गर्भाशय का हवे कुणाला प्रजोत्पादनासाठी?

ठरलेल्या सौद्याची राशी फक्त प्रेरणा होती
व्यापाराचे सूत्र पाळले, कुठे भावना नव्हती
व्यभिचाराची टोच कशाला? जिथे वासना नव्हती
यशस्वीपणे केली क्रत्रिम गर्भधारणा होती
काळ चालला हळू केवढा! तगमग शिगेस गेली
दोन्ही बाजू वाट पाहती बाळ जन्मण्यासाठी
गर्भाशय का हवे कुणाला प्रजोत्पादनासाठी?

जशी घडी येऊन ठेपली तसा जन्मला कान्हा
व्हायचे तसे सर्व जाहले, समाधान सर्वांना
सौदा होता जरी जन्मण्यामागे इवला तान्हा
जन्म घातलेल्या आईला फुटू लागला पान्हा
घालमेल जाहली सुरू अन् उशीर झाला कळण्या
नाळ कापली बाळाशी, नेहमी काचण्यासाठी
गर्भाशय का हवे कुणाला प्रजोत्पादनासाठी?

बाळ दिले व्यवहार संपला, तगमग सांज सकाळी
दु:ख लागले हात धुवोनी मागे तिन्ही त्रिकाळी
चूक जाहली सरोगसीची, करती सर्व टवाळी
तिने खरे तर दु:ख घेतले लिहून अपुल्या भाळी
पुसेल का ती पुन्हा कधी लोकांना पैशासाठी?
गर्भाशय का हवे कुणाला प्रजोत्पादनासाठी?

सौंदर्याचा ध्यास जयांना अन् त्या निपुत्रिकांनी
पैशाच्या जोरावर असते केलेली मनमानी
बालगृहातिल बाळ शोधुनी एखादे अनवाणी
दत्तक घेउन म्हणता येती अंगाईची गाणी
माफक आहे किती अपेक्षा सुजाण लोकांकडुनी!
निराधार एका बाळाचे भाग्य खुलवण्यासाठी
गर्भाशय का हवे कुणाला प्रजोत्पादनासाठी?

निसिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users