ग्राफिटी

Submitted by ज्येष्ठागौरी on 21 October, 2020 - 09:54

ग्राफिटी
काही वर्षांपूर्वी पुतणीच्या लग्नासाठी इंदोरला गेले होते, विमानतळाहून हॉटेलपर्यंतचा रस्ता बघताना, सर्व भिंती वारली चित्रकलेनी रंगवलेल्या पहिल्या आणि एकदम छान वाटलं. माझ्या लहानपणापासून अशा भिंतींवर मी फक्त "देवीचा रोगी कळवा,हजार रुपये मिळवा' किंवा "छोटे कुटुंब सुखी कुटुंब" अशी घोषवाक्यं बघितली होती.पण अशा कलात्मक भिंती पहिल्या नव्हत्या.नंतर कोणी कोणी भिंतींवर जाहिराती रंगवायचं. पण त्यात सुंदरता नव्हती ,नंतर आपल्या पंतप्रधानांनी अशा भिंतीवर चित्रं रंगवण्याबाबत आवाहन केलं आणि पुण्यातपण भिंती एकदम छान छान रंगायला लागल्या. बालभारतीजवळच्या भिंती तर मुद्दाम जाऊन थांबून बघितल्या.आभा भागवतची कल्पना फार गोड साकारली गेलीये,कल्पना आणि चित्रं दोन्ही फार गोड आहेत. तसंच पुणे बिनालेच्या मुलांनी मस्त रंगवल्यात भिंती,काही मुलांनी,बोहरी आळीमधली दुकानाची दारं इतकी बेफाट सुंदर रंगवली आहेत की ते बघायला दुपारी एक ते चार अर्थातच (पुण्यातली) दुकानं बंद असल्यानी बघायला येणारी मंडळी आहेत.हे चित्र(!) मला फार छान वाटतं. मी सहावी सातवीत असताना एक दुजे के लिए हा सिनेमा आल्यानं जिकडे तिकडे वासू सपना लिहिण्यात तरुण मुलांची कल्पनाशक्ती दुर्दैवानं संपली. मला शाळेत नाही कारण हुजूरपागेत कोणाची फार हिम्मत नव्हती सुदैवानं, पण कॉलेजमध्ये मात्र बाकावर करटकनी खरडून लिहिणाऱ्या मंडळींचं नेहमी आश्चर्य वाटत आलंय. रागही वाटतो खूप.असलं साहित्य काय कामाचं असंही वाटत राहतं आणि त्याहीपेक्षा कोणाचीतरी बदनामी होईल अशा तऱ्हेनं कुठंतरी काहीतरी खरडणं हे तर आणखी वाईट हे अगदी मनापासून वाटत राहिलं.
मी सर परशुरामभाऊ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्यावेळी तिथे होळी नावाच्या केतन मेहताच्या सिनेमाचं शूटिंग चालू होतं.माझा भाऊ मोहन हा केतनचा अगदी जवळचा मित्रअसल्यानं आणि रंगकर्मी असल्यानं होळी सिनेमाच्या बऱ्याच गोष्टींशी घट्ट बांधला गेला होता,म्हणजे त्याच्या अगदी सुरुवातीपासून तो त्यात सर्व बाबतीत पूर्ण सहभागी होता .ह्या सिनेमाचं बरंचसं चित्रीकरण स प महाविद्यालयात(मोहन माजी विद्यार्थी असल्यानं आणि तो कॉलेजचा हवा तो लूक स प ला असल्यानं) झालं होतं आणि हा सिनेमा हिंदीमध्ये असल्यानं थोडं वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीनं काही काळासाठी भिंतींवर खडूनी लिहलं गेलं. मोहन सांगायचा की प्रॉडक्शन विभागाच्या सहायक मुलांना हे काम दिल्यावर त्यांना एवढी मजा आली.त्यातलं एक भित्तीचित्र मला अजून लक्षात राहिलं आहे ,एक कसंतरी गाढवाचं चित्र आणि " पॅडी गधा है।" लिहिलेलं! म्हणजे युनिटमधल्या कोणावरतरी कोणीतरी काढलेला राग होता तो.त्यामुळे बाकी चित्र पुसली गेली तरी तो गधा काही पुसला गेला नाही.मी कित्येक दिवस तिथून जाताना तो बघून मनातल्या मनात हसायची. होळीच्या शूटिंगच्या आणि पॅडी गधा है च्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.एक ठिकाणी रस्त्यावरुन जाताना आमचा मित्र एका विशिष्ट ठिकाणी "आलो आलो" असं म्हणायचा. हा खेळ बराच काळ बघितल्यानंतर त्याला झापण्यात आलं की हा काय चावटपणा आहे तर त्यानी एका भित्तिचित्राकडे बोट दाखवलं की तिथे लिहिलं आहे की "अमुक तमुक तुम्हाला बोलावतो आहे"मग त्याला प्रतिसाद म्हणून हा आलो आलो म्हणायचा. सगळ्या मित्रमंडळींनी त्याचा हा अगोचरपणा शब्दशः हाणून पाडला मग.
हा मजेचा भाग सोडला तर मात्र भिंतींवर दुसऱ्याबद्दल काही खरडणे हे फार पळपुटेपणाचं लक्षण वाटतं मला.कोणाबरोबर कोणाची नावं लिहिणे ,काहीतरी असंसदीय लिहिणे या गोष्टी करणे हे फार खालच्या दर्जाचं वाटतं.हिम्मत नसली की असा खोडसाळपणा सुचतो माणसाला.बहुतेकवेळा रस्त्यावर पेंट कॅनच्या साहाय्याने लिहिलं जाणारं हे फक्त त्या व्यक्तीचा प्रस्थापिताविरुद्ध राग,रोष,चीड संताप व्यक्त करत असतं.मनात कुठंतरी खोल असलेला राग आणि असुरक्षितता अशी खदखदून बाहेर येत असते.अर्थात कधी कोणी केलेली मुस्कटदाबीही बाहेर येत असते.तर अशा ग्राफिटीशी (भित्तिचित्रकला) माझी ओळख मात्र मोहननी करुन दिली.तसं आमच्या घरी पत्र्याच्या माडीला जे लाकडी दार होतं त्यावर खुशाल लिहायची परवानगी होतीच होती.बापूंनी रंगीबेरंगी खडू आणलेले असायचेच.ते लाकडी पार्टिशन चित्र काढायसाठी किंवा शाळा शाळा खेळताना फळा म्हणून वापरलं जायचं.नंतरही बापूंनी नातवंडांना भिंतींवर चित्र काढायची पूर्ण परवानगी दिली होती.अपूर्वानी त्यात बूट पॉलिश हेही माध्यम वापरुन चित्र काढली होती.बापू स्वतः त्यांच्या खोलीतल्या लाकडी कापटांवर खडूनी चित्र काढायचे.काही लिहायचे.आमच्या फोनच्या बाजूला एक छोटा फळा होता त्यावर निरोप असायचे पण त्यावर एकदा कोणीतरी पिवळा काळे पट्टे असा एक निरोप लिहिला होता.अक्षर आमच्या घरातल्या कोणाचं नव्हतं पण येणार जाणाऱ्या कोणीतरी हा चावटपणा केला होता.हा शर्ट आहे का वाघ अशा चर्चा रंगल्या होत्या तेंव्हा आणि नवरा सांगतो त्याच्या आईनी एक फळा लावला होता घरी काही निरोप लिहिण्यासाठी ,नंतर मुलं मोठी झाल्यावर वेळ सांगून उशीरा घरी येण्याच्या वयात घरी ठरलेल्या वेळेपेक्षा उशीरा आली तर त्यांनी स्वतःहून तिथे आपली चूक फळ्यावर लिहायची.कोणी रागवायचं नाही पण चूक झाली याची जाणीव असावी म्हणून ,सुरुवातीला हे चाललं नंतर मुलं आणखी मोठी झाली आणि एकदाच लिहून ठेवलेल्या कबुलीजबाबावर बरोबरची खूण करायला लागली,सासूबाईंनी वैतागून फळा काढून टाकला. मोहननी एक फार छान प्रसंग सांगितला होता.फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये लहान मुलांच्या एका चमूचं शूटिंग चाललं होतं.चांगली पंचवीस तीस मुलं होती.काही कारणांनी शूटिंग थांबलं आणि मुलांची चुळबूळ सुरु झाली.मग मोहननी बाहेरुन रंगीत खडूंचं खोकं आणलं आणि संस्थेच्या आवारातल्या रस्त्यावर प्रत्येक मुलाला साधारण दोन फूट बाय दोन फूट असा चौकोन आखून दिला आणि खडू देऊन काढा हवी तशी आणि हवी तेवढी चित्रं असं सांगितलं.मुलं तास दोन तास तर रमलीच पण ती चित्रं इतकी बहारदार झाली की बाहेरुन लोकं येऊन येऊन एखाद्या प्रदर्शनासारखी ती बघून गेले.मला ही घटना ऐकताना इतकं छान वाटलं होतं की बस.कलेचा मुक्त आविष्कार तोही कुणाला त्रास न देता!पण मगाशी म्हणलं तसं ग्राफिटीशी माझी ओळख मोहननी करुन दिली. आमच्या वाड्याच्या काळ्याकुळकुळीत तुळयांवर तो पांढऱ्या खडूनी ,त्याच्या मोत्यासारख्या अक्षरात काय काय लिहायचा.कुठं उद्बोधक वाक्य कुठं संतवचनं. आईला त्याच्या अक्षराचं कोण कौतुक! आणि बापूंना त्याच्या ह्या कला अविष्काराचं! खूपदा तो काहीतरी मजेशीरही लिहायचा. म्हणजे कधी"कठोर परिश्रमाला पर्याय नाही" हे वाक्य जिथे सगळे जण पाय ताणून बसायचे त्या खोलीच्या तुळईवर असायचं किंवा आईला खूप बोलायला लागायचं तर स्वयंपाकघरातल्या तुळईवर "कामे पडली अनंत, पण वेळ मात्र मर्यादित म्हणून व्यर्थ गप्पांत कालक्षेप न कीजे।"असा संदेश द्यायचा.पण एकंदर तुळईवर लिहणं अवघड असायचं.खुर्चीवर उभं राहून डोळ्यात खडूची पूड पडत असताना लिहिणं ही परिश्रम होते.पण तो नेटानं ते करायचा. नंतर त्यानी अमेरिकेहून पेंट कॅन आणून त्याच्या खोलीच्या दारावर स्वतःचं नाव लिहिणे आणि चित्रे काढणे असे बरेच सफल प्रयोग केले.त्यामुळे ग्राफिटीकडे फक्त राग रोष ह्या पलीकडे कलेचं सादरीकरण हाही महत्वाचा भाग आहे हे कळलं.आपले विचार, आपल्याला असलेली माहिती दुसऱ्यांपर्यंत पोचणं किंवा कधी आपला आवाज पोचणं हेही ग्राफिटीमधून होतं हेही खरंच आहे.
शुभांगीनं सांगितलं ,मोहन नंतरही ग्राफिट लिहायचा, कविता लिहायचा भिंतींवर त्याच्या आवडत्या आरती प्रभूंच्या,कुसुमाग्रजांच्या... एक कविता त्यानं लिहून ठेवली होती
चार डोळे,
दोन काचा,
दोन खाचा।
यात कोठे प्रश्न येतो आसवांचा?
दुर्दैवानं त्यानंतर काहीच दिवसांत तो गेला मग शुभांगीनं त्यानी लिहून ठेवलेल्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळींशेजारी त्याचा फोटो लावला.ओळी होत्या
"ती शून्यामधली यात्रा, वाऱ्यातिल एक विराणी,
गगनात विसर्जित होता, डोळ्यांत कशाला पाणी"
मोहनला ग्राफिटी आवडायची, त्याच्या कलेला , कल्पनेला, जात्याच असलेल्या हुशारीला खूप बारीक बारीक शाखा होत्या.त्या ओळखून शुभांगीनं काय सुंदर आठवण जपली त्याची.तो उत्क्रांत होता असं वाटायला एक वेगळं कारण आहे त्यानी एक ग्राफिटी लिहून ठेवली होती.तो खरंच उत्क्रांत होता की त्याला 'आहे मनोहर तरी 'असं वाटत होतं,तोच जाणे.पण त्याच्या विलक्षण बुद्धीमत्तेची,वरच्या दर्जाची चुणूक ह्या ग्राफिटीमधून दिसते.
"Please stop the world,i want to get down..
आज त्याच्या ग्राफीटीची का आठवण आली माहिती नाही पण आली.
कधी विचार केला तर वाटतं की कधी कधी आपण स्वतःभोवती पक्क्या भिंती घालून घेतो, माणसांविषयी, नात्यांविषयी ,त्या भिंतींचं करायचं काय?अरुच्या एका मैत्रिणीनं सांगितलं की तिनं दुधी भिंत घातली आहे,बाहेरच्याला दिसणार नाही पण आतल्याला दिसेल.जर असेलच माझ्या मनात पक्की भिंत तर माझ्या भिंतींवर काढेल का कोणी ग्राफिटी? दाखवेल का कोणी राग रोष माझ्यावरचा?आणि आता असं स्वतः ला विचारावंस वाटतं आहे की ग्राफिटीतून व्यक्त व्हायचं झालं तर मी कुठलं चित्र काढीन?किंवा कुठलं वाक्य माझ्या व्यक्तिमत्वाचं प्रतिनिधित्व करेल?किंवा मला काय सांगावंसं वाटेल .अर्थात ग्राफिटी ही उत्स्फूर्त असायला हवी,तरीही विचार केला तर असं वाटतं काय येईल माझ्या मनातून?कुणाबद्दलचा राग बाहेर येईल का कुठली भीति किंवा अपूर्णता येईल?का एखादं छोटं मोठं दुःख किंवा गहिरी वेदना!का एखाद्या चुकीची खंत?का अगदी मनापासून झालेला आनंद ,लखलखणारा आत्मविश्वास,मृदू सौम्यशा भावना की तीव्र?एखादी अनवट कवितेची ओळ जीवघेणी की दासबोधतली एखादी थेट ओवी?एखादी भिंत मिळेल का कधी जिथं आपल्या चित्राला कोणी हसणार नाही,अक्षराला नावं ठेवणार नाही,कोणी तुलनात्मक बघणार नाही.माझ्या कलेच्या किंवा शब्दाच्या माध्यमातून मला कोणी परीक्षणार नाही.मिळेल का भिंत?मिळतील का माझ्या मनातले रंग?विचार, भावना, कल्लोळ, प्रपात व्यक्त करणारे?मिळेल का मला शांतता ,निबीड झाडी, गर्द निळाई,उंची ,खोली माझ्या मनातली?कुठली ओळ ,कुणाचे शब्द आठवतील की स्वतःचे सुचतील?माझ्या मैत्रिणीच्या सुचूच्या कवितांमधले एकदम अनवट वाटेवरचे शब्द की आरती प्रभूंची "सप्रेम द्या निरोप ,बहरुन जात आहे "अशा ओळी सुचतील का? चार ओळींच्या ओंजळीत आपल्या आयुष्याचं सार समेटून घेता येईल का मला?.खरंतर खूप आवडेल एक अगदी फाफटपासरा नसणारं आटोपशीर काहीतरी , अर्थगर्भ, थोडक्यात सगळं उमजून यावं असं काहीतरी...सापडेल का, एखादी अशी ग्राफिटी एकदम, अचानक....अनाहत...
©ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय खुपच मस्त लेख नेहमी प्रमाणेच. काल रात्री फोन वरून वाचला मग माझी फेवरिट ग्राफिटि लिहीली. ते स प कॉलेज चे उल्लेख मस्त आहेत. परत पुणेकर व्हावे वाटते तुमचे लेख वाचले की. खूप दिवसांनी आलात. आता होळी सिनेमा बघते.

मनापासून सर्वांना धन्यवाद! अमा नक्की बघा होळी, खूप चांगला काढलाय,मला वाटतं एलकुंचवारांची कथा आहे.

छान नेहमीप्रमाणेच!
'गली बॉय' मध्ये रणवीर सिंग कल्कीच्या ग्रुपबरोबर रात्री मुंबईतल्या रस्त्यांवरून भटकतो. ते सगळे अशी ग्राफिटी करत हिंडत असतात. हडकुळ्या मॉडेल्सच्या चित्रावर Feed me,
गोरं होण्यासाठीच्या क्रीमच्या जाहिरातीवर Brown and happy अशा प्रकारचं काही काही लिहितात. रणवीर सिंग लिहितो 'रोटी कपडा और मकान + इंटरनेट ' Happy

मी होळी सिनेमा दूरदर्शनवर बघितला तेव्हा मी अकरावी-बारावीच्या टप्प्यावर होते. त्या सिनेमातलं रॅगिंग बघून इतकी घाबरले की तत्काळ मुंबईबाहेर शिकायला जायचं नाही, असं पक्कं ठरवून‌ टाकलं. कल्याणहून सव्वा तास लोकलने प्रवास करून कॉलेजला जायचे आणि तितकाच प्रवास करून घरी येत असे. पण घरी राहून शिकले. हॉस्टेलला रहावं लागलं नाही.