अगम्य !... (भाग २ )

Submitted by Sujata Siddha on 11 September, 2020 - 07:48

https://www.maayboli.com/node/76629 (भाग १ )

अगम्य !... (भाग २ )

थिसीस च टेन्शन संपल्यानंतर त्या दोघी कॉलनीच्या बागेत संध्याकाळच्या वेळी निवांत गप्पा मारत बसल्या असताना , स्वराने स्वानंदीला तिच्या त्या स्वप्नाबद्दल सांगून टाकलं ,आणि त्या दरम्यानच्या चर्चेत हा प्रश्न साहजिकच दोघीनाही पडला की त्याचं नाव ‘भद्रक’ आहे हे स्वराला कसं कळलं ? , स्वराचं म्हणणं की ते तिला आपोआप समजलं , पण आपोआप म्हणजे कसं हे मात्र तिला सांगता येईना , खूप काथ्याकूट केल्यानंतर त्या दोघी या निष्कर्षाला आल्या की स्वरा ने ते’ स्वप्न’ किंवा ‘ ट्रान्स ‘जे काही असेल ते , त्यामध्ये गेल्यावर जे दृश्य तिला दिसतं ते आता विसरून जावं , तसंही मागच्या आठवड्यापासून तिला ते दिसलं नव्हतं . आणि पुन्हा दिसल्यास त्रिविक्रमजींकडे जावं , कारण ते तिथूनच सुरू झालं होतं .
“पण तो भद्रक का काय तो , कसा होता गं दिसायला ? “
“ आग्ग्ग् , कसला सॉलिड , खूप म्हणजे खूपच भारी , आपल्या कॉलेज मध्ये एकही नाही त्याच्यासारखा नमुना म्हणून सुद्धा दाखवायला . “
“काय सांगतेस ? “ स्वानंदीने औत्सुक्याने विचारलं ,
“ हो अगं स्वानु ,अगदी आपल्याला आवडतो तस्सा आहे तो , सणसणीत उंची, कमावलेलं शरीर , डस्की स्किन टोन , स्क्वेअर शोल्डर्स , तरतरीत नाक आणि अतिशय देखणा चेहेरा , राजबिंडा.
“एवढ्या अंधारातून दिसला तुला स्वरे तुला तो ? “
“हो मग काय ? “ स्वरा खुशीत येऊन म्हणाली
“Wowww , आणि ती चैत्या ? “
“ ती दिसायला बरी होती गं , पण फार मुळु मुळु वाटली मला , लाजत काय होती , रडत काय होती . शी !.. काहीतरीच , त्याला आजीबात शोभत नव्हती , “
“ Aww“ जेलस ? पण स्वरे तू गुंतून जाऊ नकोस हा त्या भद्रकात , ते भासतलं जग आहे हे विसरू नकोस आणि तसंही तो मॅरीड आहे, आपल्याला काही उपयोग नाही त्याचा “ .
” हं “ !... “ स्वराने शून्यात बघत सुस्कारा सोडला .
“चल पाणी पुरी खाऊया “ तिला विचारात पडलेलं बघून स्वानंदीने कोपऱ्यावरच्या पाणीपुरीवाल्याकडे बोट दाखवलं , मग दोन प्लेट पाणीपुरी ,दोन spdp , दोघीत एक रगडा पॅटिस , सर्वात शेवटी मसाला पुरी अशी मजबूत खाद्य जत्रा झाल्यावर दोघी घरी गेल्या .

“वीर भद्रक आपण इथे ? आणि आपल्या सोबत ही दिव्यांगना कोण “
“ज्येष्ठभ्राता ही ‘चैत्या’ माझी स्वामीनी, अर्थात भार्या , आपले आशीर्वाद घेण्याकरिता , कुसुम्ब नगरीतून इथवर आलो .."
“काय? , तुझी भार्या ? मूढा ssssss वस्त्रप्रावरणांवरून ती नीच कुलातील वाटते आहे . “ ज्येष्ठ बंधू कडाडले ...गुप्तहेराने हि वार्ता आणलीच होती, परंतु आम्हांस तुजकडून वदवून घ्यायचे होते ”
“ ज्येष्ठ भ्राता , मी ..मी. ..” इतका वेळ ज्या आत्मविशवसाने भद्रक आपल्या बंधू विषयी बोलत होता , आता त्याची जीभ अडखळू लागली ,
“ वृथा समय दवडू नकोस , कोणास पृच्छा करून हा परिणय साधलास तू बोल ? कोणाच्या अनुमतीने हे अघोर कृत्य तू केलेस ? आपल्या उच्चं कुलाचा असा अवमान करावयाचा अधिकार तुला कोणी प्रदान केला ? .बोल भद्रका SSSSS “ क्रोधाने आग पाखडत ,डोळ्यात अंगार धगधगत असताना ज्येष्ठ बंधूंनी लखलखीत पातीची धारदार तलवार सपदीशी म्यानातून बाहेर काढली… “या नीच कृत्याने तू देहदंडास पात्र झाला आहेस , हे तुज ज्ञात आहे काय ? “ भद्रक अविश्वासाने आपल्या वडिल बंधूं कडे पाहू लागला , त्याला प्राणापेक्षा प्रिय असलेला आणि ज्याने त्याला मुलाप्रमाणे वाढविले , त्याच्या मनावर सर्व धर्म -जात हे समान आहेत, कोणीही उच्च अथवा नीच नाहीत हे लहानपणापासून बिंबवलं होतं तोच ज्येष्ठ भ्राता आता त्याच्या या कृतीवर बोल लावत होता , इतकंच नव्हे तर देहदंडास तो पात्र आहे असं सांगत होता , भद्रकाच्या निष्कपट मनावर त्याच्या या वागण्याचा अतिशय विपरीत परिमाण झाला . आणि प्रत्युत्तर म्हणून, मनाशी काही एक निश्चय करून , तो गुडघे दुमडून चैत्यासकट खाली बसला आणि आपली निमुळती मान झुकवून म्हणाला , “ हे ज्येष्ठ बंधो , आपण मला पित्यासमान आहात, आपण माझे गुरू आहात , आपल्या पवित्र हस्ते आम्हा पती -पत्नीस मृत्यू आला तर ते आम्ही आमचे भाग्य समजतो “
इकडे भद्रक असं काही करेल याची मुळीच कल्पना नसलेली ‘चैत्या’ एकदम दचकली , तिला असा मृत्यू मुळीच नको होता ती भद्रकाचा हात झटकून उठली आणि ,पुढे काय घडेल याचा विचार न करताच , भयाने किंचाळून बाहेर पळून गेली.लांबवर जाईपर्यंत तिचा आक्रोश ऐकू येत होता , बहुधा आपल्याला कोणी मागून येऊन पकडेल हि भीती तिला वाटली असावी .
“पाहिलंस भद्रका? स्वतः:वर संकट येताच , तुझी ती नूतन परिणीत भार्या तुझा त्याग करून कशी पळून गेली ? अशी असते का सहचारिणी ? वीरपत्नीस हे कृत्य शोभा देते काय ? तुझी निवड वैमतिक आहे हे सिद्ध झालं भद्रका !....” ‘ चैत्या’ गेली त्या दिशेने भद्रकाने अतिशय विव्हल नजरेने पाहिले ,हा धक्का हि त्याला नवीन होता , त्याला अत्यंत प्रिय अशा दोन्ही व्यक्तींकडून त्याच्यावर वज्राघात झाला होता. तो अन्याय सहन न होऊन पुनश्च काही एक निश्चयाने उठला “ आपण मजसमान पापी मनुष्यास मृत्यू दंड देणेच योग्य आहे , ही माझी मान आपल्या स्वाधीन केली , मी खरोखरच अपराधी आहे ,ज्यांच्यावर मी आत्यंतिक प्रेम केले त्या माझ्या दोन्ही व्यक्तीस मी ओळखू शकलो नाही , अज्ञान हे एक प्रकारे पापच आहे आणि आपण मला मृत्यू प्रदान केला नाही तर मीच स्वहस्ते मला कंठ स्नान घालतो “ असे म्हणून ती सहा फुटी लखलखीत तळपती धारदार तलवार ‘भद्रकाने ‘ आपल्या शंखासारख्या निमुळत्या आणि सुंदर कंठावर ठेवली, आता तो चिरून त्यातून चिळकांडी उडणार तोच , “ थांबा SSSSSS !.. “ असा एक खणखणीत आवाज वातावरणात घुमला .
दोघेही बावरून आवाजाच्या दिशेने पाहू लागले , कडाडून विरोध करण्याच्या पावित्र्यात असलेली साधारण २४ वर्षे वयाची एक तरुणी द्वारात उभी होती , तिचा पोशाख खूप विचीत्र होता , वरून एक डगला आणि खाली घोट्या पर्यँत आलेलं दुटांगी फुलाफुलांच रंगीत वस्त्र , शिवाय अंगावर कोणतेही अलंकार नसून इतकंच काय कपाळावर गंधही नाही , केस खांद्यापर्यँतच जणू जाणून बुजून कापलेले , “हा कोण विक्षिप्त मनुष्य प्राणी ? “ कन्या म्हणावी तर अंगावर वस्त्र प्रावारणे पुरूषाची ? दोघेही आश्चर्याने तिजकडे पहात राहिले,
त्वेषाचा पहिला आवेश ओसरल्यावर ‘स्वरां’ एकदम भानावर आली , आणि बावरून इकडे तिकडे बघू लागली ,
एकाच वेळी भीती , आश्चर्य , रोमहर्षक अशा असंख्य संवेदना तिला जाणवायला लागल्या , ‘आपण इथे कसे ? हा प्रश्न त्या दोघांइतकाच तिलाही पडलेला , थिएटर मध्ये एखादा मूव्ही बघत असताना एकदम आपण पडद्यातून आत गेल्यावर जसं वाटेल तसं तिला झालं आणि एखादं भूत पाहिल्यावर जसा चेहरा होईल तसा त्यां दोघांचा चेहेरा झालेला , काय करायचं हे न सुचून सर्वच गोंधळलेल्या स्थितीत उभे राहिले, पण क्षणभरात ‘स्वरा’ सावरली ,कारण ती निदान त्या दोघांना आधीपासून पहात होती , जसं जमेल तसं त्यांना सांगावं असा तिने निश्चय केला आणि ती दारातून आत आली , आता उठून उभा राहिलेला ‘भद्रक’ एकदम स्वतः:च्या हातातली तलवार तिच्याकडे रोखून , सावध पवित्रा घेऊन पाहू लागला . पण हे करत असताना त्याच्या चेहेऱ्यावर प्रचंड गोंधळलेले भाव होते .
“भद्रक please मारू नको “ त्याचा विचार ओळखून ,त्याला हाताने थांबवत स्वरा म्हणाली .
“Please म्हणजे , i mean to say ..(नाही नाही हे धेडगुजरी इंग्लिश त्याला बिचाऱ्याला कळायचं नाही !)..
भद्रक , कृपया गैरसमज नसावा , मी आपल्या साहाय्याकरिता इथे आगमन केले आहे “( बास … , संपली capacity ! )
“आपला परीचय ?”
“मी ...मी ‘स्वरा गोखले’ !..
“कन्या की पुरूष ? “
“ ई ssss !!!!! शी बाई !.. काहीही काय विचारता ? अहो मी एक तरुण आणि सुंदर मुलगी आहे, तुमच्या भाषेत युवती . मी पृथ्वी नामक एका निसर्गरम्य ग्रहावर राहाते , आणि मला ठाऊक नाही हा कोणता ग्रह आहे , किंवा हा कोणता काळ आहे “
“आपण इथे प्रविष्ट होण्याचं प्रयोजन ?” ती जे काय बोलली त्यातलं त्याला काही एक कळलेलं नाही हे त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं .
“ ( ते मला तरी काय माहिती माणसा ?.. आता कसं सांगू तुला की तू माझा ‘प्रिन्स चार्म ‘ आहेस, तुझ्याचसाठी इथे आले असेन धडपडत .नसता मलाही नाही कळलं मी कशी आले)
या संभाषणादरम्यान अचानक मागे काही तरी वाजल्याचा आवाज झाला आणि दोन -तीन सैनिकांनी चपळतेने घेराव घालून’ स्वरा’ ला जायबंदी केलं .
इकडे स्वराच्या बेड भोवती , आई , बाबा , आजी , स्वानंदी , स्वानंदीचे आई-बाबा असे सर्व उभे होते ,
“एवढं सगळं इतके दिवस चाललंय आणि तु आत्ता सांगतेस स्वानंदी मला ? “
“अहो काकू , मला काय माहिती हे असं होईल ?शिवाय मध्यंतरी स्वप्न पडणं बंद झालं होतं तिला “
“काय नसते उद्योग करता गं तुम्ही पोरी आणि आई -बापाच्या जीवाला घोर लावता . बघा माझी पोर बोलत नाही , हालत नाही , अक्षरश: पुतळा झालाय कालपासून . “ स्वराच्या आईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या . पण क्षणभरात डोळे पुसून ती ताड़दीशि उठली , “ते काही नाही ,स्वानंदी मला घेऊन चल ते कोण त्रिविक्रमजी का फ्रीविक्रमजी त्यांच्या कडे , चांगली जाऊन खडसावते त्यांना हे असले उद्योग कशाला करता म्हणून ..पण त्यांना तरी काय दोष द्यायचा म्हणा , आपलंच ध्यान बावळट निघालं “ आई ,तरातरा दारापाशी गेली आणि पायात चप्पल घालून ती स्वानंदीला म्हणाली “येतेस ना ?”
“हो हो आले आले ..” थोड्याच वेळात त्या दोघी त्रिविक्रमजींच्या सेंटर मध्ये त्यांच्या समोर बसल्या होत्या .
“काय म्हणता? अशक्य ....!! असं होऊच शकत नाही ,माझ्या मंत्रांमुळे माणूस बरा होतो , दगडी पुतळा नाही, काहीही काय सांगता तुम्ही ?“ त्रिविक्रमजीं जोरजोरात नकारार्थी मान हलवत म्हणाले .
“ अहो पण झालंय ना आता असं .. त्याच्यावर उपाय काय ते सांगा “ स्वरा ची आई काकुळतीला येऊन म्हणाली ,
“ कमाल आहे , मी कसं काय सांगणार ? काही मानसिक धक्का बसून कोमात गेलीये का बघा , किंवा एखाद्या चांगल्या हिप्नोथेरेपीस्ट नाहीतर मानसशास्त्रज्ञाला दाखवा , मी गेले अनेक वर्षे हे प्रयोग करतोय पण असं कधीच घडलं नाहीये “ .
“ अहो , ती काही मनोरुग्ण नाहीये ,मानसशास्त्रज्ञाला दाखवायला आणि कोमात जायला तिचा काही अपघात झाला नाहीये . तुमच्याकडून येऊन गेल्यापासूनच ते विचित्र भास तिला व्हायला लागले होते , आणि आता माझी मुलगी एवढ्या मोठ्या संकटात सापडली असताना आम्हाला मदत करायची सोडून हात कसले झटकता ? काही माणुसकी वैगेरे आहे की नाही तुम्हाला ? “ स्वराची आई डोळे वटारून म्हणाली .
स्वराच्या आईच्या या बोलण्याने त्रिविक्रमजी जरा नरमले ,“ अहो मॅडम तसं नव्हतं मला म्हणायचं .बरं थांबा एक काम करू आपण .मी माझ्या गुरुबंधूंना सत्येन दादांना विचारतो , ते यातले तज्ञ् आहेत ., प्लिज मला आजचा दिवस द्या ”
“ काहीही करा पण माझी मुलगी मला पूर्वीसारखी हवी आहे , सांगून ठेवते .” असं म्हणून स्वराची आई आणि स्वानंदी परत घरी आल्या .घरी स्वरा आहे त्याच कंडिशन मध्ये होती , स्वराच्या बाबांच्या मदतीने आईने तिला गादीवर आडवं झोपवलं आणि ती तिच्या सताड उघड्या डोळ्यांकडे बघत म्हणाली , “स्वरा , ए स्वरा , काय झालंय तुला ? अगं इकडे बघ राजा , एकदा तरी बघ ,पापणी सुद्धा हलवत नाहीयेस , काय झालंय तुला बाळा , ए बबडया !.. “
“बापरे , मातुश्रींच्या हाका “ अर्धवट काळोखात हात बांधलेल्या अवस्थेत स्वरा बसलेली असताना तिला आईच्या लांबून क्षीण हाका ऐकू येत होत्या . तेवढ्यात बाहेरून कुजबुज ऐकू आली ,
“श्रीमन ती विचित्र युवती शुद्धीवर आलेली दिसतेय “
ती बेशुद्ध नव्हतीच , काही एका सेकंदासाठी तिची हालचाल मंदावली होती ,पण तरीही स्मृतीला थोडा ताण द्यावा लागला आणि तिला हळू हळू एक एक गोष्ट आठवायला लागली , त्या रात्री ती नेहेमीसारखी जेवण करून ,आपल्या रूम मध्ये झोपायला गेली , झोपण्यापूर्वी , व्हॉट’स अँप वर चे मेसेज चेक करत असतानाच स्वानंदीचा तिला मेसेज आला , की भद्रक आणि चैत्याचं पुढे काय झालं ?परत काही दिसलं नाही ना ? त्यावर ‘नाही ‘ असा रिप्लाय देऊन ती झोपली , त्यानंतरच ते स्वप्न तिला पुन्हा पडलं , त्यात भद्रक स्वतः:च्या हाताने स्वतः:चा प्राण घेतोय हे जेव्हा तिने पाहिलं तेव्हा ती भयंकर अस्वस्थ झाली , आपण त्याला वाचवलं पाहिजे हि तीव्र ईच्छा तिच्या मनात उपन्न झाली आणि एकाएकी भद्रकच्या जगात तिचा नाट्यमय रित्या प्रवेश झाला , मग पुढचं रामायण घडलं आणि ती तिथेच जायबंदी होऊन पडली . तितक्यात कोणीतरी आल्याची चाहूल लागली . स्वरा सावरून बसली .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users