थरार : भाग २

Submitted by सोहनी सोहनी on 15 October, 2020 - 07:58

थरार : भाग २

निसर्गावर प्रेम करण्याचा छंद आज माझं आयुष्य अश्या प्रकारे विस्कटून लावेल ह्याची मला थोडी तरी कल्पना असती तर मी आयुष्यभर स्वतःला त्यापासून निग्रहाने दूर ठेवलं असतं पण . . . . .

माझा वाढदिवस येणार होता म्हणून ते दोघे खूप उत्साही होते, ह्यावेळेस काहीतरी थरार करू असं दोघे म्हणत होते. नीरजने माझ्यासाठी सरप्राइज प्लान केला होता.
माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात स्मरणीय असा दिवस होईल अशी नीरजला खात्री होती.
त्यांचा काय प्लान होता मला त्याची काहीच कल्पना नव्हती फक्त एवढंच सांगितलं होतं की मला संध्याकाळी नीरज कडे राहायचं आहे त्यामुळे हॉस्टेल वर तशी कल्पना देऊन ठेव.

वाढदिवसाच्या आदल्या रात्री नीरज कडे जेवण उरकून रात्री अकराच्या आसपास आम्ही तिघेही निघालो.
कुठे? का?? घरात कोणाला सांगितलं की नाहीस?? इतक्या रात्री कुठे नेतयेत तुम्ही मला??
हजारो प्रश्न विचारत आम्ही दुचाकीवर जंगलात आत आत चाललो होतो.
ते दोघे फक्त हसत होते, बरंच अंतर पुढे आल्यावर त्यांनी गाडी थांबवली, एव्हाना मी प्रश्न विचारायचं बंद करून ते नेतील तिथे जायचं म्हणून गप्प बसलो.
पुढे थोडं पायी चाललो आणि अचानक दोघांनी टॉर्च बंद केले आणि अजून पन्नासेक पाऊले मला डोळे बंद करून चालावी लागली अंधारात देखील, आणि अचानक दोघेही जोरात ओरडले ' हॅपी बर्थडे'
समोर अचानक लाईट पेटली, लहानशा टेंट मध्ये नीरज होता आणि माझा हात पकडुन केदार.
ताडपत्री बांधून टेंट उभारला होता, आजुबाजूच गवत काढून नीट बसायला जागा केली होती, खायला बरंच काही दिसतं होतं, चार्गिंगचे तीन चार मोठे बल्ब लावल्याने खूप उजेड पडला होता.
तर हा होता सरप्राइज...
मी स्वतःशीच हसलो.
मी चौफेर नजर फिरवली, चारही बाजूस मोठाली झाडे आम्हा तिघांकडे कमरेवर हात ठेवून वाकून पाहत होती, त्यांच्या काळया सावल्यांना न जुमानता चंद्र आपला प्रकाश आम्हाला पुरवत होता.
हे रान नीरजच्या गावाला लाभलेलं होतं, ह्या जागी या आधी मी कधीच आलो नव्हतो. त्यामुळे इथल्या कोणत्याच वस्तूची जागेची मला ओळख नव्हती. दिवस असता तर नीट परीक्षण तरी करता आलं असतं.
मला आधी कल्पना दिली असती ह्यांनी तर मी रात्रीच्या ऐवजी नक्कीच दिवसभर येऊन इथे राहायला हट्ट केला असता.

' एक थरारक रात्र जंगलात' कसा वाटला सरप्राइज?? नीरज जोरात म्हणाला त्याच्या आवाज जोरात घुमला. मी दोघांकडे पाहतच राहिलो
तू लाख फिरला असशील रे जंगलात पण असा थरार कधी केला नसेल, नाही??
केदार माझ्याकडे पाहत हसत म्हणाला.

मला त्यांना तोंडावर म्हणायचं होतं की हा निव्वळ मूर्खपणा आहे पण त्यांनी खूप मेहनत घेतलेली दिसत होती म्हणून मी गप्प बसलो.
मी इतक्या रात्री कधी जंगलात थांबलो नव्हतो, मग मीच विचार केला काय हरकत आहे एक रात्र काढायला? नवीन अनुभव गाठीला येईल.
ते दोघे वस्तूंची काहीतरी हलवा हलव करत होते आणि मी जंगलातल्या रात्रीच्या निरवतेचा अनुभव घेऊ लागलो.

दिवसाची प्रसन्न शांतता आणि रात्रीच्या अगम्य गूढ निरवतेचा फरक प्रत्येक श्वासाला जाणवत होता. मित्रांसारखे वाटणारे हि झाडं ह्या क्षणाला गूढ भासत होती.
हि हवा, हा पाखरांचा आवाज, हा एकांत नेहमीच आपल्याला हवाहवासा वाटणारा निसर्गाचा सहवास ह्या गोष्टींना मन ह्या क्षणाला स्वीकारत नाहीये हे मला प्रकर्षाने जाणवलं.
देव जाणो पण माहीत नाही का?? ही शांतता अंगावर धावून येत होती, जराशी भीती मनावर चढणार तेवढ्यात त्या आवाजाने माझं मन वेधलं गेलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults