...पाहिले म्यां डोळा

Submitted by अनन्त्_यात्री on 8 October, 2020 - 08:45

पालथ्या मुठीत घुसवलेली iv ची सुई
जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरी.
अँटिव्हायरलच्या ठिबकसिंचनाचा
गिनीपिगी जीवरोपट्यावर विफल अभिषेक.
बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित.
धपापते विद्रोही तप्तश्वास.
PPE आच्छादितांच्या नि:शब्द कवायतींनी कोंदलेले भवताल.
स्वप्न-जागृतीच्या, शुद्धी-बेशुद्धीच्या
अस्थिर सीमारेषांवर भोवंडणारी
जाणिवानेणिवांची
कण्हणारी कडवट कडवी.
संपतील एकदाची आत्ताच
की,
ध्रुपदत राहतील
व्हेंटिलेटरच्या जागत्या पहार्‍यात
आज
उद्या
परवा?

Group content visibility: 
Use group defaults