दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी.. सफेद बालों की, ऐसी की तैसी..!!

Submitted by Nitin Salunkhe on 12 September, 2020 - 04:27

दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी..
सफेद बालों की, ऐसी की तैसी..!!

या ओळी वाचल्या आणि मला केसांवर काहीतरी लिहावं असं वाटू वागलं..केस (अर्थात पुरूषांचे. स्त्रीयांच्या केशसांभारावर ग्रंथच्या ग्रंथ लिहीले गेलेत) शरिराच्या शीर्षभागी असुनही त्यावर फार काही लिहीलं गेलं नसावं असं मला वाटतं. माझे केस लवकर गेले आणि उरलेले त्याही अगोदर पिकले. मी केस रंगवायचा प्रयत्न केला, नाही असं नाही, पण का कोण जाणे, मला ते जमलं नाही. अर्थात केस रंगवण्याचा प्रयत्न पत्नीच्या आग्रहास्तव केला होता, कारण माझे गेलेले आणि शिल्लक असलेल्यापैकी बहुतेक सर्व पिकलेले केस माझ्यापेक्षा तिलाच 'कसेतरी' वाटायचे..वयापेक्षा मोठा दिसतोस म्हणे..! (आता वयानं मोठं दिसण्याचे काय काय फायदे असतात तिला काय सांगणार..!)

मी केस रंगवायचे सोडले कारण तसं करणं मला खुप कटकटीचं वाटलं. केस कमी असले की अगदी एक एक केस पकडून रंगवावा लागतो आणि ते कल्पनेतही अवघड असतं तर प्रत्यक्षात काय उपद्य्वाप असेल याचा विचार करा.. सरसकट रंग फासला की तो रंग डोक्यावरील उरलेल्या केसांऐवजी नेमका केस नसलेल्या ठिकाणीच व्यवस्थित लागतो आणि मग ते 'तारक मेहता का उल्टा चश्मा' सिरीयलमधल्या गोकुळधाम सोसायटीचे एकमेंव सेक्रेटरी श्रीयुत आत्माराम तुकाराम भिडेंच्या रंगवलेल्या टकलासारखं काहीतरी विचित्र दिसतं. त्यापेक्षा केस न रंगवलेलेच बरे असं म्हणून आहेत तसे ठेवणे योग्य हा निर्णय मला (नाईलाजाने) घ्यावा लागला.

तरी अनेक लोक केस रंगवतात. मुंबईसारख्या धकाधकीचं जीवन जगायला लागणाऱ्या शहरात तर सततच्या टेन्शनने आणि निकृष्ट खाण्या-पिण्यामुळे अनेकांचे तरूण वयातच केस पिकतात. दुसरं म्हणजे, मुंबई हे व्यापारी शहर असल्यानं, इथं आतल्या वस्तुपेक्षा 'पॅकिंग व वेष्टना'ला जास्त महत्व असतं. आतील वस्तू फालतू असली तरी चालेल परंतू पॅकींग मात्र आकर्षक हवं. हा व्यापाराचा नियम मुंबईसारख्या शहरात मानवी व्यवहारातही लागू होत असल्यामुळे इथं प्रत्येकाला प्रेझेंटेबल राहावं लागते. दिसण्यावरूनच इथं व्यक्तीची किंमत केली जाते मग ती व्यक्ती प्रत्यक्षात कशीही असेना का. त्यामुळे अकाली पिकलेले केस रंगवणं ओघानेच आलं.

माणसाचं सौंदर्य मुख्यत: नाक आणि डोळे यावर ठरतं. म्हणून तर 'कानी-कपाळी सुंदर' न म्हणता 'नाकी-डोळी सुंदर' असं महणतात. पूर्वी नाक धारदार (किंवा लिंगपरत्वे चाफेकळी) व डोळे पाणीदार (किंवा लिंगपरत्वे बोलके, भावूक) असले की माणूस सुंदर दिसायचा. आता त्यात आणखी दोन गोष्टींची भर पडली, त्या म्हणजे रंग आणि केस. हे टिव्हीमुळे कळलं..! नाक-डोळे-रंग-केस हवे तसे आणि हवे तिथं नसूनही केवळ साबणामुळे सौंदर्य खुलतं हा आणखी एक क्रांतिकारी शोधही अलिकडं लागलाय, हे ज्ञानही टिव्हीमुळे मिळालं..! टिव्ही नसता तर सुंदर कशाला आणि कुणाला म्हणावं कळलंच नसतं कधी बुवा..!!

थोड्याश्या विषयांतरानंतर पुन्हा माझ्या नसलेल्या आणि उर्वरीत पिकलेल्या केसांकडे वळू. केस रंगवाचा मला कंटाळा का येतो त्याचं मुख्य कारण मी वर सांगीतलंच आहे. मी माझे जाऊन उरलेले केस रंगवत नाही याला आणखी एक कारण आहे. निसर्गाने आपल्याला (वयानुरबप) जे जे दिलेलं असतं, ते ते आपल्याला शोभेसं असतं यावर माझा ठाम विश्वास आहे. आपण सर्वच जर निसर्गाची (काही जण देवाची म्हणतील. हरकत नाही. दोन्ही एकच आहेत..!) युनिक निर्मिती असू तर ती सुंदरच असणार अशी माझी खातरी आहे. म्हणून जर त्यांने केस काढून घेऊन उरलेले पांढरे केले असतील तर ते आपल्याला शोभतच असणार. त्यांने पांढरे केलेले पुन्हा काळे करून त्या निसर्गाच्या कारागिरीत ढवळाढवळ आपण का म्हणून करावी..? अर्थात हे माझं मत झलं, इतरांना पटावं अशी बिलतूल अपेक्षा नाही.

टक्कल, अर्धटक्कल (पुढून असल्यास 'भव्य कपाळ' आणि मधेच असल्यास 'श्रीमंत', अशी त्या व्यक्तीला काॅम्प्लिमेंट दिल्यास, तिलाही बरं वाटतं), पूर्ण टक्कल आणि संपूर्ण पांढरे परंतू भरघोस केस (सुतरफेणी नजरेसमोर आणा) हे पुरूषांच्या माथ्यावरील केसांचे ढोबळ मानाने चार प्रकार. हे वेगवेगळे प्रकारही एकेकाला काय शोभून दिसतात..!! पिकलेल्या केसाचा अमिताभ अजूनही किती देखणा आणि भारदस्त दिसतो..पूर्ण टक्कल असलेला राकेश रोशन, विगपेक्षा टकलातच देखणा वाटतो अजुनही..! अनुपम खेर, विनोद खन्नाचा मुलगा अक्षय खन्ना कुठं वाईट दिसतात? अरुण जेटली, मोदी काय कमी देखणे वाटतात? इंदीरा गांधींच्या केसातली ती ठसठशीत रुंद पांढरी बट तर नंतर नंतर त्यांची ओळख झाली होती. ही सर्वांना माहित असलेली काही उदाहरणं. अशी कुठलीही रंगरंगोटी किंवा लपवाछपवी न करता 'दिधले अनंते' वृत्तीने बिनधास्त राहाणारी कितीतरी आनंदी माणसं आपण आपल्या आजुबाजूला रोज पाहात असतो.

लपवाछपवीवरनं मला आठवतो तो सुपरस्टार रजनीकांत. आज भारतातल्या सर्वभाषिक चित्रपट नायकांमधे सर्वाधिक मानधन घेणारा आणि तेवढाच लोकप्रियही असणारा साऊथचा चित्रपट सितारा. पण चित्रपटाव्यतिरिक्त तो त्याच्या काळ्या रंगाच्या टकलासहीत लुंगीवर बिनधास्त वावरत असतो. चित्रपटातलं खोटं जग आणि प्रत्यक्ष जीवनातलं वास्तव यातील फरक समजणारा आणि कृतीतही उतरवणारा माझ्या माहितीतला हा एकमेंव सुपरस्टार. नो लपवाछपवी, जसा आहे तसा..!

स्वत:ला ते आहेत तशी प्रेझेन्ट करणारी खुप कमी माणसं असतात. बहुतेकांची धडपड आपण प्रत्यक्षात नसतो तसंच दाखवण्याची असते. त्यात काही चुकीचं असंही नाही कारण ती काळाची मागणी आहे. आतल्या वस्तूपेक्षा पॅकिंगला महत्व आल्यावर आणखी काय होणार? पण असं करून चालणार नाही. असं केल्याने तरूण वयातच डायबेटीस, ब्लड प्रेशर होणारच, हार्ट अॅटॅक येणारच. हे सर्व अनावश्यक स्ट्रेसचेच मेन इफेक्ट्स आहेत. त्यामानाने केस लवकर पांढरे होणं हे साईड इफेक्ट्स खुपच सौम्य आहेत. केस झाले तर झाले पांढरे, गेले तर गेले काळजी कशाला करायची.! "दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी.. सफेद बालों की, ऐसी की तैसी.. म्हणायचं" आणि दिलाचं जवाॅंपण जपायचं. 'दिसणं' नव्हे तर आहोत तसं 'असणं' महत्वाचं असतं हे उमजायचं आणि पांढऱ्या (अन् गेलेल्याही) केसांची ऐशी कि तैशी म्हणायचं आणि समोर येईल त्या परिस्थितीशी (आणि जमलंच तर ‘ती’च्याशी) जुळवून घेत ऐश करायची, काय?

-नितीन साळुंखे
9321811091

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
मला विश्वासम मधला काळ्या-पांढऱ्या मिक्स केसांचा अजित आठवला. एक युनिक स्टाईल. Happy

टक्कल म्हणजे चेष्टेचा विषय असतो.few men can pull off bald look. केस नसण्यापेक्षा पांढरे पण भरघोस केस कधीही चांगले,रंगवता तरी येतात. मिल्या सोमण टकला असता कुणी इचारला असता का त्याला.?

मस्तच लिहीलंय..

केस कमी असले की अगदी एक एक केस पकडून रंगवावा लागतो >> केस कापतानाही अगदी असच होतं.. एक एक पकडून कापावा लागतो.. हे शेवटचे लढय्येच फार त्रासदायक ठरतात Happy
बाय द वे.. मला तर हाॅलिवूडचे सगळे टक्कल असलेलेच हिरो आवडतात Happy