जोगिया

Submitted by Sameer Jirankalgikar on 4 October, 2020 - 11:06

जोगिया
परवा काहीतरी कारणाने गदिमांच्या “जोगिया” ची आठवण झाली आणि पुन्हा शोधून ती कविता वाचली. खरतर या कवितेचं मराठी भाषेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. “महाकवी”, “आधुनिक वाल्मिकी” असा लौकिक असणाऱ्या ग. दि. माडगूळकरांच्या पहिल्या कविता संग्रहातील कविता, ज्या कवितेमुळे या कविता संग्रहाला “जोगिया” हे नाव मिळाले.
देहविक्रय करणाऱ्या एका महिलेची ही कथा आहे. निष्ठुर व्यवहारापायी खरं प्रेम ती डावलते. त्याची जाणीव झाल्यावर तिच्या मनस्थितीचे वर्णन गदिमांनी केले आहे. वरकरणी जरी ही कथा एका गणिकेची असली तरी थोडं रूपकात्मक अर्थाने बघितलं तर ती गणिका ही व्यावहारिक जगात खरं प्रेम, नाती विसारणाऱ्या प्रत्येक माणसाचं प्रतीक वाटते. कुठल्याही कवितेचा अर्थ प्रत्येक वाचक आपल्या पद्धतीने लावून तिचा रसास्वाद घेऊ शकतो आणि हीच कवितेची गम्मत आहे. कविता समजून सांगण्याचा नाही तर समजून घेण्याचा विषय आहे. त्यामुळे एका कवितेचे अनेक अर्थ निघू शकतात. आणि गदिमांच्या कविता समजून घ्यायला एक आयुष्य पुरणार नाही.
यातल्या भाषाशैली विषयी मी काय बोलू! त्यावर मी बोलणं म्हणजे “ज्योतीने तेजाची आरती”! पण तरी त्यातल्या काही साैंदर्य स्थनांविषयी बोलल्या शिवाय राहवत नाही. यातल्या पहिल्या कडव्यातच गदिमांच्या मधला पटकथा लेखक दिसून येतो. ठिकाणचा उल्लेख न करता गदिमा कुठल्या ठिकाणाविषयी बोलत आहेत ते लक्षात येते. हे वर्णन / कथा जरी एका वेश्येची असली तरी त्यातला भाषेचा समतोल हा थोडाही इकडे तिकडे झालेला जाणवत नाही. प्रत्येक शब्द हा त्या त्या ठिकाणी इतका चपखल बसतो की त्याला समानार्थी कितीतरी शब्द असले तरी दुसरा कुठलाच शब्द त्याजागी शोभला नसता. उदाहरणच घ्याचे झाले तर, तिसऱ्या कडव्यात आलेला “नखलिशी” हा शब्द! आणि खरतर असे शब्द ही त्यांची मराठी भाषेला देण आहे.
“भांगेत पेरूनी तुळस …….” ही कल्पना फक्त या महाकविलाच सुचू शकते. शेवटच्या कडव्यात “ही तिथी पाळते व्रतस्थ राहुनि अंगे” हे वाचून तर कुणालाही जाणवेल यापेक्षा दुसऱ्या चांगल्या शब्दात कोण काय लिहू शकेल.
ही अशी प्रतिभा लाभलेले खरंच लाखात एक असतात.
ही कविता वाचा, तुमच्या पद्धतीने रसास्वाद घ्या आणि यातलं तुम्हाला काय आवडलं ते नक्की सांगा.

जोगिया

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली

झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलूनी तू दार दडपिले पाठी

हळुवार नखलिशी पुन: मुलायम पान
निरखीशी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसि काय ते? गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.

साधता विड्याचा घाट उमटली तान
वर लवंग ठसता होसि कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने
"का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्य़ात तरंगे अभंगवेडी गाथा

मी देह विकुनिया मागून घेते मोल
जगविते प्राण हे ओपुनीया 'अनमोल'
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा

शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान... तो निघून गेला खाली

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'

नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हासुनी म्हणाले, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हा, पान घ्या... निघून गेला वेडा!

राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात
जाणिली नाहि मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येइल भलत्या व्यापाराला?

तो हाच दिवस हो, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला

हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

गदिमांची हि जोगिया "घरकुल" या चित्रपटात घेतली आहे. अतिशय सुंदर गायली आहे, फैयाज यांनी. बहुतेक जोगिया रागातंच, संगीत अण्णासाहेब चितळकर. एंजॉय...

च्रप्स /सामो,
'ओपुनीया' म्हणजे 'विकून'. गोनीदांच्या किंवा व्यंकटेश माडगूळकरांच्या लिखाणात वाचला आहे हा शब्द. आठवडाबाजारात ओपून असा काहीतरी उल्लेख आहे मला वाटतं.

गदिंमांचं, पुलंचं, बोरकरांचं लिखाण वाचताना (मला तरी) ही मंडळी त्यांच्या पन्नाशीनंतरची / साठीनंतरची, जेव्हा मला त्यांच्या खजिन्याचा शोध लागला, तेव्ह्याची आठवतात. कधीतरी पटकन जाणीव होते की यातलं बरंच लिखाण त्यांच्या उमेदितल्या वर्षातलं, विशी-तिशीतलं आहे!

लेखक / संपादक, पहिल्या ओळीतलं 'सताकर' चं 'सतार' कराल का?

मायबोली, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. चूक दुरुस्त केली आहे. टायपिंग ची चूक होती.
ओपुनिया चा अर्थ विशद केल्याबद्दल धन्यवाद. यात मला जाणवलेली अजून एक गोष्ट अशी की ती भाषा एका गणिकेची असल्यामुळे विकून या अर्थाने तो तसा वापरला आहे.

मायबोली, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. चूक दुरुस्त केली आहे. टायपिंग ची चूक होती.
ओपुनिया चा अर्थ विशद केल्याबद्दल धन्यवाद. यात मला जाणवलेली अजून एक गोष्ट अशी की ती भाषा एका गणिकेची असल्यामुळे विकून या अर्थाने तो तसा वापरला आहे.

दुरूस्तीबद्दल आभार. 'ओपुनिया' शब्द निव्वळ ती गणिका आहे म्हणून वापरला नसावा. मला त्या शब्दाचं प्रयोजन थोडं वेगळं वाटतं.

आधी म्हणालो त्याप्रमाणे फुटकळ विक्रीसाठी ओपणे हा शब्द आहे. कोकणातली मामी रूपया-दोन रूपयाला काजूंचे वाटे गोणपाटावर लावून ठेवते त्याप्रमाणे. पण पेठेतला दुकानदार साडी 'ओपत नाही', 'विकतो'. त्या आधीच्याच ओळीत बघा, ती गणिका "मी देह विकुनीया मागुन घेते मोल" म्हणाली आहे. त्यात शुद्ध व्यवहार आहे देहाचा, ही भावना ती मांडत्येय. पण निव्वळ कुडी जगवण्यासाठी म्हणून हा असला व्यवहार करून अनमोल असं आपलं शील, चार दमड्यांसाठी विकत्येय ती हे तिला कळतंय - she is selling her soul. कोणीही स्त्री कुठल्याही किंमतीला आपलं लाखमोलाचं चारीत्र्य विकणार नाही आणि ही मात्र ते , जणू कोणी बाजारात भाजीचा वाटा मांडावा तद्वत हे 'ओपायला' बसली आहे हे अधोरेखित करायला म्हणून या शब्दाची योजना असावी. दोन ओळीमधे या शब्दांची जर उलटापालट केली ......
"मी देह ओपुनी मागून घेते मोल,
जगविते प्राण हे विकूनिया 'अनमोल',"

..... तर यमकात बसेल, ढोबळ अर्थ बदलणार नाही पण त्यातल्या सखोल अर्थाची खुमारी हरवेल.

(तुम्ही लेखात "....कुठल्याही कवितेचा अर्थ प्रत्येक वाचक आपल्या पद्धतीने लावून तिचा रसास्वाद घेऊ शकतो आणि हीच कवितेची गम्मत आहे. कविता समजून सांगण्याचा नाही तर समजून घेण्याचा विषय आहे. त्यामुळे एका कवितेचे अनेक अर्थ निघू शकतात....." हे अतिशय रास्त लिहिलंय म्हणून आपलं मला जाणवलेलं सांगितलं !!)

हे स्पष्टीकरण देखील सयुक्तिक आहे. या शब्दाचा मी या दृष्टीने विचार केला नव्हता. कवितेचे वेगवेगळ्या अंगाने रसग्रहण करण्यात खूप मजा आहे. तुमचे खूप आभार.