अशी आमुची इंग्रजी मायबोली

Submitted by मंदार-जोशी on 15 March, 2012 - 22:50

गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मराठी मनात खदखदत असलेली एक गोष्ट आज बोलून दाखवीन म्हणतो. एकीकडे मराठी भाषा दिन साजरा करत असताना आणि आम्ही मराठी आहोत असं म्हणत उत्तम आणि सकस साहित्यनिर्मिती करत असताना आपण आपल्याच मायमराठीत अनेक अनावश्यक परभाषिक शब्द - प्रामुख्याने इंग्रजी शब्द - घुसवत मराठीचा अपमान करुन तिचे भ्रष्ट रूप सादर करत आहोत.

काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही. उदा. रेल्वे स्टेशन/स्थानकाला कुणी अग्निरथविश्रामस्थान म्हणा असं म्हणणार नाही. बँन्क हा इंग्रजी शब्दच आपण वापरणार. राँग नंबर याला काही 'चुकीचा लागलेला किंवा फिरवलेला नंबर' म्हणा असा आग्रह कुणीच धरणार नाही. काही काव्यरचना करताना एखादा हिंदी-इंग्रजी शब्द चपखल बसत असेल तेव्हा जरूर वापरावा, पण दैनंदित वापरात नको.

ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे, पण वाचनामुळे मराठी शब्दसंग्रह उत्तम नसला तरी बरा आहे. तरीही अगदी सोपे शब्द अडल्यास त्यांचे प्रतिशब्द मी इतरांना विचारुन घेतो. तसेही आपल्याला करता येईलच की. मी आपल्याला विनंती करु इच्छितो की शक्यतो मराठी शब्दांचा वापर करा. आपणच आपल्या भाषेचा असा आदर केला नाही तर इतरांनी गावसकरचा गवासकर आणि तेंडुलकरचा तेंदुलकर केला तर त्यांना दोष का द्यायचा?

काही शीर्षके सापडली, ज्यात वापरलेल्या इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत. सर्वप्रथम हे नमूद करु इच्छितो, की यात कुणालाही चिमटा काढण्याचा किंवा कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या मराठी मनात असलेली खदखद व्यक्त करतोय. उपलब्ध वेळ लक्षात घेता फक्त शीर्षकांचा विचार केला आहे, लेखनाला हात लावलेला नाही.

- - - - काही इंग्रजाळलेली शीर्षके - - - -

द्रविडचे रिटायर होणे = द्रविडचे निवृत्त होणे

daily alarm = रोजचा गजर

'वगैरे' Returns !!!! = पुन्हा एकदा 'वगैरे'

नवीन बुक स्टोअर सेट उप- समर्पक नाव योजावयाचे आहे = नवीन पुस्तकांचे दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे / नवीन पुस्तक दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे

सस्पेन्स, मर्डर्, थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) = रहस्यमय, खून, थरारक, पुनर्जन्म, भूतपिशाच्च चित्रपट नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

टेस्टी पावभाजी जमण्याकरता टिप्स = चविष्ट पावभाजी जमण्याकरता क्लृप्त्या

दीड वर्षाच्या मुलाच्या activities = दीड वर्षाच्या मुलाच्या शारिरिक हालचाली / दीड वर्षाच्या मुलाची दिनचर्या

आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी = आंध्र पद्धतीची मूग डाळीची खिचडी

चिकन सुके विथ काजु = काजू घातलेले सुके चिकन / सुके चिकन काजू सहित / सुकी कोंबडी काजू सहित

गुलमोहर: 

अहो पण आजकाल सगळे शिक्षण इंग्रजीतून, आजूबाजूला सगळे इंग्रजी ने भरलेले मराठी, बिचार्‍या लोकांच्या कानावर मराठी शब्द पडतच नाहीत. मराठी पुस्तके तरी कुणि वाचतात का? मराठी सिनेमात एकतर खेड्यातली भाषा नाहीतर शहरातली इंग्रजी शब्दांनी भरलेली भाषा.
अहो खोटे सांगत नाही, पाच दहा वर्षांपूर्वी १० वर्षाच्या मराठी मुलाबरोबर मराठी बोलायला गेलो, तर मला अर्धे अधिक शब्द इंग्रजीतून सांगावे लागले. त्याचा बिचार्‍याचा काय दोष?
काळाचा महिमा.

>> इन्ग्रजीत त्याला पुलीस म्हणतात
हे मला पटलेलं नाही. इंग्रजीतलं स्पेलिंग Police असं आहे आणि उच्चार पोलिस असाच होतो.

ते तुमच्या इंग्लंडात. इथल्या राजसाहेबांना विचारा ते म्हणतील त्याचा प्रानंसीयाशन पालिस आहे. किंवा काप्स.

Pages