छोटीसी आशा

Submitted by किल्ली on 25 September, 2020 - 12:10

माझी ना, खूप दिवसांपासूनची तमन्ना(हो, तमन्नाच!) आहे. मस्त निवांत दिवस असावा. कसलीही घाई, गडबड, गोंधळ नसावा. सकाळी ११-१२ वाजेपर्यन्त जाग आली तरी लोळत पडून राहावे. मग धांगडधिंगा वाली आधी, नंतर रोमँटिक गाणी लावून माहोल बनवावा. ही गाणी ऐकतच आन्हिकं उरकावी. एक तासभर अंघोळ करावी. महत्वाचं म्हणजे मी घरात एकटी असावी. कांदेपोहे करण्याचा सुद्धा कंटाळा आलेला असावा. मग loose loose comfy कपडे (जे लोकांच्या लेखी जुना -पुराना कळकट, बळकट असतात. एरवी मी घातले तर काय मेलं दरिद्री लक्षण असे तु. क. येतात) अंगावर असूनसुद्धा कसलीही तमा न बाळगता खाली टपरीवर जाऊन इडली सांबार, पोहे वगैरे ऐवज चापावा. मग तिथल्या भैयाला सांगून अद्रक वेलची वाली कडक पेशल चाय (चहा नाही!) घोट घोट हातात काचेचा पेला धरून प्यावी.

तिथल्याच किराणा दुकानात जाऊन चिप्स, मुरमुरे, भेळ,कुरकुरे , सोया स्टिकस वगैरे गोष्टी पिशवीभरून घ्याव्यात. त्यात ते मसालावाले तिखट चीझ बॉल , आचारी त्रिकोण आणि असंच काहीबाही असलंच पाहिजे. इच्छा झालीच तर readymade इमली चटणीचे पाकीट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे maazaa ची मोठी बाटली. हे सगळं घेऊन घरात बेडरूमध्ये यावे. खाऊची पिशवी बेडवरच ठेवावी. मोबाइल, चार्जेर , खाऊ ओतायला काचेचाच बाउल वगैरे सगळं घेऊन बसावे. इअरफोन्स भिरकावून द्यावे. थोडा वेळ नुसतेच लोळावे.

मग मोबाईलवर एखादा कितीतरी वेळा पाहिलेला टुकार कॉमेडी किंवा भन्नाट कॉमेडी कौटुंबिक असा कुठलाही स्टोरी माहिती असलेला सिनेमा लावावा. संबंध दुपार लोळत चिप्स, गोड गोड माझा किंवा फ्रुटीचे घोट(ते orange pulp असलेलं एक ड्रिंक असतं, आठवलं मिनिट मेड ते मिळालं तर उत्तम ) घेत आणि इतर खाऊ खात, सिनेमा , वेब सिरीस , influencers चे विडिओ पाहत घालवावी. इतके रममाण होऊन जावे की अंधार पडलेला सुद्धा लक्षात येऊ नये. मग कंटाळून उठून दिवा लावावा.

जरा उड्या माराव्या , कोचावर, गादीवर वगैरे, वेडेवाकडे नाचावे आणि फिरायला मोबाइलला घरी चार्जिंगला लावून बाहेर पडावे. काही चकरा मारून झाल्या की उगीच बसून राहावे दिवास्वप्न पाहत! मग घरी जावे. जरा रात्र झाली की पिझ्झा, बर्गर वगैरे मंडळींना आवताण द्यावे, त्यांचा समाचार घेऊन नागीण सिरीयल बघत बघत निद्रादेवीच्या अधीन व्हावे!!

बस इतनासा ख्वाब है!

हे स्वप्न मी तुकड्या तुकड्यात सुद्धा जगायला तयार आहे.

आणखी अशी बरीच स्टुपिड 'आशाए' आहेत. पुन्हा कधीतरी लिहीन.

तुम्हीही लिहा तुमचे कुठली अशी स्टुपिड तरी हवीहवीशी इच्छा आहे?
येऊ द्या! कदाचित लिहूनही बरंच बरं वाटेल. जसं मला आता वाटत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणे मस्त लेख किल्लीतै.
माझी छोटीसी आशा..
उशिरा उठायचे, रफीसाहेबांची गाणी मोठ्या आवाजात लावून आवरायचे.मग जादूने आयताच चायनास्ता टेबलावर प्रगट व्हावा, मग परत गाणी ऐकत झोपायचे, जेवायला उठायचे.दुपारी भरभक्कम बेत असावा,(पुन्हा आयता) आणि परत झोपायचे.जाग येईल तेव्हा उठायचे.
हे जरा जास्तच unrealistic होतंय पण fantasy च आहे सगळी Lol

>> नो लाईट पोल्यूशन. रात्रभर तारे बघत आरामात पडून रहा. (मला आकाश पहायला आवडतं)

अवकाशातून ताशी लाखो किमी इतक्या प्रचंड वेगाने प्रवास करणाऱ्या अवकाशयानात आपण सारे आहोत. त्याचे नाव पृथ्वी. आकाश निरभ्र असेल कोणतेही पोल्युशन नसेल आणि आजूबाजूला इमारती नसतील तेंव्हाच याचे महत्व कळते.

खरंय. शहरापासून लांब जाऊन अंधाऱ्या रात्री आकाश पाहिलं की ते चांदण्यांनी खच्चून भरलेलं दिसतं. यातले किती तरी तारे शहरातून दिसतच नाहीत.

किल्ली तुम्ही मूळ लेखात लिहिलेली छोटीसी आशा माझी वा एकूणच आमच्याकडे सगळ्यांची रोजची लाईफ आहे. सगळे कसलेही टेंशन नसल्याप्रमाणे हवे तेव्हा लोळत प्डलेले असतात,
खेळावेसे वाटले की वेळकाळाचे कोणाला भान नसते. हवे तेव्हा हवे ते खात असतात. पाऊस पडला की भिजायला जातो, आंघोळीचा मूड आला की टॉवेल उचलतो. दाढी करायचा नेहमी आळस, जेव्हा मात्र करायची असतेच तेव्हा रात्रीचे दोनलाही करतो. कॉफी प्यायचा मूड तर रात्री चारलाच येतो. विकेंडला पहाटेचे उजाडतानाच बघून झोपतो. घरात पसारा ईतका करतात की मग आवरावासा वाटतच नाही, आज ऑफिसला जायचा मूड नाही ईतकेच कारण दांडी मारायला पुरते. शिस्त, सो कॉल्ड चांगल्या सवयी, नीटनेटकेपणा वगैरे शब्दांच्या आम्ही नादीही लागत नाही. तुझे आपले मस्त चालूय असे एकमेकांना म्हणत सगळेच असेच जगत आहेत. जोपर्यंत असे जगायला मजा येतेय आणि बोअर होत नाही तोपर्यंत आमच्याकडे कोणाला हि लाईफस्टाईल बदलायचीही नाहीये. आणि त्याने काही अडलेही नाहीये. तसं काही कौतुक नाहीये या लाईफस्टाईलचे ना कसली लाज. कारण ज्याची त्याची आपापली लाईफ, कधी कोणाशी कम्पेअर करू नये. पण कोणीतरी असं आम्हालाही जगायचेय बोलते तेव्हा बरे वाटते Happy

धन्यवाद , विनिता, संध्याजीत,धनु डी, भरत,नादिशा, मृणाली, सामो, मी अनु, सीमंतिनी,कमला, अतुल पाटील, ऋ न्मेष Happy

हे स्वप्न मी तुकड्या तुकड्यात सुद्धा जगायला तयार आहे ---
इथे सांगण्यास आनंद होतोय, माझं हे स्वप्न नुकतंच काही अंशी पूर्ण झालं Happy
२तास मिळाले, माझे एकटीचे असे Happy

मस्त!
न्यू मॉम फँटसी आहे हे कळतंय अगदी लगेच Biggrin

मूल मोठं झाल्यावर परत आपल्याला आपला जॉब आणि घरकाम करूनही थोडा फ्री वेळ मिळायला लागतोच त्यामुळे आणखी काही वर्षांनी असे भरपूर दिवस असतील!

अहो एक मूल मोठ झालं की, दुसर्याचा विचार सुरू होतो. तेही मोठं झालं तरी, जरा कुठं मोकळा वेळ मिळाला तरी डोक्यातून मूलांचा विचार कधीच जात नाही. मोकळ्या वेळेतही बॅकग्राऊंडला मनामधे मुलांचेच विचार, आता शाळेतून घरी येईल, आता त्याला खायला हे बनवावे लागेल, आज संध्याकाळी त्याचा अमका होमवर्क करून घेतलाच पाहिजे, उद्या सुट्टी, लवकर आवरून त्याला गार्डनमधे न्यावे लागेल इ. पहिल्यासारखा फक्त आपलाच वेळ मिळणे आता दुर्लभ! अनुभवाचे बोल आहेत!

मस्त लेख किल्ली तै

जॉईंट फॅमिली मध्ये असल्याने किमान 8 दिवस तरी घरात फक्त एकटी असावे,( जे लग्नानंतर कधीही वाट्याला आलं नाही)
मैत्रिणींं बरोबर 1 रात्र भरपूर गप्पा,दंगा घालावा
4-8 दिवस आई-वडिलांना रहायला बोलवावे,त्यांचे खूप लाड माहेरपण आयुष्यात एकदा तरी करावं असं स्वप्न आहे

अवांतर- फुल्ल अनुमोदन @Cuty- मोठी मुलं, त्यांचे मोठे प्रॉब्लेम, असं होऊन बसतं..

कोरोनने खरतर फार वर्ष सुप्त इच्छा असलेलं स्वप्न पूर्ण केलं माझं. लोकलच्या वेळा, गर्दी, मस्टर याचा विचारही न करता घरी निवांत वेळ घालवावा जरा बागकाम मनावर घ्यावं वगैरे वगैरे स्वप्न लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम सुरु झाल्यावर पूर्ण झालं. परदेशी भाषा शिकून घेण्याचे स्वप्नही कॉलेजमधे असल्यापासून पाहिले होते ते ही बऱ्यापैकी पूर्ण झाले लॉकडाऊन कृपेने.

परत ऑफीस सुरु होईल तेव्हा परत ते रुटीनही तितक्याच आवडीने आपलं म्हणेन (पण हा जो ब्रेक मिळालाय तो बोनस आहे म्हणेन मी)

सोलो ट्रिपवर जायचय एकदा हे स्वप्न मात्र अजून पूर्ण व्हायचय.

मला घरात एक वाचन कोपरा बनवायचाय, जिथे भरपूर पुस्तकांचं कपाट असेल , छोटंसं डेस्क आणि एक अति comfortable आरामखुर्ची.
सगळ्यात महत्वाचं त्या कोपऱ्यात घालवण्यासाठी भरपूर वेळ Happy Happy

<<मला घरात एक वाचन कोपरा बनवायचाय, जिथे भरपूर पुस्तकांचं कपाट असेल , छोटंसं डेस्क आणि एक अति comfortable आरामखुर्ची.>>
आता वाचन कोपऱ्यावर एक धागा काढायला पाहिजे.. माझा वाचन कोपरा..
छान छान फोटो येतील...

माझा पूर्वी होता वाचन कोपरा
पूर्ण लोखंडी कपाट भरून पुस्तके होती
अवांतर वाचन आणि academics दोन्ही मिळून
आता सगळी पुस्तके खोक्यात गेली आहेत आणि कपाटात कपडे ठेवत आहोत Sad

Pages