मार्ले आणि मी

Submitted by दिनेशG on 13 November, 2020 - 05:24

Marley & Me मुव्ही पाहिलाय? २००८ साली रिलीज झालेला हा मुव्ही पाहिला नसाल तर जरूर पहा. ज्यांच्या घरी कुत्रा आहे किंवा ज्यांना तो घरी असावा असे वाटते अशा सर्वांनी तर हा चित्रपट नक्की पहिला पाहिजे.

आपण सुरुवातीला एक छोटेसे पिल्लू घरी आणतो आणि नंतर ते आपल्या घराचा एक सदस्य बनून जाते. घरातील प्रत्येकजण भावनिक रित्या त्या कुत्र्याशी जोडले जातात. माझ्याकडे लॅब चे छोटेसे पिल्लू 'परी' घरी आले ते योगायोगाने. पण गेली पाच वर्षे आमचा बाहेर जायचा कुठलाही प्लॅन हा तिच्या सोईनुसार होत असतो. मागे मी आणि परीने केलेला २८ तासांचा प्रवास आणि तिचे मरणाच्या दारातून परत येण्यावरच्या पोस्ट लिहिल्या होत्या. हा मुव्ही बघत असताना सुद्धा मी कितीतरी प्रसंगात स्वतःला तेथे पहात होतो.

हे लॅब्राडॉर एवढे उत्साहाने भरलेले असतात की त्यांना सांभाळता सांभाळता नाकीनऊ येतात. चित्रपटात चालत्या गाडीच्या खिडकीतून बाहेर उडी मारायच्या प्रयत्न करणाऱ्या Marley ला आवरताना जशी नवराबायकोची त्रेधातिरपीट उडाली होती ते पाहून एक वर्षाची असताना परीने गाडीतून मारलेली उडी आठवली. मी गाडी पार्क करून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या दुकानातून काही खरेदी करण्यासाठी बाहेर गेलो होतो. परी आपला पट्टा गाडीतल्या माणसाच्या हातातून सोडवून घेऊन उघड्या काचेतून बाहेर उडी मारून पळत माझ्या दिशेने आली होती! नशीब बलवत्तर म्हणून कुठल्याही गाडीखाली न येता काही बरे वाईट झाले नाही.

कुत्र्यांचे आयुष्यमान जवळ जवळ बारा तेरा वर्षांचे असते. चित्रपटात लग्न झाल्यानंतर बायकोसाठी वाढदिवसाची भेट म्हणून आणलेला Marley नंतर तेरा वर्षे कुटुंबासोबत राहतो आणि त्या दरम्यान पत्रकार आणि स्तंभलेखक म्हणून काम करणाऱ्या नायकाच्या व्यावसायिक आयुष्यातील स्थित्यंतराचा आणि तीन मुलांच्या बालपणाचा तो भाग बनतो. त्याची जाण्याची वेळ येते तेव्हा संपूर्ण कुटुंबाची होणारी घालमेल प्रत्येकाचे मन हेलावून टाकायला पुरेशी आहे.

यावर्षी जून मध्ये बीबीसी च्या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेली एक बातमी वाचायला मिळाली . फिल्म क्रिटिक केविन ली ने ट्विटर वर लोकांना 'कोणत्या मुव्ही किंवा टीव्ही शो ने त्यांना सर्वात जास्त रडवले' असे विचारले होते. जवळ जवळ ३५००० लोकांनी दिलेल्या उत्तरांमध्ये पहिला नंबर होता २०१७ मध्ये आलेल्या Coco मुव्हीचा आणि त्यानंतर २००८ मधील Marley and Me दुसऱ्या नंबर वर होता!

(मुव्ही ऍमेझॉन प्राईम वर उपलब्ध आहे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे मार्ले अँड मी.त्यात प्रिय रेचेल आहे हा बोनस.प्राईमवरच पाहिला.त्यात शेवटची 2-3 वाक्यां खूप हलवणारी आहेत.

हो..Marley and Me या पुस्तकावरच हा चित्रपट आधारित आहे. पुस्तकात मार्ले आणि लेखकामधील नात्यावर जास्त भर दिलाय तर चित्रपटात नायकाच्या आयुष्यातील कौटुंबिक नाती आणि व्यावसायिक बदल ही मुख्य थीम ठेवून मार्लेची गोष्ट समांतर चालते

One of my favourite movies! ♡ Happy
कितीही वेळा बघितला तरी तितकाच हसवतो आणि शेवटी रडवतो..

मी आणि माझी मैत्रीण ह्या सिनेमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला गेलो होतो. मीच काय सारा आयनॉक्स थेटर रडत होता शेवटी. रेडिटवरसुद्धा तुम्हाला सर्वात जास्त रडवणारा सिनेमा असा लोकप्रिय धागा आहे. मला वैयक्तिक ''लाईफ इज ब्युटीफुल (१९९७)" आणि जोसेफ गॉर्डन लेव्हिटच्या ''५०/५०'' ह्या सिनेमांनी जास्त रडवले. वैसे मै सख्त लोंडा हु.

मार्ले आणि मी खूप सुंदर चित्रपट आहे. असाच सुंदर चित्रपट आहे - हचिको, त्यात अकितो कुत्र्याची गोष्ट आहे. आपल्या मालकाची वाट पाहत जवळ जवळ ९ वर्षे स्टेशन बाहेर ट्रेन येण्याच्या वेळी उभा असायचा.