मी मोडलेली जगमान्य पुर्वापार रुढ असलेली रीत

Submitted by कविता१९७८ on 10 September, 2020 - 09:59

तशी लहानपणापासुनच मी खंबीर , घरात वडीलांच्या व्यसनामुळे आणि तापट स्वभावामुळे बालपण अगदी वाईट गेले. त्यात मी बंडखोर , धाडसी. पुढे शिकत गेले आणि माझ्यात आणि माझ्या कुटुंबात असलेली तफावत वाढतच गेली. मी एकटी एका टोकाला आणि आई— वडील , भाउ— बहीण असे चौघे दुसर्‍या टोकाला. त्यावेळी आमच्या समाजात कुणी जास्त शिक्षण घेत नसल्याने शिक्षणासाठी माझ्या घरातुन प्रचंड विरोध झाला. मारहाण झाली पण मी माझी जिद्द सोडली नाही. नोकरी करुन स्वत:च्या पैशाने डिस्टंस लर्निंग द्वारे बी.ए. पुर्ण केलं. त्यावेळी दर रविवारी बोईसर ते चर्चगेट जायचे क्लासेस साठी एस एन डी टी युनिव्हर्सिटी मधे आणि त्यावेळी लोकल नसल्याने एका वेळेचा प्रवास ३-३० तासांचा असे. नंतर एम बी ए केलं . सांगायचे कारण असे की मुळुमुळु रडत बसले असते तर आज मी स्वत:च्या पायावर उभी राहीले नसते. हळवेपणा हा आपला विकनेस होउ देउन आपण आपलंच नुकसान करतो. आपल्याला काय हवंय हे आपणच ठरवायला हवं. कुणी आपल्याला काही बोललं तर रडुन भेकुन गावगोंगाट करुन मी अबला नारी म्हणुन सहानुभुती गोळा करण्यात कसलाही मोठेपणा नाही. मन मोकळे जरुर करावे पण उगाच कुणावर भावनिकरीत्या अवलंबुन राहण्यात काही अर्थ नाही कारण आपली लढाई आपल्यालाच लढायची असते आणि सतत हळवेपणा दाखवुन आपले अबलत्व सिद्ध करण्यापेक्षा खंबीरपणे आणि प्रॅक्टीकली आलेल्या परीस्थितीला तोंड देणे जास्त महत्वाचे. बर्‍याचजणांचे मत असे की काहीजणींना नाही जमत , पण खंबीरपणे जगण्यासाठी टाकीचे घाव सोसायलाच हवेत का?

शिक्षणाबद्दल लिहायला गेले एक मालिका लिहुन होइल पण इथे शिक्षणाचा उल्लेख केलाय त्याचं कारण म्हणजे शिक्षणामुळेच मी माझ्या पायावर उभी राहीले , बाहेरच्या जगात वावरले , बर्‍याच गोष्टींबद्दल ज्ञान मिळाले. मुख्य माझ्या विचारातही आमुलाग्र बदल झाला. विनाकारण असलेल्या बर्‍याच जुन्या चालीरीती मी मोडीत काढल्या. फक्त मुलांचीच मक्तेदारी असलेली बरीच कामे मी नेटाने केली. यातली सर्वात जुनी आणि बर्‍याच धर्मात असलेली पुर्वीपासुन रुढ असलेली रीत म्हणजे माणुस मेल्यावर अंतिम संस्काराचा हक्क जो कुठल्याही परीस्थितीत पुरुषालाच मिळतो या रुढीला मी नुकतीच १५-१६ दिवसांपुर्वी तिलांजली दिली. वयाच्या १७ व्या वर्षापासुन कामाला सुरुवात करुन मी कुटुंबाला हातभार लावला. मधली बरीच वर्षे सतत व्यावसायिक आणि कौटुंबिक संघर्ष करण्यात गेली. मागच्या आठ वर्षांपासुन आई आणि वडीलांची आजारपणे सांभाळण्यात गेली. चार वर्षांपुर्वी वडीलांना दुर्धर अशा कॅन्सरने ग्रासले आणि आर्थिक आणि सेवा या दोन्हींमधे मी काही कसुर ठेवली नाही. भावाची आर्थिक स्थिती बेताची पण सेवा करण्याची बाजुही कधी त्याने सांभाळली नाही त्यावर त्याच्या बायकोची सारवासारव ही की मेल्यावर चितेला अग्नी तर तुमचा भाउच देणारे ना. हे ऐकुन मला खुप वाईट वाटले , मलगी जेव्हा आपल्या आईवडीलांची सेवा, त्यांचं औषधपाणी त्यांना मानसिक आधार देण्याचं आणि ज्या कर्तव्याची अपेक्षा मुलाकडुन असते ती सर्व कर्तव्ये बजावते तर तिला आई वडीलांच्या चितेला अग्नि देण्याचा हक्क का मिळु नये असे वाटायचे.

तर या २२ आॅगस्टला गणपतीच्या दिवशी माझे वडील गेले आणि ३-४ तासातच त्यांच्यावर अंत्यविधी करण्याचे ठरले. माझी खुप ईच्छा होती अंतिम संस्कार करण्याची पण कसं जमेल हे माहीत नव्हतं. आजकाल ज्यांना मुलगा नाही फक्त मुलीच आहेत त्या मुलींना अंतिम संस्काराचा अधिकार मिळतोय हळुहळु पण माझा भाउ असताना मला अग्नि द्यायला मिळणे कठीण वाटत होते. त्यात वडील गेल्याचे दु:ख म्हणजे एकाचवेळी हळवेपणा आणि खंबीरपणा याची सांगड घालत होते. घरातुन वडीलांचे शव बाहेर काढण्यासाठी पुरुषमंडळी आत आली तशी मी ही म्हणाले मी त्यांचा मुलगाच होते मीही तुमच्याबरोबर त्यांना बाहेर काढणार आणि आम्ही सर्वांनी मिळुन त्यांना अंगणात तिरडीवर ठेवले. तिथे बाकीचा कार्यक्रम उरकल्यावर प्रेत उचलायची वेळ आली तेव्हा सर्व पुरुषमंडळी तिरडीला खांदा द्यायला सज्ज झाली , मला बाजुला केले गेले आणि माझी घालमेल वाढली, तितक्यात माझी चुलत बहीण जीचा आम्हा सर्वांवर खुप दरारा आहे तिने सर्वांना थांबवलं आणि पहीला खांदा मला आणि भावाला द्यायला लावला. जी आॅब्जेक्शन घेईल असे वाटत होते तिनेच पुढाकार घेतला कारण तिलाही माझ्या कर्तव्याबद्दल अभिमान होता. माझ्या भावाने मला विचारलं तुला जमेल का? मी म्हंटलं का नाही? अत्यंत भावुक क्षण होता तो , मी जोरजोरात रडतही होते आणि तितकीच खंबीरही होते , अंगणातुन प्रेत रस्त्यावर आणलं तेव्हा सगळी पुरुष मंडळी अवाक! कारण मुलगी तिरडीला खांदा देतीये हे दृश्य आतापर्यंत तरी विरळाच आहे.

पुढे बाकीच्या मंडळींनी खांदा दिला तेव्हा माझ्या बहीणीनेही खांदा दिल्याचे पाहुन समाधान वाटले. आणि मी माझ्या चूलत भावाला जो अतिशय समंजस आहे त्याला सांगुन टाकले की मी ही स्मशानभुमीत येणार. त्याला काय बोलावे हे सुचलेच नाही. ५ मिनिटांवर अॅम्ब्युलन्स उभी होती तिथे गेल्यावर सर्व बायका मागे फीरल्या पण मी स्मशानभुमीवर जाण्याच्या मतावर ठाम होते , माझं पाहुन माझी बहीणही माझ्याबरोबर यायला तयार झाली आणि तिने सर्व बायकांना सांगितले की आम्ही जाणार, कविता जाईल तर मीही तिच्या बरोबर जाणार, माझ्या चुलत बहीणीच्या नवर्‍याने आक्षेप घेतला. मला अॅम्ब्युलन्स मधुन खाली उतरवायचा हट्ट धरला पण माझ्या चुलत बहीणीने आणि चुलत भावाने आमची बाजु उचलुन धरली. स्मशानभुमीवर पोहोचलो आणी सख्ख्या भावाने एका बाजुला लांब उभे राहायला सांगितले त्याला ही मी नकार दिला , आम्हीही चितेजवळ येउच शकतो असे उत्तर मी त्याला दिले. नंतर शवावरचं सामान काढण्याचे काम आणि शवाला उचलुन चितेवर ठेवण्याचे कामही मी इतर भावांच्या बरोबरीने केले. मग माझ्या काकांनी मला आणि बहीणीला बाजुला उभं राहायला सांगितलं पणे तितक्यात माझ्या आत्येभावाने शवाला तुप चोळण्यासाठी मला सांगितले. अत्यंत हळवा क्षण होता माझ्यासाठी पण तितक्याच खंबीरतेने मी ते काम पार पाडलं , भावाच्या जोडीला चितेवर ठेवलेल्या शवावर शेवटची लाकडे ठेवली. आता वेळ आली होती मुखाग्नीची. आता मात्र भाउ मुखाग्निसाठी चितेजवळ उभा झाला आणि तितक्यात माझ्या मोठ्या काकांनी मला सांगितलं की तुला भावावर मुखाग्नि द्यायचाय का ये मग आणि मी लगेचच धावले माझ्या बरोबर बहीणही आली आणि आम्ही तिघांनी चितेला ५ प्रदक्षिणा घालुन मुखाग्नि दिला. देताना शेवटची जोरात हाक मारायची होती वडीलांना. अत्यंत भावुक आणि हळवा क्षण पण खंबीरपणे निभावला.

हळवं असणं वाईट नाही पण तो आपला कमकुवतपणा नसायला पाहीजे. मी खंबीर नसते तर माझी इच्छा ही मनातल्या मनातच राहीली असती आणि मरेपर्यंत तो सल कायम राहीला असता. योग्य वेळी योग्य निर्णय आणि योग्य कृती करणे हे महत्वाचे असते. माझ्या बहीणीचेही मला कौतुक वाटले कारण तिचे शिक्षण जास्त नाही पण तिनेही आईवडीलांची सेवा केली आणि जुनी रीत मोडीस काढुन अंतिम संस्कार केले . तिच्या नवर्‍याने किंवा सासुने अक्षेप घेतला नाही उलट त्यांना आमच्याबद्दल गर्वच वाटला आणि मुलगा असताना ही मुलगा आणि दोन मुली असे तिघांनी एकत्र अग्नि देणे हे कित्येक समाजात पहीलेच उदाहरण ठरले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला तर वाचताना सुद्धा कंठ दाटून आला. खरोखरच तुमच्या जिद्दीला नमन. स्वतः दुःखात असूनही तुम्ही किती त्रयस्थपणे हे लिहीलयं , तुमच्या धाडसाचे खरोखरच कौतुक. तुमच्यासारख्या मुली समाजासाठी आदर्श/रोल model असाव्यात. कसलाही अभिनिवेश नाही लेखनात , अतिशय प्रामाणिक अनुभवकथन, मी थक्क झाले आहे.

हळवेपणा हा रोग आहे.ज्याला होतो.त्याला प्रत्येक गोष्टीचा त्रास होतो.पण तुम्ही योग्य लिहले आहे.योग्यवेळी खंबिर निर्णय घ्यायला हवा पण काहींना भीती ,नातेसंबंध टिकवणे वगैरे यामुळे जमत नाही.
तुमच्या दुखाःत सहभागी आहे.काकांच्या मृतात्म्याला सदगती मिळो.

मोठे धाडस केलेत. जगाच्या रूढी मोडणे हे एक आणि दुसरे denial मध्ये न जाता परिस्थितीला सामोरे गेलात हे त्याहून मोठे धाडस. मुलांना जर चॉईस असता तर कदाचित काही जणांनी तसे केलेही असते कदाचित. तुम्ही डिनायलमध्ये न जाता स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहीलात याचे समाधान मोठे असेल. नाहीतर तुम्हाला मोठी रुखरुख लागली असती. तुमच्या वडिलांना श्रद्धांजली!
डिनायल याचा अर्थ शरीर आणि ती व्यक्ती यांचा संबंध उरलेला नाही हे स्विकारता न येणे. ते फार अवघड असतं Sad

>>>>हळवेपणा रोग आहे>>>>हळवी व्यक्ती हाय मेन्टेनन्स असते. मला राग येतो हळव्या माणसांचा. जरा खुट्ट झालं की तोंड वाकडं. जरा करुण दृष्य दिसलं, वाचलं, म्हणजे हपा, अश्रू.

केपी तुला एक घट्ट मिठी

तुझी आजवरची धडपड बघितली असल्याने तुझे शब्द किती मनापासून आहेत याची खात्री आहे.

साईबाबांवरच्या तुझ्या श्रद्धेने तुला खंबीर होण्याचे बळ दिले आहे. हिच श्रद्धा आणि तुझे मेडीटेशन, रेकी तुला यापुढेही उर्जा देतील.

<<<हळवी व्यक्ती हाय मेन्टेनन्स असते. मला राग येतो हळव्या माणसांचा. जरा खुट्ट झालं की तोंड वाकडं. जरा करुण दृष्य दिसलं, वाचलं, म्हणजे हपा, अश्रू.>>>>

मला राग येत नाही पण सतत रडत बसणं हे कमकुवतपणाचे लक्षण आहे आणि मग अशी व्यक्ती आयुष्यभर दु:खात असते आणि भावनिक दृृृृष्ट्या परावलंबी असते मग जग अशा लोकांचा फायदा घेतं.

>>>>साईबाबांवरच्या तुझ्या श्रद्धेने तुला खंबीर होण्याचे बळ दिले आहे. हिच श्रद्धा आणि तुझे मेडीटेशन, रेकी तुला यापुढेही उर्जा देतील.>>> +१०००
तुमचे लेख मिपावर वाचलेले आहेत आणि मुख्य म्हणजे आय डी लक्षात राहीला इतके आवडले आहेत.

तुम्ही तुमच्या मतांशी खंबीर राहिलात व अश्या परिस्थितीत तुमच्या हक्कांबद्दल जागरुक राहिलात याबद्दल अभिनंदन.

या दु:खातून तुम्ही लवकर सावराल ही सदिच्छा

अस्मिता +१ .
सामो हळवे पणा हा रोग आहे हे एकदा कबूल केलंत ना मग हे ही समजून घ्या कि कोणी मुद्दाम हळवं नसतं हो. काहींच्या हातातच नसतं, येतं पाणी डोळ्यात. राग येउन कसं चालेल?

धनुडी +१
हळवेपणा हा रोग आहे > -१

मोठे धाडस केलेत. जगाच्या रूढी मोडणे हे एक आणि दुसरे denial मध्ये न जाता परिस्थितीला सामोरे गेलात हे त्याहून मोठे धाडस. > +१

कविता,

कठीण प्रसंगात रुढी मोडायचं धार्ष्ट्य दाखवलंत ! अभिनंदन !!
तुमच्याच नव्हे तर जवळच्या / ओळखीपाळखीच्या अनेक कुटुंबांना धडा घालून दिलात. तुमच्या पुढच्यांची वाट सोपी केलीत.

तुम्हाला व तुमच्या भावंडांना पितृशोकातून सावरण्याकरता शुभेच्छा .

कविता,

कठीण प्रसंगात रुढी मोडायचं धार्ष्ट्य दाखवलंत ! अभिनंदन !!
तुमच्याच नव्हे तर जवळच्या / ओळखीपाळखीच्या अनेक कुटुंबांना धडा घालून दिलात. तुमच्या पुढच्यांची वाट सोपी केलीत.

तुम्हाला व तुमच्या भावंडांना पितृशोकातून सावरण्याकरता शुभेच्छा . >>>+1

आता मात्र भाउ मुखाग्निसाठी चितेजवळ उभा झाला आणि तितक्यात माझ्या मोठ्या काकांनी मला सांगितलं की तुला भावावर मुखाग्नि द्यायचाय का ये मग >> तुमच्या धाडसाचे फार कौतुक आणि त्याच बरोबर तुम्हाला साथ दिलेल्या घरातील इतर मंडळीचंही तितकच कौतुक करावसं वाटतंय. मी साधं पाळीतही देव पूजा केली अथवा मंदिरात गेले की सगळ्यांचे रोष ओढवून घेत असते. असो, ह्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी देव तुम्हाला भरपूर बळ देवो.

म्हाळसा

पाळीत देवपुजा करणे हा मुख्यत्वेकरुन बायकांचा बायकांशी लढा आहे तो मी नेहमी लढतेच. अंतिमसंस्कार करणे हा बायकांचा समस्त जगाशी लढा आहे आणि तो ही मुलगा हयात असताना , बर्‍याचदा ३-४ मुले असुनही मोठ्या मुलालाच अंतिम संस्काराचा हक्क मिळतो आणि बाकीच्यांना मुलगा असुनही आणि ईच्छा असुनही मिळत नाही , आमच्या कडे आमचा भाउ असताना आम्ही दोन्ही मुली आणि भाउ असे तिघांनी मिळुन अंतिम संस्कार केले आणि त्याचं समाधानही आहे.

देव तुम्हांला ह्या दुःखातून सावरण्यास शक्ती देवो.. तुमच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली..
कविता तुम्ही बोईसरला रहाता मग मी नक्कीच तुम्हांला भेटायला येईन.. तुमच्या धाडसीपणाच खूप कौतुक वाटलं.

रुपाली विशे—पाटील

अरे वाह , तुम्हीही बोईसरला राहताय की , कुठे राहता बोईसरला

TAPS कॉलनी

नक्कीच

तुमच्या वडिलांना श्रद्धांजली.
तुमचं खरोखर कौतुक वाटतं.

काही वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा पंकजानी अंतिम संस्कार केले होते. सुषमा स्वराज गेल्या तेव्हा त्यांचेही अंतिम विधी त्यांच्या कन्येने केले होते. या दोन्हीचं लाईव्ह टेलिकास्ट झालं होतं, तरीही आपल्याकडे अजून या गोष्टीला लोक सहज स्वीकारत नाहीत.
करोना काळातही तुम्ही धैर्य व संयमाने कर्तव्य पूर्तता केली यासाठी अभिनंदन.

Pages