अदूला सहाव्या वाढदिवसाचं पत्र- औ पाबई!

Submitted by मार्गी on 17 September, 2020 - 23:23

१. एक प्रेमपत्र

२. दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .

३. लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!

४. मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या

५. मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: परीकथेच्या सवे

नमस्कार. काल अदूचा सहावा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने मनात आलेले विचार आपल्यासोबत शेअर करत आहे. धन्यवाद.

१८.०९.२०२०

प्रिय अदू!

तू ६ वर्षांची झालीस!! आणि तू आता "इतकी मोठी" झाली आहेस व होते आहेस की मला तुला हळु हळु कडेवर घेणं कठीण होत चाललंय! आणि तू इतकं काही करत आहेस आणि शिकत आहेस की खरंच तू खूप वेगाने मोठी होत आहेस!! तुझ्या वाढदिवस सोहळा म्हणजे सेलिब्रेशनच्या बरोबरीने गेल्या वर्षभरातल्या आठवणी, गमती जमती आणि अनुभवांना पुन: अनुभवण्याचा दिवस! आता तर तुलाही माहितीय की, मी दर वर्षी तुला मोठं मोठं पत्र लिहितो! आणि पुढच्या दोन ते तीन वर्षांमध्येच तुला ही सगळी पत्र वाचता येतील! किंवा तू लिहिण्याचा- वाचण्याचा कंटाळा केला नाहीस तर आणखी लवकरही वाचता येऊ शकतील! किती गंमत आहे ना!

अदू, आपल्या दृष्टीने गेलं वर्ष खूपच विचित्र गेलं. खूप काही घडत राहिलं! काही काही त्रासदायकही घडलं आणि काही आनंददायकही! ह्या पत्रामधून ते सगळं परत डोळ्यांपुढे आणतोय. आणि जेव्हा तू खूप खूप मोठी होशील, तेव्हा तुला कळाव्यात म्हणून तुझ्या लहानपणीच्या छोट्या छोट्या गमती तुलाच सांगून ठेवतोय. आत्तासुद्धा तू मध्ये मध्ये म्हणतेसच की, जेव्हा मी लहान होते की नाई, तेव्हा मला ते तर कळतच नव्हतं! असं तुझं मजेशीर लहानपण! तू कितीही मोठी झालीस तरी तुझं हे लहानपण व ही मजा सुटू नये म्हणून हे शेअरिंग.

वर्षभराच्या गमती- जमती सांगण्याच्या आधी ह्या वेळची मुख्य असलेली गोष्ट सांगतो. दर वर्षी तू खूप वेगवेगळी नावं घेतेस पाहा. नवीन धमाल करतेस व त्यातून तुझी नवीन नावं पडत जातात. माझेही तू नवीन नाव ठेवत जातेस. ह्यावर्षीही असंच झालं! ह्या वर्षी तू सुरुवातीला एल्सा हे नाव घेतलंस! आणि मग आत्मजा आना झाली! आणि तुझा वाढदिवस येईपर्यंत मात्र तू 'पाबई' हेच नाव घेतलंस! इतका तुझा औ पाबई जप सुरू असतो! ज्यांना हा प्रकार माहित नाहीय, त्यांना सांगेन की, टॉम अँड जेरी सगळ्यांनीच बघितलेलं आहे. त्यामध्ये एका "लिटिल डकची" गोष्टही असते. त्या लिटिल डकला वाटत असतं की, टॉम मांजर हीच त्याची आई आहे व म्हणून तो तिला "औ पाबई- माय स्वीट माsमी" अशी हाक मारत असतो! तू तो आवाज इतका भारी काढतेस की बस! तू ह्या वर्षभरात खूप वेगवेगळे आवाज व चित्कार काढले आहेस! ते इतके मस्त आहेत की सगळ्यांना खूप खूप आवडतात! किंबहुना तुझा आवाजाचा एक कट्टाही झाला आहे! तुझे निवडक आवाज मी इथे एकत्र करून ठेवले आहेत: पण त्या बद्दलच्या गमती नंतर सांगेन!

तर पाबई, मागच्या वाढदिवसाला आपण ठरवलं होतं की, तू शाळेनंतर आता नानीकडे न थांबता माझ्यासोबतच थांबणार. म्हणजे तुझी सिनियर केजीची तीन तासांची शाळा संपल्यावर तू आणि मी दिवसभर सोबतच! आपण खूप काही ठरवलं होतं की, तू तुझं खेळणार आणि मला माझं काम करू देणार इ. इ.! पण त्यात तर खूपच गमती झाल्या! कधी कधी तू मला शांतपणे काम करू द्यायचीस तर कधी कधी सतत कामाला लावायचीस की, निन्नू, मला भरव. माझ्याशोबत खेल! माझ्याशोबत मस्ती कल! तू वेगाने मोठी होत असलीस तरी‌ कधी कधी तितक्याच वेगाने लहान होतेस आणि छोटं छोटं बाळ होतेस! अशा खूप गमती आपण केल्या. मला तू‌ त्रासही दिलास. आणि मीही तुला त्रास दिला. माझ्याशी तू मस्त भांडलीस सुद्धा! पण तरी तुला मीच हवा असायचो. मागच्या वर्षी किती महिने पाऊस पडला होता! आणि पाऊस संपता संपता नोव्हेंबरच्या एका दिवशी किती मोठा विजांचा कडकडाट झाला होता पाहा! पण तुला त्याची भिती कधीच वाटत नाही. तुला फक्त एकच गोष्ट लागते- मनाला काही उद्योग लागतो, बस्स!

नंतर डिसेंबरमध्ये आपण आत्मजा- अनन्या, आजी व काकूसोबत डोंगरावर गेलो होतो पाहा. तेव्हा तू आणि आजू सारख्या एकदा तिथे दिसलेल्या सापाबद्दलच बोलत होतात! नंतर डिएसकेमधल्या जत्रेमध्ये गेलो होतो पाहा. तिथेही खूप गमती जमती तू केल्यास. तिथेच तू अनन्यासोबत फ्रोजन टू बघितलास! आणि तेव्हापासून एल्सा व आना सुरू झाल्या! तुझ्या बॅगवरची बार्बी हीच एल्सा होती हे तुला कळालं! त्या फ्रोजनवाल्यांचं कौतुकच आहे, त्यांनी लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये किती खोलवर घुसखोरी केली आहे! फ्रोजनच्या आधीही आपण दोन पिक्चर बघितले होते पाहा- हिरकणी आणि मिशन मंगल! तू दोन्हीमध्ये थोडी घाबरली होतीस, पण तुला आवडले होते! एकदाचा जेव्हा पावसाळा नीट संपला तेव्हा मी माझी जुनी सायकल नीट करून घेतली. आपलं शाळेत सायकलवर जायचं ठरलं होतं ना. आपण एक दिवस शाळेत गेलोही सायकलवर आणि नंतर डोंगरावरही गेलो. पण तुझा सायकलवर बसण्याचा मूडच नव्हता! इच्छाच नव्हती, म्हणून तू लहर फिरल्यावर म्हणायचीस मला भिती वाटते वगैरे! अशी नौटंकी तू खूप वेळेस करतेस! इतकी की नौटंकी हेही तुझं एक नाव बनलं आहे.

जास्त दिवस तू शाळेनंतर माझ्यासोबतच थांबायचीस. तुझं दुपारचं झोपणंही हळु हळु कमी होत गेलं! झोपवण्यासाठी प्रयत्न करण्याचा वेळ वाढत गेला आणि झोपेचा वेळ कमी होत गेला! लोळताना तुला दोन गोष्टी नेहमी लागायच्या- बिन रंगाचा घोडा आणि पोपटाचे ध्यान! माझ्यासोबत तू चांगलीच राहिलीस. पण कधी कधी तू नीट खायची- जेवायची नाहीस. किंवा कधी खूप चिडचिड करायचीस. तेव्हा मात्र काही दिवस तुला नानीकडे ठेवावं लागलंच शेवटी. पण तिथेही तू नौटंकी करायचीस की, मला किंडरजॉयच हवं. नाही तर मला क्राफ्ट पेपर आणि पेन्सिलच घे. ते दिल्यानंतर मात्र तू लगेचच शहाणी मुलगी व्हायचीस! आणि जर ते दिलं नाही, तर मात्र. . . सारखं ऊंवा ऊंवा ऊह ऊह! एकदा एक गंमत मस्त झाली होती. माझ्या मोबाईलमध्ये गाण्यांच्या प्लेलिस्टमध्ये तू एक फोटो बघितलास आणि नंतर मला म्हणालीस की, तुला ती डान्सर माहिती आहे ना? मी विचारलं की कोण? तर तू म्हणालीस अरे ती, ती येत नाही का सोनीवर? मुलांसोबत नाचते. अरे गूगलवर सर्च कर ना. मग तिला काही तरी आठवलं. मग म्हणाली ती अलका रे. ती अलका याज्ञिक होती! तू तिला मुलांच्या गाण्याच्या कार्यक्रमात येऊन डान्स करणारी म्हणून ओळखतेस!

जानेवारी महिन्यात तुझ्या शाळेचं गॅदरिंग झालं. तू रोबोट बनून स्टेजवर गेली होतीस पाहा. पण तुला आणि मला तो कार्यक्रम अजिबातच आवडला नाही. नुसता गोंगाट होता. इतका गोंधळ होता की, कोणालाच कोणाचं बोलणंच ऐकू जात नव्हतं. तुझ्या सरांनाही मी नंतर मोठं पत्र पाठवून विचारलं होतं की इतका डीजे पार्टीसारखा गोंगाट का करता? बाकी शाळा तू मस्त एंजॉय केलीस. शाळेतल्या ड्रॉईंगच्या किंवा काही बनवण्याच्या activities तुला आवडतात. तुझे मित्र- अन्वी व अर्णव ह्यांच्यासोबत मस्त खेळायचीस. त्यांच्या घरीही आपण गेलो होतो. पण त्यानंतर आला फेब्रुवारी महिना. . . फेब्रुवारीमध्ये मी काही दिवस परभणीला गेलो होतो. तेव्हा मी तुला एकदा एक गंमत सांगितली की, सायकलवरून फिरून येत होतो, तेव्हा मला एक शाळा दिसली! जिचं नाव होतं किंडरजॉय! आणि हीच गोष्ट अगदी अशीच तुला काही महिन्यांनंतर आठवली! पण मला फेब्रुवारी महिन्यात तुझा तापच जास्त आठवतो. अक्षरश: अनेक दिवस तू आजारी होतीस. दोन- तीन दिवस तुला खूप जास्त ताप होता. इतका जास्त की, तुला विदुला आत्याच्या लग्नाला येता आलं नाही. आणि तापाने तू अक्षरश: तळमळत होतीस. अखंड नाचणारी चिरकणारी उंडारणारी तू अगदी मलूल होऊन दोन- तीन दिवस झोपून होतीस! पण अजिबात तक्रार किंवा हट्ट करत नव्हतीस! फेब्रुवारीच्या शेवटी झालेल्या ते लग्न आता जणू खूप पूर्वी कधी तरी घडलंय, असं वाटतं! कारण त्यानंतर जो लॉक डाउन सुरू झाला तो अजूनही संपला नाहीय!

आणि अदू, मार्चच्या सुरुवातीला मीसुद्धा आजारी पडलो होतो. आणि तेव्हा काही दिवस बरा होईपर्यंत आराम करण्यासाठी परभणीला गेलो. तो दिवस होता ३ मार्च. आणि मी परभणीला गेल्यानंतर तुला जसा ताप आला होता, तसाच काहीसा मलाही आला आणि मग मला कळालं तुला किती त्रास झाला असणार. माझा ताप दोन- तीन दिवसांमध्येच कमी झाला व मी लवकरच बराही झालो. पण तोपर्यंत कोरोना सुरू झाला होता. आणि लवकरच तुझी शाळाही बंद झाली. तेव्हा काही दिवस तू अनन्या- आत्मजासोबत परभणीला येणार असं वाटत होतं. पण नंतर तर लॉक डाऊनच सुरू झाला. . .

कोरोना नावाचा राक्षस!

अदू, कोरोना नावाच्या राक्षसाने आपण सगळ्यांना फार फार त्रास दिला ना. त्यामुळे मी परभणीतच अडकून पडलो होतो. मला आठवतंय तू मार्चमध्येच मला एक दिवस फोन केलास आणि अगदी हमसून हमसून रडायला लागलीस आणि म्हणायला लागलीस की, निन्नू, ये आणि मला घेऊन जा. इतकी आवेगाने रडत होतीस तू की मला धस्स झालं. काय करू आता असं झालं. आणि बरोबर पुढच्या सेकंदाला तू तितक्याच वेगाने हसायला लागलीस- कशी गंमत केली मी म्हणून! मला मात्र ती गंमत कळायला उशीर झाला! पण जेव्हा ती गंमतच होती हे कळालं तेव्हा तुझं खूप कौतुक वाटलं की, कशी काय तू इतकी कूल राहू शकतेस आणि अशी गंमतही करू शकतेस! तू जी गंमत केलीस ती इतकी खरी वाटणारी होती! आणि नंतर तुलाही‌ ती गंमत खरी वाटली व एकदा रडू रडू खेळूनही झालं तुझं! पण कोरोना राक्षसाने मात्र आपली खूप ताटातूट केली. आपण सोबत नसलो तरी तुझ्या आनंदी राहण्यावर काहीही परिणाम झाला नाही. तुझा आनंदीपणा हा तुझ्यामध्ये अंतर्भूतच आहे; built in आहे, तो तू बाहेर कशामध्ये काढून ठेवत नाहीस! आईसोबत नानीच्या घरीही तू हसत खेळतच राहिलीस. सहा वर्षांची झाली तरीही तू जन्मताना होतीस तशीच अजूनही "शुद्ध प्रसन्नताच" आहेस! आणि कोरोना राक्षसाच्या कसोटीच्या काळामध्येही तू कमाल केलीस.

जसं कळालं की, लवकर काही आपल्याला भेटता येणार नाही, तसं आपलं फोनवरच जास्त बोलणं सुरू झालं आणि नंतर व्हिडिओ कॉलवर. पुढे तुझी शाळाही मोबाईलवर सुरू झाली व तुला वापरायला एक मोबाईलही द्यावा लागला. त्यावर मग आपले व्हिडिओ कॉल्स, गोष्टी सांगणं, गमती सांगणं हे सुरू झालं. मी माझे गच्चीतल्या रनिंगचे फोटो तुला पाठवायचो व तू स्मायली पाठवायचीस! इतक्या लहानपणी तू मोबाईल इतका जास्त ऑपरेट करशील ह्याची मी कधी कल्पना केली नव्हती. पण जेव्हा हे करावं लागलं, तेव्हा तुझ्याशी चाटिंग करतानाही तुला लिहून बोलता आलं. तुझ्या अक्षर- ओळखीला वाढवण्यासाठीचा एक मार्ग म्हणून. तू मी लिहिलेलं वाचण्याचा प्रयत्न करतेस. कधी कधी छोटं वाचतेस. कधी कधी कंटाळा करतेस! पुस्तकात कधी कधी तू कल्पनेनीच गोष्ट वाचतेस पाहा, तसं माझा मॅसेज कल्पनेनीच वाचतेस आणि सांगतेस की, निन्नू, मी तुझा रिप्लाय वाचला! लॉकडाउनमध्ये तू हळु हळु स्वत: गोष्ट रेकॉर्ड करून पाठवायला चालू केलंस. मीसुद्धा तुला गोष्टी बनवून पाठवायचो. गच्चीत रनिंग करताना माझ्या बाजूला मला एक मांजर चालत आल्यासारखं वाटलं! पण तो तर चिचीची होता! तो कसा गच्चीत बसून राहिला, त्याने मला काहीच त्रास दिला नाही. नंतर त्याच्या एका मित्राने त्याला कसा वेगळाच आवाज काढून बोलावलं व मग तो उडी मारून गेला! अशा छोट्या छोट्या गोष्टी तुला सांगायचो. तुझ्याबरोबर आजूलाही म्हणजे तू‌ एल्सा असताना आना असते तिला सांगायचो! तूसुद्धा त्या खूप लक्ष देऊन ऐकायचीस. आणि तू "छोटी असल्यापासून" आत्तापर्यंत मी तुला ब-याच गोष्टी सांगितल्या आहेतच. त्यातल्या काही काही अधून मधून पाठवायचो.

ह्या काळात आपली भेटच होऊ शकत नव्हती. तू मला कधी येणार हे फार क्वचित विचारायचीस. जी परिस्थिती आहे ती तू नेहमीच समजून घेतेस आणि त्यामध्ये तक्रार अजिबात करत नाहीस. म्हणतात ना, काही जणांचा स्वभाव हा तक्रार- केंद्रित असतो (complaint oriented) आणि काहींचा समाधान- केंद्रित असतो, जे लोक जे नाही त्यावर करण्याच्या ऐवजी जे आहे त्यावर फोकस करतात. तशी तू आहेस. आपण सोबत नव्हतो, भेटू शकत नव्हतो. पण आपलं बोलणं आणि मस्ती करणं‌ सुरूच होतं. तू तुझं जंगल मला खाऊ देत होतीस. मला म्हणायचीस, आत्ता शेंड्या नाहीत, जंगल मोकळंय. घामटलंय माझं‌ जंगल. हे घे खा! मे- जूनपर्यंत मी बस सुरू होण्याची वाट बघत थांबलो. जेव्हा खाजगी वाहनांनाही पासेस दिले, तेव्हाही वाटलं की, बस सुरू झाल्यानंतरच जावं. कारण आवश्यक असेल तरच प्रवास करा ही advisory सुरू होती. आणि आपण जे अनुभवत होतो तो खूप भयानक प्रकार होता. जगातला सर्वाधिक भयावह हॉरर चित्रपट आपण सगळ्यांनीच अनुभवला. आणि तुझ्या भाषेत सांगायचं तर कोरोना हा असा राक्षस आहे जो माणसांना खातो! आणि तू तुझ्या गोष्टीत सांगायचीस सुद्धा की, तुझ्याकडे ह्या राक्षसाला मारणारी एक जादूही आहे, पण तुझ्या ससुल्याने ती जादू शेपटीत लपवून ठेवलीय! मी प्रवास करण्याची हिंमत करत नव्हतो. क्रिकेटच्या भाषेमध्ये ही इतकी खडतर पिच होती की, इथे एक रन काढण्याइतका आक्रमक शॉटही खेळणं म्हणजे जोखीम पत्करणं होतं. त्यामानाने तू आणि आशा खूप निर्धास्त होत्या. कदाचित निसर्गत: महिलांमध्ये जो काटकपणा येतो, जी दृढता असते, त्यामुळे तूसुद्धा खूप निर्धास्त होतीस. धास्ती मलाच वाटत होती. पण शेवटी डर के आगे जीत है, ह्यानुसार जुलैच्या शेवटी पास काढून प्रवास केला आणि आलो तुझ्याजवळ. पण "तुझ्याजवळ" येऊन तुला भेटेपर्यंत १० दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं. आणि ते १० दिवस संपल्यानंतर मात्र तू व आई नानीच्या घरून- नवीन मामीसोबत काही दिवस मजा करून- परत आपल्या घरी आलात आणि ५ महिने ५ दिवसांनंतर आपली भेट झाली! आणि भेटल्यावर मात्र तू "छोटी मम्मा' बनून माझे जे लाड केलेस ते मात्र शब्दातीत आहेत! अजून काय बोलू आता!

जादुई आवाज

तर पाबई असं हे वर्ष होतं! पण वर्षाची खरी मजा आणि "पाबईची गंमत" मात्र गेल्या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये झाली. आपण दूर असताना तू मला फोनवर बोलताना कधी कधी खूप जबरदस्त बोलायचीस. फोनवर मी फक्त अदूसोबत नाही, तर मरमेड, मनीमाऊ, पिनूडी, ससुला अशा तुझ्या मैत्रिणी व प्राण्यांसोबतही बोलायचो! काय वेगवेगळे आवाज तू काढायचीस! ह्यातूनच तू खूप वेगवेगळे आवाज शिकत गेलीस. आणि तुला जे कार्टून आवडतात, त्यातलेही तू आवाज काढायला लागलीस. एकदा योगायोगाने तू काही‌ आवाज काढलेस. तुझ्या स्मिता आत्याचा मित्र प्रसन्न- तोसुद्धा निंजा हतोडी बघतो! म्हणून तुला सहज बोललो की, तू निंजा हतोडीचा आवाज काढ! आणि निंजा, मायरा आणि मेंढक असे काय जबरदस्त आवाज तू काढलेस! ते सगळ्यांनाच खूप आवडले! त्यानंतर मुग्धाताईंनी त्यांच्या वाचन कट्ट्यावर तुला बोलावलं आणि मग तुझा एक मस्त कार्यक्रम झाला! मुलांचा एक अख्खा कट्टा तू गाजवलास! वेगवेगळे तुझे आवाज तर तू काढलेसच, पण त्याबरोबर ढोल्या कूकर, चिमणीची गोष्ट आणि बाकी छोट्या गोष्टीही तू सांगितल्यास! आणि प्रत्येक आवाजासोबत तुझे एक्स्प्रेशन्स, आवाजातले चढ- उतार, भावनांमधील उत्तेजना ह्यासुद्धा खूप सुंदर होत्या! वर दिलेल्या लिंकवर ह्यातले निवडक आवाज प्ले करून ऐकता येतील. आणि चिमणीची गोष्ट तर खूपच छान सांगितलीस. त्यामध्ये एक क्रम आहे आणि नाट्यमयता आहे! ती बरोबर आत्मसात केलीस. ती गोष्टही वर ऐकता येऊ शकते. तुझ्या आवाजातल्या जादुमुळे खूप लोकांनी तुझं कौतुक केलं आणि काही जणांना तर तुझा आवाज ऐकून दिग्गज व्हॉईस आर्टिस्ट मेघना एरंडेंची आठवण झाली! मुग्धाताई तर म्हणाल्या की, कार्टूनमधले सगळे आवाज असतात, ते मोठे लोकच काढतात. कार्टूनचा आवाज इतकी लहान मुलगी काढताना त्यांनी पहिल्यांदाच ऐकलं! अजून एक गोष्ट म्हणजे माझ्या लहानपणी आणि तरुणपणीही मी चार लोकांसमोर बोलताना खूप घाबरायचो. नीट कसं बोलता येईल, जमेल ना, कसं होईल अशी खूप मोठी भिती मनात असायची! तशा भितीचा तुला तर स्पर्शही नाही! आणि आत्ताच इतक्या धीटपणे इतक्या लोकांसमोर इतकी मस्त बोलते आहेस म्हंटल्यावर नंतर तुला अशी भिती कधीच वाटणार नाही! मज्जाच आहे बाबा! अशी मोठ्ठी गंमत झाली बघ पाबई!!

शुद्ध प्रसन्नता अधिक अखंड कल्पकता!

आपण पाच महिने सोबत नसलो तरी आपण सोबत असतानाही खूप गमती‌ जमती घडत आहेतच! आणि त्याबरोबर तू खूप गडबड गोंधळही करतेसच. नुसती मजा मजा. त्यातल्या काही मोजक्या गमती तुला सांगतो परत. मागच्या महिन्यात एका दिवशी मला व आईला बाजारात जायचं होतं. आणि कोरोना राक्षसामुळे तर लहान मुलं बाहेर पडू शकत नाहीत. म्हणून मग तुला विचारून तुला घरी ठेवून गेलो होतो. आणि असं आधीही एकदा केलं होतं. तुला सहज विचारलं की, तुला आठवतंय का? तर हो म्हणालीस आणि बोललीस की, कोरोना नव्हता तेव्हा एकदा मी खूप आजारी झोपून होते ना, तेव्हा तू मला ठेवून औषध आणायला बाहेर गेला होतास! इतकी तुझी शार्प मेमरी! तर आम्ही तुला घरात ठेवून लॅच लावून बाहेर गेलो. आणि नेमकं तू दाराला काही तरी केलंस व ते आतून बंद झालं. आणि जेव्हा दादा आला तेव्हा तुला ते आतून उघडताच येत नव्हतं. मग तुला रडू आलं, तू रडत रडत आम्हांला फोन केला, व्हिडिओ कॉलही केला. सांगून तुला नीट कळत नव्हतं. मग तू मामाला व्हिडिओ कॉल केला. त्याने तुला नीट सांगितलं, त्याच्या दरवाजापाशी करून दाखवलं आणि मग तू दार उघडलंस! अशी एक मजाच झाली पाहा. आणि दुसरी मजा म्हणजे त्यानंतर थोड्याच वेळात तूच ही गोष्ट म्हणून स्वत: मस्त रेकॉर्डही केलीस की, एकदा काय झालं. . .

अदू, तुझं एक नाव गोष्ट आहे ते बरोबरच आहे! तुला गोष्टी खूपच आवडतात. आणि तू सांगतेसही छान. आणि गेल्या महिन्यापासून तर रोज आजोबा तुला व तुम्हा बहिणींना एक गोष्ट सांगत आहेत! संध्याकाळपर्यंत तू दोनदा विचारतेस, आबांनी आजची‌ गोष्ट पाठवली का? आणि अगदी तन्मय होऊन ऐकतेस! किंवा तुला ती समुद्र खाल्ल्याची‌ गोष्ट प्रचंड आवडते! तू मला सलग चार वेळेस सांगायला लावली होतीस पाहा आणि नंतर तूच रेकॉर्डही केली होतीस की कसा मला समुद्र आवडायचा. कसा मी चिनूकाकाडे गेलो असताना बाटलीत समुद्र भरून घेतला आणि घरी आणून फ्रीजमध्ये ठेवला आणि मग कसा निखिलकाकाला पिताना तीच बाटली मिळाली व त्याने कसा माझा समुद्र सांडून दिला! तू ही गोष्ट आणि चिंकू- पिंकूची गोष्टही खूपच मस्त रंगवून सांगतेस! असंच एकदा मी तुला गोष्ट सांगत होतो की, एकदा काय झालं मी सायकलवर फिरायला गेलो. आणि परत येताना रात्र झाली. तू मध्येच विचारतेस, तेव्हा मी कुठे होते? मग मी सांगतो की, तेव्हा तू नव्हतीसच. मग परत गोष्ट पुढे जाते. तेव्हा मला दोन तास अंधारात सायकल चालवावी लागली. पण माझ्या सोबतीला आकाशातून शुक्र होता आणि बाकीही काही तारे होते. तेवढ्यात तू म्हणतेस, मीसुद्धा होते, एक बारीक तारा म्हणून मी आकाशात होते आणि आकाशातूनच तुझी रक्षा करत होते, तुला सोबत करत होते! लहान मुलं जन्मण्याच्या आधी आकाशातले तारे असतात! हे अतिशय निरागस सत्यवचन होतं! Simplicity at its best- everything has a cosmic presence!

कोरोना राक्षसामुळे सगळंच खूप बदललंय. पण कोणतीही तक्रार न करता तू त्यातही खूप नवीन करत असतेस. वहीचे कागद कापून त्याला स्टेपल करून पुस्तक बनवायला तुला खूपच आवडतं! चित्र आणि कलरिंग तर सारखीच करत असतेस. गोष्टी ऐकायला व सांगायला आवडतात, मात्र वाचायचा व लिहायचा चांगलाच कंटाळा करतेस! तुझ्या बाहुल्यांना रात्री आडवं करून बरोबर झोपवतेस आणि सकाळी उठवतेस! अगदी क्वचित चिडून तू म्हणतेस की, मला बोअर होतंय यार! आपण बाहेर कधी जाणार? कधी खेळायला जाणार? मग मी तुला सांगतो की, चल, तुला कडेवर घेऊन मी घरातच वॉक करतो. तुला कडेवर घेऊन (वेताळासारखी तू माझ्या कडेवर आणि कधी खांद्यावरही बसतेस!) मी छोटा वॉक घरातच करतो! तेही तुला खूप खूप आवडतं. तुझ्या आवडीची दोन गाणी लावतो आपण आणि मस्त गप्पा! त्यातच तुझं हेही सुरूच की, आपण सुरुवातीला कोणता विषय बोलत होतो आणि नंतर कोणता बोललो! बाहेर जाता येत नाही, त्यामुळे माझं बघून तूही कधी कधी घरातच रनिंग करतेस किंवा वॉक करतेस. आणि मी पळताना जसा तुला धप्पा करतो किंवा तुझ्या केसांना थोपटून टर्न घेतो, तसंच तूही माझ्या केसांना हात लावून टर्न घेतेस! खरंच छोटी मम्मा हेही तुझं एक नाव सार्थ आहे!

तू एक मस्त खेळही तू शोधून काढलास नुकताच! तुझे दोन तीन चेंडू आहेत. त्यातला एक मोठा चेंडू तू घेतला आणि फूटबॉलसारखा खेळायला लागलीस! आणि त्याबरोबरच जणू तीन बहिणी एकत्र मिळून खेळत आहेत, अशी कॉमेंटरीही तू सुरू केलीस! फूटबॉलचा खेळ आणि त्यात कॉमेंटरी! तुला पाच मिनिटांमध्येच घाम आला! मैदानी खेळासारखा थकवणारा खेळ तू शोधून काढलास! आणि ती तीन बहिणींच्या सिम्युलेशनची जी कॉमेंट्री केलीस ती तितकीच भन्नाट होती! ती मी गुपचूप रेकॉर्ड केली आहे. इथे ते आवाज ऐकता येतील! आपण कॅच कॅच किंवा बॅडमिंटन खेळतो तेव्हाही तू खूप मस्ती करतेस. तुला जमलं तर सगळं छान. आणि तुला जमत नसेल तर लगेचच माझ्यावर चिडतेस की तू नाही देत नीट कॅच! तुला राग आला तर हातांनी लगेच फडफड करतेस, चिडचिड करतेस! त्यावर मला एक युक्ती सापडली आहे! तुझ्या एका गोष्टीमध्ये रडणारं वासरू आहे आणि धोंडू आहे! ते वासरू सारखं उं उं करून रडतं! जेव्हा तू अशी रडतेस, तेव्हा मी लगेच म्हणतो की, आला का धोंडू! ए धोंड्या! मग लगेच त्या ओरडू किंवा रडूमध्ये हसू जोडलं जातं! आणि एका गालाने (ओ) रडणारी व एका गालाने हसणारी पाबई बघायला मिळते! रडू- हसूचा मग लपंडावच दोन्ही गालांवर चालतो! आणि आता तर तुझ्या गालावर खळीही येते आहे! अशा किती गमती! आणि मस्ती, गडबडी, बडबडी, नौटंकी, पाबई, एल्सा, गोष्ट, टमडी, लाडू, धोंडू अशी तुझी तितकीच नावं! तुझं "स्वरा" नावही तू सार्थ करते आहेस!

अशा तुझ्या किती किती गमती आहेत! तुला अलीकडेच शक्तीमान मालिका बघायला मिळाली व आवडलीही! माझ्या लहानपणीच्या गोष्टी आता तुझ्या लहानपणाशी रिलेट होत आहेत! मी ज्या आधारे शिक्षणाच्या शिक्षेमध्ये तग धरला ते ध्रुवचे कॉमिक्स होते! त्याच्या गोष्टी तुला आता आवडतात! कॉमिक्समध्ये मोठ्या मुलांच्या गोष्टी तुझ्यासाठी तुझ्या परिभाषेत "ट्रान्सलेट" करतानाही तितकीच गंमत होते! पण मजाही येते! तुला सांगता येतं की, जसा गंगाधरच शक्तीमान आहे व ते सीक्रेट आहे, तशीच ध्रुवची बहीण श्वेताच चंडिका आहे व तेही सीक्रेट आहे! तुझं श्रवण कौशल्यही छान आहे! तू ज्या इंग्लिश गोष्टी ऐकतेस व बघतेस, त्या तू जेव्हा म्हणतेस तेव्हा तुझा एक्सेंटही तसाच येतो बरोबर! तुझ्याकडे आवाजाची जादु आहे हे तर खरंच आहे!

अदू, पत्राच्या शेवटी तुला एक गोष्ट सांगतो. कोरोना राक्षसाशी निगडीत आहे. एका सुफी फकिराची गोष्ट आहे. तो बगदादच्या बाहेर त्याच्या झोपडीमध्ये बसला होता. त्याच्या झोपडीसमोरून एक मोठ्ठी काळी सावली जाताना त्याला दिसली. त्याने विचारलं की कोण आहेस? तर ती सावली मृत्यूची होती. त्याने विचारलं कुठे जाते आहेस? त्यावर ती म्हणाली मी बगदादला जातेय, मला ५०० लोकांना न्यायचं आहे. नंतर काही दिवसांनी त्याला परत ती सावली दिसली. त्याने विचारलं झालं का काम? त्यावर ती सावली म्हणाली हो, झालं, पण मी ५००० लोकांना नेते आहे. त्यावर त्या फकिराने विचारलं मग खोटं का बोललीस की, ५०० लोकांना न्यायचं आहे? ती सावली म्हणाली की, मला फक्त ५०० लोकांनाच न्यायचं होतं, बाकीच्या लोकांना मी मारलंही नाही. ते भितीनेच मेले. ह्या गोष्टीचा अर्थ असा आहे की, आपल्याला मनातून जे वाटतं ते एका अर्थी खरं होतं. मनात भिती असेल तर भिती खरी होते. आणि मनामध्ये खंबीरपणा असेल तर शरीरही खंबीर होतं.

. . . लॉकडाउनचा हा खडतर काळ तुझ्यामुळे खूप सोपा होतो आहे. मी परभणीवरून पुण्याला येण्याच्या आधी मनामध्ये असंख्य शंकाकुशंका- भिती होती. पण तू मला शेवटी ओढून आणलसंच. जेव्हा मनाची हिंमत होत नव्हती, तेव्हा शेवटी विचार केला की, जेव्हा इतक्या लोकांना कोरोना राक्षस त्रास देतोय, तेव्हा तो मला देणार नाही असं होणार नाही. आणि त्याने मला त्रास देऊ नये, असं कन्सेशन मी का मागावं? इतके लोक जेव्हा संकटातून जात आहेत, तेव्हा मी मात्र त्यातून वाचावा, अशी अपेक्षा तरी का ठेवावी? हे तुला सांगताना भिमाची एक गोष्ट आठवली! भिती वाटण्याऐवजी मी तर असा विचार केला पाहिजे की, इतके लोक कोरोनामधून जात आहेत आणि त्यातले ९८% हे पार पडले आहेत, मग मीसुद्धा पार पडेनच. उलट मला कोरोना झाला तर मी प्लाझ्मा डोनेट करू शकेन आणि कदाचित कायमचा कोरोना मुक्तही होऊ शकेन. म्हणजे मग तर काळजीच मिटेल. शेवटी आपण मनाची जितकी तयारी करतो, तितकं मन शरीराची‌ तयारी करून देतं. रनिंग किंवा सायकलिंगमध्ये हेच अनुभवलंय की, शरीर असाधारण नसतं. शरीरामध्ये क्षमता असतातच. फक्त त्या activate कराव्या लागतात. त्यासाठी मन तयार असावं लागतं. आणि मन जर तयार असेल, तत्पर असेल तर शरीर नेहमीच सहकार्य करतं, ते मनाचं अनुगामी आहे. आणि एकदा मनाने कच खाल्ला की मग शरीर आधीच सरेंडर करून बसतं. आज कँसरसंदर्भात जे नवीन काम सुरू आहे, त्यामध्ये मानसिक उपचार तज्ज्ञांची भुमिका मोठी होते आहे. कारण आता असं आढळलं आहे की, कँसर होण्याचा संबंध व त्यावरील उपचार ह्याचाही संबंध मनाशी आहे. मनातील ताणामुळे एक प्रकारची "आत्मघाताची" जी वृत्ती निर्माण होते, तिचं एक साकार रूप हे कँसर आहे, असं आज काही जण सांगतात. त्यामुळे केमोथेरपीच्या बरोबर मनाचे उपचारही आज कँसरवर महत्त्वाचे मानले जातात. असो.

अदू, तुझ्यासोबत वाढताना आणि प्रत्येक दिवस "वाढदिवस" असेल असा प्रयत्न करताना खूप काही शिकायला मिळतंय हे नक्की. तू खूप काही अप्रत्यक्ष प्रकारे शिकवतेस, सांगतेस आणि दाखवूनही देतेस. स्टिरिओटाईप माइंडला जिथे काही विशेष दिसत नाही, तिथे तू एखादं डिजाईन शोधतेस! किंवा कागदाच्या तुकड्यातून तुझ्या बाहुलीची उशी करतेस! इतक्या ह्या गमती आहेत ना. पत्र संपवताना इतकंच म्हणेन की, मुलांना वाढवणं ही मोठी जवाबदारी आहे खरी. पण त्यातही खरी जवाबदारी स्वत:ला वाढवणं हीच आहे. मुलांना नुसतं हे करा, ते करा सांगून काही होत नाही. त्याउलट ज्या गोष्टी आपल्यामध्ये असतात, त्या न सांगताही त्यांच्यापर्यंत पोहचतातच. मी स्वत: जर कोणताही व्यायाम न करता तुला व्यायाम कर म्हणून सांगत असेन तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. पण मी जर स्वत: व्यायाम करत असेन तर मी‌ न सांगूनही तू तो करशील. म्हणून खरं तर पालक म्हणून मुलांनी जे जे शिकायला पाहिजे अशी अपेक्षा असेल ते ते पालकांनी स्वत: केलं तरच मुलं ते शिकू शकतील. आणि अदू तू सारखी दाखवून देतेस की, मुलं किती खोलवर बघत असतात. किती खोलवर त्यांना कळत असतं. तुझ्यापासून आणि मुलांपासून काहीही लपवता येत नाही. नुसता उपदेश देऊन किंवा नुसत्या सूचना मुलं काहीच शिकत नाहीत. आणि खरं तर तू हे हे नको करूस, हे हे कर, असं सांगणं, हीसुद्धा एक हिंसाच आहे. त्यामुळे तुला जे जे करायला सांगायचं असेल, ते ते आम्हांला करावं लागेल. तुला जर भरपूर वाच आणि लिही असं सांगायचं असेल, तर ते आम्हांला करावं लागेल. आणि तसं खरोखर झालं तर तुझा प्रत्येक "वाढ दिवस" आमचाही "वाढ दिवस" ठरेल!

हम को मन की शक्ति देना, मन विजय करें।
दूसरों की जय से पहले, खुद को जय करें।

भेदभाव अपने दिल से, साफ कर सकें।
दोस्तों से भूल हो तो, माफ कर सकें।
झूठ से बचे रहें, सच का दम भरें।
दूसरों की जय से पहले, खुद को जय करें।

मुश्किलें पड़े तो हम पे, इतना कर्म कर।
साथ दे तो धर्म का, चलें तो धर्म पर।
खुद पे हौसला रहे, बदी से ना डरें।
दूसरों की जय से पहले, खुद को जय करें।

हम को मन की शक्ति देना, मन विजय करें।
दूसरों की जय से पहले, खुद को जय करें।

हे सविस्तर वाचल्याबद्दल धन्यवाद. - निरंजन वेलणकर niranjanwelankar@gmail.com 09422108376.

Group content visibility: 
Use group defaults

खूप सुंदर लिहिलेय. वाचताना अगदी रंगून गेले होते. मुलांना वाढदिवसाला पत्र लिहिणे, ही कल्पना खूप सुंदर आहे. ख्यातनाम लेखिका शोभा डे याही अशी त्यांच्या मुलांना पत्रे लिहायच्या. त्या पत्रांचे पुस्तक काढले नंतर. "स्पीडपोस्ट "नाव आहे बहुतेक त्याचे.

पहिला विचार अरे किती लिहिलंयस!
वाचल्यानंतर मग किती छान लिहिलंयस!
कसं जमतं तुला, दोन्ही करता मला तुझ्याकडे शिकवणी लावायची आहे.

@ हर्पेन "जी"! धन्यवाद! Happy Happy

@ डी मृणालिनी, ओके, अच्छा! तुमच्या वयाच्या वाचकांनाही माझं पत्र आवडलं हे कळून आनंद झाला! कदाचित तुम्हांला मी हॅरी पॉटरच्या भाषेत लिहिलेलं हे पत्रही आवडू शकेल. Happy

मार्गी जी मी हॅरी भक्त आहे. मला खूप आवडतं हॅरी पॉटर. आणि आता त्या आवडीच्या लिस्ट मध्ये तुमचं पत्र ही आलंय. किती सुंदर लिहिलंय ! मला खूप आवडलं. जर मी हे माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर केलं तर चालेल ?