मजकूर का ओलावला होता?

Submitted by निशिकांत on 17 November, 2020 - 10:40

समेटाचा जरी प्रस्ताव तू धुडकावला होता
तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता?

वंसंताशी तुझे नाते जपाया तू हवे होते
कशाला ग्रिष्म वेड्या सांग तू बोलावला होता?

कबूली दे मला तू! शक्य नाही एकटे जगणे
लपवला का उगा जो हुंदका पाणावला होता?

कधी मी शुन्य झाले हे मला कळलेच नाही पण
खरे तर काळही तुझियाविना सुस्तावला होता

फुले नाना तयाने हुंगली तारुण्य जगता पण
उतरता कैफ सुर्यास्ती, मनी धास्तावला होता

स्मशानी जावया नेत्यास का मज्जाव त्या गावी?
चपात्या तो चितेवर भाजण्या सोकावला होता

बघूनी लाचखोरांचे उजळ माथे मिरवताना
कुणी सत्त्यास जपणारा, जरा पस्तावला होता

कशाला मुल्यमापन मी करू सरकारचे सांगा?
कधी नव्हताच जो दर्जा, पुन्हा खालावला होता

कशी सांगू तुला? "निशिकांत" मृत्त्यूच्या अधी थोडा
तुझ्यासाठीच माझा श्वासही मंदावला होता

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वियदगंगा
लगावली--लगागागाX४

Group content visibility: 
Public - accessible to all site users