माझी सर्कस परीक्षा ...

Submitted by डी मृणालिनी on 15 September, 2020 - 02:03

माझ्या १० वी च्या home science ची प्रात्यक्षिक परीक्षा माझ्यासाठी परीक्षा कमी आणि सर्कसच जास्त होती. त्यामुळेच की काय ती माझ्यासाठी इतकी अविस्मरणीय होऊन बसली.
परीक्षेच्या आदल्या दिवशीच केंद्रावर जाऊन ' उद्या परीक्षा आहे ना ?' ' किती वाजता ?' ' इथेच ना ? ' असे सगळे बावळट प्रश्न विचारून आले. ( सर्वांची उत्तरं हॉल तिकीट वर ठळक अक्षरात लिहिली होती . तरीसुध्दा ! )
माझ्या ' अती पूर्व तय्यारी ' तलाच हा एक भाग. सिक्युरिटी आत प्रवेश दिलाच नाही. पण शक्य तितक्या संयम व प्रेमयुक्त आवाजात ते माझ्या प्रश्नांची उत्तरे देत होते. परीक्षा केंद्र एक hotel managment institute होती. कारण आमचा विषयच home-science होता. परीक्षेच्या दिवशी येताना पुलाव आणि खीर घेऊन येण्यास सिक्युरिटी ने सांगितले. मी दचकलेच ! डोहाळ जेवण आहे की परीक्षा ?! तेवढ्यात त्या मनकवड्या सिक्युरिटी ने काही गैरसमज नको म्हणून मला नोटीस बोर्ड दाखवला. त्यात ठळक अक्षरात लिहिेले होते.
*विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना पुलाव आणि खीर घेऊन यायची आहे. हेच तुमचे practical आहे. त्यामुळे दोन्ही पदार्थांचे प्रोजेक्ट सुध्दा बनवून आणायचा आहे.
माझी ट्यूब पेटलेली पाहून सिक्युरिटी ने मला प्रेमाने हाकलून लावले. पुण्यात असल्याने मीसुध्दा मुकाट्याने सिक्युरिटीच्या या ' *जामंत्रणाचा* ' स्वीकार करून वाट्याला लागले. घरी जाता जाता पुलाव आणि खिरीचे साहित्य घेतले. परीक्षकांना बेहद खुश करण्यासाठी पुलाव बनवताना आमची स्वप्नाली काकू आपले सर्व कला गुण कौशल्य , शक्ती युक्ती आणि तन मन पणाला लावून प्रयत्नांची शिकस्त करत होती. थोड्याच वेळात तिच्या या प्रयत्नांनी संपूर्ण घर ( अं... मला वाटते संपूर्ण पुणे शहरच ) स्वादिष्ट पुलावाच्या सुवासाने व्यापून गेले. रात्री ९:३० लाच अंथरूण पांघरूण घेऊन गाढ झोपणारे पुणेकर त्यादिवशी बहुधा खिडक्या उघडून या सुवासाचाच शोध घेत असावेत. खिरीचाही मंद मंद सुगंध तोंडात पाणी साठवत होता. दोन्ही पदार्थ तर तयार झाले . पण आता काम होतं या पदार्थांचा प्रोजेक्ट बनवण्याचं ! रात्रीचे बारा वाजण्यात होते आणि माझ्या झोपेचे तीन तेरा .. पण तरीही झोपेसाठी मी २० मार्कांशी तडजोड करायला तयार नव्हते. शक्य तेवढ्या जलद गतीने मी प्रोजेक्ट लिहून रात्री १:३० ला निवांत झोपायला गेले.
दुसऱ्या दिवशी परीक्षा १०:०० ला सुरू होणार होती. मी ८:३० लाच केंद्रावर हजर ! हळूहळू विद्यार्थ्यांची गर्दी वाढत गेली. पण माझ्यासारखे ८:३० लाच हजर होणारे आगाऊ मुलं कोणीच नव्हते. सगळ्या प्रकारची मुलं होती. म्हणजे कुठूनतरी " अबे .... तेरी तोSS मेरा पेन काय को लीया रे ?!" तर कुठूनतरी " excuse me , can I borrow your pen for a minute " असे निरनिराळे आवाज विद्यार्थ्यांतील वैविध्य दर्शवत होते. जवळजवळ ३०० विद्यार्थी होते. कोणी स्लम एरीआतले ,कोणी गर्भ श्रीमंत तर कुणी मध्यम वर्गीय. परीक्षा सुरू व्हायला अर्धा एक तास होता. माझ्या आजूबाजूचे बरेच मुलं मुली आपापले प्रोजेक्ट्स ला रंग रंगोटी करत होते. काही मुलं तर चक्क पदार्थ बनवताना लागणारं साहित्य ,कृती साधने वगैरे पाठ करत होते. ( अर्थात अशा मुलांनी रेस्टॉरंट मधून पुलाव ,खीर आणली होती. ) हे दृश्य बघताना मला काल रात्री वाया गेलेली झोप सार्थकी लागल्याचं समाधान वाटलं. सहज बाजूला बसलेल्या मुलीचा प्रोजेक्ट डोकावून पाहिला. पण ...पण हे काय ! हा तर भलताच कोणतातरी प्रोजेक्ट होता.
" हा कसला प्रोजेक्ट आहे " मी अधिरतेने विचारलं. एका सर्कशीतल्या बावळट विदुषकाकडे बघावं तसं तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली " तू नाही केलीस ही प्रोजेक्ट बुक ? ही तर सर्वांनीच केली आहे. पाच मार्क आहेत याला ! " माझ्या पोटात ढवळून निघालं. पण दुसऱ्याच क्षणी ' इतर कोणाच्याही बॅगेतून इतका पुलाव खिरीचा सुवास येत नाहीये जितका माझ्या बॅगेतून येतोय ' असा विचार करून मी स्वतःला बरंच सावरलं. प्रोजेक्टचे काय एवढं ! परीक्षक तर पाहत पण नाहीत. पण स्वादिष्ट पुलाव आणि सुवासिक खीरीचा घास घेऊन कितीही खडूस परीक्षक तुम्हाला पैकीच्या पैकी देईल , यात मला खात्री होती. थोड्याच वेळात आम्हाला आमच्या १०-१२ परीक्षकांचं दर्शन घडलं. पंधरा शुभ्र कडक इस्त्रीचा शर्ट , हातातल्या फाईल्स , तडफदार चालण्याची पद्धत आणि घोड्याला झाप लावल्यासारखे कुठेही न बघता थेट principle office मध्ये जाण्याची त्यांची तऱ्हा पाहून मला तर ते शाळेवर रेड टाकायला आलेत की काय असचं वाटलं. ' परीक्षक आये ,परीक्षक आये ' असा मुलांनी गलका केला नसता तर मी त्याचं गैरसमजुतीत असते. काही क्षणातच आम्हाला एका प्रचंड मोठ्या हॉलमध्ये बसवले. एका डेस्कवर एकच विद्यार्थी. काही मुलं खूपच गोंधळ करत होती. पण परीक्षक तर फाईल्स मध्ये डोकं खुपसून काहीतरी शोधण्यात मग्न होते. थोड्या वेळाने आमची हजेरी घेतली आणि काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. एव्हाना माझ्या पोटात कावळ्यांनी ' काव काव ' ची जत्राच मांडली होती. बॅगेतून येणारा सुवास तर पोटाला अजुनच छळत होता. सगळा गलका चालला होता पण तरीही परीक्षक शांत होते. " बॅग मे से आपके प्रोजेक्ट्स ,आपकी कंपास और पुलाव खीर बाहर निकालिये. और बॅग हमे दिजीये . " एक खणखणीत आवाज. मी अत्यंत sincere शांत मुलीचा आव आणून मुकाट्याने बॅग आणि प्रोजेक्ट्स परीक्षकांच्या हाती सोपवले.
" अभी ध्यान से सुनीये , सब को आपने बनाये हूए पुलाव और खीर के बारे मे लिखना है " परीक्षकांच हे वाक्य अर्धवट तोडत एका आगाऊ मुलाने विचारलं " अगर यही लीखना था ,तो खाली पिली ये प्रोजेक्ट क्यो बनवाया ?"
" अगर इतनी खुजली है ,तो जा के principle से पूछो. बेवकुफ !" हे म्हणताना परीक्षांचे खरे रौद्र रूप आता दिसू लागले. " हां तो बच्चो , आपको सबसे पहले साहित्य फिर साधन , बनाने की विधी और फिर आपके अनुभव इस क्रम से लिखना है . मराठी मिडीयम के दो बच्चे ,आप अपने अपने मिडीयम मे लिखे. आपके पास आधा घंटा है " परीक्षकांनी आम्हाला काहीशा कठोर सुरात सांगितलं. काही क्षणात सगळी मुलं पेपरात डोकं खुपसून भरा भरा लिहू लागले. मला लिहायचा जाम कंटाळा आला होता. मी फ्लो - चार्ट मध्ये ही रेसिपी लिहिली पण अनुभव मात्र पेपरभर लीहावेच लागले. परीक्षक येरझाऱ्या घालत घालत मध्येच कोणाचाही पेपर ढुंकून बघत होते.सगळेच परीक्षक भलतेच कडक लाभले म्हणून न जाणो हॉल मधली कित्येक मुलं मनात लाखोळी वाहत असतील. २-३ हाताबाहेर गेलेल्या मुलांना तर परीक्षकांनी परीक्षेला बसूच दिले नाही. सरळ त्यांना absent सांगून घालवून दिले.
माझ्या ४ रांगा पुढे एक मुलगी बसली होती. शॉक ट्रीटमेंट केलेले तिचे केस ( त्याला स्ट्रेचनिंग म्हणतात बहुतेक ) तिने खुले सोडले होते . नुकतंच कोणाचं तरी रक्त पिऊन आल्यासारखे तिचे ओठ लालभडक लिपस्टीक ने रंगवले होते. तिच्या केसांकडे बघून असेही वाटले की तिला नक्कीच एक लहान भाऊ असावा ,ज्याला रंगवण्यासाठी कागद न मिळाल्यामुळे त्याने तिच्या केसांवरच चॉकलेटी - हिरव्या रंगाची मनसोक्त रंग रंगोटी केली असावी. ती मुलगी पेपर लिहीत होती. पण परीक्षकांच्या ओरडण्याने क्षणभर दचकली.
" ये क्या लिखा है तुम ने ! इतना गीचामिड है तुम्हारा पेपर . मै तो इस पेपर को १ मार्क भी नहीं दे सकता "
परीक्षक भलतेच संतापून बोलत होते. प्रत्येकाच्या पेपरमध्ये ढुंकून आपल्या खणखणीत आवाजात काहीना काहीतरी शेरा मारीत होते. आतापर्यंत कित्येक मुलं अख्ख्या हॉल समोर अपमानित झाले होते. त्यांच्या तावडीतून एकही विद्यार्थी सुटत नव्हता . जसेजसे ते माझ्या दिशेने येत होते तसे तशी मी स्वतःला अधिकाधिक स्तब्ध ठेवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर ते माझ्या डेस्कपाशी आले . माझं लक्षच नाहीये असं दाखवून मी पेपर लिहिण्यात मग्न होण्याचा प्रयत्न करत होते. थोड्याच वेळात आता माझ्या पेपरची सुध्दा अख्ख्या हॉल समोर विटंबना होणार या विचाराने माझ्या पोटात भलामोठा गोळा आला.
" बेटा, क्या मै सिर्फ एक मिनिट आप का पेपर ले सकता हुं ? "
हे कोण बोललं ? माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना. मी काही न बोलता माझा पेपर परीक्षकांना दिला. सर्वांना दिसेल इतपत पेपर उंचावून ते सर्वांना दाखवत म्हणाले
" This is...this is a perfect paper. कितना अच्छा लीखा है इस बच्चीने ! मै इसे पुरे पुरे मार्क्स दे सकता हुं ! " परीक्षक म्हणाले. अख्या हॉल ची नजर माझ्यावर होती. मला काही क्षण मी स्वतः सुप्रसिध्द हॅरी पॉटर बनल्यासारखं वाटलं. याच संधीचा फायदा घेऊन मी हळूच त्यांना विचारले. " सर मैने वो ५ मार्क का प्रोजेक्ट बुक नही बनाई. मेरा मतलब ..मुझे उसके बारें मे पताही नंही था तो..."
"अरे नंही बेटा , वो तो ठीक है . पर आपने पुलाव खीर तो लाया है ना ? "
क्षणाचाही विलंब न करता मी दोन्ही डबे त्यांच्या समोर धरले. थोडेसे त्यांच्या नाकापाशीच धरले. जेणेकरून तो सुवास त्यांच्या नाकात शिरेल. स्वादिष्ट पुलाव आणि चविष्ट खिरिचा वास घेतल्यावर कितीही खडूस परीक्षक तुम्हाला पैकीच्या पैकी गुण देईल ही माझी वाणी अखेर खरी ठरली. " व्वा ! अच्छी बात है " असे म्हणून ते माझ्या मागे बसलेल्या विद्यार्थ्यांची ' बिन पाण्याची ' करायला निघून गेले.
परीक्षा अगदी सुखरूप पार पडली. परीक्षकांनी पुलाव खिरीची चवच घेतली नाही म्हणून मी थोडी निराश होते. पण साहजिकच आहे, ३०० मुलांच्या डब्यातला पुलाव ,खीरीची चव घेण्याचा कार्यक्रम म्हणजे परीक्षकांच्या बायकांना दुपारच्या स्वयंपाकातून दिलेली सुट्टीच असती.
परीक्षकांच्या सहनशक्तीला मात्र मी दाद देते. एवढ्या स्वादिष्ट पुलाव आणि चविष्ट खीरिचा सुवास घेऊनही चव न घेण्याचा मोह मला तरी आवरला नसता.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे वा ! अशी असते का ही परीक्षा. छान . तुझे अभिनंदन. मग पुलाव आणि खीर खाल्लीस की नाही शेवटी Happy :

मृणालिनी. चांगला अनुभव आणि परीक्षकांनी कौतुक केल्याबद्धल अभिनंदन .
मी तुमचा युट्युब व्हिडीओ पाहिला, तुमचा शैक्षणिक प्रवास छान आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील प्रवासासाठी.

:-)) Happy

ही कसली परीक्षा... जेवण विद्यार्थांना बनवायचे होते की घरच्यांना? आणि घरच्यांनी बनवले तर मार्क विद्यार्थ्यांना का?

@च्रप्स.. ही परीक्षा होम सायन्स practical होती. त्यामुळे घरातल्या दैनंदिन कामांमध्ये विज्ञान शोधण्याचा syllabus च आम्हाला होता. या गोष्टी मला फार सोप्या होत्या कारण मुळातच मी शाळेत न जाता वाढले ..जे काही शिकले ते फक्त आणि फक्त अनुभव आणि कामातली मज्जा ! पण शहरातल्या मुलांना मी आजकाल पाहिलंय साधी भाजीसुध्छा ढवळता येत नाही.. त्यामुळे अर्थात त्यांच्या आई बाबांना पुलाव खीर बनवावी लागली. मी माझ्या बाबाच्या एका मित्राकडे राहिला गेले होते...त्यामुळे त्यांनी मला करू दिलं नाही..पण मी जर घरी असते तर
अर्थात मीच केलं असतं.
पण मला ही परीक्षा इतर भोकंपट्टी करायला लावणाऱ्या परिक्षांपेक्षा खूप आवडली. त्या निमित्ताने मुलांना पुलाव खीर मध्ये काय काय टाकतात हे तरी कळले असेल... Happy
हा NIOS board आहे. जगातली सर्वात मोठी मुक्त शाळा. तुम्ही गूगल करा तुम्हाला नक्कीच आवडेल.

म्हणजे तुम्ही न बनवताच तुम्हाला छान मार्क्स मिळालेत ते बरोबर, पण इतर मुलांनी जर तेच केलं तर चूक?
पण शहरातल्या मुलांना मी आजकाल पाहिलंय साधी भाजीसुध्छा ढवळता येत नाही>> हे कशाच्या भरोशावर लिहिलय हे तर मुळीच समजले नाही मला. तुम्ही पहिलय का अश्या मुलाना? पुलाव आणि खीर बनवणे आणि विज्ञान समजणे ह्याचा उल्लेख लेखात कुठेच नाही त्यामुळे संपूर्ण कमेंटच डोक्याच्या वरून गेली माझ्या.

एक गंमत लिखाण म्हणुन छान आहे. पण लगेच जगतल्या इतर लोकांच्या तुलनेत माझं जग जास्तं चांगलं असं म्हणन्याचा अट्टाहास प्रत्येक वेळी का?

@ नविना ताई , मी असं कुठेही म्हणाले नाही की इतर लोकांपेक्षा माझे जग चांगले आहे... पण नक्कीच वेगळे आहे. दुसरा मुद्दा... माझे अनेक मित्र मैत्रिणी शहरात राहतात. त्यांचे आई वडील अत्युच्च पदावर काम करतात आणि लाखो रुपये कमवतात. त्यांच्याकडे बघून मी हे लिहिलेले आहे याचा अर्थ असा अजिबात नाही की सगळेच शहरात राहणारे असेच असतात. माझा एक मित्र जो आता NASA मध्ये scientist होण्याच्या तयारीत आहे..पण त्याला साधं आपल्या घरात येणारं दूध कोणाचं आहे हे सांगता येईना. त्याचं उत्तर होतं ...दूध वाला भैय्या देतो..

By the way खीर मीच केली. मी दुसऱ्यांच्या घरी होते..आणि त्यामुळे त्यांनी मला करू दिलं नाही..पण इतर मुलं आपल्याच घरी होती तरी त्यांनी हॉटेल मधून आणलं...त्यामुळे अर्थात ते चूक ..

विज्ञानाचं म्हणाल तर फोडणी मारताना जेव्हा आपण तेलात मोहरी घालतो तेव्हा ती का फुटते ?? याच्या मागे विज्ञान आहे. आणि मला वाटते याचं explanation मी देण्यापेक्षा तुम्हीच शोधा.. Happy आणि बरं का , प्रत्येक गोष्ट लेखात लिहिली पाहिजे असा काही नियम मी तरी पाळत नाही.. सुज्ञ व्यक्ती ते समजून घेतो. Happy

तुम्ही कितीही यावर डिबेट केलं तरी शेवटी सत्य एकच राहणार आहे, शहरात प्रत्येक कामासाठी maid असते त्यामुळे मुलांना घरातली काम करणं म्हणजे खालच्या दर्जाचं वाटतं. ( त्यामुळे की काय माझी आई housewife आहे हे सांगताना ते कचरतात. खरं म्हणजे housewife होणे हे किती कठीण असते. It's like managment guru ) ... आणि गावात एक मुलगा किंवा मुलगी स्वयंपाकात ही असते आणि शेतातही. हेच मला सांगायचं होतं. कदाचित सांगण्याची शैली चुकली असेल . माफ करा लहान आहे.

मृणालिनी शहरात अनेक मुले असतात.. प्रत्येकाच्या घरी मेड नसते...
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असते ते अफोर्ड करू शकतात. खूप जनता मध्यमवर्गीय आणि त्याखाली असते.
मला वाटतेय नविना यांचा मुद्दा तो होता.. सरसकट जनरलायझेशन नको...

अर्थात .. मला generalization करायचंच नव्हतं . कदाचित लिहिण्याच्या शैलीत चुकले असेल. माफी असावी.. पण हे माझं overall निरीक्षण हे होतं .
इतर लोकांच्या तुलनेत माझं जग जास्त चांगलं आहे. असं मी कधीही म्हंटलेलं नाही. मला जाणून घ्यायचंय नवीना ताईंनी हे कोणत्या निष्कर्षावर म्हणले.

आमच्या घरात स्वयंपाकाला बाई आहे. पण माझे सात वर्षाची मुलगी पोळ्या करते.
भाजून घेत नाही आम्ही शक्यतो पण तरीही तिची इच्छा असते.
आणि अगदी छोटी असल्यापासून ashi kam करते

@नानबा.. हे फारच कौतुकास्पद आहे. पण सगळीच पालक आहे नसतात. आपल्या मुलाचे मार्क टक्के यावरच ते भर देतात.
लंडन स्कूल ऑफ फूड and science तर्फे मुंबईत झालेल्या सर्वेमध्ये त्यांना असं आढळलं की ९१ %मुलांना जेवण बनवता येत नाही. कारण त्यांचा दिवस पूर्ण शाळा क्लास घर क्लास आणि शाळेतच जातो.
त्यामुळे हे काही फक्त मीच म्हणत नाही. आणि वर मला बहुतांशी मुलांना येत नाही असं म्हणायचं होतं पण बहुतांशी हा शब्द लिहायचा राहून गेला. त्यामुळे गोंधळ उडाला. Happy

लेख छान खुसखुशीत आहे. फक्त च्रप्स यांनी लिहीलंय ते पटलं. मुलांनी स्वतःच्या हातांनी एकही पदार्थ परीक्षकांसमोर न बनवता होम सायन्स या विषयाची बोर्डाची प्रॅक्टिकल परीक्षा कशी होऊ शकते हे कळलं नाही.
मृणालिनी, लहान वयात काय शिकायचे आणि कसे शिकायचे हा चॉईस असणं ही लक्झरी आहे. तू खरंच खूप लकी मुलगी आहेस. सगळी मुलं इतकी लकी नसतात.

@जिज्ञासा agreed. पण ती मुलं पास नाही झाली. लेखात लिहिल्याप्रमाणे बऱ्याच मुलांना परीक्षेला बसू दिलं नाही आणि बरीच मुलं नापास झाली. पण अर्थात NIOS या बोर्डात बसणारी मुलं ही मुक्त शिक्षण प्रणालीत च असतात. त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही... CBSC बोर्ड वगैरे ठिक आहे. तिथे मुलांना असं शिकायला मिळतं नाही.

Pages