"रंग जोगिया"

Submitted by ज्येष्ठागौरी on 15 November, 2020 - 21:30

रंग जोगिया...
गुलजारांनी अंगूर नावाचा सिनेमा काढला होता आठवतंय?शेक्सपिअरच्या कॉमेडी ऑफ एरर्स वर आधारित! त्याचं बरंच शूटिंग पुण्यात ,कोरेगाव पार्कात झालं होतं.तेंव्हा गुलजारजी आणि माझे वडिल बापू भरपूर वेळा भेटायचे.आणि त्या सिनेमाची आठवण किंवा sovenier म्हणून गुलजारांनी एक पेन स्टँड तयार केला होता.त्याच्यावर देवेन वर्मा आणि संजीव कुमार यांनी caricatures होती. त्याचा रंग केशरी होता.गुलजारांनी बापूंना एक सेट दिला बापू म्हणाले "अरे वा किती छान भगवा रंग!" त्यावर म्हणाले "मैं इसको जोगिया रंग कहता हूँ| बापू एकदम चकित झाले, जोगिया रंग! नंतर बापू त्यांच्या केशरी स्वेटरला जोगिया स्वेटर म्हणायला लागले.
किती सुंदर गोष्ट आहे.जोग म्हणजे संन्यास आणि तो रंग म्हणजे जोगिया!
आज हे लिहितानासुदधा मला आतून इतकं विशेष वेगळं वाटतंय.गुलजारजी ही तीच व्यक्ति आहे ज्यांनी बंदिनी सिनेमातलं "मोरा गोरा अंग लई ले मोहे शाम रंग दई दे।
छूप जाऊंगी रात ही में
मोहे पी का संग दई दे।
लिहिलं होतं! शाम रंग~अहाहा!पण हे जोगिया प्रकरण फारच विलक्षण आहे.मराठीत संन्यस्त किंवा व्रतस्थ!व्रतस्थ रंग!संन्यासी लोक जो रंग पसंत करतात तो रंग..
रंगांना धर्म जोडले गेले आहेत आणि भावनाही जोडलेल्या आहेत. चित्रकला शिकताना ऐकलंय की जांभळा हा राजवैभवाचा रंग,लाल रक्ताचा, म्हणून जपून वापरायचा, हिरवा सृजनाचा, निळा सागर खोलीचा, गुलाबी प्रेमाचा. दुःखाचा काळा किंवा कधी पांढराही..पण व्रतस्थेचा जोगिया रंग ही कल्पना फार आवडून गेली.
व्रतस्थ ह्या शब्दात काहीतरी विशेष अशी स्वस्थता आहे,स्थिरता आहे असं वाटतं.कशाच्या तरी परे असलेली एक वेगळीच भावना असावी असं वाटतं.
ग दि माडगूळकर यांची जोगिया कविता खूप पूर्वी वाचली तेंव्हा नीटशी समजली नाही पण नंतर काही वर्षांनी पुन्हा पुन्हा वाचली तेंव्हा समजला,त्यातला व्रतस्थ असण्याचा अर्थ.ती गायिका आहे, गणिका आहे आणि स्वतःचं वर्णन ती "रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा" असं करते.मैफिलीत जोगिया रंगला आहे अशा वेळी तो अगदी नवखा तरुण तिला येऊन अगदी प्रामाणिक भावनेनं म्हणतो की माझी तुझ्यावर प्रीति आहे, ती हसते आणि तो ताऱ्यासारखा दिसेनासा होतो.
"भांगेत पेरुनी तुळस परतला शाम" मग तिला जाणीव होते आपण काय गमावलं त्याची आणि त्या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी ती तो दिवस व्रतस्थ रहात असते आणि तिच्या आयुष्यातला वर्षातला एक दिवस असा जोगिया रंगत असतो.अंगावर अगदी काटा येईल अशी कविता आहे ही.त्यातला तिचा त्याच्या आठवणीत व्रतस्थ राहण्याचा निर्णय सच्चेपण दाखवतो,जे तिच्या मनाला स्पर्शवून गेलेलं आहे.
आंतरजालावर जोगिया रागाची माहिती बघितली तर तो सकाळच्या पहिल्या प्रहरातला राग आहे आणि त्याचा मूड devotion किंवा detachment आहे.हे सगळं वाचल्यावर जोगिया कविता आणखी वेगळी भासली.
अनेक सिनेमे बघताना,कविता वाचताना किंवा पुस्तकं वाचताना हा जोगिया रंग जाणवायला लागला.काही माणसं वाचताना,काही समजून घेण्याच्या प्रयत्नात,माणसांच्या वागण्यात,बोलण्यातही जोगिया रंग जाणवला.तारा जुळल्या..
गुलजारजींचा मौसम किंवा आंधी हे दोन्ही सिनेमे बघताना हेच जाणवत राहतं. हाच जोगिया राग आणि जोगिया रंग पूर्ण सिनेमाभर पसरलेला आहे.मौसम मध्ये आपल्या हातून एका व्यक्तीचं आयुष्य वाया गेलेलं समजल्यावर त्याचं प्रायश्चितच म्हणून नव्हे तर त्या प्रेमाची आठवण म्हणून वेश्या व्यवसाय स्वीकारलेल्या आपल्या प्रेयसीच्या मुलीला(त्याच्या आणि तिच्या नव्हे! )आपलं म्हणणारा संजीव कुमार आणि आणि दोन चांगल्या माणसांचं न पटल्यामुळे फारकत होऊनसुद्धा एकमेकांविषयी अपार प्रेम बाळगणारे आँधीचे नायक नायिका हे मला प्रेमाचं रुप फार उदात्त आणि खरं वाटतं.
अमृता प्रीतम ह्यांनी साहीर यांच्यासाठी आणि इमरोझ यांनी अमृता यांच्यासाठी जोगिया व्रत घेतलं असंच म्हणावं लागेल.ह्या सगळ्यांनी जोगिया राग आळवला किंवा जोगिया रंग आत्मसात केला असं वाटतं आहे.प्रेमाच्या ह्या परिभाषाच वेगळ्या!प्रेमातून होणारे हल्ले आणि एका बाजूला ही प्रगल्भ प्रेमभावना!
सर्वसाधारणपणे बहुतेक कुटुंबातल्या व्यक्ती एकमेकांसाठी आधारवड असतात, त्या रक्ताच्या प्रेमाच्या नात्यांसाठी आपण दिव्यही करायला तयार असतो.कधी कधी प्रेमाचा धागा अगदी वेगळ्या अर्थानी वेगळ्या संदर्भानी जोडला जातो.अगदी घट्ट जवळचं नातं, कधी अगदी जवळचं नसलं तरी नातं असतं,कधी मैत्री असते,कधी गुरु शिष्याचं नातं असतं, कधी अनामिक असतं,पण असे धागे आपसूक जोडले जातात.ती व्यक्ती आपल्यातलं काहीतरी सुंदर ,काहीतरी झिलई असलेलं बाहेर काढते.कधी गुण असतात ,कधी वेदना ,कधी मन,कधी उपेक्षा, कधी सुप्त इच्छा,कधी आपल्याला न लाभलेलं काहीतरी,ती व्यक्ती लख्खपणे दाखवते !आपल्याला आरसा दाखवून ती व्यक्ती कधी कधी लुप्त होते.
कधी मृत्यू, कधी समज आणि गैरसमज,कधी समाज रीत,कधी अगदी विनाकारण,माणसांच्यात अंतर पडतं. मग त्या माणसाच्या शारीर नसण्याचा किंवा आपल्या आयुष्यात नसण्याचा किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपण नसण्याचा प्रसंग येतो आणि त्या एकत्र घालवलेल्या क्षणांना साक्ष मानून पुढचं आयुष्य चांगलं व्यतित करणारी माणसं असतात आणि आयुष्य कुरतडणारीही असतात.भले तुम्ही वेगळीच वाट चालत आहात पण तुम्हाला त्या व्यक्तीची किंवा क्षणांची आठवण येऊन स्तब्ध व्हायला होतंय अगदी निमिषभर, इंग्लिशमध्ये we are having a moment here! म्हणतात तसं!आणि परत त्या सुखद किंवा अगदी फार सुखद नसणाऱ्या आठवणींना कप्प्यात ठेवून तुम्ही वाट चालत राहता.हाच जोगिया असावा का?
"जुदा हो के भी तू मुझमें कही बाकी है"असं वाटणारी भावना..
ते क्षण,जपून ठेवून आपलं नेहमीचं आयुष्य चालताना,त्या क्षणांना अस्पर्श ठेवणं,त्यांचं स्मरण ठेवणं ही संन्यस्त,व्रतस्थ किंवा जोगिया वृत्ती ही संकल्पना मनात आकार घेतीये.त्यानी एकदम वेगळ्या मितीतून बऱ्याच कलाकृतींकडे बघते आहे.कथा,कविता, चित्रपट,चित्रं,विस्मृतीत गेलेली माणसं आणि घटना एवढंच काय तर आजूबाजूची माणसं ह्यात ह्या जोगिया रंग सापडायला लागलाय.थोडं जास्त संवेदनशील व्हावं लागतं आहे.पण वेगळ्या मितीतून माणसं समोर येत आहेत.
माझ्या ओळखीत एक बाई होत्या,त्या नेहमी पांढरं ब्लाऊज घालायच्या,साडी कुठल्याही रंगाची असो,जरीची असो किंवा काही असो.पूर्वीच्या काळी असेलही असं पण हा काळ तो नव्हता.मग कोणाच्यातरी बोलण्यात आलं की त्यांचं प्रेम सफल झालं नाही म्हणून त्या असं करायच्या.मला पहिल्यांदा हसू आलं की ही काय निषेध व्यक्त करायची वृत्ती पण ही त्यांची जोगिया moment होती हे आता जाणवतंय.त्यांना काहीच सिद्ध करायचं नव्हतं पण तो धागा मनात जपून ठेवला होता.कदाचित खूप मनापासून केलेल्या प्रेमाचा किंवा दुःखाचा असेल किंवा कदाचित उपेक्षेचा किंवा विफलतेचा.त्याचं स्मरण वारंवार व्हावं असं वाटणं हीच जोगिया moment असावी..तरुण नवथर वयातलं विफल प्रेम हे मनात आर्त आठवण कोरून जातं का आणि बाकी सगळं बदललं तरी ती एक भावना तशीच राहते का?प्रामाणिकपणे त्या भावनेला मनाशी कवटाळून पुढे जातात का माणसं?किंवा प्रेमाची माणसं जे सुंदर क्षण सहजी आपल्या ओच्यात टाकतात,त्या क्षणांचा सुगंध आपल्याला म्हणजे फक्त आपल्यालाच येतो,जगण्याची लढाई सुवासिक करतो आणि त्या झुळुकीच्या भरवशावर आपण पुढची वाट चालतो..
आयुष्यात पुढं जात असताना एखाद्या गोष्टीसाठी मागे वळून बघावं असं वाटतं तोच जोगिया क्षण असतो का?
जोगिया रंग हा फक्त दुःखाचा,फक्त त्यागाचा नसणार, नक्कीच.आपल्या आवडत्या माणसांची आठवण काढताना ती काही फक्त दुःखाची नसते.सुखाच्या क्षणांचीही असते. अगदी सोन्यासारखे घणसर क्षण अगदी परंपरागत चालत आलेल्या दागिन्यांसारखे नुसत्या दर्शनानी किंवा आठव येण्यानी सुखावणारे! त्या आठवणीमुळे आपल्या नेहमीच्या पायवाटेवर काही 'सरसर येणारे शिरवे' वाटावे.
कधीकधी एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीची आणि खाण्यातली आवडती गोष्ट वर्षभरासाठी सोडली जाते.माझ्याही बाबतीत झालं असं, पण ती सोडली नाही गेली तर सुटली,कायमचीच!आता विसरुन गेले ती चव.आता कधीही परत ती चव घ्यावी असं वाटत नाही!ज्या व्यक्तीसाठी सोडली ती व्यक्ती भूतलावर असती आणि समोर असती म्हणली असती की वेडी की काय,उलट चांगली माझी आठवण काढून त्या चवीचा आस्वाद घे!आयुष्य कुठल्याही गोष्टीकडे मुद्दाम पाठ करण्यासाठी नसतंच!पण मी निषेध म्हणून सुरुवातीला बाळगली ती वेडी भावना!कितीही हातपाय आपटले तरी काही गोष्टी बदलत नाहीत हे कळलं आणि स्वीकारण्यावाचून पर्याय नाही हे कळलं.आणि आता त्या प्रिय व्यक्तीची आठवण म्हणून मी ती जपते...आता त्याच्यापलीकडची भावना आहे किंवा भावनेच्या पलीकडचं काहीतरी आहे .if their absence brings you peace,you never lost them.....हे कळायला लागलंय.
तो जोगिया रंग तिथे आहे.
व्रतस्थ,वैराग्य,संन्यस्त ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ नव्यानं लागतोय.म्हणजे लावायचा प्रयत्न करतीये.माझ्या मैत्रिणीनं
सुचूनी खूप वर्षांपूर्वी शांता शेळकेंची कविता मला लिहून दिली होती....
संबंधांचे अर्थ कधीच लावू नयेत
त्यांचा फक्त नम्र कृतज्ञतेने स्वीकार करावा
जसा पाण्याचा झुळझुळ नितळ जिव्हाळा
जुळलेल्या समंजस ओंजळीत धरावा..
संबंधांचे धागे कधीच उलगडू नयेत
ते फक्त प्राणांभोवती सहज घ्यावेत लपेटून,
जसे हिवाळ्यातल्या झोंबऱ्या पहाट गारठ्यात
अंगांगी भिनवीत राहावे कोवळे धारोष्ण ऊन्ह.
संबंध तुटतानाही एक अर्थ आपल्यापुरता....
एक धागा... जपून ठेवावा खोल हृदयात
एखादे रखरखीत तप्त वाळ्वंट तुडवताना
माथ्यावर आपल्यापुरती खासगी बरसात.
मीरेचं पूर्ण आयुष्य तर शाम रंगात नखशिखांत रंगलं होतं.पण ते जोगिया रंगातही होतं. राधेच्या मनातही असणार आहे हा जोगिया रंग नक्कीच!
रंग प्यार का क्या जाने पीर फकीर ।
ये तो जाने मीरा या जाने हीर।
तोच नक्की, रंग जोगिया
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर !
जोगिया(वैराग्याचा) रंग आवडता. जणु एखाद्या प्रिय व्यक्तीच्या सगळ्या प्रकारच्या सप्तरंगी आठवणी ह्रदयाच्या प्रिझम मधून आरपार जाताना जोगिया रंगात परिवर्तित होऊन तिथेच चिरंतन रहातात. Happy

फारच सुंदर..
प्रत्येक जण स्वतः च्या परीने जोगिया असतोच.
कुठल्या ना कुठल्या बाबतीत..

खूप म्हणजे खूपच आवडलं.
अंगूर सिनेमा फार आवडतो. त्याचं शूटिंग पुण्यात झालंय हे माहिती नव्हतं.