कोरोना नंतर ऑफिस

Submitted by पिल्या on 13 October, 2020 - 23:58

कोरोना नंतर ऑफिस

येणार येणार म्हणत ऑफिसकडून आज शेवटी मेल आली,

'आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे कि आपल्याला आपल्या परिवाराला सोडून उद्यापासून ऑफिसला बोलाविण्यात येत आहे. सोबत केवळ मास्क घालून यावे, बाकी येऊन बॉसला केवळ मुजरा करावा. (हे अर्थातच कंसात)

आपले विश्वासू(?),
मनुष्यबळ विकास '

असो. तब्बल ७ महिन्यानंतर आज ऑफिसला जायची वेळ आली. निरोप आल्यापासून केवळ कस करायचं, काय करायचं हेच सुरु? आधी तर HRलाच शिव्या घालून झाल्या कशाला बोलावलं म्हणून.

मास्क रोज बदलायचा का? सॅनिटायझर कोणत्या कोणत्या वेळी लावायचं, घरून पण न्यायचं का? शेजारी कोण असेल? मीटिंग मध्ये बसायचं का कि ऑनलाईनच करायची? एक ना धड असंख्य प्रश्न.

मास्क कुठे मिळेल, किती घ्यायचे म्हणून थोडी फोनाफोनी झाली. शेवटी आहे त्याच मास्क वर सध्यातरी धकवायचं ठरलं. कपडे कोणते घालायचे हाही एक फार मोठा प्रश्न होता. कपाटात ठेऊन बुरा आलेले कपडे बाहेर काढले, बसतील का ते बघून झालं. मग दर शर्ट आणि पँट घालून नीट बसलाय का हे विचारून घरात सगळ्यांना पीडून झालं. इस्त्री नीट आहे ना, कुठे गुढ्या पडलेल्या तर दिसत नाहीत ना, इतके विचार अखंड मनात सुरु.

Shoes - कुठे ठेवले आहेत इथपासून सुरुवात. आता आधी त्यांना polish करा. अर्धा तास घासून घासून तोंड दिसेपर्यंत (खरंच दिसत का माहित नाही, पण आपलं म्हणायची पद्धत आहे म्हणून) चमकवून झालं. पण पुन्हा बंद बांधताना चुकलेच. असो, दुसऱ्या प्रयत्नात जमले.

बॅग भरायला १० मिनिट लावले, एक गोष्ट तीन तीनदा तपासून पाहिली.

बॉस काय म्हणेल, बाकीचे लोक काय म्हणतील, नीट रस्ता सापडेल ना? चहा, पाणी (हेही घरूनच न्यायचं का?) असेही सगळे विचार मनात चालू. माळ्यावरून थर्मास काढायचा पण विचार झाला पण म्हणलं राहूदे, बघू जाऊन काय होतंय ते.

रात्री जेवायला बसलो, पुन्हा तेच सुरु, उद्या डबा. चमच्याने खायचं कि हातानेच.

अख्खी रात्र ह्याच विचारात गेली. आणि शेजारी पाहिलं तर बायको मस्त घोरत होती, म्हणलं माझा उद्या एवढा महत्वाचा दिवस आणि हिला ह्याची काहीच नाही. बायकांना मेलं ह्याच काहीच नाही. हीच ऑफिस असतं तर मी असंच केलं असतं का. असो, हे सगळं आमचं आपलं मनातल्या मनात.

कधी नव्हे ते सकाळी पहिला अलार्म वाजायच्या आधीच मी जागा. पुन्हा आवरून, ऑफिसला जायचं म्हणून गुळगुळीत दाढी केली, मस्त perfume मारला. गाडी धुवून येऊ का, असं विचारलं. तशी परवाच धुतली होती म्हणा. निघायच्या आधी पुन्हा बुटावर धूळ बसली असेल म्हणून फडकं मारलं.

असो. इतक्या असंख्य विचारानंतर कसातरी ऑफिस मध्ये आलो. तोही वेळेआधी. आणि इथे तर कोणीच नाही. मग हळू हळू बाकीचे लोक आले.

इथे येऊन पाहिलं तर कोणालाही काही सोयरसुतक नाही, सगळे जण आपापल्या कामात. 'अरे आलास का?' ह्याच्याशिवाय दुसरी काही प्रतिक्रिया नाही. आणि मी आपलं उगाचंच कधी नव्हे ते ऑफिसला यायचं टेन्शन घेतलं म्हणून स्वतःशीच हसलो.

शंतनू कुलकर्णी
१३/१०/२०२०

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे वा छान लिहिलेय
आमचाही असाच अनुभव
मी सुद्धा त्या दिवशी याच अनुभवावर चार ओळी खरडलेल्या.. आणि मग राहून गेले. आता हे वाचून पुन्हा पुर्ण करावेसे वाटतेय Happy

अरे देवा.. म्हणजे ऑफिसेस सुरु होतायत तर..!! Uhoh

मी तर घरात सांगुन टाकलं होतं की आता इथुन पुढे घरुनच काम करण्याचे दिवस येतील म्हणुन.....श्फार फार वाईट्ट झालं हे... ७ महिन्यानंतर ऑफिसला जाणं हा तर कोरोना रिपोर्ट पॉझिटीव आल्यापेक्षाही महाभयनक अनुभव ठरेल..!!

मस्त लिहिलंय . कपडे,शूज,बॅग च असच भविष्य दिसतंय पण शेवट नुसता 'अरे आलास का? नसेल , कट्टे जमलेले असतील ठिकठिकाणी .

नका नका, असले लेख छापून टनेलच्या शेवटी ऑफिस आहे याची आठवण करून देऊन नका.... मला तर ऑफिस कुठे आहे तेही आता आठवत नाहीये हो.... Sad Sad

मला तर आजन्म वफ्रॉहो दिलं तरी मी आनंदाने करेन.. भले ऑफिसमधे लॅवीश सोयी सुविधा आहेत, वर्कलोकेशन अगदी निसर्ग सनिद्ध्यात आहे, ट्रांसपोर्ट फॅसिलिटी चांगली आहे, वर्ल्डक्लास कॅफेटेरिया आहे (असं ऑफिस अ‍ॅडमीन कडुन च कौतुक येत असतं..) तरिही आता पुन्हा त्या ऑफिसला जावं अशी स्वप्नातसुद्धा कल्पना करवत नाही.

कोरोनामुळे काही न करता 6 महिने भरपगारी बिनकामाची सुट्टी मिळाली, जिची आयुष्यात कधी कल्पना पण केली नव्हती. आता वफॉहो आहे, पण पूर्वी इतके कामाचे प्रेशर नाही. सध्या गरज असल्याने हे चांगले वाटतेय पण माझेही आवड ऑफिसात जाऊन काम करायचीच आहे

आय एम ऑफिस पर्सन... +111

Wfh म्हणजे तुम्ही रानावनात तहानेने हिंडत नसता (हा wfo scenario), तळ्याजवळ तहानलेले उभे असता आणि तरी पाणी पिऊ शकत नाही, तळं दिसतंय एवढेच काय ते सुख..
Repost

Dj, काही बेंचवर म्हणजे काय?

मला लास्ट इअर ऑफिस लॅपटॉप मिळत होता जो मी घेतला नव्हता, नाहीतर हे लोक सुखाने जगू देत नाहीत, ह्या रागात बॉसने लॉक डाउन च्या पहिल्या लॅप्पी लॉटला माझे नाव दिले नाही, जून नंतर माझे नाव होते पण मी प्रवास करणार नाही सांगत ऑफिस ला गेलेच नाही. शेवटी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाऊन डेस्कटॉप घेऊन आले कारण 2nd लॅप्पी पण दुसऱ्या ला दिला. HR नियमानुसार पगार मिळाला.
मार्च महिन्यात मी वार्षिक रजा घेतली अन लॉक डोवनचे पाच असे मस्त सहा महिने सुट्टी मिळाली.

अहो VB, कानी न करता म्हणालो होतो मी Bw (जर काही काम नसेल तर त्या कर्मचार्‍यांना बेंच रिसोर्स म्हणुन वेगवेगळ्या टेक्नॉलोज्या शिकवण्याच्या बहाण्याने खाउ-पिऊ घालण्याचं पुण्य करतात काही काही कंपन्या.. मी जिथं काम करतो त्या कंपनीत ३-४ महिने वाट बघुन त्या बेंच कर्मचार्‍याला काम नाही मिळालं तर मग घरचा रस्ता दाखवतात Uhoh )

तुम्ही मात्र फार नशिबवान.. असं नशीब कुणाकुणाच्याच वाट्याला येतं Bw

काय माहित नशिबवान कि अजुन काय?

या सगळ्यात माझे आवडते प्रोजेक्ट गेले हातुन Angry असो चालायचेच

मला हे आठवले अन खुप राग आला की मी सरळ नो ईलेक्ट्रीसिटी मेसेज टाकुन आराम करते.

Biggrin आमच्या टीम मधे पण काहीजण असं करतात.. शॉक चं आयकॉन दोन्ही बाजुला टाकुन "नो ईलेक्ट्रीसिटी अ‍ॅट माय एरिया. लॅपटोप इज रनिंग ऑन बॅटरी विच इज ऑलरेडी अबाउट टु ड्रेन. विल रिजॉइन वन्स पॉवर कम्स" असा मेसेज टाकुन गायब होतात Biggrin

मला हे आठवले अन खुप राग आला की मी सरळ नो ईलेक्ट्रीसिटी मेसेज टाकुन आराम करते....
मग inverter बसवून घ्या म्हणून सांगत नाहीत???

आमच्याकडे असं चालत नाही, light नाहीत वगैरे , ही employee ची जबाबदारी असते
वेळेत काम झालं1 पाहिजे मग दिवसभर light असो वा नसो.
Desktop दिला म्हणून त्याच्या सुरक्षिततेसाठीups inverter घेतले, तो आणखी एक खर्च.. इकडे सारखी light जाते कारण

उलट आपलीच कामं रेंगाळतात
म्हणून आम्ही बॅटरी टिकेपर्यत काम करतो, लॅपटॉप बॅटरी संपली आणि light नसेल, तर त्या दिवशीच काम रात्री उशिरा बसून संपवतो.

Pages