इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट

Submitted by पाषाणभेद on 24 August, 2020 - 00:22

(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२)

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट

(प्रस्तावना: कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल हे लेखकाच्या मनात आल्याने "इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट" हा पाठ लिहीला आहे. )

जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०१९ च्या दरम्यान झाला होता. या शहरातून इतरत्र तसेच इतर देशात गेलेल्या व्यक्तींमार्फत हा आजार इतर देशांत पसरला. साधारण जानेवारी २०२० च्या शेवटी कोरोना या आजाराची लागण असलेले रुग्ण भारतात सापडले. एप्रिल २०२० च्या मध्यानंतर हा आजार भारतात सर्वत्र पसरला होता.

या आजारात कोवीड विषाणू हवेतून तसेच स्पर्शामधून पसरत असत. त्या काळात या आजारावर कोणतेच औषध तसेच लस उपलब्ध नव्हती. लाखो लोक या आजारामुळे जगात दगावले. अनेक देशांनी आपल्या देशांतील सार्वजनीक व्यवहार अनेक महिने बंद ठेवले होते. जगभरातील विमानसेवा ठप्प होती. इतकेच नव्हे तर अनेक गावेच्या गावे एकमेकांपासून विलग केलेली होती. प्रशासनाच्या परवानगी विना कोणीही व्यक्ती दुसर्‍या गावात प्रवेश करु शकत नव्हता. भारतात देखील प्रशासनाने जिल्हाबंदी, गावबंदी असे उपाय अंमलात आणले होते. सार्वजनीक ठिकाणी वावरतांना तोंडावर रुमाल किंवा मास्क लावणे सक्तीचे होते. दोन व्यक्तीत कमीतकमी तिन चार फुटांचे अंतर राखावे अशी अपेक्षा होती. कोरोना विषाणू स्पर्शाद्वारे पसरत असल्याने वरचेवर हात सॅनिटायझरने किंवा साबणाने धुवावे असे वारंवार सांगितले जात होते.

त्या कालावधीत होणार्‍या परिक्षा रद्द झाल्या होत्या. मात्र शैक्षणिक वर्ष चालू झाल्याने अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग घेणे चालू केले होते. त्या वर्गात दहावी बारावी सारखे मोठे वर्ग तर होतेच पण अगदी बालवाडी, पहिली दुसरीचेही वर्ग होते. शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादींना नवे तंत्र शिकणे, इंटरनेटचा अभाव, मोबाईल, लॅपटॉप आदींची अनुपलब्धता अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यावर मात करत अनेक ठिकाणी शिक्षण चालू झाले होते.

त्या काळात कामगार वर्गाचे फार हाल झाले. लॉकडाऊनमुळे कित्येक कारखाने चार महिने बंद होते. अनेक व्यापारी दुकाने बंद पडली. कित्येकांनी आपले व्यवसाय बदलले. कारखान्यातले कामगार, मजूर आदी आपापल्या गावी परतू लागले. रेल्वे, बस सेवा बंद असल्याने कित्येक कामगार आपले कुटूंबाबरोबर पायी आपल्या गावी जात असणारे चित्र रस्त्यावर दिसत होते. अनेक जणांनी रस्त्यातंच प्राण गमावले. कित्येकांचे पगार होत नव्हते किंवा त्यात कपात केली जात होती. आर्थीक कुचंबणा होत होती. बाजारपेठेत पैशाचे चलनवलन थांबलेले होते. भारतातच नव्हे तर अनेक विकसीत देशांतही परिस्थीती काही निराळी नव्हती.

ऑगस्ट २०२० महिन्यात सार्वजनिक व्यवहार साधारणपणे चालू करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली. त्यामध्ये सुरूवातीला काही बाजारपेठा सम आणि विषम पद्धतीने चालू करणे, मोठे मॉल्स बंद ठेवणे, चित्रपट गृहे बंद ठेवणे, हॉटेल व्यवसाय बंद, बस सेवा चालू जरी असली तरी त्यात ई-पास आणि दोन प्रवासीदरम्यान अंतर राखणे आदी पद्धती अवलंबल्या गेल्या.

जागतीक आरोग्य संघटना अर्थात डब्लू.एच.ओ. ने या आजाराविषयी विश्वासार्ह माहिती देण्याचे काम केले नव्हते. त्यांच्या वेळोवेळी प्रसारीत होणार्‍या बातम्यांबद्दल दुमत व्यक्त केले जात होते. जगात चीन देशानेच हा आजार मुद्दाम तयार केला आणि पसरवला याविषयी मत बनत चालले होते. अमेरीकेसहीत अनेक देशांनी याबाबत चीनविरूद्ध उघड भुमिका घेतल्याने जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंभरठ्याच्या दिशेने जात आहे की काय अशी शंका वेळोवेळी येत होती. संपूर्ण जगाचे राजकारण कोरोना या आजाराभोवतीच फिरत होते.

अनेक देशांतील औषधे निर्माण करणार्‍या किंवा संशोधन करणार्‍या संस्थांनी या आजारावर प्रतिबंधक लस निर्माण करण्याचे संशोधन सुरू केले होते. त्यात यश मिळण्याचे प्रमाण मात्र अगदी नगण्य होते. ऑगस्ट २०२० महिन्याच्या मध्यावर रशीया देशाने सर्वप्रथम कोरोना आजारवरची लस बनवल्याचे आणि ती लस बाजारात आणल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु या लशीच्या यशाच्याबाबत बरेच देश आणि जागतीक आरोग्य संघटनाच साशंक होत्या.

कोरोना या आजारानंतर सर्वसामान्य मानव समाजाची जीवन जगण्याची शैली बदलली होती. सार्वजनीक उत्सव, सण, समारंभ एवढेच नाही तर दुख:द प्रसंगी जमावाने एकत्र येणे टाळले जात होते. एकमेकांच्या घरी सहज जाणे, गप्पा मारणे आदी लक्षणीय रित्या कमी झालेले होते. बाजारात जातांना किंवा घराबाहेर पडतांना तोंडाला मास्क लावूनच पडावे लागत होते. हात साबणाने धुणे, सॅनिटायझर वापरणे आदी सवयी लोकांच्या अंगवळणी पडले होते. पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पीटलमधील सेवा देणारे, नगर/महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी यांनी या काळात जीवाची पर्वा न करता काम केले. लॉकडाऊन काळात बंदोबस्त ठेवून पोलीस आणि प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. कित्येक डॉक्टर तसेच नर्सेस हे इतरांवर उपचार करतांना दगावले.

कोरोनासारखा आजार, निसर्ग वादळ या नावाचे महाराष्ट्रावर आलेले संकट, बेरोजगारी, व्यापार, व्यवसाय कमी होणे, नोकर्‍या जाणे, बंद शाळा, आर्थिक चणचण, बदललेली जीवनशैली अशा अनेक अर्थांनी साल २०२० हे एक वेगळेच वर्ष आहे हे जाणवत होते. जागतीक स्तरावरील ही स्थिती कशा प्रकारे बदलेल आणि पूर्वीचे जीवन कसे सुरळीत होईल याविषयी सर्वांच्याच मनात शंका होती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धडावर प्रश्नोत्तरे सोडवायची नाहीत ह्याचा आनंद झाला. शब्दार्थ हवे होते
उदा: करोना, इंग्रजी शब्द laptop , mask etc मराठी करण झालेले असेल का ?
कार्यक्रुती : ह्या धड्याचे नाट्यांतर करा....

छान. यात डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस व नगर/महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अतोनात कष्ट केले याचा उल्लेख केल्यास कसे राहील?

जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०२० >>>इथे २०१९ हवं ना?