अनय

Submitted by गंधकुटी on 23 August, 2020 - 12:20

*राधेचा अनय*

फार फार कठीण आहे
त्या राधेचा अनय बनणे
आपल्याच प्राण प्रियेला
दुसऱ्यासाठी झुरताना पाहाणे

कृष्ण, तो तर राजा, देव,
त्याच्याशी कसलं ते झुंजणे
आपलाच अटळ पराभव
अगतिकने स्वीकारणे
फार फार कठीण आहे
त्या राधेचा अनय बनणे

कृष्ण, तो तर अनंत रूपे वावरी
तारणहार, सकलांचे दुःख हारी
त्या सर्वज्ञालाही न कळावे
अनयाचे मूक अश्रू ढाळणे
फार फार कठीण आहे
त्या राधेचा अनय बनणे

कृष्ण, तो मुरारी, छेडी बासरी
मोहित राधिका नाद बावरी
त्या राधेची बनून सावली
तिजसवे युगानुयुगे चालणे
फार फार कठीण आहे
त्या राधेचा अनय बनणे

सांग सोपे कसे असेल बरे
जगावेगळे हे दुःख सोसणे
काळजात रुपणाऱ्या जखमेसाठी
अश्वत्थामासारखे तेलही ना मागणे
फार फार कठीण आहे
त्या राधेचा अनय बनणे,

खरंच, फार फार कठीण आहे
त्या राधेचा अनय बनणे,
त्या राधेचा अनय बनणे...

Gandhkuti

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जन्माष्टमीच्या दिवशी सगळ्यांना राधा आणि. कृष्णाच्या प्रेमाचे भरते येते... तेव्हा सुचली. प्रत्यक्ष देवाबरोबर राधेचा पती अनय स्पर्धा करूच शकत नाही अशा अर्थाने लिहिली आहे.

मला संपूर्ण नीटसे आठवतं नाही... पण पूर्वी कधीतरी वाचल्याचे स्मरते आहे खरे.
सापडली तर पोस्ट करा please. पुन्हा वाचायला नक्की आवडेल.

अरुणा ढेरेंची कविता मी वाचली नाही पण ह्या बाबतीत लिंक मध्ये दिलेले मत पटते. श्रीकृष्ण प्रत्येक गोकूळवासीयाचा जिव की प्राण. सगळ्या गोपीकांचे निरागस प्रेम होते या ८-१० वर्षाच्या निरागस, नटखट मुलावर... हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही. तशी या बाबतीत मतांतरे असू शकतात. एकच सुचवतो . कृपया राग धरु नका. असे विषय हाताळताना काळजी घ्यावी. मनात आलेल्या कल्पनेला लगेच अंतिम स्वरुप देऊ नये.

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!

– अरुणा ढेरे
---------------------------------------------------------------------------------------
कृष्ण- अरुणा ढेरे
तुला नाही सूर्य झाकता आला
आणि घूँघट ओढून अंधार झाला ,असा देखावाही नाही करता आला
राधे ,तुझ्या चेह-यावर त्या दिवशी प्रत्येकाने पाहिली - मुकी कासाविस संध्याकाळ.,
आणि नंतर दूर डोंगरात धडाडून पेटला ...वणव्याचा केशरी जाल

अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा घात केला त्यानं
बिनमोलाचं केलं अवघं आयुष्य एक निरोप घेण्यानं..
हात हललेला तू पाहिलास !
रथ चाललेला तू पाहिलास!
पण खिळून राहिलीस ठायिच, नाही धावलीस मागे आवेशानं..

कळलं न तुला
शेवटी मनापासून मन दूर जातं
तेंव्हा कुणाला कशाचाच अडसर उरत नसतो ..
ना अंगाचा वास ,ना शपथांचा फास
श्वास अडतो की घुसमटतो याचा विचार ही नसतो, जाणा-याच्या मनात .
काल होते हात हातात , आज नाहीत .
संबंधाचा अर्थ सामावतो एवढ्याच साध्या वस्तुस्थितित .

हवं ते हवं तेंव्हा घेतो तो , मिळवतो , खेळवतो , मालावतो .
त्याच्यातून त्याच्याचसाठी उगवतात स्वीकार ..नकार
जग त्याच्याभोवती तो सहज वळवतो

त्याच्या ओळखी‌आड असते एक अदय अनोळख
तो यमुनेच्या जळात कधी कान्हा हो‌उन हसतो ..
तर कधी कालिया हो‌उन डसतो ..
राधे,, पुरूष असाही असतो ...

-अरुणा ढेरे

हा त्या कवितेचा पूर्वार्ध.

मी नेटवर शोधत होते तेव्हा मला या कवितेचे वाचन सापडले, पूर्वी कधी तरी ते वाचले होते, पण पूर्वार्ध पहिल्यांदाच वाचला.
आभारी आहे.

मस्त