खोटे कयास होते

Submitted by निशिकांत on 10 September, 2020 - 23:06

पाऊस यावयाचे खोटे कयास होते
सातत्त्य संगतीचे जमले उन्हास होते

खेळाअधी पराजित शेतीतला जुगारी
त्याला सदैव शिक्षा, मानेस फास, होते

ये यायचे नभा तू किंवा नकोस येऊ
अश्रूत सिंचलेले गतसाल खास होते

बोटे धरून ज्यांना चालावया शिकवले
अडचण घरात माझी का वारसास होते?

मी जन्मलो कधी अन् मेलो कुण्या तिथीला
कसले महत्व दुसरे या तारखांस होते?

जे भटले तयांची प्रतवार छाटणी का?
हेही झकास होते तेही झकास होते

खेड्यात राहिल्याने, विहिरीत डुंबल्याने
अंघोळ बादलीने! हासावयास होते

जो जिंकतो लढाई म्हणती तया सिकंदर
जे हारले तयांचे असणे खलास होते

जे लीन ईशचरणी 'निशिकांत" ते यशस्वी
कौरव दुराभिमानी बसले उशास होते

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
जे भेटले तयांची प्रतवार छाटणी का?
हेही झकास होते तेही झकास होते
क्या बात है !!!