तुम्ही घरकामाला बाई पुन्हा ठेवली आहे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 September, 2020 - 18:58

लॉकडाऊन लागायच्या आधीच आमची बाई सर्वांची नोकरी सोडून कायमची गावाला गेली. आम्ही नवीन घरात शिफ्ट होणार असल्याने महिनाभरासाठी तात्पुरती बाई पाहिली. पण तिलाही या महिन्याभराच्या कामात रस नसल्याने दोमचार दिवस काम करत ती सुद्धा गायबली. मग कोरोना आला. लॉकडाऊन लागला. या काळात सोसायटीनेच घरकामाल बाई ठेवण्यास मनाई केली होती. आणि नंतर जेव्हा निर्बंध हटवला तेव्हा आम्हीच रिस्क नको म्हटले. तसेही बायको आणि आई मिळून घर व्यवस्थित चालवत होत्या. माझीही वर्क फ्रॉम होम मुळे त्यांना मदत होत होतीच. आणि तसेही पुन्हा थोड्या काळासाठी नवीन बाई शोधण्यात अर्थ नव्हता.

नुकतेच आम्ही नवीन घरात शिफ्ट झालोय. तर मोठे घर, त्या घरातला पसारा, नवीन घराची छोटीमोठी कामे, आजूबाजूचे काम चालू असल्याने येणारी धूळ, मुलीची ऑनलाईन शाळा, माझे नुकतेच आठवड्यातून दोन दिवस सुरू झालेले ऑफिस यामुळे एकंदरीतच घरकामाला कोणी मदतीला आले तर बरे असे पुन्हा घरच्या बायकांना वाटू लागलेय.
घरकाम म्हणजे कचरा, भांडी, लादी पुसणे वगैरे.. स्वयंपाक जोपर्यंत आईबायको आवडीने करताहेत तोपर्यंत त्यांच्याच हातचेच खायला आवडते.

तर चौकशी करता समजले की नव्या बिल्डींमध्ये जे आतापर्यंत राहायला आले आहेत त्या सर्वांच्या घरी घरकामाला बाई येते. आम्हीच आहोत जे अजून कोरोनाच्या भितीने हे टाळत आहोत. त्यामुळे आता घरच्या दोन्ही बायकांमध्ये कुजबूज सुरू झालीय की आपणही आता बाई बघायला हरकत नाही. फारतर काळजी घेऊया. पण ती काय हे त्यांनाही ठाऊक नाही.न्म्हणून हा धागाप्रपंच.

तुमच्याकडे घरकामाला बाई येते का? किती वेळासाठी येते? काय काय काम करते? आणि याबाबत तुम्ही एकूणच काय काळजी घेता? उदाहरणार्थ तिला आल्या आल्या हात धुवायला लावणे? तिचे सामान असल्यास वेगळे ठेवणे? तिला मास्क लावायला सांगणे? झाल्यास आपणही मास्क लावणे? तिला मोजकीच कामे सांगणे जेणेकरून कमीत कमी तिचा घरात वावर होईल? ईतर आणखी काही काळजी? कि अजूनही हि रिस्क घेऊ नये? अजून काही काळ आपली कामे आपणच करावीत?

सर्वांची याबाबत मते आणि अनुभव फायदेशीर ठरतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही जुलैपासून केरफरशीसाठी बाई परत बोलावली. तोपर्यंत पूर्ण पगार दिला. भांडी घरीच घासतो, कपडे वॉशिंग मशीनमध्ये.
कामाला बाई आली की ती पहिल्यांदा कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय स्वच्छ साबणाने धुते. मग तिला रोज एक नवीन डिस्पोजेबल मास्क देतो (पुणे पोलिसांनी जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार घरापुरता वेगळा मास्क - जो ती व्यक्ती बाहेर वापरणार नाही - ठेवावा. ऑनलाईन एकगठ्ठा विकत आणून ठेवलेत). ती आसपास असताना आम्ही सुद्धा सगळेजण मास्क घालतो. ती विश्वासू आहे आणि मुख्य म्हणजे काटेकोर स्वच्छता आणि टापटिप पाळणारी आहे एरवीही. त्यामुळे अडचण येत नाही.

नाही, अजून नाही ठेवली आहे, माझी बाई ऑगस्ट मध्ये आली गावा वरून, पण ती जिथे राहते तो रेड अलर्ट एरिया आहे सो दिवाळी पर्यंत नाही ठेवणार असं म्हणते आहे, बाकी वरची दिव्या ची पोस्ट वाचली तसंच मी सुद्धा रात्री पर्यंत चा स्वयंपाक करून ठेवते, शनिवार रविवार लेका च्या special demand पूर्ण करते बाकी आपलं नेहमीच जेवण

उलट झोपडपट्टीवाले अँटिबॉडी कमवून बसले
>>>
ते स्वत:साठी.
पण ईतरांसाठी ते कोरोनाचे प्रसारक होऊ शकतात ना? चुकत असेल तर कोणी कर्रेक्ट करा.

आणि कामवाल्या बाईकडून वा कोणाकडूनही कोरोना झाला असे ईथे कोणी म्हटले म्हणजे त्या व्यक्तीला दोष दिला असे होत नाही. जर कोणी कोरोनायोद्धा असेल तर त्याचा आदरच असतो आपल्याला. पण त्यांच्या स्वत:च्या कुटुंबालाही नाईलाजाने त्यांच्यापासून दूर राहावे लागते ना.

आमच्या कडे आधी धुणे भांडी करायला एक ताई यायची आणि स्वयंपाकाला एक ताई यायची. दोघींना 3 महिने पूर्ण पगार आणि सुट्टी दिलेली. तीन महिन्याने परत बोलावलं तर पहिल्याच दिवशी धुणे भांडी करणाऱ्या ताईला चोरी करताना रंगे हात पकडलं.
मग तिला 6 महिन्याचा पगार देऊन काढून टाकलं ( ही ताई आमच्याकडे 8 वर्षांपासून काम करते, तिने पैसे मागितले असते तर असेच दिले असते, या आधी अनेक वेळा दिलेले आहेत पण विश्वासघाताला माफी नाही म्हणून काढून टाकलं)
लॉकडाऊन मध्ये तिच्या नवऱ्याची नोकरी गेली तेंव्हा गरज असेल म्हणून असं केलं असेल असा विचार करून पगार दिला.
स्वयंपाक करणारी ताई म्हणाली मी भांडी, फरशी करते, मला पैसे वाढवून द्या. मग आता तीच सगळं काम करते.

हे वरती कोणी तरी विचारलंय की कामावल्याना पगार कोण देतं त्याचं उत्तर

रीया खूप छान केलेत.
तसेच चोरी पकडूनही काढताना आणखी पगार दिलात हे सुद्धा भारी.
त्या बाईंवर आठ वर्षांच्या संबंधानंतर अशी करायची वेळ आली याचेही वाईट वाटले.

जूनपासून आमच्याकडे कामवाल्या बायका (पोळ्या करणारी आणि झाडू-पोछा करणारी) येत आहेत. सोसायटीच्या गेटवर त्यांची temperature / oxygen तपासणी रोज होते. हातावर sanitizer ही देण्यात येते. तरीही त्या घरात आल्या की त्यांना साबणाने हात धुवायला लावते. घरात काम करताना त्या मास्क लावत नाहीत आणि आम्हीसुद्धा त्या घरात असताना मास्क लावत नाही. पण त्या ज्या खोलीत असतात तिथे जाणे टाळतो. किंवा अगदीच जावे लागले तर त्यांच्यापासून २ हात लांब रहातो. तसही त्या दोघी भल्या पहाटे येतात त्यामुळे त्यावेळी मी सोडून घरातील बहुतेक सगळे मेंबर झोपलेले असतात.

Pages