घर का की घाट का?

Submitted by पराग र. लोणकर on 8 September, 2020 - 00:37

घर का की घाट का?

ठरलेल्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटं अधिक होऊन गेली होती. मनात ठाम विश्वास असूनही हृदयाची धडधड कमालीची वाढली होती. इतक्यात माझ्या मोबाईलचा मेसेज टोन वाजला. मेसेज उघडला. जी भीती मला वाटत होती ती खरी ठरलेली होती.

मेसेज तृप्तीचाच होता.

``प्रिय प्रशांत, मी खूप खूप विचार केला. माझा भरलेला संसार सोडून मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. सचिन श्यामळू आहे, अगदी साधा आहे, पण त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. प्लीज मला विसरून जा. मी उद्यापासून जिमला येणार नाही. इथून पुढे आपण कोणताच संपर्क ठेवायला नको. बाय!``

मी मटकन खालीच बसलो. मी आता ना घर का ना घाट का असा झालो होतो!

नक्की काय झालं ते तुम्हाला सांगतो.

मी एका जिममध्ये इंस्ट्रक्टर म्हणून काम करतो. तसा मी दिसायला राजबिंडा, व्यायामानं कमावलेलं शरीर! मात्र शिक्षणात बुद्धीची चमक दाखवू न शकल्यामुळे शिक्षणात फारसं काही करू न शकलेला. तीन वर्षांपूर्वी जिममध्ये येणाऱ्या किरणच्या मी प्रेमात पडलो. अतिशय सुंदर असलेली किरण स्वतःचा मोठा वडलोपार्जित व्यवसाय चालवत होती. माझं उत्पन्न तसं तुटपुंजंच होतं. सुदैवानं माझ्या रूपाला आणि पर्सनॅलिटीला भाळून किरणही माझ्या प्रेमात पडली. आम्ही लग्न केलं.

पण लग्न केल्यानंतर किरणचं वेगळंच रूप मला पाहायला मिळालं. किरण अतिशय डॉमिनेटिंग होती. गेली तीन वर्ष आमच्या संसारात तिची एकतर्फी हुकूमशाही चालू होती. माझं तिच्यावर खरंच प्रेम असल्यामुळे मी संसार टिकून राहावा यासाठी खूप प्रयत्न केले. माझ्या मुळच्या गमतीशीर स्वभावाचा वापर संसारात वेळोवेळी करून संसारात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण किरणच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. मला विकत घेतल्यासारखं तिचं माझ्याबरोबर वागणं होतं.

सहा महिन्यापूर्वी आमच्या जिममध्ये तृप्तीने व्यायामासाठी येणं सुरू केलं. तृप्ती विवाहित होती. दोन गोंडस मुलींची आई होती. तीदेखील एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करत होती. आर्थिक दृष्ट्या चांगलीच सक्षम होतील. तरीही तिचे पाय चांगलेच जमिनीवर होते. तिला तिच्या श्रीमंतीचा, हुशारीचा अजिबात माज नव्हता. सगळ्यांशीच ती मिळून मिसळून राहत होती. या तिच्या स्वभावामुळे आणि घरात होत असलेल्या त्रासामुळे मी तुप्तीच्या प्रेमात पडलो.

हळूहळू आमचा संवाद वाढला. इतका की जिमच्या इमारतीच्या जिन्यामध्ये आमच्या अगदी वैयक्तिक गप्पा होऊ लागल्या. तिचा नवरा एकदमच साधा, अगदी शामळू होता. त्यामुळे तिलाही माझ्या पर्सनॅलिटीचे आकर्षण वाटू लागले होते. हळूहळू आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे आमच्या लक्षात आले. खरं तर ती माझ्याहून काही वर्षांनी मोठी होती. पण अर्थात तो विचार आम्हाला महत्वाचा वाटला नाही. आणि एके दिवशी धाडस करून माझ्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव तिच्यापुढे मांडून मी तिच्या मुलींनाही आनंदानं स्वीकारायची तयारी दाखवली.

पुढील काही दिवस तृप्ती जीमला येत होती पण तिने माझ्या प्रश्नाचे उत्तरही दिले नाही आणि माझ्याशी काही संवादही साधला नाही. साधारण आठवडाभराने एकदा तिने अचानक मला जिन्यात गाठलं आणि माझा प्रस्ताव मान्य असल्याचं सांगितलं. मला आश्चर्याचा आणि आनंदाचा मोठा धक्का बसला. मग अधिक काही नियोजन करून आम्ही पळून जाण्याच्या दृष्टीने आज भेटायचं ठरवलं आणि आता तिचा हा असा मेसेज आला होता.

इथे येण्यापूर्वी मी किरणला एक पत्र लिहलं होतं. त्या पत्रात गेल्या तीन वर्षात तिने माझा कसा कसा मानसिक छळ केला आहे, तिची हुकुमशाही घरामध्ये कशी चालू असते, मला अगदी जीवन नकोसे कसे झाले होते, व त्यामुळे मी आता घर सोडून जात आहे असं सारं मी अगदी सविस्तर लिहिलं आणि दिवाणखान्यातल्या सेंटर टेबलवर ते पत्र ठेऊन त्यावर टी.व्ही.चा रिमोट ठेवून मी घराबाहेर पडलो होतो.

आता मात्र तृप्ती येणार नव्हती आणि हे सारं वाचून किरणही घरात घेणार नव्हती, अशा परिस्थितीत मी सापडलो होतो. जवळजवळ अर्धा तास मी तिथेच बसून होतो. डोक्यात विचारांनी थैमान घातलं होतं. शेवटी मी तिथून उठलो. थोड्या वेळात मी माझ्या घरी पोहोचलो. दरवाजाची बेल वाजवली.

गेल्या दीड एक तासात काहीतरी चमत्कार होऊन ते पत्र किरणच्या हातात पडलेलंच नसूदे अशी प्रार्थना माझ्या मनात चालली होती.

दरवाजा उघडला गेला आणि समोरचं किरणचं रूप पाहून तिनं पत्र वाचल्याचं माझ्या लक्षात आलं. आता तिच्या जोरदार शाब्दिक आक्रमणाला सामना करण्याची मी जय्यत तयारी केली.

``का आलास परत?`` डोळे लाल झालेल्या किरणनं मला ज्या आवाजात हा प्रश्न विचारला, त्या आवाजात मी लग्न झाल्यापासून किरणला बोलताना कधीच ऐकलं नव्हतं.

मी एकदम माझ्या हातामध्ये मागे धरलेला फुलांचा बुके आणि चॉकलेटचा बॉक्स तिच्या समोर धरला आणि जोरात ओरडलो, ``एप्रिल फूल!``

माझ्या हातातील तो बुके आणि चॉकलेटचा बॉक्स खेचून घेऊन हॉलमधल्या सोफ्यावर फेकून देऊन किरणनं मला घट्ट मिठी मारली.

``प्रशांत, मला माफ कर. तुझ्या चिठ्ठीतला एक अन एक मुद्दा मला पटला आहे. माझी खरंच चूक झाली. आता मी बदलेन, निश्चित बदलेन. तुला मी समजून घ्यायला हवं होतं. पण तू इतके दिवस कधीच हे सगळं स्पष्टपणे का बोलला नाहीस? Officeमधलं माझ्यातील bossचं वागणं मी घरी आल्यावर बदलायला पाहिजे होतं. ठीक आहे. झालं गेलं आपण विसरून जाऊया. नव्याने संसाराला सुरुवात करूया. या नवीन जीवनाची सुरुवात आपण सेलिब्रेट करूया. थांब, मी तुझ्यासाठी पेग भरून आणते.`` असं म्हणून किरण स्वयंपाकघरात निघून गेली.

घामाने डबडबलेला मी सोफ्यावर बसलो. मोबाईलमधील तृप्तीचा नंबर आणि हृदयातील तृप्तीचं स्थान मी डिलिट केलं. `एप्रिल फूल` या प्रथेची सुरुवात करणारा जो कोणी असेल त्याला मनोमन दंडवत घातलं आणि स्वयंपाकघरातून बाहेर येणाऱ्या माझ्या किरणची मी वाट पाहू लागलो...

**

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy छान.
नेमका 1 एप्रिललाच घडला का प्रसंग. बरं झालं.
शेवट गोड तर सगळंच गोड.

मस्त लिहिता तुम्ही
या कथा नीट जपून ठेवा, थोडी समानता ठेवा(म्हणजे कथा लांबी) आणि अश्या 10-15 झाल्या की अमेझॉन वर एक छोटे पुस्तक सेल्फ पब्लिश करा.(तिथे साईटवर स्टेप बाय स्टेप आहे)

mrunali.samad, विनिता.झक्कास मन:पूर्वक धन्यवाद!

mi_anu आवर्जून केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मनापासून आभार!

कथा छान लिहिली आहे.
सगळ्यांना 1 एप्रिलचा एक्सक्युज मिळत नाही. Sad माझी क्लासमेट स्कुल रियुनियन मध्ये भेटली होती. ती जिम इन्स्ट्रुक्टरच्या मोहात ना घर की ना घाटकी झाली. जिम इन्स्ट्रुक्टरबरोबर घर सोडण्याएवढी सिरीयस नव्हती आणि नवऱ्याला कळल्यावर घर सोडावं लागलं. आयटीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे, शिवाय एक दणदणीत चालणारा बिझिनेस करते त्यामुळे आर्थिक प्रॉब्लेम नाही, पण इमोशनली वाट लागली आहे.

मस्तय कथा
तुमची लेखनशैली आवडतेय Happy

छान लिहिली.. मला काय वाटले, पेग मध्ये काही देते कि काय किंवा ही अन टी दोघी मैत्रिणी असल्याने खरंच ना घर्का ना घात्का झाला.. ,,,

मीरा. me_rucha, किल्ली, अनूताई - अभिप्रायांबद्दल खूप खूप धन्यवाद!

मुळात यातलं एप्रिल फूल च्या दाव्यावर विश्वास बसणारं बायको पात्र युनिकॉर्न किंवा पेगासस प्रमाणे काल्पनीक संकल्पना आहे. Happy
खरी बायको खर्‍या एप्रिल फूल वर पण शंभर प्रश्न विचारेल, जिम मध्ये जाणार्‍या एखाद्या बाईशी मैत्री करुन गॉसिप मिळवून बीजीव्ही करेल.

भारी लिहिलंय.

अय्यो ती gym वाली पण म्हणेल मी एप्रिल फुल केला मला यायचा आहे, जाऊ आपण पळून. मग कसं काय करणार Proud Proud Proud

एक एप्रिल वगीरे फिल्मी योगायोग असला तरी मस्त आहे कथा आवडली...
ईन्फॅक्ट हवे तसे ट्विस्ट घेत आणखी वाढवली असती.. मजा येत होती वाचायला.

अवाण्तर - कथा आणि त्यानंतर मीरा यांचा प्रतिसाद वाचून वाटले लहानपणी चार पुस्तके वाचून ईंजिनीअर होण्यापेक्षा चारशे दंडबैठका मारून जिम ईन्स्ट्रक्टर झालो असतो तर आयुष्य आणखी मजेशीर झाले असते Happy

ShitalKrishna, ऋन्मेऽऽष अभिप्रायांबद्दल धन्यवाद!

ऋन्मेऽऽष- आपण गमतीने एक इच्छा व्यक्त केली आहे. माझी चोरी कथा (गम्मत म्हणून) शक्य होईल तेव्हा वाचावी.

आवडली कथा.
आयुष्य आणखी मजेशीर झाले असते Happy> D :-
मीरा... Wink Wink :

आवडली कथा.
आयुष्य आणखी मजेशीर झाले असते > बाप रे
मीरा... Wink Wink :