आप्पासाहेब

Submitted by वीरु on 11 November, 2020 - 13:21

आप्प्या उर्फ आप्पासाहेब म्हणजे आमच्या गल्लीतलं वेगळंच प्रकरण होतं. हे आप्पासाहेब पहिलीपासुन‌ आमच्याच वर्गात होते. आईवडील अंगुठाछाप पण मुलाने चार बुकं शिकुन मोठा साहेब व्हावं अशी त्यांची भारी इच्छा. आता चार बुकं वाचुन कोणी साहेब झालय का.. याच्या उलट आप्पासाहेबांचे विचार. शिकुन काय उपयोग असं याला पहिलीत नाव दाखल केल्यापासुन वाटायचे की काय देव जाणे. कारण आप्प्याचे शाळेत येणे म्हणजे रोज सकाळचा मोठा सोहळा असायचा आणि गल्लीसाठी फुकटची करमणुक. बऱ्याच वेळा शाळेतली सकाळची प्रार्थना संपुन पहिला तास सुरु व्हायचा तेव्हा त्याची आई शाळेकडे ओढुन नेण्याचा प्रयत्न करत असे. त्यावेळी जोरजोरात गळा काढत आप्पाचा तिच्या हातुन सुटण्याचा प्रयत्न असायचा आणि त्यात यश मिळाले की स्वारी घराच्या दिशेने धावत सुटायची. घरी स्वागताला दारात छडी घेऊन त्याचे वडील तयारच असायचे. छडीचा एखादा तडाखा बसला की पुन्हा दुप्पट वेगाने गडी शाळेकडे पळायचा. हा एखाद्या दिवशी शाळेत गेला नाही तर सगळ्या गल्लीला चुकल्याचुकल्या सारखे वाटायचं.
पुढे हायस्कुलला गेल्यावर तरी हा सुधरेल असं वाटलं होतं, पण नाव नाही. फक्त सकाळचा शाळेत जाण्याचा सोहळा बंद होऊन मुकाट्याने आमच्याबरोबर यायला लागला होता. कारण सध्यातरी याच्यातुन सुटका नाही हे त्यालाही समजुन चुकलं होते. हायस्कुल तालुक्याच्या गावी होते. रोजचा एस्टीचा प्रवास. या प्रवासादरम्यान आमची चांगलीच मैत्री झाली. सोबत येणं जाणं सुरु झालं.
शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गात चांगली जागा पकडण्यासाठी सगळ्यांची लगबग असायची. एका वर्षी "तु टेन्शन नको घेऊस, मस्त जागा पकडतो बघ. तु ये सावकाश." असं आप्पाने मला तोंडभरुन आश्वासन दिलं आणि शाळेची बेल झाल्यावर हा सगळ्यांच्या पुढे पळालाही. मी निवांतपणे वर्गात गेलो तर हा खिडकीजवळच्या कोपऱ्यात शेवटुन दुसऱ्या नंबरची जागा पकडुन बसला होता. मी वैतागल्यावर "पिक्चर पहिल्या रांगेत बसुन बघायला मजा येते की शेवटच्या रांगेतुन बघायला. आणि या कोपऱ्यातुन तु सगळ्या वर्गावर लक्ष येऊ शकशील" असं याचं म्हणणं. आता शाळा म्हणजे पिक्चर आहे का आणि आपण इथे वर्गावर लक्ष ठेवायला येतो का? असे प्रश्न त्याला विचारण्यात काही अर्थ नव्हता.
वर्गात शिस्त लावायला म्हणुन एक मॉनिटर असायचा. तालुक्याच्या गावचाच दिपक सलग दोन वर्ष मॉनिटर होता. दिवसभर वर्गात गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थांची नावं डायरीत टिपुन दुसऱ्या दिवशी पहिल्या तासाला ती नावं वर्ग शिक्षकांकडे द्यायचा. शिक्षकही मोठ्या उत्साहाने छड्या मारायचे. पहिल्या वर्षी ठीक होता, पण दुसऱ्या वर्षी डोक्यात हवा गेली, त्याचं वागणं बदललं आणि आमच्यासारखी खेड्यापाड्यातुन शिकायला येणारी जनता रोजच पहिल्या तासाच्या छडी वाटप कार्यक्रमाची मानकरी व्हायला लागली. बरं त्याने तटस्थपणे नावं लिहली असती तर आमचं काहीएक म्हणणं नव्हतं, पण तेही नाही..त्याच्या मित्रांची मस्ती त्याला दिसायची नाही आणि वर्गातल्या मुलींचा कलकलाट त्याच्या कानातही शिरायचा नाही. बऱ्याच वेळा कळायचंच नाही की आपला पराक्रम काय होता ते. वर्ग शिक्षक इतिहास शिकवायचे. दररोज तेच चेहरे पाहुन त्यांनाही स्फुरण चढायचे आणि तलवार चालवल्यासारखी छडी चालवायचे.
"या दिप्याचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. काल मी दिवसभर पुतळ्यासारखा बसुन होतो तरी माझं नाव.. आपल्याला मार बसतो तेव्हा त्या पोरी कसल्या हसतात तुला माहितीये." एका दिवशी छड्या खाऊन आल्यावर जागेवर बसतांना आप्पा म्हणाला.
"अरे, पण आपण काय करु शकतो? साधं शिंकलं तरी तो आपलं नाव टिपुन घेतो." मी आपली असहाय्यता मांडली.
"बघच तु. याला धडा शिकवला नाही तर आप्पासाहेब नाव नाही लावणार." आप्पाच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं पण तो मला सगळं पार पडल्यावरच सांगेल हे आतापर्यंच्या अनुभवावरुन माहित असल्याने मी पण फार काही विचारले नाही. शेवटचा तास खेळाचा असायचा. शाळेच्या मैदानावर जायला मिळत असल्यामुळे या तासाची आम्ही आतुरतेने वाट पहायचो. "मला बरं वाटत नाहीये, मी येतो सावकाश." आप्पा म्हणाला. मैदानावर जायचे असल्याने 'ठीक आहे' एवढंच बोलुन मी वर्गाबाहेर पडलो. जरा वेळाने आप्पा शांतपणे मैदानाजवळच्या बाकावर येऊन बसला.
दुसऱ्या दिवशी दिपकने सवयीने डायरी सरांकडे दिल्यावर सरांनी नावं वाचायला सुरुवात केली आणि सगळ्यांना धक्काच बसला. आमच्याबरोबर दिपकच्या मित्रपरिवाराच्या आणि दिवसभर कलकलाट करणाऱ्या मुलींपैकी काहींच्या नावांचा पुकारा सरांनी करताच वर्गात एकच गोंधळ सुरु झाला. विशेष म्हणजे नेहमीच्या मानकऱ्यांपैकी काल गैरहजर असलेल्या रव्या आणि विज्याचही नाव होतं.
"काय रे दिप्या, तुला मीच दिसली का? ती आर्ची नव्हती का माझ्याशी बोलत?" सरांनी नाव पुकारताच मोनीने उभं रहात अधिकची माहिती पुरवली.
"बाई गं!! मी कालच बोलले तुझ्याशी! तु तर दिवसभर सगळ्यांशी बोलत फिरत असते. एक दिवस नाव आलं तर काय झालं?" आर्चीने बसल्या जागेवरुन माहितीत भर घातली.
"सर मी तर तुम्हाला विचारुन काल आलो नव्हतो तरी याने माझे नाव लिहलं" रव्याला कंठ फुटला.
"सर माझी तब्येत बरी नव्हती म्हणुन काल मी आलो नव्हतो. डॉक्टरची चिठ्ठी आणलीये सर." विज्यानेही तत्परतेने आपली बाजु मांडली.
हा सगळा गोंधळ बघत सर शांतपणे उभे होते. जरा गलका कमी झाल्यावर त्यांनी रोजच्या मानकऱ्यांना "तुम्ही खाली बसा रे. तुम्हाला रोजरोज मारून मला कंटाळा आला" असं सांगुन खाली बसवलं आणि दिपकला बोलावलं.
"सर..मी..मी.." दिपकला काय बोलावे तेच सुचत नव्हते.
"खामोश.." सर चिडले की राष्ट्रभाषेचा आधार घ्यायचे. "हात पुढे कर" दिपकने हात पुढे करताच प्रत्येक हातावर तीन याप्रमाणे सटासट छड्या ठेऊन दिल्या. "चला,‌ आता तुम्हीपण प्रसाद घ्या रे." असं सांगुन उभ्या असलेल्यांना बोलावल्यावर मुलींपैकी एकदोघींनी रडायला सुरुवात करताच "रडु नका. शिक्षेला इतके घाबराल तर पुढच्या आयुष्यात संकटांना कसे तोंड द्याल? देश पारतंत्रात असतांना महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने सहभाग घेतला. वेळप्रसंगी लाठीमार सहन केला. धन्य त्या रणरागिनी." असं म्हणत सरांनी कोणालाच दयामाया दाखवली नाही.
"तरी मला संशय होताच की यांचीच नावं कसे काय येतात बुवा. दिपक शेवटी तुझी विवेकबुध्दी जागृत झालीच तर. तु भविष्यात नक्कीच चांगला नागरिक होशील. पण उद्यापासुन कोणीच कोणाची नावं लिहायची नाही." हात चोळत बसलेल्या दिपककडे बघत सर म्हणाले. त्या दिवशी दिपकबरोबर कोणीच बोलले नाही. इतकंच काय मधल्या सुटीत नेहमीप्रमाणे तो त्याच्या मित्रांमध्ये डबा खायला गेल्यावर मित्र दुसरीकडे जाऊन बसले.
शाळा सुटल्यावर "काही नाही रे. तुम्ही सगळे खेळाच्या तासाला मैदानात गेल्यावर मी गुपचुप दिप्याच्या दप्तरातुन त्याची डायरी काढुन आपल्या नावांमध्ये त्याच्या मित्रांचे आणि त्या पोरींचे नावं घुसवले. रव्या विज्याचं नाव तर मुद्दामच टाकलं." आप्पाने हसत हसत खुलासा केला.
नववीत असतांना असंच एका ऑफ पिरियडला मराठीच्या सरांनी मोठं झाल्यावर तुम्ही काय बनणार असा प्रश्न केला. सगळेच पोरंपोरी डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्रोफेसर असं काहीबाही सांगायला लागले. मीपण डॉक्टरकीची डीग्री उद्याच हातात येणार आहे या थाटात 'डॉक्टर होणार' असं सांगताच आप्पा फिस्सकन हसला. "तु सांग रे. दुसऱ्याला हसणं सोप्प असते" सरांनी आप्प्याला उठवले.
"सर मला पंचायत समितीचा सभापती नाहीतर शास्रज्ञ व्हायचे आहे." आप्पा कपडे झटकत उठत म्हणाला. त्याचे हे उत्तर ऐकुण सगळेच चक्रावले.
"व्वा छान! बघा मुलांनो तुमच्यामध्ये एकजण तरी आहे जो चाकोरीबाहेर जगु पहातो. पण मला सांग आप्पा हे दोन क्षेत्र का हवेहवेसे वाटतात तुला" सरांनी विचारले. सरांना काहीतरी भारदस्त उत्तराची अपेक्षा होती.
"या दोघांसाठी शिक्षणाची अट नसते सर" आप्पा फुशारुन म्हणाला. आप्पाने असं सांगताच वर्गात एकच खसखस पिकली. सरांच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव पाहून आप्पाने आता थांबावं असं मला वाटायला लागले.
"जरा सविस्तर समजाऊन सांगशील का आम्हाला" सर शांतपणे म्हणाले.
"कसं असतं सर.." आप्पाची गाडी कोणत्या दिशेला जाणार याचा अंदाज येताच मी त्याला कोपराने ढोसलं. सुदैवाने आप्पाला माझा इशारा कळला. "या दोन्ही क्षेत्रात आयुष्यभर शिकायला मिळते, कर्तुत्वाला सीमा नसतात." असलं काहीसं बोलुन तो खाली बसला. "कशाला मस्ती करतोस रे? तुला नाही आवडत तर सोडुन दे शाळा." मी चिडलो.
"तुला नाही कळणार. तुझ्या घरात सगळेच शिकलेले आहेत. मी शिकतो आहे याचे खुप कौतुक आहे रे आईबापाला. शाळा सोडली तर त्यांना काय वाटेल." माझी नजर चुकवत आप्पा म्हणाला. आप्पा तसा मुळातच हुशार होता. परीक्षेला फार अभ्यास न करता ही पहिल्या पाचात नंबर मिळवायचा. पण वर्गातल्या शिक्षणापेक्षा शाळेबाहेरचं शिक्षण त्याला जास्त महत्वाचं वाटायचं.
शाळेतले दिवस भराभर निघुन गेले. दहावीनंतर आम्हीही ते गाव सोडलं
आणि आप्पाचा संपर्क हळुहळु कमी होत गेला. पुढे शिक्षणानिमित्त मी शहरात आलो आणि तिथेच रमलो.
गेल्या दिवाळीला वर्गातल्या एकाचा फोन आला..'दिवाळीत शाळेतल्या दोस्तांनी भेटायचं ठरवलं आहे तु पण ये' असं सांगत होता आणि बोलताबोलता आप्पापण येणार असल्याचे त्याने सांगितलं.
आप्पा.. खुप जवळची गोष्ट जेव्हा सापडत नाही तेव्हा आपण सुरुवातीला अस्वस्थ होतो, कालांतराने तिच्याबद्दल विसरुन जातो. कधीतरी अनपेक्षितपणे ती गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा जसा आनंद होतो तसाच आनंद आप्पा भेटेल या कल्पनेनेच मला झाला.
गावाबाहेरच्या एका छानशा हॉटेलवर भेटायचे ठरले होते. ठरल्यादिवशी वेळेच्या आधीच हॉटेलवर जाऊन पोहचलो. हळुहळु सगळेच जमले. सगळ्यांच्या भेटीगाठी, चौकशा करुन झाल्या पण आप्पाचा काही पत्ताच नव्हता. "आप्पा येणार होता ना?" मी एकाला सहज विचारलं. "येईल रे तो. व्याप कमी आहेत का त्याच्यामागे."
आम्ही बोलत असतानाच एक स्कॉर्पिओ डौलदार वळण घेऊन हॉटेलसमोर थांबली. "आप्पा आला वाटतं" एक जण म्हणाला. गाडीतुन उतरलेल्या व्यक्तीला क्षणभर मी ओळखलंच नाही.. होय आप्पाच होता तो. आल्यावर त्याने प्रत्येकाला भेटुन विचारपुस सुरु केली. बाकी सगळे नेहमी भेटत असल्याने त्यांच्यात मोकळेपणा होता. मी मात्र खुप वर्षांनी सगळ्यांना भेटत होतो, थोडं अवघडल्यासारखे झाले होते त्यामुळे एका कोपऱ्यात बसुन होतो. अचानक आप्पा माझ्यासमोर येऊन उभा राहिला. क्षणभर पहात राहिला अन् नंतर "मन्या...! मन्याच आहेस ना तु!!" आप्पाचा आनंद चेहऱ्यावर मावत नव्हता. "हा येणार आहे असं आधी का सांगितलं नाही. सगळं हॉटेल सजवुन ठेवलं असतं, अत्तराचा सडा मारुन घेतला असता ना अंगणात."
"मोठ्या मुश्किलीने शोधला त्याला. आम्ही मुद्दामच सांगितलं नाही तुला. पण तु भेटशील म्हणुन हा बिचारा सगळ्यांच्या आधी येऊन थांबला होता हॉटेलबाहेर." इतकावेळ गप्प असलेल्या दिप्याने तोंड उघडले.
"तु गप रे. तु सुधरणार नाहीस कधी" असं म्हणत आप्पाने हॉटलच्या मॅनेजरला हाक मारली "ओ मॅनेजर लक्ष कुठे असतं तुमचं? हा पाहुणा तासभर हॉटेलच्या बाहेर उभा होता. काही चहापाणी विचारायचं ना."
हा आप्पा कोणालाही काहीही सांगतो असा विचार मनात आला तोच दिप्याने हे आप्पाचं हॉटेल आहे असं सांगितलं.
बऱ्याच उशीराने हळुहळु सगळे पांगले तरी आप्पाने मला थांबवुन घेतलं होतं. आप्पाचं चांगलं चाललं होतं. हॉटेल, गावात दोन दुकानं, बांधकाम व्यवसाय यामध्ये तो व्यस्त होता. आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. मात्र
"मुलं काय करतात तुझे" असं विचारल्यावर आप्पाचा चेहरा उतरला. "आमच्या घराण्यात शिकण्याची आवडच दिसत नाही रे. तुला आठवतं मी शाळेत जाणं टळावं म्हणुन कसा गोंधळ घालायचो ते.. अगदी तसाच गोंधळ आता माझी मुलगी घालते." आप्पा हताशपणे म्हणाला आणि माझ्या डोळ्यासमोरुन लहानग्या आप्पाचा शाळेत जाण्याचा सोहळा तरळुन गेला.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहिलंय!! खूप आवडलं!
हा नावं लिहिण्याचा प्रकार आमच्या शाळेतही असायचा. अशी पार्शलिटीपण अर्थात असायची Happy

छान लिहिले आहे...
आमच्या शाळेत फळ्याच्या एका कोपर्यात नावे लिहायला सांगायचे..मॉनिटर मी असायचे तेव्हा मैत्रिणींना दंगा नका करू सांगायचे नाहीतर नाईलाजाने नाव लिहावे लागायचे.. पार्शेलिटी केली तर बाकीच्या मुली असायच्या चुगली करायला Happy त्यामुळे खरं ते लिहावे लागायचे.

अजून एक गंमत,मी आधी राहायचे त्या लेनमधे एका u.k.g. च्या मुलाचा असाच शाळेत जायचा कार्यक्रम असायचा. शाळेची बस तर रोज चुकायची त्याची मग आईवडील बाईकवर मधे बसवून घेऊन जायचे शाळेत. मोठमोठ्याने रडत असायचा मुलगा..घरातून बाईकवर बसेपर्यंत छान आवरलेला सगळा अवतार व्हायचा त्याचा.. आम्हाला घरात असून पण आवाज यायचा रडण्या-ओरडण्याचा आणि कळायचं , स्वारी शाळेत निघाली Happy

छान

Thank u.