नावडता

Submitted by वीरु on 3 October, 2020 - 05:36

"मी कोणालाच आवडत नाही." आज पुन्हा बाबा ओरडल्याने तिसरीतला गणु घराबाहेरच्या ओट्यावर एका कोपऱ्यात बसुन मुसमुसत होता. "आई सारखी छोट्या बबलीला घेऊन बसलेली असते. काही विचारावं तर नीट बोलतही नाही माझ्याशी, तिच्याकडे काही मागितलं तर तिचं आपलं एकच 'तु आता मोठा झालाहेस, हट्ट नको करु. तुझी कामे तुच करायला हवी.' बाबांना काही विचारलं की मोठ्याने खेकसतात माझ्यावर. तायडी तर चोंबडीच आहे. सारखी माझ्या तक्रारी करते. मला मार पडला की मज्जा बघत बसते. त्या तिघांच्या गप्पांमध्ये भाग घेतला की, लगेच 'तुला रे काय कळतं? तु काय इतका मोठा झाला का?' असं म्हणुन मला गप करतात. शाळेतपण हेच चालतं. माझ्या ताडमाड उंचीमुळे मला शेवटच्या बाकावर ब‌सवतात. तिथुन मास्तर काय शिकवतात काही कळतच नाही. मग मी खिडकीतुन बाहेर बघत रहातो.. आकाशातले ढग, झाडाच्या फांद्यावर चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या, इकडुन तिकडे पळणाऱ्या खारुताई, रंगबिरंगी फुलपाखरं.. वेगळेच जग आहे ते, कोणी कोणावर ओरडत नाही की रागावत नाही...
हे सगळं पहातांना कित्ती मज्जा येते सांगु, मी वर्गात बसलोय हेच आठवत नाही. मास्तरांच्या लक्षात आलं की ते मला खडु फेकुन मारतात. मास्तर चिडले की मला ठोंब्या म्हणुन हाक मारतात. मग सगळा वर्ग फिदीफिदी हसतो. सगळे म्हणतात तायडी किती हुश्शार आणि हा असा कसा दगडोबा. पण तायडीला येतात का माझ्यासारखे चित्र काढता? तायडीलाच काय वर्गातल्या कोणालाच माझ्यासार‌खे चित्र काढता येत नाही. झाडावरुन माझ्यासारख्या कैऱ्या, चिंचा तर बाबांनाही पाडता येत नाही. मी दगड फेकल्यावर कैरी पडली नाही असं होतच नाही. मागे एकदा मुंबईहुन मामा आला होता तेव्हा घरामागच्या जास्वंदीला आलेल्या फुलाचं मन लावुन चित्र काढलं मी. कौतुकाने दाखवायला गेलो तर "चित्र काढुन पोट भरणार आहे का तुझं" असं म्हणाले बाबा. मामा खोखो हसला. मला मेल्याहुन मेल्यासारखं झालं. मामाच्या मुलांचं
आईला, तायडीला किती कौतुक.. ते आल्यावर आईला काय करु अन् काय नको असं होऊन जातं. मुंबैला राहतात ना ते..
नाही म्हणायला आज्जी करायची माझं कौतुक. सुरकुतलेला खरखरीत हात माझ्या गालावरुन फिरवायची. बाबा मारायला आले की धडपडत मध्ये पडायची अन् थरथरत्या हातांनी मला पोटाशी घ्यायची. बाबांचं मग काही चालायच नाही. मागच्या वर्षी ती पण गेली देवबाप्पाकडे.. मला एकटं सोडुन.. आमच्या चंद्री गायीसमोर हात केला की ती हातावरुन जीभ फिरवते. तिच्या त्या खरखरीत स्पर्शाने मला आजीच आठवते. म्हणुन आज्जीची आठवण आली की मी चंद्रीसमोर जावुन हात पुढे करायचो. एकदा बाबांनी हे पाहिल्यावर खुप ओरडले ते.. त्यांना कसं सांगु की आजी भेटते तिथे मला म्हणुन."
खाली मान घालुन बसलेल्या गणुच्या मनात विचारांचा गुंता झाला होता. गल्लीतल्या सदुच्या हाकेने त्याची तंद्री भंगली. "काय गणोबा, काय झालं? आज पुन्हा ओरडा खाल्ला का? तुझं बरं आहे बाबा, जेवण करायची गरजच नाही." सदु हसत म्हणाला.
"चल येतोस का खेळायला." सदुने विचारलं. सदु गणुपेक्षा चार वर्षांनी मोठा. दोघं बरोबरच खेळायचे. सदुला सगळं माहित असायचं. गणु डोळे मोठे करुन सदुच्या गोष्टी ऐकत रहायचा. काही कळायच्या तर काही कळायच्या पण नाही..
सदुचे बाबा त्याला कधीच अभ्यासाचं विचारायचे नाही. उलट शेळ्या चारायला पाठवायचे कधीकधी सोबत शेतावर कामालाही न्यायचे. गणुला खुप हेवा वाटायचा सदुचा. आपले बाबाही असेच हवे होते असं वाटायचं गणुला.
सदुने बोलावल्यावर गणु डोळे पुसत खेळायला पळाला. अजुन दोघे तिघे मित्र होते सदुच्या वर्गातले. खेळता खेळता एकाच्या डोक्यात आलं की गावाबाहेरच्या देवीच्या मंदीरात जायचं दर्शनाला. गणु आढेवेढे घ्यायला लागला. "भित्री भागुबाईच आहेस तु. म्हणुन सगळे ओरडतात तुला. आमच्याकडे बघ आम्हाला कोणी काही बोलतं का. याला खेळायला घ्यायचं नाही रे आपल्यामध्ये" सदुने असं सांगितल्यावर गणुचा नाईलाज झाला. सुर्य मावळायच्या आत परत यायचं या अटीवर गणु तयार झाला. ते निघाले तेव्हा संध्याकाळ होत आली होती. मंदीर गावापासुन तीन चार किलोमीटर लांब होतं. तिथे पुर्वी खुप जंगल होते आणि जंगलात वाघही होते असे सांगायची आजी. कधीकाळी जंगलात खरंच वाघ होते कारण वाघांना पकडायचा पिंजरा गावातल्या मारुतीच्या पाराजवळ गंजत पडला होता. आता पोरं खेळायची त्याच्यावर.. मंदीराशेजारुन जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक पडकं दगडी बांधकाम होतं, झाडाझुडपांनी वेढलेलं. गणुला भीतीच वाटायची त्याच्याकडे पाहुन, जणुकाही ते बोलावत आहे असं वाटायचे गणुला.. एकदा बाबांना हे सांगितल्यावर ते हसायला लागले "अरे घाबरतोस कशाला? इंग्रजांच्या काळात चौकी होती तिथे. त्याकाळात मंदीराजवळच्या घाटात दरोडेखोर येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुंना लुटायचे म्हणुन शिपाई रहायचे तिथे पहाऱ्याला." बाबांनी हसत सांगितलं होतं. बाबांनी असं सांगितल्यावर तर गणु जास्तच घाबरायचा त्या पडक्या चौकीकडे पाहुन. त्या चौकीच्या दारातुन गोरा शिपाई रागाने पहातोय असं वाटायचे गणुला..
मंदीरापासुन काही अंतरावर जुनी पायऱ्यांची विहिरही होती दर्शनाला येणाऱ्यांच्या सोयीसाठी. एकदा कसल्यातरी पुजेच्यावेळी आई बाबांचा हात पकडुन पायऱ्या उतरुन विहिरीमध्येही गेला होता तो. जसजसा एकेक पायरी उतरत गेला तसतसा उजेड हळुहळु कमी होत गेला.. विहिरीतल्या त्या थंडगार वातावरणात किती भारी वाटलं होते तेव्हा त्याला..
आता मित्रांबरोबर जातांना हे सगळं आठवत होतं गणुला. सरळ मागे वळुन घरी पळुन जावं असाही विचार येऊन गेला त्याच्या मनात. पण नंतर महिनाभर सदु आणि त्याचे मित्र चिडवुन नकोसं करुन टाकतील याची शंभर टक्के खात्री होती म्हणुन काही न बोलता तो चालत राहिला. गावाबाहेर मोकळ्या वातावरणात आल्यावर गणु सगळंच विसरला.. आई, बाबा, तायडी-बबली, मास्तर सगळंच. आतापर्यंत अंग चोरुन मित्रांच्या मागे चालणारा गणु आता सगळ्यांच्या‌पुढे चालायला लागला..
गप्पागोष्टी करत, रमतगमत ते एकदाचे मंदीराजवळ पोहचले. दर्शन घेऊन तसेच मंदिराबाहेर बसुन राहिले. आता सुर्यही मावळतीला गेला होता. संधीप्रकाशात पसरायला लागल्यावर ते घराकडे निघाले. मस्त गप्पागोष्टी करत पुढच्या सहलीच्या योजना आखत ते गावात पोहचले. गल्लीत पोहचले तेव्हा सारा गाव जमा झालेला दिसला. काय झालं ते कळेना तोच सदुच्या वडीलांनी सदुला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. हे पाहुन भेदरलेल्या गणुला त्याच्या बाबांनी घरात कधी नेले ते समजलंच नाही. झालं आता‌ आपलीही अवस्था सदुसारखीच होणार याची गणुला खात्री पटली होतीच. आत जाताच बाबांनी दरवाजा बंद केला आणि गणुला उचलुन छातीशी घट्ट पकडुन ठेवले. जेव्हा एक उबदार थेंब गणुच्या हातावरुन ओघळत गेला तेव्हा बाबा ओठ दाताखाली दाबुन रडताहेत हे गणुला समजलं. असे बाबा गणु पहिल्यांदाच पहात होता. तिकडे आई तोंडाला पदर लावुन रडत होती, गणुला पाहिल्यावर त्याला जवळ घेत तिला अजुनच रडायला येत होते. तायडीचेही डोळे रडुन लाल झाले होते. हे पाहुन गणुलाही रडु यायला लागलं. तिघेही गणुला जवळ घेत त्याला गोंजारत पुन्हा असा एकटा कुठेही जाऊ नको म्हणुन पुन्हा पुन्हा सांगत होते तेव्हा फोटोतली आजी खुदकन हसुन "बघ मी सांगत होती ना, तु खुप आवडतो सगळ्यांना. ऐकशील ना आता त्यांचं" अस सांगते आहे असं गणुला वाटलं आणि त्याने नकळत मान हलवुन आईचे डोळे पुसले. "शाहणं माझं बाळ" म्हणत आईने गणुला पोटाशी धरलं, अगदी आज्जीसारखं..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान. मी शाळेत शिकवत असताना काहीतरी निमित्त झाले अन एक अकरावीचा मुलगा चक्क रडू लागला. कारण विचारल्यावर म्हणाला, 'मी घरात कुणालाच आवडत नाही. अभ्यासावरून आणि साध्यासुध्या गोष्टीवरून घरचे लोक मला चूक नसतानाही सारखे रागावतात. काहीही झाले तरी मलाच बोलतात.' नेमके परिक्षेचे, धावपळीचे दिवस होते ते. त्याला मी नंतर स्टाफरूममधे नेऊन समजावले होते. आज ही कथा वाचून तो मुलगा आठवला.

छान.

मस्त!

वीरू, तुम्ही नवलेखक वाटतही नाहीत, इतकं छान लिहिताहात. आतापर्यंतच्या सगळ्या कथा छान होत्या. ही पण आवडली.

VB, हर्पेनजी धन्यवाद.
--
परिक्षेचे, धावपळीचे दिवस होते ते. त्याला मी नंतर स्टाफरूममधे नेऊन समजावले होते. आज ही कथा वाचून तो मुलगा आठवला.
Submitted by Cuty
>> तुम्ही त्या मुलाला समजुन घेतलं, समजावलं. खुप चांगलं काम केलं तुम्ही.
--
गणुचं भावविश्व सुंदर मांडले आहे कथेत.>>
धन्यवाद रुपालीताई.
--
मानवजी, विनिताजी, भावनाजी धन्यवाद.
--
छान आहे कथा! आवडली.
Submitted by वावे >> धन्यवाद.
--
मीराताई, जे थोडफार लिहिले ती सगळी मायबोलीकरांची कृपा. मला लिहिता येईल असं कधी वाटलंही नव्हतं..
--
बोकलतजी, निरुजी धन्यवाद.

छान गोड लिहिलय वीरू..

माझ्या मुलाला ही त्याच्या पप्पांनी रागावले/मारले कि त्याला असेच वाटते मग मला पटकन सांगावे लागते.. जो ज्यादा प्यार करते वही डाटते/मारते..पाच मिनिटांत राग विसरून कळी खुलती त्याची मग Happy

पाच मिनिटांत राग विसरून कळी खुलती त्याची मग>> मृणालीजी खुप छान अनुभव सांगितला तुम्ही.
__
खूप छान लिहिली आहे कथा.
Submitted by एस >> धन्यवाद.

मला मुलांना मारणे अजिबात आवडत नाही. मी स्वतः मारत नाही.. प्रेमाने बोलून, समजावून सांगणे असं मी करते.
पण त्यांचे पप्पा आणि मुलांच्या मधे मी पडत नाही.