बाल-रोप संवर्धन उपक्रम

Submitted by संयोजक on 22 August, 2020 - 11:44

“बाल-रोप संवर्धन उपक्रम”
स्वरूप व माहिती:- घरच्या घरी बियांपासून उगवणार्‍या रोपाचे संवर्धन करणे.
उपक्रमात भाग घेण्यासाठी मुलांनी छोटी कुंडी, अर्धी कापलेली प्लास्टीक बाटली किंवा एखादा रिकामा श्रीखंड-आम्रखंडाचा डबा अश्या कोणत्याही वस्तू मधे धने, बडीशेप, मटकी, मूग, ओवा, झेंडू, तुळस, आलं, पुदिना, लिली, कोरांटी, गोकर्ण, गुलबक्षी इत्यादी पैकी बियांपासून सहज उगवणाऱ्या रोपट्याचं जतन करायचं आहे.
एक महिन्यानंतर संयोजकांनी दिलेल्या लिंक वर मायबोलीकरांनी आपापल्या पाल्याने जपलेल्या रोपट्याचे फोटो अपलोड करावेत.
“पालकांनी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला तरी देखील रोपांची जपणूक आणि त्यांच्या वाढीसाठी लागणारे इवलुसे कष्ट हे मुलांनी स्वत:हून करणे आवश्यक आहे!!”
कारण मुलांना झाडं जोपासण्याची आवड लागावी हाच मुख्य हेतू आहे.

नियम:-
१) कृपया बाहेरून विकत आणलेले कोणतेही रोपटे स्वतःच्या पाल्याच्या नावाने देऊ नये.

२) ज्या रोपट्यांची बियांपासून सहज आणि जलद निर्मिती होते, त्यांचीच लागवड करावी.

३) शक्यतो जे मटेरिअल पाणी, चिखल, सतत ची ओल इ. गोष्टींपुढे टिकेल त्याच्या पात्रा मध्येच बिया पेराव्यात.

४) हा उपक्रम फक्त १३ वर्षांखालील मुलांसाठी आहे. बालरोप संवर्धन उपक्रमाची अंतिम तारीख पुढील महिन्यातील ५ ऑक्टोबर २०२० ही असेल.

५) उपक्रमाची स्टेप बाय स्टेप किमान ३-४ प्रकाशचित्रे द्यावी.
प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे बघता येईल. - https://www.maayboli.com/node/1556

६) Entries आत्तापासून दिल्यासही हरकत नाही. धाग्याच्या शीर्षकामधे “बाल-रोप संवर्धन उपक्रम” असे नमूद करावे.

------------ संयोजक मंडळाकडून हर्दिक शुभेच्छा --------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडला हा उपक्रम.
ह्या वर्षी उपक्रमांची आधी जाहिरात केली नाही का?

आमच्या कडे कन्येने नॅचरल आणि ब्लॉसम कोचर क्रीम च्या डब्यात झेंडू च्या बिया लावल्या
त्याला कोंब तरी फुटलेत
एक महिन्यांनंतर टिकलेले असले तर फोटो टाकू

इथे कोणी कोणी भाग घेतलाय? जरा लिहा ना मंडळी. हा उपक्रम मला फार आवडलाय. उपक्रम पाल्यांसाठी आहे म्हणून नाहीतर घरी आमच्या 'पालकां'नी टोमॅटो आणि मिरची लावलीये सध्या त्याचे फोटू टाकले असते.

मामी
वृद्धत्व हे दुसरं बालपण
त्यामुळे टाकून दे फोटो Happy

अतिशय चांगला उपक्रम आहे.

माबोवरील समस्त पालकमंडळी ज्यांच्या घरात बच्चेकंपनी आहे त्यांनी या उपक्रमात भाग घ्यावा ही मी विनंती करते. मुलांना निसर्गाची गोडी लावा आणि त्यासाठी याहून चांगला उपक्रम असूच शकत नाही. मुलांना एक रोप लावू द्या, मुले स्वतःच पुढची रोपे लावतील.

उपक्रमात भाग घेतलेल्यांनी धागे उघडून प्रवेशिका देण्यास सुरुवात करावी. अंतिम मुदतीपर्यंत तुम्ही तुमच्या धाग्यात बदल करून रोपट्याचे नवीन प्रकाशचित्र समाविष्ट करू शकता. येउद्यात तुमच्या प्रवेशिका.