स्त्रीत्वाचे देणे

Submitted by रूपाली विशे - पाटील on 2 October, 2020 - 11:54

२०१२ साली घडलेले दिल्लीचे निर्भयाकांड, हैद्राबादचे दिशा अत्याचार प्रकरण किंवा काल परवा घडलेली हाथरसची घटना. देशात स्त्रियांवरील अत्याचारांची मालिका संपता संपत नाही आहे.

मुलीला गर्भातच उखडून फेकणारा आपला विवेकशून्य बनत चालेला समाज जो पर्यंत स्त्री कडे भोगवस्तू न बघता आपल्या सारखीच हाडामासाची व भाव- भावना असलेली सजीव प्राणी आहे ह्या दृष्टीकोनातून बघणार नाही तो पर्यंत स्त्रियांवरील अत्याचार बंद होतील अशी आशा बाळगण्यात काहीच अर्थ नाही.

अनादि काळापासून स्त्रीत्वाचे मानसिक व शारीरिक शोषण केले गेले आहे. स्त्रीत्वाचा आदर आणि सन्मान झाला असेल तर तो फक्त शिवरायांच्या स्वराज्यात. आज जर स्त्रियांवरील अत्याचाराला आळा घालायचे असेल तर शिवरायांसारखे कठोर शासन हवे.

स्त्रियांवरील अत्याचारांच्या संवेदनशील घटनांवर व्यक्त होण्यासाठी शब्दसुद्धा निशब्द होतात. सदर घटनेत अभागी ठरलेल्या पिडीत कन्येस श्रद्धांजली...

स्त्रीत्वाचे देणे

परिटाच्या निर्भत्सनेने श्रीरामाने त्यागलेली
तव कारणे मनोमनी दुखावलेली
आत्मसन्मान रक्षिण्या देऊनी अग्निपरिक्षा
भूमातेच्या गर्भात सामावलेली श्रीरामाची जानकी मी...

द्युतक्रिडेच्या कपटी डावात अन् अपमानास्पद
वस्त्रहरणाच्या खाईत लोटलेली
दुःशासनाच्या रुधीराने बांधीन मी कुंतले
प्रतिज्ञा पणास नेणारी अन् भरदरबारी
पुरुषार्थ हरलेल्या पांडवांची द्रौपदी मी....

पदोपदी पाहूनी अपमान पतीचा अन् पाहुनी
राधेयाचे कवचकुंडलांचे दान त्या कपटी इंद्रास
क्षणोक्षणी अश्रृ ढाळणारी कर्णाची वृषाली मी...

स्वप्नाळू नयनांची.. नभी उंच भरारी घेऊ पाहणारी
अन् क्षणात त्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या
हैवानांच्या हाती संपलेली
भारतमातेची अभागी कन्या ' निर्भया' मी....

पवित्र स्त्रीत्वाचे देणे आज घडीस
ठरू पाहे स्त्री जीवनास एक शाप
संवेदनाशून्य समाजमन जगी हे
मग निदर्यी कर धजावती करावया पाप...

नको मज पूजा-अर्चा
देऊनी मज देवीचा मान- सन्मान
अवकाशी झेपावू पाहणारा मी जणू एक विहंग
नका छाटू पंख तयाचे ठेवा फक्त हे भान...

‌सौ. रुपाली विशे - पाटील
.

Group content visibility: 
Use group defaults

संध्याजीत जी , सामो, किशोरजी, अस्मिता, नादिशा, तेजो, वर्णिता
तुम्हां सर्वांना मनापासून धन्यवाद.

वास्तव मांडले आहे. Sad

स्त्रीची लढाई गर्भधारणा झाल्यावरच सुरु झालेली असते. अगदी जन्म घेण्यासाठी पण इतरांची परवानगी घ्यावी लागते. पुढे जगण्यासाठी, प्रत्येक दिवशी, तिला लढावे लागते. खाण्या -पिण्याच्या बाबत आबाळ/ आरोग्य/ शिक्षण सुविधांत तिला आजही २०२३ मधे दुय्यम स्थान आहे.
पोटच्या मुलाच्या / मुलीच्या शिक्षणासाठी खर्च होतांना पालकांचा विचार नकळत बदलतो.

नवरा गेल्यावर स्त्रीच्या अस्तित्वाला काही अर्थच नाही म्हणून तिला अनेक शतके सती पाठविणारा किंवा काल पर्यंत शिक्षणाचे दरवाजे तिच्यासाठी घट्टपणे बंद ठेवणारा आपला समाज.
आज शिक्षण आणि नोकरी मधे स्त्रीयांचे अस्तित्व मान्य होत आहे पण अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.

परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करु शकतो?
मुलांचे पालक - आपल्या मुलांना स्त्री जातीचा आदर करायला शिकवायला हवे. स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू नाही आहे हे लहान पणापासून त्यांच्या मनावर बिंबवा. सार्वजनिक तसेच खासगी जागे मधे वावरतांना प्रत्येक स्त्रीला तिचा असा एक खासगी स्पेस आहे. त्या स्पेस वर केवळ तिचा आणि तिचाच अधिकार आहे , त्या स्पेसचा आदर करायला शिकवा. तिच्या परवानगी शिवाय त्या खासगी जागे मधे मुलाने प्रवेश करु नये.

मुलींचे पालक - मुलींना शिक्षण द्या. मुलांचा आदर करण्याची शिकवण द्या. आर्थिक स्वावलंबन मिळविणे आणि ते टिकविणे याचे महत्व सांगा.
वयांत आलेल्या मुलीला एखाद्या मुलाने मागणी घातली तर चतुरईने नकार देण्याची कला तिने आत्मसांत करायला हवी. एखादा निर्णय चुकला ( उदा - आयुष्याचा साथीदार निवडतांना तिला पुढे चुकल्याचे जाणवल्यास) तरी घराची/ मनाची दारे सतत उघडी ठेवा.

मुलीने मुलाच्या 'मागणीला' नकार दिला म्हणून तिला जिवंत जाळले. चाकू / कोयत्याने मारले अशा घटना वाचून मन सुन्न होते. तिला तिच्या आवडीचा सहकारी निवडण्याचेही स्वातंत्र्य नाही आहे? दहावीच्या परिक्षेला गेलेली रिंकू पाटील घटना आजही शहारे आणते.

सरकार/ शासन - लैंगिक शिक्षणाची सुरवात इयत्ता ४ पासून सुरु करावी आणि पुढे ७ वी त्यांना स्त्री/ पुरुष/.. शरिररचना शास्त्रा बद्दल शास्त्रिय माहिती असेल अशी शिक्षण व्यावस्था निर्माण करावी.

छन्दीफन्दी धन्यवाद...!
तुमच्या प्रतिसादाने तीन वर्ष जुनी कविता वर आली.

उदयजी.. अतिशय उत्तम प्रतिसाद दिलायं तुम्ही कवितेवर..
विचार करायला लावणारा ..!

उल्हासनगरच्या रिंकू पाटील हिला दहावीची बोर्डाची परिक्षा सुरू असताना भर वर्गात घुसून सर्व विद्यार्थी आणि परिक्षकाला वर्गाबाहेर काढून पेट्रोल टाकून जिवंत जाळणारा नराधम किती विकृत असेल याची कल्पना करवत नाही. फक्त सोळा वर्ष वय होतं तिचं... !

हि घटना घडली होती त्यावेळेस प्राथमिक शाळेत तिसरीत होते मी.. पेपर वाचायची लहानपणापासून आवड होती .. मी तेव्हा वाचलं होतं ते सगळं प्रकरण.. घरातही खूप चर्चा चालत होती त्यावर.. सगळं स्पष्ट आठवतंय मला... मला इतकं वाईट वाटलं होतं त्यावेळी की माझ्या सर्वात धाकट्या असलेल्या बहिणीला मी लाडाने रिंकू नावाने हाक मारायचं सोडून दिलं ...

>>>>द्युतक्रिडेच्या कपटी डावात अन् अपमानास्पद
वस्त्रहरणाच्या खाईत लोटलेली>>>>

हा प्रश्न विचारून द्रौपदीने युधिष्ठीराला निरुत्तर केले....
माझ्या आधी द्युतात तुला कौरवांनी जिंकले...तू गुलाम झालास आणि गुलामाला एक राणीला पणाला लावायचा अधिकार कुठंय....

कविता आवडली.

ही कविता वाचून मला माझी एक कविता इथे टाकण्याचा मोह झाला.

अग्निकुंड
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |
होमकुंडातून जन्मली द्रौपदी
पेटती ज्वाला मानली जाते
अपमानाची मनी आग तिच्या
पेटती अखंड राहते|
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |

असहाय्य सितामाता होती शत्रू दारी
होता रामही वनवासी जरी
पावित्र्य कसोटी फक्त सीतेची
अग्नि परीक्षा एकटी स्त्रीच देते |
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |

परक्याची तू ठेव म्हणूनी
दावणी दुसऱ्या बांधली जाते
भोग संपवूनी गेला पती की
फुकाचे देवत्व, अन् सती तीच जाते |
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |

चालती युद्धे संपत्ति अन् भूमीसाठी
गाजविती पराक्रमही ते हव्यासा पोटी
अपमान करण्या पराभूताचा
तिचाच वापर करीती जेते |
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |

क्रूरकर्मी वासनांध पशू ते
अबला, मग कुठची माता, कुठची भगिनी असते
भोगवस्तू तिच, अन् पायदळीही तीच
उमलण्या आधीच ती जोहारी पडते |
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |

मंगळावर गेले जग, तरी वड अजून तिथेच
आहे ती वकील डॉक्टर पोलिस..
कधी अप्राप्य कधी कुरूप कधी नकोशी
अॅसीड पेट्रोल काहीही, अजूनही बळी ती जाते|
धगधगत्या अग्निकुंडाशी तिचे जुनेच नाते |
****************

धन्यवाद किशोर मुंढे, उदय, छन्दिफन्दि.
रूपाली च्या कवितेवरून मला माझी ही कविता आठवली म्हणून इथे प्रतिक्रियेत टाकली होती..
ती आता स्वतंत्र धागा म्हणून टाकत आहे. कुणाला प्रतिक्रिया द्यायच्या असल्यास कृपया त्या धाग्यावर द्याव्या.

दत्तात्रेयजी धन्यवाद, द्रौपदीचा प्रश्न अगदी योग्य होता.

शर्मिलाजी धन्यवाद..!
काळजाला हात घालणारी शब्दरचना आहे तुमची...
तुम्ही कवितेचा नविन धागा काढलात ते छान केले.