नातीगोती - भाग ६

Submitted by अज्ञातवासी on 17 November, 2020 - 13:47

भाग - ५
https://www.maayboli.com/node/77246

भाग - ४
https://www.maayboli.com/node/77226

भाग - ३
https://www.maayboli.com/node/69646

भाग १
https://www.maayboli.com/node/63469

भाग २
https://www.maayboli.com/node/69583

मी पप्पाच्या खोलीत आले, आणि क्षणभर बघतच राहिले.
त्याची खोली म्हणजे त्याच्या मनाचा आरसाच होती. मोठी, मोकळी आणि हवेशीर... खोलीत जाताच मला त्याच्या आठवणीने भरून आलं.
माझ्या पप्पाची खोली, लहानपणापासूनची... अजूनही त्याने सांभाळलेली...
खोलीत मध्यभागी एक मध्यम आकाराचा पलंग होता. बाजूलाच एक लाकडी मोठा टेबल आणि एक मोठी लाकडी खुर्ची होती. आणि त्याच्या शेजारीच एक जुना टेबलफॅन होता. टेबलाच्या बाजूलाच एक मोठं लाकडी कपाट होतं, आणि समोर एका लाकडी फ्रेममध्ये एक फोटो लावलेला होता.
'माझे आजीबाबा!'
कित्येक वर्षांनी मी त्यांना फोटोत बघितलं... प्रत्यक्षात मी त्यांना कधी भेटले होते?
नाही आठवत! खूप लहान असेल मी.
मी कपाट उघडलं.
देवा, इतकी पुस्तके!!!
मी त्यातलं एक पुस्तक घेतलं, आणि टेबलावर बसले...
... आणि इतकावेळ मला न दिसलेली ती वस्तू दिसली...
एक छोटीशी फ्रेम, आणि त्यात एक फोटो.
माझा फोटो...
...मला आता बिलकुल रडायचं नाहीये...
◆◆◆◆◆
रात्री सगळे मस्त एकत्र जेवायला बसले.
"मग सायली, कसा झाला प्रवास?"
"झकास. भाजी द्या इकडे."
"घे!"
मला मरणाची भूक लागली होती.
"किती दिवस थांबणार?" वहिनीने हळूच प्रश्न विचारला. आजीने डोळे वटारले.
"माहिती नाही."
मी निवांत जेवत होते.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह होतं, जे मला ठळक जाणवत होतं.
आता मात्र मला जेवून निवांत झोपायचं होतं.
◆◆◆◆◆
पप्पाचा पलंग, पप्पाची खोली...
पप्पाच्या खूप जवळ आल्यासारखं वाटत होतं.
जस्ट पप्पा नव्हता.
मिस यू पप्पा.
पप्पा मी तुला शोधेन. तुझा शोध घेईनच. तू असा का झालास, हे शोधल्याशिवाय राहणार नाही.
आहे तर तुझीच मुलगी मी.
मला केव्हा झोप लागली ते मलाच कळलं नाही.
◆◆◆◆◆
पहाटेच मला जाग आली. थोडीशी थंडी जाणवत होती.
घरात मात्र सर्वजण आधीच कामाला लागले होते.
मी उठून दरवाजा उघडला.
समोरच एक मस्त गुबगुबीत छोटी माझ्यासमोर उभी होती!
किती क्युट होती ती, असं वाटत होतं तिला उचलून तिचा गालगुच्चा घ्यावा...
"इतक्या वेळ कुणी झोपत का?" तिने अतिशय शांत आवाजात मला विचारले.
"सॉरी," मी कान पकडले.
दात घासा. चहा घ्या. आणि ती तशीच शांतपणे खाली निघून गेली.
कोण ही? असुदे!
दिवसाची सुरुवातच मस्त झाली होती.
◆◆◆◆
"सायली, मग आजचा काय प्लॅन?" महेशदादाने प्रश्न विचारला.
"माहिती नाही. इथे बघण्यासारख काय आहे?"
"काहीही नाही. बस रामाचं मंदिर, तिकडे नदीपार, आपलं दुकान आणि आपलं शेत. बस!"
"माझी शाळा." छोटीने कपात दूध पिता पिता माहिती पुरवली.
"हो हिची शाळा, जिथे ही कधीही जात नाही." महेशदादा हसून म्हणाला.
मीसुध्दा हसले.
"किती वर्षांची आहे ही?"
"चार!"
"चाळीशीची असल्यासारखी वागते."
"मुलं लहानपणी चांगलच वागतात. मोठेपणी वात्रट होतात." वहिनी मध्येच म्हणाली.
"मी लहानपणापासून वात्रटच होते." मी गालातल्या गालात हसत म्हणाले.
"अग तसं नाही, म्हणजे..." महेशदादा कावराबावरा झाला.
"गप रे. काहीही स्पष्टीकरण देऊ नकोस... आम्ही दोघीजणी ते काय म्हणतात... विसरले... वहिनी आपलं नातं काय?"
"नणंद आणि भावजय..."
"बरोबर... त्यात असं हे चालणारचं. बरं मी अंघोळ करून रामाला जाऊन येते. छोटी येशील का माझ्या बरोबर."
"जाई..." ती पुन्हा गाल फुगवून म्हणाली.
"ओके जाई. येशील?"
"बरं.".आणि तिने पुन्हा कपात तोंड खुपसलं!
◆◆◆◆◆
भव्य विस्तीर्ण पटांगण, आणि मध्यभागी सभामंडप. त्याच्या मागे रामाचं मंदिर.
राम, सीता आणि लक्ष्मण. खाली हनुमान हात जोडून उभा.
मी हात जोडले. जाईनेही हात जोडले.
मागून तिच्याच वयाच्या काही मुली तिच्याकडे रोखून बघत होत्या.
आम्ही तिथून निघालो.
"बाजू व्हा, आम्ही बीजी आहे ना."
तिने जाताना सगळ्यांना टोमणा मारलाच...
पिंपळगावात आमची फेरी सुरू झाली होती... अजून तर शेत आणि दुकान बाकी होतं...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर.
उत्सुकता वाढत आहे!
पुढील भाग लवकर टाकावे.

छान भाग!!
एका वेळी इतक्या कथांवर विचार करून लिहिता...
खरचं कौतुकास्पद!!!

@रुपाली धन्यवाद.
@नौटंकी धन्यवाद.

सिरियसली उत्तर द्यायचं ठरलंच, तर आधी Transition मध्ये वेळ जायचा, आता मात्र क्षणार्धात होतं.
फ्लो आला आहे, टिकायला हवा. Happy

सर्व भाग वाचून काढले आज .. सुरुवातीचे १, २ वाचले होते..
मस्त चालुये कथा .. Happy
पु.भा.प्र.
एका वेळी इतक्या कथांवर विचार करून लिहिता...
खरचं कौतुकास्पद !! >> +११