दुसरी माळ- सृजनशीलता,नवनिर्मिती, कल्पकता ( Creativity)

Submitted by पूजा जोशी on 26 October, 2020 - 05:39

कालच्या लेखात आपण पाहिलं की आपल्यातील दोषांवर मात करण्यासाठी आपणचं आपल्यातील शक्ती जागवायच्या. याचं शक्तींचा आजपासून आठ दिवस आपण मागोवा घेणार आहोत.

आज आपणजी शक्ती बघणार आहोत ती म्हणजे सृजनशीलता- नवनिर्मिती - कल्पकता. सोप्या मराठी भाषेत ‘ क्रिएटिविटी’!

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला कंटाळा आला, तेच तेच रुटीन होतं आहे असं वाटलं की मग आपण सुट्टी काढून कुठेतरी बाहेर जाऊन येतो. लॉंग विकेंड मिळाला की आपली पावलं रिसॉर्टकडे वळलीच म्हणून समजा. रोज रोज घरचं खायचा कंटाळा आला की आपण कधीतरी हॉटेलमध्ये जाऊन जेवतो. हा बदल छान असतो पण तात्पुरता असतो. एक पाऊल पुढे जाऊन जर आपण दैनंदिन जीवनात उत्साह निर्माण करू शकलो तर किती छान होईल.

दैनंदिन जीवन कंटाळवाणं किंवा चाकोरीबद्ध झालं नाही तर त्यातच खरी मजा. आणि ह्याच्यासाठी लागते सृजनशीलता, नवनिर्मिती कल्पकता.

बाळाचा जन्म, बिजाला फुटणारा अंकुर ही जशी नैसर्गिक सृजनशीलतेची उदाहरणं आहेत तसेच एखाद्या व्यक्तीने केलेले काव्य, चित्र किंवा रांगोळी ही माणसाच्या सृजनशीलतेची उदाहरणं आहेत.

पण सृजनशीलता ह्याच्या पुरतीच मर्यादित नाही आणि ही फक्त कलाकारांकडे किंवा मोठ्या माणसांकडे असते असं ही समजण्याची काही गरज नाही.

सृजनशीलता म्हणजे-
आहे त्या परिस्थितीत आणि असेल त्या साधनांचा वापर करून वेगळ्या पद्धतीने काम करणे.
रूढी पेक्षा स्वतंत्र विचार करणे,
एकाच कामासाठी अनेक पर्याय शोधणे,
अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या करणे,
चाकोरीबाहेरचा विचार करणं

एडवर्ड डी बोनो क्रिएटिव्हिटी विषयी असे सांगतात की-
Creativity involves breaking out of established patterns in order to look at things in a different way.
And creativity in daily life makes life infinitely interesting and fulfilling

पुढे ते असंही म्हणतात creativity is not a talent, it is a skill, it can be learnt and it can be developed.

क्रिएटिविटी किंवा सृजनशीलता ही केवळ बदलासाठी बदल म्हणून अट्टाहासाने करण्याची गोष्ट नव्हे. फावल्या वेळात करायचा उद्योग म्हणून ह्या गोष्टी कडे बघू नये. तर या मधून आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे. शिकता आलं पाहिजे. किंवा आपला वेळ,पैसा, श्रम वाचले पाहिजेत आणि स्वास्थ्य सुधारलं पाहिजे.

आपल्याला सृजनशीलता दैनंदिन जीवनात कशी विकसित करता येईल? खरंतर बऱ्याच प्रमाणात आपण ‘कल्पकता क्रिएटिव्हीटी’ वापरत असतो पण आपल्याला त्याची जाणीव नसते. जेव्हा आई-वडील मुलांच्या भन्नाट प्रश्नांची उत्तरे देत असतात तेव्हा ते क्रिएटिव्हिटीे वापरत असतात.आईला आपल्या मुलांना पौष्टिक पण तरी त्यांच्या आवडीचं खायला द्यायचं असतं तेव्हा सुद्धा ती क्रिएटिव्हीटी वापरत असते.आता या लाॅकडाऊनच्या काळात सण साजरे करण्यासाठी नातेसंबंध जपण्यासाठी आपण जे वेगवेगळे प्रयत्न करतो आहोत ही सुद्धा एक प्रकारची क्रिएटिव्हिटीच आहे.

सृजनशीलता जाणीवपूर्वक आणि सजगतेने वापरण्याचा प्रयत्न केला तर आपल्या दैनंदिन जीवनाला एक नवीन उत्साह आणि चैतन्य मिळू शकते. समजा तुमचं ऑफिस किंवा घर चौथ्या मजल्यावर आहे. तर तुम्ही आठवड्यातून एक दिवस वर जाताना लिफ्टने जा, खाली उतरतांना जिन्याचा वापर करा किंवा दोन जिने चढून जा, दोन मजले लिफ्टने जा. असे वेगवेगळे प्रयोग केले तर आपला स्टॅमिना पण वाढतो, व्यायाम पण होतो, लिफ्ट शिवाय राहण्याची सवय होते. गमतीचा भाग म्हणजे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर काय चालतं याचीही कल्पना येते.

सृजनशीलता अंगी बाणवण्यासाठी काही पद्धती सुचवलेल्या आहेत. त्यातली एक म्हणजे समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे, वस्तूकडे, परिस्थितीकडे कुतुहलाने बघणे.वेळ काढून त्या गोष्टीतली सुंदरता पहाता आली पाहिजेत त्याचा आनंद घेता आला पाहिजे.

आता आपण येता जाता रस्त्यांनी झाडं फुलं बघत असतो. पण किती वेळा आपण असा विचार करतो की अरे माती पाणी त्याच्यात पडलेले एक बीज आणि वरून येणारा सूर्यप्रकाश याच्यातून किती छान झाडे येते. मग कधी या झाडाची पाने हिरवी ,पिवळी, लाल येतात पण त्याला येणारी फुलं मात्र पांढरी असतात. त्या फुलांना एक वेगळा सुगंध असतो. काही झाडांना फुले येतात त्यावर फळे येतात आणि ती वेगळ्याच रंगाची असतात आणि त्यांची चव तर आणखीनच वेगळी असते . कधी थांबून सौंदर्यदृष्टी वापरून आपण या गोष्टीकडे बघतो का? कारण जेवढं आपण सृष्टीतलं- निसर्गातलं सौंदर्य वेळ काढून मन लावून बघू तेवढीचं आपल्यातली सृजनशीलता विकसित व्हायला मदत होते.

याचे एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे पु.ल. देशपांडे यांनी त्यांना भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे कुतूहलाने बघितलं प्रत्येक व्यक्तीकडे निर्मळ मनाने बघितलं आणि म्हणूनच 'व्यक्ती आणि वल्ली' 'बिगरी ते मॅट्रिक' 'असा मी असामी' अशा अजरामर साहित्याची निर्मिती झाली.

आता काही उदाहरणे अशी आहेत की जिथे आपण बहुतेक गोष्टी कर्तव्य म्हणून, आईबाबांनी सांगितले आहे म्हणून किंवा रूढी परंपरेने चालत आलेले आहेत म्हणून करत आलो आहोत.म्हणजे बघा, रस्त्यातून चालता-चालता पायातली चप्पलही न काढता किंवा स्कूटरवरून न उतरता देवाला 'उडता' नमस्कार करणारे अनेकजण आपल्या आजूबाजूला दिसतात. ( तुम्ही नाही ना त्यातले?). अरे बाबा पण दोन मिनिट थांब जरा. मंदिराच्या आत मध्ये जा. मुर्ती बघ, चेहर्यावरचे भाव बघ. आजूबाजूला दरवळणारा धुपाचा सुगंध, विविध फुलांनी- दागिन्यांनी सजवलेली देवाची मूर्ती बघ. घंटानाद ऐक आणि अगदी मनापासून श्रद्धेने काहीही न मागता देवासमोर हात जोड. हे सगळं मनात सामावून घेतलं तर एका मिनिटात मनामध्ये लगेच प्रसन्नता येते. त्यातला यांत्रिक पणा निघून जातो आणि मग देवाला नमस्कार करण्याची औपचारिकता न राहता एक गरज बनून जाते. मन प्रसन्न करण्याची सोपी पद्धत.

आता प्रत्येक गोष्टीकडे कुतुहलाने पाहायचं म्हणजे कुतूहल शक्तीसुद्धा आपल्याला जागृत करायला पाहिजे नाही का? आहे आहे आणि त्याच्या वर ही उपाय आहे. तो सोपा उपाय म्हणजे मुलांबरोबर वेळ घालवायचा. मुलांच्या भन्नाट कल्पनांमध्ये रमून जायचं. त्यांच्याबरोबर कोडी सोडवायची, त्यांच्याबरोबर गाणी म्हणायची. या गोष्टी आपण मोठे होतो तशा हळूहळू विसरतो. लहान मुलांबरोबर वेळ घालवला की आपलं मन त्यांच्यासारखाचं निरागस होत. आपल्याला एक चाकोरीबद्ध विचार करण्याचा सवय पडलेली असते. ती मोडायला मदत होते. मूल कसं प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलाने बघत . त्यांच्यासाठी ते जग नवीन असतं. तेव्हा ते पूर्णपणे त्याला एक्सप्लोर करू पाहत. अशाने आपणही प्रत्येक गोष्टीकडे नव्याने , नव्या दृष्टीने पाहायला शिकतो.

सृजनशीलतेचा विकास करायचा असेल तर आणखीन एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे आपल्याला शिकत राहायचं आहे आणि आयुष्यभर शिकतचं राहायचं आहे. आपण अगदी काहीही शिकू शकतो. एखादी नवीन कला, भाषा, रेसिपी. पण सतत काहीतरी नवीन शिकत राहायचं. बरं हे शिकणं एखाद्या क्लासमध्ये जाऊन गुरूकडे जाऊन औपचारिक पद्धतीने असेल तरी चालेल. पण दर वेळेला हे औपचारिक असलं पाहिजे असं नाही . मुळात शिकण्याची दृष्टी पाहिजे. कधी आपल्याला लहान मुलांकडून शिकता येतं. आपल्याकडे काम करणारी बाई ड्रायव्हर यांच्याकडून शिकता येतं. तर कधी आपल्या घरातील हक्काच्या सीनियर सिटिझन्स कडून शिकता येतं. कधी एकमेकांच्या चुकातून शिकता येतं तर कधी एकमेकांच्या यशातून शिकता येतं. सतत शिकत राहण्याची वृत्ती आणि आणि डोळसपणा मात्र गरजेचा आहे.अनिल अवचट आपल्या एका लेखात म्हणतात की 'माणसाचं शिकणं संपलं की त्यानी स्वतःचा फोटो घरात लावून त्याला दररोज हार घालावा. शिकणं संपलं म्हणजे माणूस जिवंत असूनही मेल्यासारखा असतो'.

एक अतिशय सहज करण्याजोगा उपाय असा आहे की आपण कुठलेही कौटुंबिक घरगुती निर्णय घेताना घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यामध्ये सामावून घेणे. म्हणजे समजा घरात रंगकाम काढायचा आहे किंवा घरामध्ये काही बदल करायचे आहेत तर सगळ्यांनी एकत्र बसून त्या गोष्टीवर चर्चा करणे आणि प्रत्येकाचे विचार शांतपणे ऐकून घेणे. प्रत्येकाला मन मोकळेपणाने बोलू देणे. त्यातून भन्नाट कल्पना निघतील ज्याचा आपण विचारही केला नव्हता. ज्याच्यामुळे काही वेळेला आपला पैसा वाचेल, प्रत्येकाला निर्णय घ्यायची, सगळ्या बाजूंनी सारासार विचार करण्याची सवय लागेल. यालाच मॅनेजमेंटच्या भाषेत visualisation and brainstorming म्हणतात. जे लोक ऑफिसमध्ये काम करतात ते ही गोष्ट आपल्या सहकाऱ्यांबरोबर सुद्धा करू शकतात. जेणेकरून सहकारी त्यांना नेमून दिलेलं काम सर्वसंमतीने योग्य साधन वापरून वेळेत पूर्ण करतील. आपण निर्णय घेतला आहे, आपलाही त्यात सहभाग आहे याची त्यांना सतत सकारात्मक जाणीव होत राहील. आणि ते आनंदाने उत्साहाने या गोष्टी करतील.

दुसरा गमतीशीर उपाय म्हणजे रोल प्ले करणे. एखाद्या दिवशी मुलांना स्वयंपाक करायला सांगणे किंवा त्यांना बाजारहाट करायला सांगणे दिलेल्या बजेट मध्ये दिवसाचा खर्च करायला सांगणे ह्यातून मुलांची क्रिएटिव्हिटी तर दिसेलच पण आपल्यालाही त्यातून काहीतरी नक्कीच शिकता येईल.

थोडक्यात पण महत्त्वाचं- आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आनंद, उत्साह, चैतन्य येण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने जीवन सुखकर व सुकर करण्यासाठी सृजनशीलतेचा आणि कल्पकतेचा जाणीवपूर्वक उपयोग करून घेता येतो.

तुमचे काही अनुभव /प्रयोग नक्की शेअर करा.

भारती दंडे - पूजा जोशी

पहिली माळ - घटस्थापना
https://www.maayboli.com/node/77105

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख .आता वाचला पण सुरुवात करायला कोणताही दिवस चांगला म्हणून आता ‌try करेन.