डिप्रेशन .. जगण्याचा कंटाळा

Submitted by राधानिशा on 14 October, 2020 - 11:16

हल्ली मधूनमधून किती दिवस राहिले असावेत असा विचार मनात येतो .. 20 वर्षं धरली तर 7300 दिवस .. 40 वर्षं धरली 14600 दिवस ..

40 वर्षं किंवा 20 वर्षं म्हटलं की धडकीच भरते .. त्यामानाने दिवस बरे वाटतात .. तेवढाच काळ असला तरी .. 40 वर्षं म्हणजे साडेतीन लाख तास होतील .. नको .. दिवसच बरे , एकेक दिवस तसा पटकन संपतो .. तास खूप वाटतात ..

आतापर्यंत 25 वर्षं म्हणजे 9100 च दिवस झाले आहेत फक्त आणि खूप .. खूप .. म्हणजे खूपच जगून झाल्यासारखं वाटतं . खूप बघितलं , खूप अनुभवलं , खूप सोसलं असं वाटतं .. खरं तर जगाच्या दृष्टीने ज्याला सोसणं म्हणता येईल तसं काहीच वाट्याला आलं नाही ... तरी इच्छा नसलेले खूप अनुभव आले असं वाटतं , जे चूझ करायचं स्वातंत्र्य असतं तर नक्कीच निवडले नसते अनुभवण्यासाठी ...

आणखी आयुष्य अनुभवण्याची हौस संपल्यासारखी वाटते .. भरपूर जगून झालं , आता पुरे झालं तरी चालेल असं वाटतं .. जनरल आयुष्य चांगलं चाललेल्या लोकांमध्ये जी जगण्याची असोशी असते , आशा , आकांक्षा , इच्छा , त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याची तयारी असते - ह्या सगळ्याच गोष्टींची क्वांटीटी मनात खूप कमी झाल्यासारखी वाटते . शिवाय पुढचीही भीती वाटते .. एवढ्याशा आयुष्यात इतका मनस्ताप देणारे अनुभव आले , आता डोळे मिटण्यापूर्वी आणखी काय काय बघावं लागणार .. पुरेसं जगून झालं आहे , आणखी जगावं लागलं नाही तर देवाचे उपकार होतील असं वाटणं हे नॉर्मल समजलं जातं नाही ... लाईफ इज गॉड्स गिफ्ट असे क्वोट्स वाचले की आयरॉनीने हसू येतं .. घे बाबा तुझं गिफ्ट वापस प्लिज ..

70 - 80 - 90 वयाच्या माणसांचेही शक्य तेवढे उपचार केले जातात .. अनेकदा त्यांच्या विरोधाला भीक न घालता .. आजारपण सहन करत , सतरा पथ्यं पाळत का होईना त्यांना जगायला लावायचं असतं .. कारण आम्हाला तुम्ही अजून हवे आहात हे कारण असतं .. शिवाय बऱ्याच केसेस मध्ये त्या पेशंटलाही एवढ्यात मृत्यू नको असतो .. they enjoy life and it's great and everything . तेव्हा 25 व्या वर्षी पुरे , खूप जगून झालं म्हटलं तर डिप्रेशनच्या गोळ्या आणि कौन्सिलिंग सुरू करण्यापलीकडे काही होणार नाही .. जगणं पुरे असं वाटणं ही कन्सेप्टच समजू शकत नाही ... बहुतेक ती हेल्दी माईंडचं लक्षणही नाही ...

हा डिप्रेशनचा परिणाम आहे की कंटाळा आहे की नुसताच आळस आहे माहीत नाही .. डिप्रेशन बरंच कमी झालं आहे .. रोज रडू केव्हाच बंद झालं आहे .. क्वचित आठवडा पंधरवड्यातून एखाद दुसरेवेळीच रडू येतं ... दिवस मजेत जातो , कसा संपला ते कळत नाही ... घरातली कामं करते , वाचते भरपूर .. म्युजिक ऐकते .. सिरिअल्स बघते .. आयुष्य छान चाललं आहे म्हणायला कोणतीच आडकाठी नाही ... पण existence आणि non-existence अशा दोन चॉइसेसचा विचार केला तर नॉन एक्सिस्टेन्स नेहमीच प्र चं ड अपिलिंग वाटतो ... Oh , how much I would love to rest .. सतत अखंड चालू असलेले विचार नाहीत , आठवणी नाहीत , अस्तित्वाची जाणीव नाही .. शांत झोप .. स्वप्नं सुद्धा नसलेली .. अस्तित्व संपूर्ण पणे पुसलं गेलेलं असेल या विश्वाच्या पटावरून ... its beyond tempting ..

लोक आजारी पडल्यावर जिवंत राहण्यासाठी किती आटापिटा करतात जीवाचा ... wow .. मला जर डॉक्टरांनी सांगितलं , " सॉरी अब आपके पास सिर्फ दो ही महीने बचे है , हम कुछ नहीं कर सकते " तर मला लिटरली हर्षवायू होईल ...

आत्महत्या करण्याची हिंमत नाही .. जगण्याचा मोह असा नाही पण नॉन एक्सिस्टेन्सची काही खात्री नसल्याने .... पुनर्जन्मावर विश्वास आहे ... त्यामुळे धडधाकट शरीर दिलं होतं ते टाकून आलीस , जा आता हात - पाय किंवा डोळे नसणं कसं असतं ते अनुभवून बघ म्हणून जन्म मिळाला तर काय घ्या .... किंवा चांगली परिस्थिती सोडून आलीस जा आता दारिद्र्य , संधीचा अभाव कसा असतो ते अनुभव म्हणून पोटाला अन्न नसलेल्या , शिक्षणाची संधी नसलेल्या घरात पाठवलं तर काय करणार ... 18 - 20 ला लग्न आणि 2 पोरं पदरात .. ( shudders ) त्यापेक्षा आहे ते सोन्यासारखं आयुष्य म्हणता येईल .... पण नॅचरल डेथ आली तर वाईट ठिकाणी पाठवणार नाहीत .... त्यामुळे नॅचरल रिजन्सनी पटकन काहीतरी होऊन जीव जावा अशी एक इच्छा मनाच्या कोपऱ्यात असतेच कायम .....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ radhanisha ---
तुमच्या पोस्टच्या परिच्छेदाप्रमाणे लिहीतेय.
काही प्रश्न येतील त्याची उत्तरे जाहीर नको पण स्वतःपुरती शोधून बघा जमलं तर....
तुम्ही लिहीलेल्यावरून अंदाज बांधून प्रतिसाद दिलाय.
जे लागू पडत नाही / मी चुकीचा अर्थ लावलाय ते सोडून द्या प्लीज. त्याचा भुंगा मनात घेऊ नका.

तुमचा त्रास खरा आणि तुमच्यासाठी खूप असह्य आहे हे मान्य करूनही;
१,२ ---
अशा कॅल्क्युलेशनमध्ये का वेळ घालवायचा? उरलेले आयुष्य काही तास / दिवस/ वर्षे हे कळले तरी काय कराल? तितका काळ 'जायची' वाट पहाल कारण त्या काळात काय करायचे / करायला हवे याचा विचारच उमटत नाहीये सध्या मनात.

ओके धरून चालू २० वर्षे. आत्महत्या करायची नाहीये. २० वर्षे काढायची तर आहेत. मग या काळात मी काय करेन, काय करायला आवडेल, काय करणे गरजेचे आहे हा विचार केला तर? २० वर्षांनी शेवटचा श्वास सोडताना अपराधी न वाटता / अरे हे राहून गेले न वाटता, well done radhanisha असे स्वतःलाच म्हणू शकाल असे काय करायला जमेल / आवडेल? याची यादी कराल का?

२० वर्षे उरावरचा दगड. ठीक. १ वर्ष धरा. तर १५ ऑक्टो २०२१ पर्यंतचा प्लॅन बनवायचा आणि अमलात आणायचा. १६ ऑक्टो २०२१ उजाडलाच तर पुढचा प्लॅन करता येईल. हा प्लॅन सुधारता / वाढवता येईल. मग १७ ऑक्टो २०२२.

प्लॅन काहीही असू शकतो. रोज एक याप्रमाणे ३६५ आवडीचे पदार्थ खाईन. आठवड्याला एक पुस्तक वाचून संपवेन. ५० होतील १६ ऑक्टो २०२१ पर्यंत. मग आपोआप महत्त्वाचे काय ते प्लॅनमध्ये वरची जागा पटकावेल. कारण वेळ लिमीटेड धरलाय. सध्या तुम्हाला अनलिमीटेड काळाचे आखीव वेळापत्रक बनवायचे दडपण येतेय बहुतेक. बाकी काही नाही.
बघा जमतय का.

थँक यू , रीया , जिज्ञासा , सीमंतिनी , कारवी ... सगळ्यांनाच ज्यांनी इतके एनकरेजिंग आणि समजून घेणारे प्रतिसाद दिले .. जज न करता ... काही वर्षांपूर्वी ज्या समुपदेशकांकडे गेले होते ते इतके accepting नव्हते .. काहीतरी नवीन शिकायचा क्लास लाव , बाहेर पड अशी सक्तीच करण्याचा प्रयत्न करू पाहत होते .. म्हणजे आत जे काही चाललं आहे ते आधी सॉर्ट आऊट करण्यासाठी काहीही सूचना न देता , मी बाहेर पडले की सगळं आपोआप बरं होईल असं त्यांना वाटत होतं की काय कोण जाणे .... सोशल ऍन्कसायटी आहे , पीपल ड्रेन मी , ओळख करून घेणं , मैत्री वाढवणं , जनरल संवाद हे सगळं एक्जहॉस्ट करू लागलं होतं ... डिप्रेशनने मानसिक शक्ती मुळातच कमी झालेली असताना बाहेर पडून लोकांत मिसळणं त्यावेळी अशक्य होतं ... पण त्यांचा आग्रहच होता ... त्यांनी मला सुधारण्यासाठी प्रयत्नच करायचे नाहीत असा आरोप केला होता जवळपास ... त्यांच्याकडे परत गेले नाही .... आता कधीतरी बाहेर पडेन , काहीतरी करेन .. सक्ती किंवा नाईलाज म्हणून नाही तर आवडीने .. पण त्यावेळी ती इच्छा अजिबात नव्हती ... पॉजिटिव्ह विचार कर एवढा साधा आणि सुंदर सल्लाही त्यांनी दिल्याचं आठवत नाही ...

अर्थात त्यांना का दोष द्या ... पॉजिटिव्ह विचार करावा हे काही रॉकेट सायन्स नाही .. आपलं आपल्याला कळायला हरकत नसावी .... पण काहीवेळा दुसऱ्यांनी समजून घेऊन तीच गोष्ट सांगितली तर अधिक पटते , सोपी वाटते .. त्यासाठी थँक यू .

बाकी ह्या मूळ पोस्ट मधले विचार हे अर्थातच अनस्टेबल मनाच्या अवस्थेतून आलेले आहेत .. कदाचित ती अवस्था माझ्यासाठी पर्मनंट किंवा नॉर्मलही असेल .. तडा गेलेल्या काचेतून सुंदर जगही विकृत दिसतं तशी ही विकृती असेल .. वाईट अर्थाने नाही .. प्रकृतीत ( नॅचरल अवस्थेत ) निर्माण झालेला बिघाड ही विकृती या अर्थाने .. जगण्याची इच्छा ही नॅचरल अवस्था असेल तर मृत्यूची इच्छा ही ऍबनॉर्मल म्हणता येईल कदाचित ... कदाचित जगण्याची इच्छा निर्माण करणारी रसायनं , एनझाईम्स माझ्या शरीरात पुरेशी निर्माण होत नसतील .. कदाचित विचारांचा गुंता असेल .. किंवा चक्क खरी विरक्तीही थोडीशी आली असेल .... किंवा हे सगळं थोडं थोडं .. I don't know .. यातून नकळत आत्महत्या किंवा मृत्यू romanticize किंवा उदात्तीकरण किंवा जस्टिफाईड करण्याचा प्रयत्न झाला असेल तर ते अनस्टेबल व्यक्तीचं बोलणं म्हणून दुर्लक्ष करावं ... जे स्वतः नाजूक मनस्थितीत असतील त्यांनी .

@ radhanisha ---
३,४ ----
गेलेल्या 9100 दिवसांनी तुम्हाला काहीच दिले नाही का? रिकामी ओंजळ, तहानले मन ठेवले? चांगले घर, प्रेम करणारी माणसे, जवळच्या मैत्रिणी, सावरणारे हात, मनाला / विचाराला वळण देणारे शिक्षण, गरजेचे अन्न-वस्त्र-निवारा --- मिळालेय ना? पोटाची आग पाण्याने शमवून पांघरूण नाही म्हणून अंगाची जुडी करून झोपलाय कधी? सहज मिळाले पण फुकट नव्हते ते. ज्यांनी ते दिले त्यांनी कष्ट केलेच त्यासाठी. हिशोब मांडताना जमा आणि खर्च असे दोन्ही कॉलम भरतात ना. जमा मोजायची राहून जातेय की तुमची. म्हणून फक्त वजाबाकी दिसतेय का?

खूप बघितलं , खूप अनुभवलं , खूप सोसलं असं वाटतं .. खरं तर जगाच्या दृष्टीने ज्याला सोसणं म्हणता येईल तसं काहीच वाट्याला आलं नाही ... >>>>>

हे दोन्ही तुम्हीच म्हणताय. सोसणं, असह्य होणं याचे threshold प्रत्येकाचे वेगळे असतात. मान्य. तुमचं एक मन म्हणतय मी सोसलं दुसरं म्हणतय इतकं काही नव्हतं हां.... आणि तुमचा झालाय पेन्ड्युलम. बाहेर पडून जग पाहिल तर आपल्याला आपलच हसू येतं की आपण कशा कशाचा बाऊ केला. मीही केलय हे. सगळे करतात. समाधानी व्हायचं असेल तर आपल्या दु:खांची जाणीव ठेवावी पण त्यांच्यावर magnifying glass धरून ती वेगवेगळ्या कोनातून निरखण्यात काही हाती लागत नाही. त्या अडचणी आपल्याला नकळत पुढेच नेतात, त्यावेळेपुरती ठेच लागली तरी.

तरी इच्छा नसलेले खूप अनुभव आले असं वाटतं , जे चूझ करायचं स्वातंत्र्य असतं तर नक्कीच निवडले नसते अनुभवण्यासाठी ... >>>>>

कल्पना नाही काय अनुभवलत. कदाचित असेलही विदारक काही. त्याबद्दल चिरफाड नको.
पण चूझ करायचं स्वातंत्र्य आहे + शहाणपण आहे + अनुभव आहे --- असे असले तरीही कधीतरी विपरीत दान पडते. ना निभावता येत ना सोडून देत. ना तक्रार करता येत कारण चूझ करणारे आपणच ( सगळ्या सल्ल्यांना डावलून).
मग जे आपसूक अनुभवाला आले त्याचे खापर नियतीवर / योगायोगावर तरी फोडता येते की आपल्याला.

पिठात कोंडा, भाताला तूस, जेवणाला खरकटे सोबतच येते. मूळ अनुकूल किती असते आणि सोबत नकोसे किती प्रमाणात येते? प्रयत्न न करता चालून आलेली संधी, अपेक्षित नसलेले यश, न मागता मिळालेली मदत, सातत्याने मिळणारा कोणाचा सपोर्ट या अनुभवांना forefront देऊन पहा?

आणखी आयुष्य अनुभवण्याची हौस संपल्यासारखी वाटते .. भरपूर जगून झालं , आता पुरे झालं तरी चालेल असं वाटतं .. जनरल आयुष्य चांगलं चाललेल्या लोकांमध्ये जी जगण्याची असोशी असते , आशा , आकांक्षा , इच्छा , त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याची तयारी असते - ह्या सगळ्याच गोष्टींची क्वांटीटी मनात खूप कमी झाल्यासारखी वाटते . शिवाय पुढचीही भीती वाटते .. >>>>>

कोणाचही 'जनरल' 'चांगल' नसतं start to finish. कुठे ना कुठे खाचखळगे पार करावेच लागतात. कधी बालपणी आबाळ, शिक्षणात अडचणी, नोकरी-व्यवसायात तडजोड / मानसिक त्रास, आर्थिक ओढाताण, आरोग्याच्या तक्रारी, वैवाहिक आयुष्य / मुले यात असमाधान, कर्तव्ये उत्तम पार पाडून श्रेय डावलले जाणे, सारे काही असून जिवलग गमावणे....... प्रत्येकाला असते. कमी/जास्त, आधी/उशीरा. पण असतेच. कोणी हातपाय गाळते, कोणी निभावते, कोणी स्वतः सावरून दुसर्‍यांना उमेद देतात.

बहुतेक बालपण, शिक्षण, होईस्तोवर तुम्ही खूप 'जपल्या' गेलात. त्याची सवय झालीये का? खूप आश्वस्त, सुरक्षित उबदार, सगळ्या शॉक अ‍ॅब्सॉर्बर सहितच जग.... आता स्वतंत्र, स्वावलंबी आयुष्याच्या प्रवाहात पडायची, स्वतः हात मारायची वेळ आल्यावर जमेल की नाही या कल्पनेनेच भीती वाटतेय का? मग सोपा मार्ग म्हणजे सुखावह भूतकाळ कवटाळून इथेच थांबलो तर unpredictable, demanding, कृतीचे स्वातंत्र्य देणार्‍या आणि जबाबदारीही टाकणार्‍या फेजकडे जावेच लागणार नाही. असा सोयीस्कर मार्ग सुचलाय?

पण असं नसतं.... सुरूवातीच्या थोड्या धडपडण्यानंतर जमायला लागतंच हळूहळू..... स ग ळ्ञां ना. तुम्हालाही जमेल. पांगुळगाडा सोडून चालायला लागलेल्या बाळाच्या गुढग्यात डगमगण्यासारखे आहे हे. आठवडाभर फार तर. मग चालणे, पळणे याचे प्रोग्रामिंग निसर्गाने केलेले असते. Run, Execute, Edit, Re-run ही आपली जबाबदारी.

एवढ्याशा आयुष्यात इतका मनस्ताप देणारे अनुभव आले , आता डोळे मिटण्यापूर्वी आणखी काय काय बघावं लागणार .. पुरेसं जगून झालं आहे , आणखी जगावं लागलं नाही तर देवाचे उपकार होतील असं वाटणं हे नॉर्मल समजलं जातं नाही ... लाईफ इज गॉड्स गिफ्ट असे क्वोट्स वाचले की आयरॉनीने हसू येतं .. घे बाबा तुझं गिफ्ट वापस प्लिज .. >>>

इतका मनस्ताप देणारे अनुभव...... इतका म्हणजे कितका? मनस्ताप म्हणजे? मला नाही माहीत. रिलेटिव्ह आहेत या गोष्टी. बाऊ कराल तितक्या घाबरवतील. पायाखाली ठेवाल तर काबूत राहतील. येऊ देत मनस्ताप देणारे अनुभव. काही होत नाही. मनस्तापाचा कोटा संपला असेल मग एव्हाना. पुढे समाधान उभे असेल. आणि तुम्ही दार लावून घेताय....?

वाढदिवसाला गिफ्ट घेतो ना? की उघडून बघून "श्या हे काय दिलय? घे बाबा तुझे परत" म्हणतो आपण? आपण रिटर्न गिफ्ट देतो. खाऊ कोल्ड्रिंक देतो. द्या की देवाला काहीतरी छान कृती परत. ज्यामुळे त्यालाही त्याच्या निर्मीतीचा आनंद मिळेल. निसर्ग / देव (जे काही मानत असाल ते) उगीचच आणि निरूपयोगी काहीही बनवत नाही... कधीही.

तुम्हीही त्याचे विचारपूर्वक डिझाईन केलेले प्रोडक्ट आहात एका उद्देशाने, काही कार्य घडवून आणण्यासाठी. फक्त तो उद्देश आणि कार्य तुम्हाला जाणवलेले नाही अजून. तुमच्या असण्याचे कारण आणि मूल्य याकडे लक्ष नाही गेलेय तुमचे. म्हणून स्वतःला worthless समजताय. ते शोधले / मिळाले / जाणवले की आयुष्याला दिशा, वेग आणि उत्साहही मिळेल.

***********

हो , खूप जपलं आहे .. कधी भाजी सुद्धा खरेदी करून आणू दिली नाही आजवर .. कधी लाईट बिल भरायला पाठवलं नाही किंवा अकाऊंट मध्ये पैसे भरायला ... 10 वी पर्यंत गॅस पेटवू दिला नाही साधा .. अजून खूप जपतात .. आता मलाही खाच खळगे नकोच वाटतात .. नवीन अनुभवांची थोडी भीती किंवा जमणार नाही असं वाटत राहतं ...

आलं थोडं लक्षात....
तुम्हाला मार्गदर्शक पुरेसा समजूतदार नाही मिळाला....

आता उशीर झालाय ....झोपा तुम्ही शांत
उद्या फ्रेश डोक्याने आनंदिनी या मायबोलीकर आयडीनी ----- भीती / anxiety वर लेखमाला सुरू केली आहे नुकतीच ती वाचा. मी २ लेख वाचले होते, अजून आले का माहीत नाही. पूर्ण नसावी झाली.
त्या मानसोपचार तज्ज्ञच आहेत. त्या लेखातून तुम्हाला काही दिशा मिळेल. त्यांच्याशी संपर्क करता येईल वाटल्यास नंतर.

वेळ गेल्याने प्रॉब्लेम मुरलाय. थोडा वेळ लागेल पण +ve note वर सुटेल असे मनातून वाटतेय मला.
शुभेच्छा. झोपा शांत.

मलासुद्धा असे कित्येकदा वाटले आहे, फार पुर्वी मूड स्विंगचा सततचा त्रास होत असे. स्वतःकडे बारकाईने पाहून, स्वतःबद्दल लिहून सकारात्मक बदल झाला. पुढच्या सेकंदापासून नव्याने सुरूवात करायची आहे असा विचार करत रहायचा. झाले ते बदलणे शक्य नाही तर त्यावर विचारही करायचा नाही असे ठरवून टाकले. जगणे निरर्थच आहे कसे तरी अर्थ जोडत जायचे, खोटे का होईना रंग भरत जायचे. जितके होईल तितके मन गुंतवून घेतले म्हणजे तेवढ्यापुरता अर्थ लाभत जातो. मी स्वतः जिज्ञासांनी सुचवलेल्यापैकी काही गोष्टी करत असतो. उगाच कुठल्या तरी अज्ञात प्रदेशात गुगल मॅपवर भटकून यायचे, एखादी जुनी कथा, कविता वाचायची, कशात तरी रमायचे. राधानिशा, कृपया वेडेवाकडे विचार येत असतील तर कळकळीचा सल्ला की उपचार घ्या. जवळच्या कुणाजवळ मन मोकळे करा.

नवीन Submitted by कारवी on 16 October, 2020 - 00:03....... छान. आश्वस्त करणारा प्रतिसाद.

radhanisha,पुंबा, बाकीचे कराच.त्यासोबत mandla chitre काढायची किंवा रंगवत बसा.एका कौन्सिलरचे नातलग स्त्रीला केलेली सूचना आहे.

OMG सकाळीच मनात हा विचार आला की आता बस झालं जगून आणि तुमचा लेख आला आणि तसं मी सांगतच असते की मी खूप सुखात असताना देखील देवाने नेलं तरी काही वाटणार नाही. खरंच जेव्हा पाहिजे तेव्हा हे जग सोडून जायला पाहिजे होतं...

OMG सकाळीच मनात हा विचार आला की आता बस झालं जगून आणि तुमचा लेख आला आणि तसं मी सांगतच असते की मी खूप सुखात असताना देखील देवाने नेलं तरी काही वाटणार नाही. खरंच जेव्हा पाहिजे तेव्हा हे जग सोडून जायला पाहिजे होतं...

Life is never easy. Life is a risk. Take it as a challenge. Because there is no option, no shortcut.
कोणाच्या ओळी माहिती नाही पण मला आवडल्या त्या खाली देतेय.
असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर .

>> असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर

वाह! खूपच प्रेरणादायी.

सतत कामात गुंतवून ठेवणे हा सुद्धा डिप्रेशनवर मार्ग असू शकतो. इतके कार्यमग्न, इतके कार्यमग्न राहायचे कि विचारू नका. अशी अवस्था आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली असेल. फक्त आणि फक्त आपल्या प्रोजेक्टचेच विचार असतात डोक्यात अहोरात्र. इतर अनावश्यक गोष्टीवर विचार करायला फुरसत नसते, डोक्यात जागा पण नसते. इतरांचे माहित नाही. पण मलातरी तसे जगणे अन्य पर्यायांपेक्षा खूपच छान वाटतं.

अर्थात डिप्रेशनहा बहुआयामी आजार आहे. त्याची कारणमीमांसा ज्या त्या व्यक्तीनुसार बदलते (उदाहरणार्थ, दीर्घ/दुर्धर व्याधीमुळे आलेले डिप्रेशन). त्यामुळे कामात खूप व्यस्त होणे हा डिप्रेशनवर नामी उपाय आहे असे सरसकट म्हणता येणार नाही. पण तो एक उपाय आहे असे वाटते मात्र जरूर. काही न काही प्रोजेक्ट हाती घेणे. छोटा असो वा मोठा. पण सतत त्यात व्यस्त राहणे.

@अतुल- हो का , मी पूर्वी कधीतरी वहीत लिहून ठेवली होती नेट वरून , विंदा करंदीकरांच्या नावाने

@ radhanisha ---
तुमच्या पोस्टच्या परिच्छेदाप्रमाणे लिहीतेय.
काही प्रश्न येतील त्याची उत्तरे जाहीर नको पण स्वतःपुरती बघा.

तुम्ही लिहीलेल्यावरून अंदाज बांधून प्रतिसाद दिलाय.
जे लागू पडत नाही / मी चुकीचा अर्थ लावलाय ते सोडून द्या प्लीज. त्याचा भुंगा मनात घेऊ नका.

तुमचा त्रास खरा आणि तुमच्यासाठी खूप असह्य आहे हे मान्य करूनही;;

-५-
70 - 80 - 90 वयाच्या माणसांचेही शक्य तेवढे उपचार केले जातात .. ... .. शिवाय बऱ्याच केसेस मध्ये त्या पेशंटलाही एवढ्यात मृत्यू नको असतो .. they enjoy life and it's great and everything . तेव्हा 25 व्या वर्षी ,... .. जगणं पुरे असं वाटणं ही कन्सेप्टच समजू शकत नाही ... बहुतेक ती हेल्दी माईंडचं लक्षणही नाही ... >>>>>

७०-८० वर्षांच्या माणसांचे लौकिक अर्थाने 'जगून' झालेले असते. आयुष्याच्या सार्‍या फेज पार केलेल्या असतात, कडू-गोड रस चाखलेला असतो आणि आसक्तीही निर्माण होते थोडीफार. तिकडे बघूच नये. २५ वय हा उमेदीचा काळ. पूर्ण जोमाने तुमच्या गुणांचा कौशल्यांचा कस लावल्याशिवाय, त्यांना स्वतःसाठी, जगासाठी वापरल्याशिवाय वाया घालवणार का?

भले एक का होईना वैशिष्ट्य असणार तुमच्यात..... उमलवा त्याला...तुम्ही अनुभवा....जगाला दिसू दे. या स्टेजला जगणं पुरे असं वाटणं हे अनहेल्दी माईंडचं नव्हे तर गोंधळलेल्या मनाचे, स्वतःच्याच उलटसुलट विचारांच्या गुंत्याचे लक्षण आहे फक्त.

८ ऑक्टोबर २०२०चा लोकसत्ता -- पान ७ -- व्यक्तिवेध पहा. डॉ आर्थर अ‍ॅशकिन. ऑप्टिकल ट्वीझर या संकल्पनेचे भाकित त्यांनी १९७० साली केले आणि पुढे हा शोध प्रत्यक्षातही आणला. सहभागी शास्त्रज्ञाला त्यासाठी १९९७ साली नोबेल मिळाले. यांना मूळ कर्त्याला २०१८ मध्ये...तेव्हा ते म्हणाले 'जुन्या गोष्टी साजर्‍या करायला मला वेळ नाही'.

वादविवाद नाही, मी पैला होतो नाही, मी पुरस्कार नाकारतो नाही.... ते नवा शोधनिबंध लिहीत होते. वय वर्षे ९६ फक्त. मी शहानिशा केली नाही पण हे खरे असेल तर किती निष्ठा कामावर आणि किती विश्वास स्वतःच्या क्षमतेवर....
हे वेडे पीर. त्यांची आपली तुलना नाहीच. पण मग आपण आपल्या गुणांच्या, कौशल्याच्या आधारे मोठे कार्य जाऊ दे, १ वीट/ १ थापी सिमेंट तरी रचल्याशिवाय 'जायचा' विचार कसा करू शकतो?

- ६ -
हा डिप्रेशनचा परिणाम आहे की कंटाळा आहे की नुसताच आळस आहे माहीत नाही .. डिप्रेशन बरंच कमी झालं आहे .. रोज रडू केव्हाच बंद झालं आहे .. क्वचित आठवडा पंधरवड्यातून एखाद दुसरेवेळीच रडू येतं ... दिवस मजेत जातो , कसा संपला ते कळत नाही ... घरातली कामं करते , वाचते भरपूर .. म्युजिक ऐकते .. सिरिअल्स बघते .. आयुष्य छान चाललं आहे म्हणायला कोणतीच आडकाठी नाही ... >>>>>

सॉरी म्हणते तुम्हाला सुरूवातीलाच....
पण काय काय? आहे ज्याचं त्याला माहीत असतं पोटातून. उघड मान्य करायचं नसलं की अशी भेंडोळी उलगडतो आपण. सोयीच्या वातावरणातून बाहेर येऊन कसोटीला तोंड द्यायचा मूड नाही येत पटकन. मीही केलय. टायफॉईड झाला २दा उलटला. २-३ महिने झोपा काढायची सवय झाल्यावर मग शाळेत जावेसे वाटेना... मग अजून नाही बरं वाटते, थकवा आहे चक्कर येतेय, वर्गात बसायला नाही जमणार सुरू केले. वडिलांनी सांगितले आपण जाऊ, तू वर्गात जा, मी बाहेर बसतो. चक्कर आली तर घरी येऊ.....गेले झक्कत करते काय....
तुम्हाला पँपरिंगची लत लागली का बघा. डिप्रेशनचा परिणाम असूच शकतो. नॉर्मल आहे ..... पण जाणीवपूर्वक ठरवले तर याल बाहेर.

डिप्रेशन कमी झालंय ना.... मग व्हा गिअर अप थोड्या थोड्या. अ‍ॅक्टिव्हनेस वाढला की डिप्रेशन अजून मागे हटेल. मग पुढचा गिअर टाकायचा. दिवस फक्त मजेत नाही तर स्वतःसाठी value addition करत घालवायचाय हे टास्क आहे.
घरातली कामं करते , वाचते भरपूर .. म्युजिक ऐकते .. सिरिअल्स बघते .. --- एकतर हे खोटे आहे किंवा हे सारे करूनही तुमच्या 'मनापर्यंत पोहोचत' नाहीये... यंत्रवत, मेलेल्या मनाने होतेय सगळे. शरीर करतेय कृती आणि मन भरकटलेलेच.

काय वाचता / ऐकता / बघता? बूस्ट करणारे की निरर्थक की चाललेय त्या विचारांनाच खतपाणी घालणारे? तपासून बघाल का? लिहीलात तर काय उमटेल? पोस्टसारखेच की वेगळेही काही?
घरातली कामं करते --- कशी? मोजकी, वाटलं तर, लादली तर.... की मनापासून initiative घेऊन? घरकामाचीही एक लय असते. आवड असेल तर त्याने मन प्रसन्न होते. नसेल तर उरकून टाकले जाते.

स्वतःहून घरातल्या जबाबदार्‍या घेऊन बघा. सकाळी न्याहरी बनवणे, झाडांना पाणी घालणे, वॉशिंग मशीन लावणे / व्हॅक्यूम क्लीनर लावणे, ग्रोसरी मागवणे + भरून ठेवणे, बेल वाजली की दार उघडणे. अशी आजूबाजूची, छोटी पण महत्त्वाची कामे. जबाबदारी म्हणजे तुम्ही पूर्ण करायचे.....दुसर्‍या कोणाची त्यासाठी धावपळ नाही होता कामा...

आयुष्य छान चाललं आहे म्हणायला कोणतीच आडकाठी नाही ... उत्तम आहे पण 'हे' छान नव्हे सोयीचे जास्त आहे. आपल्याला अजून + खरोखर छान करायचे आहे. त्यासाठी कष्ट आहेत, जबाबदार्‍या आहेत, प्लॅनिंग लागेल, मनाला विचारांना हळूहळू जाणीवपूर्वक दिशा द्यावी लागेल. आणि हे सगळे नाजूक अवस्थेतील मनाला ताण न देता.

-६-
पण existence आणि non-existence अशा दोन चॉइसेसचा विचार केला तर नॉन एक्सिस्टेन्स नेहमीच प्र चं ड अपिलिंग वाटतो ... Oh , how much I would love to rest .. सतत अखंड चालू असलेले विचार नाहीत , आठवणी नाहीत , अस्तित्वाची जाणीव नाही .. शांत झोप .. स्वप्नं सुद्धा नसलेली .. अस्तित्व संपूर्ण पणे पुसलं गेलेलं असेल या विश्वाच्या पटावरून ... its beyond tempting .. >>>>>>>

नॉन एक्सिस्टेन्स नेहमीच प्र चं ड अपिलिंग वाटतो ... कारण तो प्रांत अजून अज्ञात आहे, अनुभवलेला नाही, म्हणून छानच असणार हे गृहीत धरलेय.... आणि existenceची अतिपरिचयात अवज्ञा झालीये कारण तो माहिती +अनुकूल आहे बर्‍याच प्रमाणात. सात गाद्यांखालचा वाटाणा खुपतोय, दर्भाची चटई कधी बरं मिळेल...त्यातली गत !!

खाली दिमाग शैतान का कारखाना. चांगली प्रॉडक्शन लाईन सुरू करा... (ref जिज्ञासा) जंक हळूहळू मागे पडेल.

अपिलिंग / अन-अपिलिंग हे सगळं शरीरापुरतं.... पुनर्जन्म मानता म्हणताय.... मग मनाचं, चैतन्याचं काय? जे पुढच्या प्रवासाला जाणार? शरीर (= भौतिक देह) इथे जाळले पुरले जाते. मन आणि मनाला बिलगलेल्या इच्छा, विचार, इत्यादि (= वासनादेह ज्याचा कर्मफलनिवाडा, गती, पुनर्जन्म वगैरे होते) पुढे जाते. त्याचे री-प्रोसेसिंग होते. तिथे आयुष्यभर काय काय जमा केलेय हेच महत्त्वाचे असते. घाबरू नका पण तुम्ही मनात जे क्लटर जमा केलेय / करताय नकळत, ते beyond tempting नव्हे तर गोत्यात आणणारे आहे मॅडम इतकेच सांगेन.

tempting असतं ते हिताचं असतच असे नाही. रोजची चपाती दुय्यम मानून पिझ्झामागे फार धावलं की एक दिवस BMI, cholesterol चे आकडे आपल्याला जागेवर आणतात आणि आपण पुन्हा फुलके खाऊ लागतो. आधीच सुखाने नावं न ठेवता खाल्ले तर....

-७-
लोक आजारी पडल्यावर जिवंत राहण्यासाठी किती आटापिटा करतात जीवाचा ... wow .. मला जर डॉक्टरांनी सांगितलं , " सॉरी अब आपके पास सिर्फ दो ही महीने बचे है , हम कुछ नहीं कर सकते " तर मला लिटरली हर्षवायू होईल ... >>>>>

असं काही नसतं हो.... ही फँटसी आहे. तशी वेळ आली की पायाखालची वाळू सरकते. स्थितप्रज्ञ असाल / मनाला प्रयत्नाने घडवले असेल तर प्रश्न नाही अन्यथा वाटणे निराळे आणि प्रत्यक्षात येणे निराळे. तुमच्या मनावर सद्ध्या मळभ आहे; राख जमली आहे, जीवनेच्छेचा निखारा आहे आत. तो फुलवा, भरभरून जगा (लिप्त म्हणत नाहीये मी) आणि योग्य वेळी कृतार्थ निरोप घ्यायचा क्षणही येईल, आपोआप येईल. त्यासाठी झुरत बसून स्वतःला वाया घालवू नका.

-८-
आत्महत्या करण्याची हिंमत नाही .. जगण्याचा मोह असा नाही पण नॉन एक्सिस्टेन्सची काही खात्री नसल्याने .... पुनर्जन्मावर विश्वास आहे ... त्यामुळे धडधाकट शरीर दिलं होतं ते टाकून आलीस , जा आता हात - पाय किंवा डोळे नसणं कसं असतं ते अनुभवून बघ म्हणून जन्म मिळाला तर काय घ्या .... .. त्यापेक्षा आहे ते सोन्यासारखं आयुष्य म्हणता येईल .... पण नॅचरल डेथ आली तर वाईट ठिकाणी पाठवणार नाहीत .... त्यामुळे नॅचरल रिजन्सनी पटकन काहीतरी होऊन जीव जावा अशी एक इच्छा मनाच्या कोपऱ्यात असतेच कायम .....>>>>

गरजही नाही आत्महत्या करण्याची. आशा भोसलेंनी, सिंधुताई सपकाळांनी केली? त्या काय मखमली आयुष्य जगल्या का? जे घडले त्याचे वण असतील मनावर, भळभळतही असेल एकांतात पण नासूर नाही होऊ दिलाय त्यांनी. उभ्या आहेत पाय रोवून. स्त्रियांमध्ये हे बळ उपजत असते. कोलमडतील पण उन्मळत नाहीत. जिद्दीने तगतात आणि इतरांना जगवतात. You are gifted in this aspect, so please don't give up.

आत्महत्या करण्याची हिंमत नाही हे उत्तमच आणि मरायचे पण डेरींग नाहीये हो.... मग जगूया की आनंदाने. रोमान्स हवा, डोहाळे पुरवायचे, आईपण आवडेल पण पेन्स, जागरणे, लंगोट बदलणे नको....जमेल? सिलेक्टिव्ह जगण्यासाठी सरोगेट थोडीच मिळतो.
तुमचं पॅकेज डील जन्माबरोबर घेऊन आलात ..... (मागे काय केलत त्यानुसार -- अ‍ॅज पर पुनर्जन्म कन्सेप्ट) अ‍ॅज इज बेसिसवर. काजू वेचून वेचून खायला आणि मिरच्या मागे ठेवायला चिवड्यात जमते. इथे मिटक्या आणि हायहुय दोन्ही आपल्याच एकाच तोंडाने करायचे आहे. प्र त्ये का ला.

पुढे सगळे चांगले होईल, चुकीची शिक्षा होणार नाही, पुनर्जन्मात मनाविरूद्ध अनुभव येणार नाही याचीही गॅरंटी हवीय तुम्हाला मरण्यापूर्वी. कोण देईल? कशी देईल? कोणाकडून हवाय हा अ‍ॅश्युरन्स तुम्हाला? देवाकडून? का द्यावा त्याने? आहे ते, द्याल ते उधळून टाकेन पण मला कफल्लकपणाचा अनुभव नको, भीती वाटते म्हणाले मी तर तुम्ही मला पैसा, रिसोर्सेस पुरवत रहाल? कुठवर? कशासाठी?

पुनर्जन्मात ज्याच्या अभावाची कल्पनाही सहन होत नाहीये, ते आत्ता, इथे हातात आहे ! ..... त्याचे चीज करायचे सोडून हा काय उलटा कारभार. आता सगळे टाकून मरते, पण मला पुन्हा सग्गळे सग्गळे प्रॉपर हवे हं .... मग मी नीट जगेन. ती गॅरंटी तुम्ही देताय? पाळाल पुढच्या जन्मात? नक्की? मग आताच जगा की रीतसर.

कशावरून मागच्या जन्मात अभावात असताना विनवण्या केल्यात, देवाने ऐकले, सगळे दिले आणि आता तुम्ही शब्द फिरवताय... असे नसेल झाले? बघा, मी पण नवीन बॅकडेटेड गुंता दिला तुम्हाला ......

विचारांची आंदोलने आहेत, तुमच्या नियंत्रणात नाही राहू शकत. ओके. पण ही आली कुठून? जन्मत: तर नव्हती. नंतर आली. त्या पॉईंटला जा मागे मागे शोधत. काय घडले, कुठून सुरू झाला हा गुंता. कसली भीती, अनिश्चितता, डळमळीत करते तुमच्या मनाला? मग त्यावर उपाय बघता येतील. उपाय असणार निश्चित.

आत्महत्या = शिक्षा पात्र आणि नॅचरल डेथ = पुढे आनंदी आनंद गडे असे नसते. आधी म्हटल्याप्रमाणे तुमच्या मनातील विचार, वासना आणि त्यांची तीव्रता यांच्या evaluation वर ठरतात तुमचे क्रेडीट पॉईंट्स. पेरायचे स्वातंत्र्य तुम्हाला जरूर आहे, पण ते उगवून आल्यावर 'हे नको होते मला' म्हणून रडलात तर कोणी ऐकून घेणार नाहीये. बघा काय करताय ते.

शुभेच्छांसह.....

कारवी,
विचारातल्या/संकल्पनेतल्या त्रुटी, गुंता यथायोग्य पोस्टमार्टेम करुन परखडपणे आणि त्याचवेळी अतिशय संतुलितपणे आणि त्याचवेळी अतिशय कळकळीने, आपुलकीने मांडणारा अतिशय उत्तम, व्यवहार्य प्रतिसाद..
तुमचे सर्व प्रतिसाद काॅपी करुन ठेवा.
अन्य सभासदांच्या मागणीमुळे ॲडमीन यांनी यदाकदाचित हा धागा उडवला तर हे विचारवैभव वाया जाता कामा नये.
तुमचे टप्प्याटप्प्यात दिलेले पर्याय ही एकमेव गोष्टही या धाग्याला उडवण्यापासून रोखू शकते.. (अर्थात अन्य अनेकांचे पर्याय उत्तम आहेतच..)

कारवी, जियो! काय सुंदर प्रतिसाद लिहिला आहेस! राधानिशा लाच नाही तर आयुष्याचा कंटाळा आलाय असं वाटणाऱ्या कोणत्याही वाचकाला पुनर्विचार करायला लागेल असा प्रतिसाद वाचून.

कारवी, उत्तम प्रतिसाद आहे पण...
——
मी मूळ लेखावर काहीच लिहिले नाही कारण काही प्रश्ण होते,
राधानिशा,
जमलच तरच उत्तर द्या, बंधन नाही, कारण तुमचा अधिकार आहे, उत्तर द्यायचा की नाही,

१) आता, ह्या क्षणी, तुमच्या जवळ कोण आहे?
२) घरातील “एखादी व्यक्ती” , तुम्हाला विश्वासू वाटतेय का?
३) हा लेख वा इथे जे काही तुम्ही लिहलय , ते “ सर्वात आधी“ बोलला आहात का त्या जवळच्या व्यक्तीबरोबर? जी अतिशय जवळची आहे आणि आता ह्या क्षणी , “विश्वासु” वाटतेय म्हणून त्या व्यक्तीबरोबर शेअर केलय?
प्रयत्न तरी केलाय? किती वेळा? कसे वाटलं बोलुन?
४) व्यव्स्थित जेवण घेताय का?

अरे बापरे.... इतके प्रतिसाद. धन्यवाद सार्‍यांना....
निरू विचारवैभव वगैरे नाही हो .... पण ठेवते सेव्ह करून तुम्ही म्हणताय तर
त्यांनी वाचले, विचार केला, समरसून जगल्या तर पुरेसे आहे की. उमलते आयुष्य आहे;
टॅलेंटेड त्या आहेतच फक्त हेलकावे रोखून स्थिर मनाने पुढे जायला हवे.
त्या गुंत्यात गुरफटल्या आहेत आपण बाहेर आहोत, त्रयस्थपणे बघू-बोलू शकतोय, काही करू शकतोय तर का न करावे....

विंदा करंदीकरांची कविता , आयुष्याला द्यावे उत्तर

Submitted by ए_श्रद्धा>> धन्यवाद

कारवी जी उत्तम प्रतिसाद

कारवी , थँक्स .. एवढं कळकळीने आज कोण कुणा अनोळखी माणसाला सांगतं ... प्रत्येक मुद्दा सावकाश परत परत वाचेन मी आणि वागण्यात , दृष्टिकोनात फरक पाडण्याचा प्रयत्न करेन ..

Pages