माधुरीचा अक्षै (भाग १)

Submitted by nimita on 22 September, 2020 - 00:29

आज पहाटे पासूनच रंजीची धावपळ चालू होती. लवकर लवकर घरातली सगळी कामं आटोपून तिला वेळेत तिच्या नवीन कामावर पोचायचं होतं. तसं सांगितलंच होतं ताईंनी -' रोज आठच्या ठोक्याला हजर राहावं लागेल !' एरवीची रंजी असती तर सरळ सांगितलं असतं तिनी त्या ताईंना..." आठ म्हंजी लैच लौकर हाये ओ ..साडेआठ च्या पयले नाय जमायचं." पण तसं काही न बोलता ती चक्क मान हलवत "व्हय, येईन की..." म्हणाली होती.

तसं पाहिलं तर काम काही वेगळं नव्हतं- तेच नेहेमीचं- भांडी, कपडे, केर फरशी आणि स्वैपाक !पगारसुद्धा त्या सोसायटीतल्या इतर बायांनी ठरवल्या प्रमाणेच होता...पण तरीही रंजी लवकर जायला तयार झाली होती. कारण एकच - त्या ताई रंजीला खूप आवडल्या होत्या; अगदी बघताक्षणीच ! त्यांचा आवाज, बोलायची पद्धत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं ते गोड हसणं .... एकदम 'माधुरी' सारखं! हो,.... रंजीसाठी एखादी स्त्री 'आवडणं' किंवा 'न आवडणं' यासाठी एक महत्वाचा मापदंड म्हणजे ... 'माधुरीसारखं हास्य' !! आणि पुरुषांच्या बाबतीत....तिथेही तसंच... तो अक्षय कुमार सारखा ...नाही नाही 'अक्षै कुमार' सारखा जंटलमन असायला पाहिजे !! अगदी die hard फॅन होती ती माधुरी आणि अक्षयची.. !!! आणि म्हणूनच त्या ताईंसाठी ती अर्धा तास आधी यायला तयार झाली होती. तिनी तर मनातल्या मनात त्या ताईंचं नाव ही ठरवून टाकलं होतं -'माधुरी ताई' !!

तिची ती सकाळची धावपळ बघून तिच्या नवऱ्यानी- अशोकनी तिला विचारलं देखील,"आज येवडी घाई कशाची गं?अजून तर टाईम हाये ना आपल्याला जायाला?" त्यावर रंजी म्हणाली," आजपासून नवीन काम धरलंय. आणि बरुब्बर आठ वाजता पोचाया हवं.. आता मी रोज सकाळच्याला एकली जाईन, सांजच्याला येऊ दोघं जोडीनी."

अशोक त्यांच्या वस्तीजवळच्याच एका कार रिपेअरिंग वर्कशॉप मधे मेकॅनिक म्हणून नोकरी करत होता. पुढे भविष्यात स्वतःचं एक वर्कशॉप उघडायचं स्वप्न होतं त्याचं. लहान असल्यापासूनच त्याला गाड्यांचं खूप आकर्षण होतं ..अगदी सायकल पासून चार चाकी गाड्यांपर्यंत! आणि म्हणूनच दहावीची परीक्षा पास झाल्यावर त्यानी सरळ ITI मधून मेकॅनिकचा कोर्स केला होता...अशोक होताही खूप मेहनती...अगदी मन लावून काम करायचा, एकीकडे गाड्या ठीक करता करता आपल्या मालकाला ही बघत राहायचा... एकलव्य बनून वर्कशॉप मॅनेजमेंट चे धडे गिरवायचा.

रंजी आणि अशोक रोज सकाळी एकत्रच घराबाहेर पडायचे- आपापले जेवणाचे डबे घेऊन. अशोकच्या वर्कशॉप हून थोडं पुढे गेल्यावर एक मोठ्ठी हाऊसिंग सोसायटी होती.. सकाळच्या वेळात तिथल्या काही घरांमधे रंजी घरकाम करायची आणि मग दुपारी एका ब्युटी पार्लर मधे मदतनीस म्हणून जायची. भविष्यात तिला छोटंसं का होईना पण स्वतःचं ब्युटी पार्लर सुरू करायचं होतं ! दहावी पर्यंतच शिक्षण झालं होतं तिचं. त्यानंतर पैसे नाहीत म्हणून बापानी पुढे शिकवलं नाही. केवळ कायद्याच्या भीतीमुळे तो रंजी अठरा वर्षांची होईपर्यंत थांबला होता.... नाहीतर केव्हाच लग्न लावून दिलं असतं तिचं. दहावी नंतर दोन वर्षं रंजी तिच्या मावशीच्या ब्युटी पार्लरमधे तिला मदत करायला जायची. थोडेफार पैसे मिळायचे आणि अनुभवही!

अशोकचे आईवडील गावी राहून शेतीवाडी करायचे; पण गावात त्याच्या मेकॅनिक च्या कामाला फारसा वाव नसल्यामुळे अशोक शहरात आला होता. अशोक आणि रंजीचा जोडा अगदी साजेसा होता... एकमेकांना पूरक असा...दोघंही खूप हौशी आणि तितकेच मेहनती, प्रामाणिकपणे आपलं काम करणारे, उराशी स्वप्नं बाळगून जगणारे.... आणि आपली स्वप्नं पूर्ण व्हावी म्हणून जीवापाड कष्ट करणारे !!!

आणि म्हणूनच रंजीनी हे जास्तीचं काम धरलं होतं.... तेवढेच काही पैसे गाठीला राहतील हा विचार करून!

घरातली रोजची कामं करता करता रंजीचं एकीकडे अशोकला सूचना देणं चालू होतं...' दुपारच्याला येळेत डबा खाऊन घ्ये ' , 'त्या शेजारच्या दुकानातल्या पोरांसंगं लगट वाढवू नको जास्तीची.... लै बिनडोक टाळकी हायेत ती.... निसतं दुसऱ्याच्या पैशावर मजा माराया हवं' .... एक ना दोन !!

पण रंजीचा हा राग काही अनाठायी नव्हता. काही महिन्यांपूर्वी त्या मुलांच्या नादाला लागून अशोकला देखील अधूनमधून दारू प्यायची सवय लागली होती. पण सुरुवातीला अधूनमधून असलेली ती सवय हळूहळू रोजचीच व्हायला लागली होती. रंजी अशोकला खूप समजावून सांगायची. त्यालाही तिचं सगळं म्हणणं पटायचं आणि तो तशी मनाची तयारी करूनच घरातून निघायचा ! पण एकदा का त्याच्या मित्रांच्या संगतीत गेला की तो रंजीला दिलेलं वचन विसरून जायचा.असाच एका रात्री जेव्हा तो झिंगत पडत घरी आला होता तेव्हा त्याचं आणि रंजीचं खूप मोठं भांडण झालं होतं; आणि रागाच्या भरात अशोक नी रंजीवर आपला हात उगारला होता. पण पुढच्याच क्षणी त्याला आपली चूक समजली होती. रंजीवर उगारलेल्या त्या हातानी स्वतःलाच मारून घेतलं होतं त्यानी !! खूप पश्चात्ताप झाला होता त्याला. आणि त्या क्षणी त्यानी ठरवलं होतं - "ज्या दारूमुळे माझ्यातला माणूस जनावर बनून जातो... एका स्त्रीला मारायला माझा हात उठतो... त्या दारूला मी यापुढे कधीही स्पर्श करणार नाही." रंजीच्या कुशीत शिरून एखाद्या लहान मुलासारखा रडला होता तो त्या रात्री ! तिच्यावर हात उगारला म्हणून किती तरी वेळा तिची माफी मागितली होती !!

आणि खरंच, त्या दिवसापासून अशोक नी दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता. पण तरीही रंजी रोज एकदा तरी त्याला त्याच्या त्या टवाळखोर मित्रांपासून सावध राहायला सांगायची . आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता.अशोक सुद्धा नेहेमीच्या सवयीप्रमाणे एकीकडे तिच्या बोलण्याला मधे मधे हुंकार देत त्याची सकाळची सगळी कामं आटोपत होता.

रंजी घाईघाईतच नव्या कामावर पोचली. बरोब्बर आठ वाजता तिनी ताईंच्या घराची बेल वाजवली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे माधुरी-अक्षै मस्त सुरुवात होती. वाटलं असच खट्याळ व विनोदी वाचायला मिळणार. पण मधेच दारु मारहाण आली आणि विरस झाला.
अंदाज येत नाहीये कथा गंभीर असणारे की हलकीफुलकी.
पुलेशु.