आधुनिक कृष्ण!

Submitted by आसावरी. on 15 September, 2020 - 03:57

आठ वर्षे झाली आता जवळपास पण मला अजूनही स्पष्ट आठवते ती दुपार, अगदी कालच घडल्यासारखी!
आठवीत होते मी, म्हणजे आठवीत जाणार होते, सातवी नंतरची उन्हाळ्याची सुट्टी होती. माझा ऋषी दादा आला होता सुट्टी साठी. ऋषी दादा म्हणजे ऋषिकेश, माझ्या मीना मावशीचा मुलगा. त्याची पण नुकतीच बारावीची परीक्षा संपली होती म्हणून तो आमच्याकडे राहायला आला होता.

त्या दिवशी सकाळपासूनच जरा बरं वाटत नव्हतं मला; गेले दोन-तीन दिवस रात्री जागून सिनेमा पाहिल्यामुळे असेल असं वाटलं म्हणून काही फार विचार नव्हता केला मी त्यावर. आई आणि बाबा नेहमीप्रमाणेच लवकर आवरून दवाखान्यात गेले होते. आज्जी काही दिवस आत्याकडे गेली होती, त्यामुळे घरात मी आणि दादा दोघेच होतो.

सकाळी नाश्ता, अंघोळ वगैरे झाल्यावर मी आणि दादा थोडावेळ कॅरम खेळलो आणि मग झोप यायला लागली, अशक्तपणा वाटत होता म्हणून मी झोपायला गेले आणि दादा पुस्तक वाचत बसला. साधारण जेवायच्या वेळेस जाग आली तेव्हा लक्षात आलं की आपली चादर थोडी ओलसर वाटते आहे; उठून पाहिल्यावर लक्षात आलं की आता आपण "मोठे" झालो आहोत. अर्थात याबद्दल आम्हाला शाळेत शिकवलं होतं, माझ्या आई बाबांनी पण मला सगळं समजावून सांगितलंच होतं. पण तरीही अचानक भीती वाटली आणि आईची आठवण यायला लागली. इतक्यात मला जेवायला बोलवायला म्हणून खोलीत आलेल्या ऋषी दादाने सगळं पाहिलं. माझे डबडबलेले डोळे बघून तो म्हणाला, " अगं वेडाबाई रडतेस काय? रडण्यासारखं काय आहे याच्यात? अगदी नॉर्मल असतं हे! आणि खरं तर खूपच आनंदाची गोष्ट आहे ही! जा, तू पटकन आंघोळ करून घे आणि कपडे बदल. आणि हे कपडे गरम साबणाच्या पाण्यात भिजवून ठेव, नंतर मग आपण धुवून टाकूयात हं. मावशीने सगळं सांगितलं असेलच तुला, हो ना?" मी मान डोलावली आणि आणि बाथरूममध्ये गेले.

आंघोळ करून, कपडे वगैरे बदलून दहा पंधरा मिनिटांत बाहेर आले तर पाहिलं की दादा ती चादर स्वतः धूत होता! एकीकडे खूप ओशाळे वाटत होतं पण कुठेतरी खूप बरं देखील वाटत होतं. माझी स्वतःची ही पहिलीच वेळ असली तरी आईवर "त्या" दिवसात असलेली असंख्य बंधनं बघत होते मी. आई, बाबा दोघेही डॉक्टर असून केवळ आज्जीच्या हट्टाखातर म्हणून तेव्हा तिला बाजूला बसायला लागायचं. माझ्या इतर मैत्रिणींच्या घरातलीदेखील अशी उदाहरणं मला माहित होती. एकूणच या विषयाबद्दल आपल्या समाजात आजसुद्धा किती लपून छपून बोललं जातं हे आपण बघतोच.
आणि माझ्यापेक्षा जेमतेम चार-पाचच वर्षांनी मोठा असलेला दादा मात्र एकदम सहजपणे ती चादर धूत होता. ती वाळत टाकून झाल्यावर तो परत घरात आला अन मला म्हणाला, " चल आता आधी जेवून घेऊ आणि मग मावशीला फोन करून ही आनंदाची बातमी देऊयात, ठीके?"
किती सहज हाताळली होती त्याने परिस्थिती! मुळात काही "हाताळण्यासारखी परिस्थिती" आहे, असंच त्याला वाटत नव्हतं! याचं श्रेय मात्र खरंच माझ्या मावशीला!

आज मी स्वतः देखील एक मेडिकलची विद्यार्थीनी आहे. पण मी माझ्या बरोबरीच्या मित्रांनापण या विषयावर मोकळेपणाने बोलताना, हा विषय सहज हाताळताना पाहिलेले नाही. म्हणजे पेशंटशी चर्चा करणं एखादवेळेस ठीक आहे; पण आपल्याच मैत्रिणीशी, आईशी, बहिणीशी वा ओळखीच्या स्त्रीशी बोलणं जमत नाही, awkward वाटतं! हे जरा विचित्रच नाही का?

कित्येक घरांमध्ये तर या विषयाबद्दल मुलांना समजावूनच सांगितलं जात नाही. आणि बऱ्याच शाळांमध्ये देखील हे फक्त मुलींनाच शिकवलं जातं. यामुळेच मग मुलांच्या मनातले गैरसमज वाढत जातात. आणि एका अत्यंत नैसर्गिक गोष्टीचा उगाचच बागुलबुवा केला जातो!

त्यापेक्षा जसं माझ्या मावशीने दादाला, माझ्या आई बाबांनी मला छान समजावून सांगितलं होतं, तसंच आपण आपल्या मुलींना आणि हो, मुलांनादेखील सांगितलं पाहिजे! कारण आजच्या काळात स्त्रियांना खऱ्या अर्थाने समजून घेणाऱ्या माझ्या दादासारख्या आधुनिक कृष्णांची फार गरज आहे, नाही का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद @peacelilly! मला माझ्या दादाचा तर अभिमान आहेच, पण त्याहून जास्त माझ्या मावशीचा आहे!!

आसावरी तुला त्या प्रसंगामध्ये तुझ्या भावाने जो मानसिक आधार दिला त्याबद्दल त्याचे मनापासून कौतूक वाटते.. तुझे सुद्धा कौतूक यासाठी कारण तू लेख छान लिहिला आहेस...